esakal | आनंदाचे डोही आनंद तरंग (प्रभू महाराज माळी)
sakal

बोलून बातमी शोधा

prabbhu maharaj mali

आनंदाचे डोही आनंद तरंग (प्रभू महाराज माळी)

sakal_logo
By
प्रभू महाराज माळी

आषाढ महिना लागला, की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते वारीचे. पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोहळ्यामध्ये किती तरी वारकरी अतिशय समरसून सहभागी होतात. विठुमाउलीच्या भेटीची ओढ लागते, पावलं पडत जातात आणि मनात आनंदसरींचा वर्षाव होत राहतो. उत्साह कमी होत नाही, की त्यातलं भारलेपण कमी होत नाही. उद्या (२४) आणि परवा (२५) संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवत आहे. त्यानिमित्त या आनंदवारीची उलगडलेली वैशिष्ट्यं.

भेटी लागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।

पंढरीच्या आषाढी वारीच्या वाटेवर कोणतीही व्यवस्था नसताना लाखो वारकरी निर्माण होणाऱ्या गैरसोयीतसुद्धा सोय मानतात. जागा मिळेल तिथं मुक्काम. एरवी भौतिक सुविधांमध्ये रमणारा माणूस वारीच्या वाटेवर उपलब्ध अवस्थेतसुद्धा सुखाची अनुभूती घेतो, हेच पंढरीच्या वारीचं वैशिष्ट्य आहे. वारी हे या महाराष्ट्राचं वैभव आहे. महाराष्ट्राची संस्कृती निर्माण करण्यात; तसंच तिचं रक्षण करण्यात वारकरी संप्रदायाचं योगदान अतिशय मोठं आहे. संतवाङ्‌मयाचं पारायण, भजन यांच्या माध्यमातून वारी ही संस्कृती अधिकच बळकट आणि प्रगल्भ रूप घेते. वारी ही एकात्मतेचं प्रतीक आहे. तिच्यात सामाजिक विषमतेचा लवलेश नाही. वारीत वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येनं, त्यातून येणाऱ्या भव्यतेनं संस्कृतीमध्ये नित्यनूतनता जशी येते, तशी तिची पाळंमुळंही आणखी चांगली रुजत आहेत.

मानवी जीवनाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आवश्‍यक सर्वगुणांची प्राप्तता, त्यांचं संवर्धन आणि त्यांची परिपूर्णता वारीमध्ये परावर्तित होताना दिसते. व्यष्टी आणि समष्टी जीवनाचा अर्थ वारीतून कळतो. त्याच्या धन्यतेची पायाभरणीही वारीतच होते. संप्रदायाच्या दृष्टीनं वारी हे पारमार्थिक साधन आहे. ते एक शारीरिक तप आहे. त्यातून शरीर थकत असलं, तरी मनाची उमेद निश्‍चित वाढते. अडचणींवर मात करण्याची ताकद वारी देते. अहंकाराला रामराम करून अतूट श्रद्धा वाढवणारं वारीइतकं चांगलं साधन नाही. म्हणूनच वारी हे पारमार्थिक मानवी जीवनाचं व्यापक दर्शन होय. त्यातून अंतरंगाची शुद्धी साधली जाते.

गेली अनेक शतकं संत ‘गात जा गा, गात जा गा, प्रेम मागा, विठ्ठला’ हा संदेश देत आले आहेत. वारीचा सोहळा महाराष्ट्राचं एक ललामभूत वैशिष्ट्य आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या काळात खऱ्या अर्थानं महत्त्व प्राप्त झालेल्या वारीला संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज आदी संतांनी जनाधार मिळवून दिला. आपल्या अभंगवाणीनं समस्त मानवजातीच्या कल्याणाची गणितं प्रकट मांडणारे तुकाराम महाराज यांनी वारी अत्युच्च शिखरावर नेली. तुकाराम महाराज सांगतात ः
‘पंढरीची वारी, आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत’
केवळ वर्षातले काही दिवस वारीसमवेत पालखीबरोबर चालत जाण्यानं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर भागवत संप्रदायात अगदी सहजपणे दिलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात ः ‘येथे जातिकुळ अप्रमाण’ किवा ‘हे आघवेची अकारण.’ या संतवचनामुळं समाजाला जगण्याचा नवा मंत्र दिला. वारकरी संप्रदायानं महाराष्ट्रातल्या राजकीय पुनरुत्थानाला आधार दिला. त्याच संप्रदायातून निर्माण झालेल्या भागवत धर्मानं समाजातील एकीच्या प्रयत्नांना बळ दिलं.
संत तुकाराम महाराज सांगतात ः
एकमेका साह्य करू।
अवघे धरू सुपंथ।।

भक्ती निर्लोभ असली, तरी त्यामागं जगण्याचं एक विशाल तत्त्वज्ञान सामावलेलं असतं, याचं भान या संतपरंपरेनं सामान्य जीवाला दिलं. त्या आधीच्या सांप्रदायिक परंपरा सर्वसमावेशक होऊ शकल्या नाहीत आणि वारकरी संप्रदायानं मात्र ते करून दाखवलं. कारण समाजातल्या शेवटच्या माणसाबद्दल कमालीचा कळवळा होता. संत सांगतात ः
बुडते हे जन न देखवे डोळा।
येतो कळवळा म्हणोनिया।।

समाजव्यवस्था सुधारण्यासाठी सर्वांत मोठी आणि यशस्वी प्रयोगशाळा म्हणजे पंढरीची वारी. हे त्याचं जिवंत प्रात्यक्षिक. पांडुरंगाच्या ओढीनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून पंढरपूरच्या दिशेनं वारकरी दिंड्या घेऊन चालू लागतात, तेव्हा सध्याच्या काळातल्या आधुनिक व्यवस्थापनशास्राच्या अभ्यासकांनाही आश्‍चर्य वाटेल अशी स्वयंशिस्त दिसायला लागते. कोणतंही निमंत्रण नसताना केवळ भक्तीच्या बळावर संतांच्या संगतीत लाखो भाविक वारीत सहभागी होतात, ही गोष्ट सामान्य नाही. या वारीत कोणताही भेदभाव नाही. उच्च-नीचपणा नाही, स्पृश्‍य-अस्पृश्‍यता नाही, जातिभेद, गरीब-श्रीमंतीची दरी नाही. संतांनी नष्ट केलेल्या जातीपातीला राजकारण्यांनी स्वार्थासाठी आपलंसं केलं. त्यांच्यामागं सारा समाज वाहवत जाऊ लागल्याचं चित्र आपण सर्वच सध्या अनुभवतो आहोत. मात्र, वारीनं समस्त मानवजातीला आत्मविश्वास दिला, जगण्याचा नवा विचार दिला. वारीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आयुष्य जगण्याची नवी पद्धत रूढ करण्याचं काम अखंडपणे केलं. जिथं जातीला थारा नसेल, वयाला बंधन नसेल, असं हे समग्र दर्शन ज्या काळात समस्त विश्व अनुभवतं- ती आहे पंढरीची वारी.

पारमार्थिक मार्गामध्ये परब्रह्म, स्वरूपाच्या प्राप्तीसाठी अधिकारपरत्वे कर्म, ज्ञान, योग, उपासना या मार्गांचा विशेषत्वानं विचार सांगितला जातो. या प्रत्येक मार्गासाठी स्वतंत्रतेनं अधिकाराचा विचार आहे. निष्काम कर्मानं अंत:करणशुद्धी होते. त्यामुळं तो ज्ञानाचा अधिकारी होतो. यमनियमादी साधनं करणारा समाधीचा अधिकारी होतो, अशा प्रकारची व्यवस्था सांगण्यात येते. तथापि वारी म्हणजे या सर्व साधनांचं सार आहे. वारीमध्ये ही सर्व साधनं आपोआप घडून येतात. म्हणून वारी हे खऱ्या अर्थानं तपच आहे. ज्ञानेश्वर महाराज यांनी तपाची व्याख्या करताना म्हटलं आहे ः
स्वरूपाचिया प्रसरा। लागी प्राणेंदियशरीरा।।
आटणीकरणे जे वीरा । तेचि तप ।।

वारीमध्ये शरीर, इंद्रिय, प्राण झिजले जातात. यामध्ये अनेक साधनांचा समावेश होतो. ज्ञानासाठी आवश्‍यक विवेक-वैराग्यादिक आंतरिक शुद्धीची साधनं; तसंच समाधीसाठीची यमनियमादिक साधनं वारीत आपोआप साधली जातात. भक्तीसाठी आवश्‍यक वृद्धसेवेपासूनची साधनं; तसंच परमार्थासाठी आवश्‍यक साधनं वारीत सहभागी झाल्यानं प्राप्त होतात. असं सर्व साधनांचं सार म्हणजे वारी आहे. तरीही तिचं इतर साधनांपेक्षा वैलक्षण्य शिल्लक राहतंच. हे एकमेव साधन असं आहे, की साध्य प्राप्तीपूर्वीच यातून आनंदाची अनुभूती येऊ लागते आणि म्हणून साध्यप्राप्तीत या साधनेच्या सातत्याची मागणी करण्याचा मोह अनावर होतो. म्हणूनच तुकाराम महाराजही म्हणतात ः
हेचि व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ।।
म्हणूनच वारीचं महत्त्व मोठं आहे.
प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ।।
हे वारीचे स्वरूप आहे, तर
आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे ।।

हे वारीचं फल आहे.

loading image