आजच्या राजकारणासाठी इतिहासाला, इतिहासातल्या मान्यवर व्यक्तिमत्त्वांना वेठीला धरणं हा सांप्रतकाळाचा गुण बनतो आहे. याचं लख्ख दर्शन संसदेतल्या राज्यघटनेवरच्या चर्चेत घडलं. इतिहासाचा राजकारणातला वापर तसा नवा नाही; मात्र, राज्यघटनेला ७५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं संसदेत होणारी चर्चा अशा सोईची आणि एकमेकांचे वाभाडे काढण्यापुरती उरते तेव्हा, आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या क्षमतांचाच मुद्दा तयार होतो.