आमचा 'फेक फेमिनीझम'..!!

आमचा 'फेक फेमिनीझम'..!!

आज महिला दिन. तसा तो रोज आमचाच दिवस असतो म्हणा.... आम्ही कोण म्हणून काय विचारता? आम्ही स्वतःला फेमिनिस्ट म्हणवतो.. काय? तुम्हाला माहीत नाही आम्ही कोण ते? आम्ही म्हणजे सोयीशास्त्रानुसार वागणाऱ्या बायका-मुली. अजूनसुद्धा नाही कळलं? अहो, म्हणजे आम्हाला वाटेल, पटेल, रुचेल तेव्हा आम्ही स्त्री-मुक्तीवादी नाहीतर मग पारंपरिक. 
आता उदाहरणं पण देऊ का? छान, आजूबाजूला एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही वावरत असूनसुद्धा तुम्हाला उदाहरणं लागतात?? काय हे!!! आम्ही ना एखादी गोष्ट फक्त 'मुलगे करतात' म्हणून करतो. स्वतःला ते पटतं म्हणून नाही. 

आम्हाला मानवजातीला mankind म्हणलं कि ते स्त्री-विरोधी वाटतं. आम्हाला स्वयंपाक करणं हे टिप्पिकल बायकी वाटतं म्हणून आम्ही स्वयंपाकघरात जात नाही. कारण आमच्या मते आजपर्यंत स्त्रिया जे करत आलेल्या आहेत त्याला मोडीत काढणं म्हणजे फेमिनीझम...
एखादा मुलगा आम्हाला जाड म्हणाला तर आम्ही त्याला तो त्याचे शब्द मागे घेईपर्यंत सुनावतो. आणि तसं सुनावताना त्यालाच जाडा, ढोल, ढब्बू म्हणतो. एखाद्याच्या व्यंगावर, शरीर प्रकृतीवर टीका करणं चुकीचं आहे हे आमच्या ध्यानीमनी नसतं. आम्हाला फक्त एवढंच कळतं की तो 'आम्हाला जाड म्हणाला.' आणि त्याला चूक कबूल करायला लावणं म्हणजे फेमिनीझम.

आम्ही बसच्या गर्दीत एखाद्या दमलेल्या बाप्याला लेडीज सीटवरून उठवतो कारण तो आमचा हक्क आहे. मग माणुसकी गेली तेल लावत... आम्हाला पुरुषांइतकाच पगार हवा असतो, मात्र आमच्या मते त्याने एकट्यानेच घरखर्चाची जबाबदारी घ्यायला हवी. कारण आमचा पैसा हा 'आमचा' पैसा आहे.. आणि त्याचा पैसा हा दोघांचा पैसा आहे...
आम्ही मुलं जन्माला घालू शकतो म्हणून स्वतःला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ समजतो. पण त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पुरुषाचासुद्धा वाटा आहे हे सोयीस्कररीत्या विसरतो. 

अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवायला आमचा विरोध नाही, कारण नात्यांत एकनिष्ठ असणं पारंपरिक आहे; आणि या पारंपरिक विचारांना मात्र आमचा विरोध आहे! ब्रा-स्ट्रॅप दाखवण्यात काही गैर नाही असं म्हणून काय वाट्टेल ते घालणं किंवा पीरिअड्सच्या वेळेस पॅड न वापरणं का तर ते नैसर्गिक आहे. 'त्यात लाजण्यासारखं काय' (?!) असं म्हणून त्यावर व्हिडिओ शूट करणं, मोठी आर्टिकल्स लिहिणं इथपर्यंतच आमचा फेमिनीझम.

विचारवंत म्हणतात 'फेमिनीझमचा खरा अर्थ समानता, पुरुषांचा किंवा पौरुषत्वाचा दुस्वास नव्हे. स्त्री आणि पुरुषांमधील काही मूलभूत बदल (शारीरिक आणि मानसिक) लक्षात घेऊन त्यानुसार एकमेकांना पूरक होईल असं वागण्याची मानसिकता म्हणजे फेमिनीझम. स्त्रीला किंवा पुरुषाला स्त्री, पुरुष असं विभागण्याआधी ते माणूस आहेत हे लक्षात घेणं म्हणजे फेमिनीझम..' पण छे! आमच्यासाठी फेमिनीझम म्हणजे 'आम्हाला आयुष्यभर कोणीतरी उपेक्षेने मारून टाकलं आहे आणि आता आम्ही त्याचा बदला घेणार या वल्गना करत केली जाणारी कृती!!'

लोकांनी आम्हाला समजवायचा प्रयत्न केला तरीही आम्ही त्यांचं ऐकत नाही. आमच्या अशा वागण्यामुळे ज्या मुली-बायका स्वतंत्र विचाराच्या आहेत, स्वतःहून काहीतरी करून दाखवावं, पुरुषप्रधान जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून धडपडत आहेत. यशाची शिखरं गाठत आहेत. शहरांमध्ये, खेड्यांत जिथे 'फेमिनीझम' कशाशी खातात हेही माहित नाही तिथेसुद्धा त्या बायका-मुली स्वतःच्या कणखरपणामुळे उठून दिसत आहेत. आमच्या फेमिनीझमच्या व्याख्येमुळे त्यांनासुद्धा कमी लेखलं जातंय. पण आम्हाला त्याचं काय.. आम्ही आमच्यातच मग्न आहोत..
तर मंडळी, आता कळलं ना 'आमचा' फेमिनीझम म्हणजे काय ते!!!

ता.क.- पोस्ट उपरोधिक आहे. शब्दशः अर्थ घेऊन विपर्यास करू नये!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com