खरे शिक्षण महर्षी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरे शिक्षण महर्षी

खरे शिक्षण महर्षी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अशिक्षितपणामुळे व्यवसाय करताना हरेकला हजब्बा यांना पदोपदी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा एक परदेशी पर्यकटांची जोडी त्यांच्या दुकानावर फळ खरेदी करायला आली; पण त्यांना फळांची किंमत इंग्रजीत सांगता न आल्याने हरेकला यांना फळांची विक्री करता आली नाही. केवळ आशिक्षितपणामुळे आपल्याला ग्राहकांना परत पाठवावे लागले, ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली.

एखाद्या माणसाची खरी ओळख त्याच्या कार्यावरून होत असते. त्याच्याकडे किती पैसा आहे, याला फारसे महत्त्व नसते. काही व्यक्तींजवळ अमाप संपत्ती, गडगंज मालमत्ता असते; मात्र विधायक व रचनात्मक कार्य करण्याची त्याची इच्छा नसते, असे लोक पैसा पैसा करतात. मात्र त्यांच्यात सेवाभाव नसतो. इतरांचा विचार न करता केवळ स्वतःपुरते जीवन जगणारे आपल्या अवतीभवती असंख्य लोक दिसतात. काही व्यक्तींजवळ काहीच नसते. परंतु मेहनत, परिश्रम करून समाजासाठी काहीतरी वेगळे कार्य करण्याची जिद्द त्यांच्यात असते. काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. असे लोक स्वतःचा उदरनिर्वाह करताना विधायक कामेदेखील करतात. अशा लोकांची समाज, सरकार दखल घेते. असे लोक समाजासाठी आदर्श ठरतात. असे व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्नाटकात फळ विकणारे हरेकला हजब्बा. हरेकला हजब्बा हे संत्रा विक्रेते. व्यवसाय खूप लहान, मात्र त्यांचे ध्येय व कार्य खूप मोठे. आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून त्यांनी कर्नाटकातील नेवापडू गावात शाळा बांधून शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले.

हरेकलासारख्या एका अशिक्षित व्यक्तीला शिक्षणाचं महत्त्व कळलं. हरेकला हजब्बा अशिक्षित. गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. मात्र शिक्षणचं महत्त्व त्यांना कळलं. इतरांच्या शिक्षणाची सोय व्हावी, ही विलक्षण तळमळ त्यांच्या ठिकाणी होती. म्हणून त्यांनी शाळा उघडली. यामुळे ते खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी ठरतात. १९७७ पासून ते मंगरूळ येथील हंपनकट्टा मंडईमध्ये संत्री विकतात. वास्तविक पाहता शिक्षण संस्था किंवा शाळा या समाजाच्या आस्थेचा विषय आहेत. या राष्ट्रनिर्मितीच्या कारखाना असून, यातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी देशाचा व समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडला पाहिजे. मात्र हा उदात्त हेतू शिक्षण सम्राटांजवळ आहे का? शिक्षण देण्याच्या नावावर शिक्षण सम्राटांनी शिक्षणाला उद्योग बनवून टाकले. शिक्षण देण्याच्या व नोकरी देण्याच्या निमित्ताने लाखो व कोट्यवधी रुपयांची उलाढाल आज या उद्योगात होत आहे. हे खरे शिक्षण महर्षी की हरेकला. ज्यांनी केवळ फळ विक्रीतून शाळा उघडली? याचा विचार आपणच करायचा आहे.

हरेकला हजब्बा दक्षिण कन्नडच्या न्यू पहाडू गावाचे रहिवासी. ते ६८ वर्षांचे असून, अनेक वर्षांपासून ते फळविक्रीचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करताना त्यांना पदोपदी आपल्या आशिक्षितपणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा एका परदेशी पर्यकटांची जोडी त्यांच्या दुकानावर फळ खरेदी करायला आली; पण त्यांना फळांची किंमत इंग्रजीत सांगता न आल्याने हरेकला यांना फळांची विक्री करता आली नाही.

केवळ आशिक्षितपणामुळे आपल्याला ग्राहकांना परत पाठवावे लागले, ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली. आपण शिक्षण घेऊ शकलो नाही, आपल्याला ती संधी मिळाली नाही म्हणून काय झालं. आपण आता आपल्या गावातील इतर मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायचीच, या उदात्त हेतूने हरेकला यांना पछाडलं. सन २००० मध्ये त्यांनी उराशी बाळगलेलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हरेकला येथे त्यांनी त्याच वर्षी एक प्राथमिक शाळा बांधली. प्राथमिक शाळेनंतर २००८ मध्ये त्यांनी माध्यमिकचे वर्ग सुरू केले. यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. या शाळेत १० ते १४ वर्षांच्या मुलांना शिकवले जाते. सुरुवातीला शाळेत २८ विद्यार्थी होते. आज या शाळेत १७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी कर्ज काढले. या महान कार्यामुळे ते अक्षरसंत म्हणून ओळखले जाऊ लागले. हरेकला यांच्या कार्याची जसजशी ओळख होऊ लागली तसतसा त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला लागला.

त्यांचे कार्य, संघर्ष वृत्तपत्रांमधून प्रकाशित व्हायला लागले. ही बाब कर्नाटक सरकारला समजताच सरकारने त्यांच्या शाळेच्या इमारतीसाठी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली. हरेकला यांच्या कार्याचा गौरव म्हणून २०१२ साली सीएनएन व बीबीसी या दोन आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी त्यांचा गौरव करणाऱ्या महितीपटांचे प्रसारण केले. मग त्यांची ओळख जगाला झाली. असंख्य लोकांनी त्यांच्या शाळेला देणग्या देण्यास सुरुवात केली. लवकरच या शाळेच्या कामात एक अजून मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या शाळेच्या परिसरात एक महाविद्यालय आकारास येत आहे. एक फळविक्रेत्याच्या संघर्षाला पद्मश्रीच्या रूपाने मिळालेला सन्मान हा खऱ्या अर्थाने संबंध गावसाठीच नव्हे तर अनेकांसाठी अभिमानाची बाब आहे.

- प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल , नागपूर

loading image
go to top