esakal | चिकूचा परदेश प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Sapodilla Farming

चिकूचा परदेश प्रवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिकूचा परदेश प्रवास

- प्रसाद जोशी

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावरील घोलवड गाव. समुद्रकिनारी वसलेल्या या गावाचा व्यवसाय आहे बागायती शेती आणि पर्यटन. या गावाची खास ओळख असलेले ‘घोलवडचे चिकू’ फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. वाडवळ, भंडारी, आदिवासी, माच्छी, पारसी, ब्राह्मण, बारी, जैन अशी या गावाची वैविध्यपूर्ण समाजरचना आहे. चिकूच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे येथील चिकू जी.आय. मानांकनप्राप्त आहेत.

घोलवड, बोर्डीत चिकू उत्पादनाची उलाढाल वार्षिक ३५० कोटींच्या वर आहे. पोर्तुगाल काळात चिकू ब्राझीलहून भारतात आला. हळूहळू त्याचा विस्तार गोवा, कोलकाता व नंतर मुंबईत झाला. गोव्यात प्रयोग यशस्वी झाल्याने इराणी कावसजी पटेल यांनी १९०१ मध्ये घोलवड येथे चिकूची लागवड केली. उत्पन्न उशिराने मिळत असल्याने फारसे कोणी या व्यवसायात उतरले नाहीत. पारशी मुलांना इंग्रजी शिकवणारे चिंतामण नाना पाटील व त्यांचे बंधू कुशा नाना पाटील यांना शिक्षणाच्या मोबदल्यात चिकूची दोन रोपे देण्यात आली व त्यांनी बोर्डी येथे लावली. घोलवड गावातदेखील चिकूच्या उत्पादनाला सुरुवात झाली खरी; मात्र १९६० पर्यंत फार मोठं चिकू बागायत क्षेत्र नव्हते. १९६८ मध्ये गावात वीज आली व बागायतदारांना विकासाच्या दृष्टीने ‘प्रकाश’वाट दिसली.

घोलवड परिसरात सद्यस्थितीत वाडवळ, बारी, ब्राह्मण, आदिवासी, भंडारी समाजाने सात हजार हेक्टर जमिनीवर चिकूची लागवड केली आहे. बरीच वर्षं चिकू मुंबईत विक्रीसाठी जायचे; मात्र त्यानंतर मध्य प्रदेश, इंदूर, दिल्ली, गुजरातच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. जी. आय. मानांकन मिळाल्यामुळे निर्यातीला वाव मिळाला व दुबई, कुवेत या आखाती देशांसह इंग्लंडपर्यंत घोलवडच्या चिकूची निर्यात सुरू झाली.

लेखिका शारदा पाटील यांनी चिकूपासून तयार करण्यात येणाऱ्या १४६ प्रकारांबाबत माहिती देणारे पुस्तक प्रकाशित केले आहे. लतिका पाटील व शारदा पाटील चॉकलेट, पावडर, चिप्स तयार करत आहेत. चिकूपासून फोडी, भुकटी यासह विविध पदार्थ तयार करण्यात येतात. चिकूच्या बिया काढून सुकवल्यानंतर प्रक्रिया केली जाते.

गेल्या सात वर्षांपासून चिकू महोत्सवाचे आयोजन येथे केले जाते. चिकूपासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ या महोत्सवाचे आकर्षण असते. शासनाने ठोस पाऊल उचलले, तर चिकू उत्पादनातून पालघर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे; मात्र या प्रक्रिया उद्योगात सरकारने लक्ष घातले नाही. त्यामुळे उत्पादनासाठी जरी मेहनत केली गेली, तरी पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नाही, अशी खंत येथील चिकूउत्पादक व्यक्त करतात.

देशातच नव्हे, तर परदेशातदेखील घोलवडच्या चिकूने स्थान मिळवले आहे. त्यामुळे आपसूकच पालघर जिल्ह्याला झळाळी मिळत आहे. चिकू उत्पादनामुळे आर्थिक उलाढालदेखील गावाच्या व जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहे.

loading image
go to top