स्वयंपूर्ण पल्ली गाव

palli gao
palli gao

भामरागड तालुक्यात पल्ली  या  गावाची  विशेष ओळख आहे. तालुका मुख्यालयापासून साधारण १८ किलोमीटरवर  हे गाव आहे. साधारण १२ किलोमीटरपर्यंत गाडी जाईल असा रस्ता आहे. पण पुढचे ६ किलोमीटर फक्त कशीबशी बाईक  किंवा दुचाकी जाईल असाच रस्ता आहे. डिसेंबर जानेवारीकडे दरवर्षी श्रमदान  करून चारचाकी जाईल असा मातीचा  रस्ता गावकरी बनवतात.  पल्ली गावात तीन वेगवेगळ्या आदिवासी समाजातील लोक वास्तव्यास आहेत. हलबी  समाजातील लोकांची ५० घरे आहेत. गोंडगोवारी समाजातील ४० घरे आणि माडिया  समाजातील ३ घरे. गावाची  लोकसंख्या ४५० आहे.

गावातील मंडळी अतिशय प्रेमळ आहेत.  पल्ली गट ग्रामपंचायत आहे. यात केहकापरी, जिंजगाव, कसनासूर, बोरिया  अशी गावे येतात. पल्ली हे गाव इंद्रावती नदीला खेटून आहे. नदी पलीकडे  समोरच छत्तीसगड  आहे.  पल्ली गावचे रुग्ण लोक बिरादरी प्रकल्पाच्या  दवाखान्यात अनेक वर्षांपासून येतात.

२ मोठ्ठे  डोंगर चालत गेलात की  पल्ली गाव येत. साधारण ६ किलोमीटर डोंगर पार करून जावे लागते. तोच जवळचा मार्ग. डोंगर चढायला  छोटीशी पायवाट. त्या वाटेवरून नुसते चालत जाणे म्हणजे दिव्य काम आहे. पण दवाखान्यात पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग तोच असल्याने सगळे याच मार्गाचा  पूर्वी खूप वापर करीत असत. रात्री बेरात्री या  छोट्याशा वाटेवरून  रुग्णाला  बाजेवर  टाकून आणि ती  बांबूच्या साहाय्याने  खांद्यावर उचलून ही मंडळी दवाखान्यात पोहोचत असे. गरोदर महिला, सर्प दंश, मेंदूचा  मलेरिया  अशा व्याधींनी  ग्रस्त असलेल्या रुग्णांना अशा बिकट वाटेने आणणे फार खडतर असे. त्यावेळी टॉर्च नाही. मग एखादे शेकोटीमधील  पेटते लाकूड घ्यायचे आणि त्याच्या प्रकाशात रात्री डोंगर पार करायचा. कोणीही आजारी पडले तर  सोबत पूर्ण गाव येत असे. रुग्णाला  बाजेवर  उचलून खांदे  दुखले की  खांदे  द्यायला दुसरे गावकरी सोबत असायचे. एकमेकांना सहाय्य करण्याची त्यांची परंपरा वाखाणण्याजोगी  आहे.

२०१८ पासून पल्ली गावची स्वाती रायधर बाकडा  सध्या या  गट ग्रामपंचायतीची सरपंच आहे. लोक बिरादरी आश्रमशाळेतील माजी विद्यार्थी रायधर बाकडा  हा  कोतवाल म्हणून भामरागड तहसील कार्यालयामध्ये कार्यरत आहे. गावात आता आरोग्य केंद्र आहे. नवीनच पोस्ट ऑफिस तिथे सुरु झाले आहे. गावात  जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा आहे.   पल्ली गावातील अनेक मुलं-मुली शाळा शिकले आहेत. त्यातील बरेच लोक बिरादरी आश्रमशाळेत शिकले आहेत. काही पदवीधर झालेत. काहींना शासकीय नोकरी मिळाली आहे. बरीच मुलं आणि मुली विविध शहारात  उच्च शिक्षण घेत आहेत. रामपुरी दुर्जन मांजी  हे सध्या गावचे पाटील आहेत.

गावात घाटकरीण मातेचे मंदिर आहे. भिकारी काशिनाथ मांजी  हे त्या मंदिराचे पुजारी. दरवर्षी या  मातेची जत्रा पल्ली  गावात भरते. पौष  महिन्यात पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या मंगळवारी ही जत्रा भरत असते. त्यावेळी नवीन पिकवलेले अन्न आपण ग्रहण करण्यापूर्वी  प्रसाद म्हणून देवीला  नैवेद्य दाखविला  जातो. गावावर  भूतबाधा  होऊ नये व गाव सुरक्षित राहावे म्हणून कोंबडी-बकऱ्याचे बळी देवी पुढे दिले जातात. अनेक गावातून तसेच छत्तीसगड मधून  जनता या  जत्रेत सहभागी होत असते. त्या दिवशी अनेक आदिवासी स्त्री पुरुषांच्या अंगात देवी येते असे ते मानतात. अंगात देवी आली की त्यांचे नृत्य सुरु होते. पारंपरिक वाद्य वाजविणारी आदिवासी मंडळी सातत्याने वाद्य  वाजवित असतात. ज्यांच्या अंगात देवी येते ते  स्वतःलाच  लोखंडी काटेदार  साखळीने  आणि चाबकाने  खूप  मारतात. त्या दिवशी सर्वांचे जेवण एकत्र असते. या  जत्रेला या भागात महत्व असल्याने शाळेचे  मुलं मुली सुट्टी घेऊन सहभागी होतात. जत्रेच्या निमित्ताने बाहेरील दुकानदार खेळण्यांची, कपड्यांची, खाण्याची छोटी दुकाने  गावात लावतात.

पल्ली गाव हे एका दृष्टीने स्वयंपूर्ण आहे. गावात शेती अतिशय उत्तमरित्या केली जाते. प्रत्येकजण भाताची शेती करतो. तसेच प्रत्येक परिवार भाजीपाला सुद्धा पिकवतो. पूर्वापार जतन केलेले बियाणे वापरून सेंद्रीय शेती ते करतात. शेणखत अथवा शेळ्या बकऱ्याचे लेंडी खताचा  शेतात वापर करतात. अतिशय चांगल्या दर्जाची  वांगी, मिर्ची, टोमॅटो, काकडी,  दोडके, भोपळे, दुधी भोपळे, कारली, वाल शेंगा, चवळी शेंगा, माठ, चवळी पालेभाजी, मेथी, पालक, मुळा, अळु, आंबाडी,  मूग, उडीद, बरबटी, माटाळू  इत्यादी प्रकारचा  भाजीपाला पल्ली गावात पिकविला जातो.

काही जण  तंबाखूची सुद्धा शेती करतात.  पावसाळ्यानंतर इंद्रावती  नदीच्या पात्रातून  कावड  करून पाणी आणून शेती केली जाते. गावात दिवे आलेले आहेत पण ३ फेज लाईनची सुविधा नाही. अनेकदा निवेदन देऊन ते काम अजून झालेले नाही. शेतीसाठी नदीवरून पाणी उपसा करायला  विविध योजने अंतर्गत काही शेतकऱ्यांना पाच हॉर्स पॉवरचे थ्री फेज वर  चालणारे  पंप मिळाले आहेत ते सध्या धूळखात पडले आहेत. त्यामुळे शेतीसाठी  खांद्यावर कावड करून पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही.  पल्लीची भाजी ताजी आणि चांगली असल्याने  भामरागडच्या आठवडी बाजारात लवकर विकली जाते.

लोक बिरादरी आश्रमशाळेत  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही  पल्ली व इतर गावातून मोठ्या प्रमाणात दर बुधवारी आणि रविवारी भाजीपाला खरेदी करत असतो. या  गावातील अजून एक वैशिष्ट म्हणजे येथील पेरू, सीताफळ आणि आंबा ही फळं. एक पेरू साधारण अर्धा किलो भरेल एवढा असतो. चव सुद्धा मधुर. सीताफळ पण मोठी असतात. विविध प्रकारचे गावठी आंबे मोठ्या प्रमाणात येथे आपल्याला बघायला मिळतात. आंब्यांचे आकार पण वेगवेगळे. प्रत्येक झाडाच्या आंब्याची चव वेगळी. आंब्यांचे अनेक वृक्ष गावात आहेत.  पल्ली गावाच्या शेतीचे उत्पन्न  बघून इतर गावात पण आता थोड्या फार प्रमाणात भाजीपाला  लावला जात आहे. हे एक वेगळे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. फक्त कष्ट करायची तयारी हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com