बोले तैसा चाले...

पंजाबराव ठाकरे
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

अनिष्ट रूढी परंपरेला स्वकर्तृत्वाने फाटा देऊन अखेरच्या श्वासा पर्यत शेतकरी आणि कामगारासाठी न्याय मागणारा कॉम्रेड नेता मरणानंतरही सर्वांच्या मनात जागा करून काळाच्या पडद्याआड झाला.

४ फेब्रुवारीला काकोडा या लहानश्या खेड्यातून जन्म घेतलेले शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान नेते भाई वासुदेवराव मुकुंदराव मानखैर (पाटील) यांचे निधन झाले. १९४८ पासून राज्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्याच्या  मार्गदर्शनाखाली वासुदेराव याची राजकीय कारकीर्द सुरू झाली. शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या न्यायासाठी सदैव लढा उभारणे हाच पक्षाचा मुख्य उद्देश ठेऊन कार्यकर्ता चळवळ बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुजविण्यासाठी मानखैर याचा मोलाचा वाटा राहिला आहे.

दिवंगत वसंतराव पाटील, तत्कालीन आमदार भाई के.आर.पाटील, भाई एकनाथजी ठाकरे, रामभाऊजी वाघ अशा अनेक निष्ठावान नेत्याच्या तालमितील एक नेतृत्व म्हणजे संग्रामपूर तालुक्यातील भाई वासुदेवराव मानखैर बहुजनांनी संघटीत राहून अनाठायी खर्च व अनिष्ट रूढी ना थारा देऊ नये. नोकरीच्या मागे न लागता आपले हक्क समजून घेऊन तरुणांनी अन्याया विरुद्ध नेहमीच लढण्यासाठी तयार असले पाहीजे. राजकारण आणि शेती करताना त्यासाठी व्यवसाय करणेही महत्व पूर्ण समजले पाहीजे. असे ध्येय ठेऊन याची सुरुवात स्वतः पासुन करण्याचे त्याचे धाडस थोडे समाजाच्या चाली रीती विरोधात ठरूही शकतात. पण, कुटूंबातील भाऊ, चार मुले आणि एक मुलगी व नातवंडांसमोर तो पाठ गिरविण्याची शर्थ ठेऊन जगाचा निरोप घेणारा काम्रेड खऱ्या अर्थाने लाल सलामचा हकदार ठरणारा नेता म्हणून भाई वासुदेराव यांनी अनेकांना आदर्श दिला आहे. 

त्याच्या अंत्यविधीचे वेळी शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याचे परिवारातील लोकांनी दिलेली माहीती सर्वांसाठी वैचारिक आणि नैतिकतेचा धडा देणारी ठरली. राजकारण करीत असतांना कुठलाही लोभ अथवा स्वार्थ न ठेवता इतरांसाठी होईल ते काम करण्याची धडपड मानखैर याची या माध्यमातून दिसून आली. वय झाल्या नंतर ही शेतकरी आणि कामगार कुटुंबापेक्षा महत्वाचा मानत. त्यांना न्याय देण्यासाठी खासदार आणि आमदार यांना निरोप देण्याचे कार्य उल्लेखनीय म्हणावे लागेल. वासुदेराव यांनी मरणा अगोदर कुटूंबातील काही जबाबदार सदस्यांना टिप्स दिल्या आणि त्याचे तंतोतंत पालन करण्याची गळ घातली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांमध्ये शासन दरबारी पात्र आणि अपात्र अशा भानगडी आहेत. अपात्र म्हणजे  काय? तो मेला नाही. या बाबीला शासनाने आळा घालून आत्महत्या ती आत्महत्याच समजावी. त्याला फाटे फोडू नयेत.

माझे मृत्यू नंतर कुठलाच शोक मानू नका. रस्त्यावर रांगोळ्या काढा लाल सलाम चे निशाण लावा. हसत हसत माझे अत्यंसंस्कार करा. अग्नी दिल्यानंतर कुठलेही पिंड दान, आणि तेरा दिवस सुतक ठेऊ नका. जळाल्यानंतर राख शेतात टाकावी. नदीत प्रदूषण करू नका. तीन दिवसात संपूर्ण कार्यक्रम (म्हणजे तेरवी सुतक नाही) आटोपून आप आपली कामे करावी. नाहक सर्वांना कामधंदे सोडून तेरा दिवस अडकवून ठेऊ नका. वायफळ खर्च करू नका. मुलाच्या शिक्षणावर तो खर्च करावा. अत्यंयात्रेत येणाऱ्या लोकांचे स्वागत करून त्यांना चहा पानी द्या, असा पायंडा आपले घरातून आणि माझे पासून सुरू झाल्याचा आनंद घेऊन मी माझे जीवन सतकर्मी लागल्याचे समजेन. आणि हीच माझे साठी खरी श्रद्धांजली ठरेल! असे लिहून ठेवायला सांगून आणि तसे वागण्या बाबत अट ठेवणारे वासुदेराव पाटील सर्वांसाठी आदर्शाचे उदाहरण बनले आहेत. यासाठी त्याचे अरविंद पाटील, अशोक पाटील अनिल पाटील, अविनाश पाटील या चारही मुलांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा मानावा लागेल.

आज त्यांनी देहाने जगाचा निरोप जरी घेतला असेल तरी त्याच्या कर्तुत्वाने मात्र मनात घर करून ठेवले आहे. अशाच प्रतिक्रिया त्याचे अत्यंविधी समयी सर्व राजकीय आणि सामाजिक लोकांच्या श्रद्धांजली मधून व्यक्त करण्यात आल्या. त्याच्या सुचनेनुसार अंत्ययात्रा जाणाऱ्या रस्त्यावर लाल सलामच्या रांगोळ्या दिसत होत्या. कुणीही रडताना दिसत नव्हते, विशेष म्हणजे भडाग्नीचे वेळी महिलांची उपस्थिती वेधक ठरणारी होती. हसत हसत कुटुंबाकडून अत्यसंस्कार करवून घेणाऱ्या या काम्रेड नेत्याला आपसूकच लाल सलाम म्हटल्याच जाईल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panjabrao Thackeray Write abiout Bhai Vasudeorao Mukundrao Manakhair (Patil)