पाकिस्तानातील जाफर एक्स्प्रेस या रेल्वेवर बलोच बंडखोरांनी हल्ला करून त्यातून प्रवास करणाऱ्या अनेक लष्करी जवानांना तसेच सामान्य प्रवाशांनाही ठार केलं. दोन दिवस साडेचारशे प्रवाशांना ओलीस ठेवलं. यातून पाकिस्तानमधीलल बलोच प्रश्न पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
रेल्वेवरील हा हल्ला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश म्हणून दाखवला जातो आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्करानं कारवाई करून ३३ बंडोखोरांना ठार केलं आणि ओलिसांना सोडवलं असं जाहीर केलं. पाठोपाठ बलोच बंडखोरांनी त्यांच्या कारवाईचं यश नाकारणारी भूमिका जाहीर करत आपण ओलिसांना मुक्त केल्याचं सांगितलं.
या दाव्याची सत्यता पडताळणं कठीण आहे. मात्र यातून बलुचिस्तानातील खदखद उग्रपणे समोर आली. पाकिस्तानसाठी सर्वाधिक डोकदुखीचा भाग आहे तो या भागात प्रशासन चालवणं आणि नियंत्रण ठेवणंच कठीण बनतं आहे. सूर्यास्तानंतर बलुचिस्तानच्या बहुतेक भागात बंडखोरांचं राज्य असतं.
पाकिस्तान सध्या दहशतवादाला बळ देण्याच्या आपल्या कर्माची फळ देशातच भोगतो आहे. तेहरिक-ए-तालिबान - पाकिस्तान सारखं संघटन तिथल्या लष्करासमोर आव्हान बनून उभं आहे. धार्मिक कट्टरपंथीयांचं आव्हान असतानाच बुलचिस्तानमधील अशांतता भर टाकते आहे.
बलुचिस्तानातील बंडखोरी पाकिस्तानसाठी अधिक काळजीची, कारण त्या या बंडखोरांना सामान्यांचा असलेला पूर्ण पाठिंबा. असं घडतं, तेव्हा केवळ लष्करी बळावर प्रशासन चालवता येत नाही.
बलुचिस्तानची कथा एखाद्या घटकाकडं कायम दुर्लक्ष करीत राहिल्यानंतर येणाऱ्या टोकाच्या प्रतिक्रियेची आहे. बलोच बंडखोरीला पाकिस्तान हा स्वतंत्र देश झाल्यापासूनचा इतिहास आहे, किंबहुना त्याही आधीपासून त्याची मुळं दाखवता येतील. पाकिस्तानच्या एकारलेल्या वाटचालीला आलेलं काटेरी फळ म्हणजे बलुचिस्तानची सध्याची चळवळ.
ब्रिटिश जोखडातून भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश फाळणीसह अस्तित्वात आले, तेव्हापासून दोन देशांनी स्वीकारलेला दृष्टिकोन निराळा आहे. भारतानं देशातील वैविध्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. ज्यातून स्वातंत्र्यावेळी अनेकांना हा देश कसा एकत्र कसा राहील ही शंका होती, ती फोल ठरली. सगळ्यांच्या आकांक्षा सामावून घेता येतात.
त्यातून देशाची एकात्मता आणि राष्ट्रवाद अधिक बळकट आणि रचनात्मक होऊ शकतो, हे ही वाटचाल दाखवते तर पाकिस्ताननं मात्र क्रमाक्रमानं एकारलेली वाटचाल स्वीकारली. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा मधील अस्वस्थेतेचं मूळ कारण त्यात आहे. भारतात अनेक धर्म, वंश, भाषा, प्रांत त्यासोबतच्या अस्मिता जमेस धरूनही एकत्र राहतात.
कारणपरत्वे ताण आले तरी मार्ग काढता येतो हे सामावून घेण्याच्या वाटचालीतून साधतं. पाकिस्ताननं मात्र धर्म हाच देशाचा आधार बनवला. त्यातही एकाच प्रांताचं वर्चस्व लादायचा प्रयत्न केला. त्याचे पाकिस्तानच्या अखंडतेला ग्रासणारे परिणाम दिसू लागले आहेत.
केवळ एक धर्म असणं आधुनिक राष्ट्र - राज्य साकारण्यात पुरेसं नसतं, हा धडा खरंतर पाकिस्तानला अत्यंत अपमानास्पद रीतीनं बांगला देश निर्मितीनं शिकवला होता. जी चूक पाकिस्तान तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकांच्या संदर्भात करीत होता, तीच बलुचिस्तानातील बलोच लोकांसोबत करत राहिला.
धर्म एक असला तरी बंगाली जनतेची आकांक्षा आणि अस्मिता यांना पाकिस्तानातील पंजाबी मुस्लिमांच्या वर्चस्वाखाली राहावं ही मानसिकता पाकिस्तान तोडणारी ठरली होती. हे तुटणं धर्म वाचवू शकला नव्हता. यातून पाकिस्तानचं धोरण मात्र काही बदललं नाही. बलुचिस्तानात तर वांशिक वेगळेपणाची जाणीव आणखी टोकदार आहे.
पाकच्या राज्यव्यवस्थेनं बलुचिस्तानबाबत पुन्हा पुन्हा विश्वासघात आणि धोका देणारी कृती केली. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानसोबत राहायचं नाही, ही भावना वाढत गेली. म्हणूनच रेल्वेवर हल्ला किंवा अधून मधून पाकिस्तानी लष्कर किंवा पाक आणि चीनच्या एकत्रित प्रकल्पावरील हल्ले हा पाकिस्तानातील केवळ कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा नाही.
लोकांच्या आकांक्षा आणि विकासात सहभागी होण्याच्या अधिकारांना चिरडत पंजाबी मुस्लिमांचा वर्चस्ववाद लादण्याच्या विरोधातील त्या दृश्य प्रतिक्रिया आहेत. हे दुखणं त्याहून खोलवर गेलं आहे. पाकिस्तान त्यावर सोपा उपाय शोधू पाहतं.
ते संख्येनं आणि सामर्थ्यानं पाकिस्तानच्या लष्कराच्या तुलनेत नेहमीच कमजोर असलेल्या बलोच बंडखोरांना बळानं मोडायचा प्रयत्न करायचा आणि तिथल्या सगळ्या असंतोषाचं खापर भारतावर फोडायचं. यातून पाकमधील मुख्य प्रवाहातील नॅरेटिव्ह वर नियंत्रण ठेवता येतही असेल मात्र मागच्या सहासात दशकांत बलुचिस्तान अधिकाधिक दुरावत चालला आहे, हे वास्तव बदलत नाही. ते अधिक गंभीरपणे रेल्वेवरील हल्ल्यानं पुढं आलं आहे.
पाकिस्तानशी बलुचिस्तानच्या मतभेदांची कहाणी स्वातंत्र्यासोबत सुरू होते. तेव्हा संस्थानं तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र होणार होती मात्र त्यांना भारत किंवा पाकिस्तान या दोन सार्वभौम देशांतच सामील व्हावं लागेल हे उघड होतं. बलुचिस्तानातील कलात हे असंच संस्थान होतं. तेथील खानास आपल्याला स्वतंत्र राहता येईल असं वाटत होतं.
त्यानं बॅ. जिनांना आपला वकील म्हणून नियुक्त केलं होतं. साहजिकच सुरुवातीला जिनाही कलातच्या स्वतंत्र राहण्याविषयी सकारात्मक होते. फाळणी झाल्यानंतर मात्र जिनांनी यू टर्न घेतला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच मुस्लिम देश या ओळखीत सारे सामावले पाहिजेत, यासाठी आग्रह धरायला सुरुवात केली.
प्रत्यक्षात त्याचा अर्थ पाकिस्तानातील पंजाबी दबदबा कायम राहील, याची बेगमी करणं असाच होता. कलातच्या दारात पाकिस्तानी सैन्य आल्यानंतर संस्थान विलीन झालं पण खानाच्या भावानं बंड करून लष्कराला आव्हान दिलं. तेव्हापासून बलुचिस्तान वेगळा व्हावा ही मागणी पूर्णतः कधीच संपलेली नाही.
१९५४ मध्ये भूतपूर्व कलातचा वारस खान नवरोज खान यांन बंड पुकारलं, तेव्हा निमित्त होतं ते पाकिस्ताननं बलुचिस्तानचं प्रांत म्हणूनही वेगळं अस्तित्व संपुष्टात आणलं आणि पाकिस्तानचा एकच प्रांत जाहीर करण्याचं. हे बंड संपवताना पाकिस्नाने खानाला दिलेली आश्वासानंही पाळली नाहीत.
१९६३ मध्ये पुन्हा एकदा बलोच लोकांनी पाकिस्तानच्या विरोधात सशस्त्र लढा दिला, तेव्हा नैसर्गिक स्रोतांवरील मालकी मान्य करा, ही मागणी होती. ७० च्या दशकात बलोच बंडखोरांनी पाकिस्तानविरोधात युद्धचं पुकारलं, यात दोन्ही बाजूनं सुमारे नऊ हजार जणांचा बळी गेला. पाकिस्तानला आपल्याच देशात बॉम्बफेक करावी लागली.
जनरल झिया यांनी भुट्टोचं शासन उलथवल्यानंतर ही कारवाई थांबवून सर्वांना सरसकट माफी जाहीर केली. त्यानंतर बराच काळ शांत असलेल्या बलुचिस्तानात ताजा संघर्ष सुरू झाला तो २००४ पासून. पाकिस्तान आणि चीननं संयुक्तपणे सुरू केलेले प्रकल्प हे त्याचं तात्कालिक कारण होतं. बलोच बंडखोरीच्या अशा प्रत्येक लाटेवेळी पाकचा प्रतिसाद विरोध चिरडणारा होता.
तसंच वाटाघाटीत दिलेली आश्वासनं वाऱ्यावर सोडून देणारा होता. यातून पाकिस्तानमधील सर्वांत मागासलेला भाग असलेल्या बलुचिस्तानात खदखद कायम राहिली. बलुचिस्तानचा पाकिस्तानच्या भूमीतील वाटा सुमारे ४४ टक्के आहे तर लोकसंख्येत अवघा पाच टक्के. तसचं टोकाची गरिबी आहे.
हाच भाग पाकिस्तानमधील सर्वाधिक खनिजसंपत्तीनं भरलेला आहे. ही खनिज संपत्ती पाकिस्तानमधील सगळ्या राजवटी ओरबाडून पंजाब आणि सिंध प्रांताना देतात ही बलुचिस्तानची तक्रार आहे. यात अलीकडं भर पडली ती चीनच्या मदतीनं पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची.
चीन पाकिस्तान इकॉनॉमि कॉरिडॉर या चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग असलेल्या योजनेतील अनेक प्रकल्प बलुचिस्तानातून जातात. चीनचा डोळा अर्थातच तिथली खनिज संपत्ती आणि या भागातून मध्य आशियाशी जोडण्यात आहे. पाकमधील ग्वादर बंदर चीन विकसित करतो आहे, या सगळ्या प्रकल्पात बलुचिस्तान बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक तिथं आले आहेत.
जो बलोच लोकांना आपली संख्या कमी करण्याचा डाव वाटतो. ब्रिटिश काळापासून तिथं कोळसा उत्खनन सुरू झालं, नंतर सोनं आणि तांब्याचेही साठे पुढं आले. या खनिजाच्या बदल्यात बलुचिस्तानला परतावा देताना पाकिस्तान सरकार भेदभाव करीत आलं. पंजाब आणि सिंध प्रातात अशा खनिजांसाठी जो परतावा दिला जातो, त्या तुलनेत बलुचिस्तानाला केवळ २० टक्केच मिळतो. सशस्त्र बंडखोरानं समर्थन मिळण्याची ही खरी कारणं आहेत.
बलोच बंडखोरी ही केवळ पाकिस्तानची समस्या नाही. इराण आणि अफगाणिस्तनातही बलोच काही भगात एकवटलेले आहेत आणि या दोन्ही देशांना बलोच लोकांतील वेगळेपणाची भावना आव्हान देणारी वाटते. पाकिस्तान सध्या एका बाजूला टीटीपी सारख्या धर्मांध दहशतवादी गटाच्या कारवायांनी त्रस्त आहे. दुसरीकडं बलोच बंडाची धग वाढते आहे.
यापूर्वी बलोच संघर्षाचं नेतृत्व प्रामुख्यानं तिथले सरदार करीत होते. आता मात्र शिकलेली सामान्य तरुणांची पिढी यात सक्रिय आहे. जगभरातून हे तरुण बलुचिस्तानचं समर्थन करणारी मोहीम राबवताहेत. त्याच्यावरील अन्यायाच्या युक्तिवादाला पाकिस्तानकडं उत्तर नाही.
एकतर पंजाबी श्रेष्ठत्वाचा गंड बलुचिस्तानात स्वीकारला जाणं शक्य नाही, तसंच बलुचिस्तानातील नैसर्गिक स्रोत ओरबाडून या भागाला कंगाल ठेवणही तिथं मान्य नाही. पाकिस्तानमधील राज्यकर्त्या वर्गासाठी पंजाबी श्रेष्ठत्व गंड बाजूला टाकणं सोपं नाही. पाकिस्तान लष्करी ताकद दाखवेलही मात्र बंडखोर बलुचिस्तानात प्रशासन चालवणं जवळपास अशक्य करू शकतात.
बलोच लोकातंही अनेक उपजमाती आहेत. त्याचे स्वतंत्र गट आहेत, त्यांच्यात स्पर्धाही आहे. याचा फटका कायमच त्यांना बसत आला आहे. अलीकडं यातून एकच व्यूहात्मक आघाडीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. रेल्वेवर हल्ला करणारी बलोच लिबरेशन आर्मी हा याच प्रयत्नांचा भाग आहे. यातून पाकिस्तानच्या अखंडतेला आव्हान मिळतं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.