गोष्ट एका कारची (प्र. ह. जोशी)

p h joshi
p h joshi

"त्या गद्रेबाई म्हणाल्या, की मेषेला गुरू मार्गी झालाय. त्यांचा अभ्यास चांगला आहे. मी काय म्हणते आता आपण कार घेऊ. तुमची स्कूटर आता अजित चालवेल,'' पत्नी. ""पडला म्हणजे?'' मी. ""काहीही काय! अजित सध्या सायकलनं कॉलेजला जातोय. म्हणून मी म्हणते- कार घ्या. परवा प्रमोशनही झालंय. आता कारनं ऑफिसला जात जा.''आता मला "नको' म्हणण्याचा कोणताच मार्ग दिसेना. म्हणून म्हटलं ः ""बघू.''

"अहो ऐकलं का?'' स्वयंपाकघरातून कुकर लावत असताना पत्नीचा प्रश्‍न.
माझी देवपूजा संपली हे तिला कसं कळलं कोण जाणे. बहुधा ताम्हण, पळी, पंचपात्र आवरून ठेवल्याचा आवाज तिनं ऐकला असावा. अशा बाबतीत तिचे कान तीक्ष्ण! मी उठायच्या आत ती मागं येऊन उभीच राहिली.
""मी काय म्हणते?''
मी शांतपणे ः ""काय?''
ती धमकी दिल्यासारखं म्हणाली ः ""बाहेर या, सांगते.''
मी मनांत म्हटलं ः "बापरे!'
""बसा'' असं म्हणत ती स्वतः सोफ्यावर बसली. मी समोरच्या खुर्चीत. ""काय? म्हणून विचारलं नाहीत? तुम्ही नेहमी तंद्रीत असता,'' ती.
""बरं, काय?'' ""परवा भाऊजी म्हणत होते, त्या गावाकडच्या जमिनीला गिऱ्हाईक आलंय; विकून टाकावी.''
मी काही म्हणायच्या आत, स्टडीरूममधून बारावीचा अभ्यास करणाऱ्या चिरंजीवाचा आवाज ः ""होय बाबा, आई म्हणते ते खरं आहे.''
मनांत आलं, या मुलाच्या वयात आम्हाला जुनी सायकल विकून नवीन घ्या असं वडिलांच्या समोर म्हणण्याचं धाडस नव्हतं आणि आता वडिलोपार्जित जमीन विकून टाका असा सल्ला मुलं देताहेत. ही पुढची पिढी!
""कुठली जमीन?'' मी उगाच.
""जमिनी काय दहा आहेत? एक तर आहे त्या माळावरची. तिथं धड गवतही उगवत नाही,'' पत्नी.
मुलगा अभ्यास थांबवून बाहेर आला. मी रागरंग ओळखून म्हटलं ः ""बघू मी दिगूशी बोलतो.''
आपलं काम साध्य झालं असं वाटून पत्नी आणि मुलगा आपापल्या कामाला लागले. खरं तर ती माळावरची जमीन वडिलांनी का घेतली होती हे कळलं नव्हतं. एक शंका होती, त्या जमिनीच्या मालकाला वडिलांनी काही कर्ज दिलं असावं, त्यानं ते फेडलं नसावं. पुढं त्याचं निधन झालं. नशीब, त्या कर्जाच्या बदलात ती जमीन द्यायला त्याची मुलं तयार झाली, म्हणून त्यांनी ती स्वतःच्या नावावर करून घेतली असावी.
परवा पेपरमध्ये आलेलं भविष्य वाचलं होतं ः "गुरू मार्गी झालाय, इस्टेटीची कामं होतील.' मी खरं तर अशा भविष्यावर विश्‍वास ठेवत नाही, तरी वाचतो.
महिन्याभरात त्या जागेचे व्यवहार झाले. चार लाख आले. दिगूला दोन लाख आणि मला दोन लाख.
दोन महिन्यांनी पुन्हा एकदा स्वयंपाकघरातून ः""अहो ऐकलं का?'' माझी पूजा आटोपलेली. "बाहेर या सांगते' असंही म्हणायच्या आत मी बाहेर येत कोचावर बसलो. पत्नी समोर. ""काय?'' मी विचारलं.
""त्या गद्रेबाई म्हणाल्या, की मेषेला गुरू मार्गी झालाय. त्यांचा अभ्यास चांगला आहे.'' ""हो वाचलं मीसुद्धा.'' मी.
""मी काय म्हणते आता आपण कार घेऊ.'' ""गुरू भरणार आहे का पेट्रोल त्यात?'' माझा विनोद.
""तुम्ही म्हणजे असे आहात ना!'' ती लाडात. ""मी काय म्हणते, तुमची स्कूटर आता अजित चालवेल.''
""पडला म्हणजे?'' मी.
""काहीही काय! अजित सध्या सायकलनं कॉलेजला जातोय. म्हणून मी म्हणते- कार घ्या. परवा प्रमोशनही झालंय. आता कारनं ऑफिसला जात जा.''
मी मनात म्हटलं ः "बऱ्याच बऱ्याच पुढच्या विचारांनी गावाकडची जमीन विकायचा घाट घातलेला दिसतो.'
""दिनूकाकाही कार घेणार आहेत...'' चिरंजीवांचा खोलीतून आवाज.
आता मला "नको' म्हणण्याचा कोणताच मार्ग दिसेना. म्हणून म्हटलं ः ""बघू.''
एका सायंकाळी पत्नी बागेतून फिरून आली. तिथं तिच्या पाच-सहा मैत्रिणी जमतात, गप्पा मारतात, चालणंही होतं आणि रोजची ख्याली खुशाली.
मला एकट्याला पाहून म्हणाली ः ""अहो, त्या गद्रेबाईंची कार विकायची आहे म्हणे. दोनच वर्षं झाली आहेत घेऊन. ते ती विकून नवी घेताहेत. ऑफिसकडून त्यांना स्वस्तात लोन मिळतं म्हणे.''
...मला ना, ही घरातली मंडळी बरोबर घेरतात. या बुद्धिबळाच्या डावात मी नेहमी हरतो.
""गुरू मार्गी झालाय; पण शनी वक्री आहे ना!'' मी. मला कार विकत घ्यायची नव्हती. तो एक पांढरा हत्ती आहे असं माझं मत होतं; पण घरात, दारात, लोकशाही आहे ना! घरांत मेजॉरिटी पत्नी आणि मुलाची. मी एकटा बापडा.
शेवटी गद्रेंची कार घ्यायचं ठरलं- फक्त दोन लाख!
कार बघून आलो. एकदा ड्रायव्हरच्या सीटवर बसून स्टिअरिंग हातात धरून बघितलं. मुलानं काही कळत असल्यासारखं मागची डिकी उघडून आत डोकावून पाहिलं. पत्नी दूर उभी राहून एकटक त्या कारकडं पाहत होती. दृश्‍य फार छान होतं.
घरी आल्यावर कळलं, की पत्नी एवढं निरखून काय पहात होती. घरी आल्याआल्या म्हणाली ः ""मला रंग फार आवडला.'' एखादी साडी आवडल्यासारखं सांगत होती.
""मलाही आवडला,'' चिरंजीव.
मी मात्र पांढरा पडत चाललो.
आमच्या ऑफिसमध्ये एक गोरे नावाचे ऑफिसर आहेत, त्यांना भविष्य कळतं. मी त्यांच्याकडं गेलो. मी काही म्हणण्याच्या आत ते म्हणाले ः ""काय जोशी, कार घेणार आहात म्हणे.'' मी आश्‍चर्यचकित!! यांना कसं कळलं? का माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय? मग कळलं, की माझी पत्नी आणि त्यांची पत्नी मैत्रिणी-मैत्रिणी.
""हो, विचार आहे. तेच तुम्हाला विचारायला आलो होतो, घेऊ का नको म्हणून. ग्रहमान कसं आहे?''
त्यांनी प्रश्‍नकुंडली मांडली. कुंडलीतल्या बारा घरावर बोटं फिरवत म्हटलं ः ""एकूण तुम्ही विचारलेल्या प्रश्‍नाची वेळ चांगली नाही. काम होईल असं दिसत नाही.''
घरी आल्यावर पत्नीला हे सांगितलं, तर ती म्हणाली ः ""ते काय सांगताहेत? त्यांना काय कळतं!'' ""बाबा, घ्यायचीच हं,'' चिरंजीव.
आम्ही गद्रेंच्या घरी गेलो. कार घ्यायचं ठरल्याचं सांगितलं. ते म्हणाले ः ""ठरलं मग. मला माझी कार तुम्हाला विकतोय याचा आनंद होतोय; पण एक करू, व्यवहार पुढच्या महिन्यात करू. माझ्या भावाच्या मुलीचं जळगावला लग्न आहे, त्याला कार लागणार आहे...''
मी मनात म्हटलं ः ""चला, तेवढंच एक महिन्याचं व्याज तरी सुटेल!''
गद्रेंच्या मुलीचं थाटात लग्न झाले. मंडळी सगळी परत आली; पण कार आली नाही.
दुसऱ्या दिवशी पत्नीचा बेडरूममधून आवाज ः ""अहो ऐकलं का?''
"आता काय?' मी मनात.
""अहो, आपण घेणार होतो ना ती कार, त्यांच्या भावाला आवडली म्हणे. त्यामुळं आपल्या नशिबात नव्हती,'' पत्नी.
मला गोरेंचे शब्द आठवले ः "काम होणार नाही असं वाटतंय.' मी उगाचच मोठ्यानं म्हटलं ः ""काय म्हणतेस? एकूण नशीब वाईट्ट!!''
नंतर एकदा गोरे घरी आले. ते इन्व्हेस्टमेंटचीही कामं करतात. त्यांनी पत्नी, मुलाला पटवून दोन लाखांची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकीटं घ्यायला लावली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com