पारस छाब्रा इतका फिट कसा राहतो? फळं खाऊनच!

पारस छाब्रा इतका फिट कसा राहतो? फळं खाऊनच!

स्वत:चं आरोग्य सांभाळण्यासाठी अन्‌ ते निरोगी राहण्यासाठी मी आहाराची पथ्यं सांभाळतो आणि आठवड्यातून तीन-चार वेळा व्यायाम करतो. मला फळं खूप आवडतात. त्यामुळं सर्वच फळं मी खातो. एकच फळ तुम्ही वर्षभर खाता कामा नये, असं माझं मत आहे. ऋतूप्रमाणं वेगवेगळी फळं खावीत. 

स्वत:चं आरोग्य सांभाळण्यासाठी अन्‌ ते निरोगी राहण्यासाठी मी आहाराची पथ्यं सांभाळतो आणि आठवड्यातून तीन-चार वेळा व्यायाम करतो. त्यामुळं माझ्यात भरपूर ऊर्जा राहते. 'निरोगी जीवनासाठी सकाळची न्याहारी अगदी शाही असावी, दुपारचं जेवण मनापासून करावं आणि रात्री मात्र कमीत कमी जेवावं, ज्यात थोड्या प्रमाणात फळे व इतर आरोग्यदायी पदार्थ असतील,' असं माझी आई नेहमी म्हणते. मी ठोस आहार आणि पेयांचे संतुलन राखतो. मला फळं खूप आवडतात. त्यामुळं सर्वच फळं मी खातो. उन्हाळ्यात कलिंगड, थंडीत सफरचंद, याचबरोबर सर्व मोसमी फळं मी खातो. माझ्या मते, एकच फळ तुम्ही वर्षभर खाता कामा नये. ऋतूप्रमाणं वेगवेगळी फळं खावीत. तुम्ही एकच फळ खात राहिलात, तर तुमच्या शरीराला त्या फळाची सवय होते आणि त्यातल्या पोषक तत्त्वांचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम कमी होत जाईल. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असली पाहिजे. 

आहाराबरोबरच मी व्यायामासाठीही वेळ काढतो. मात्र, जिमसाठीची माझी वेळ नक्की नसते. कधीकधी सकाळी आमचं चित्रीकरण सुरू होतं. अनेकदा ते 12 तासही चालतं. त्याचदरम्यान, आम्हाला अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. त्यानंतर मी थोडा आराम करतो. मी अशा जिममध्ये जातो, जे संपूर्ण आठवडा 24 तास उघडं असतं- त्यामुळं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तिकडं जाऊ शकतो. सामान्यत: मी चित्रीकरण संपवतो, घरी येतो, कपभर ब्लॅक कॉफी घेतो आणि जिममध्ये जातो. तिकडून घरी परतलो, की रात्रीचं जेवण करून लगेच झोपून जातो. त्याचप्रमाणं मी दर आठवड्याला फिटनेस फिचर करतो. 

पाणी भरपूर प्या 
प्रत्येकाचं पाणी पिण्याचं प्रमाण खूप जास्त असलं पाहिजे- कारण आपल्या शरीरात खूप विषारी द्रव्यं तयार होत असतात. या द्रव्यांचा निचरा करण्यासाठी भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. पाणी आपल्या शरीरातून अशा गोष्टींचा निचरा करतं- ज्यांची आपल्या शरीराला गरज नसते. विशेषकरून आजकाल आपलं अन्न हे खूपच भेसळयुक्त असतं. या अन्नातली नकोशी तत्त्वं शरीरातून काढून टाकण्यासाठी पाण्याची मदत होते; तसंच जास्त पाणी प्यायल्यानं आपली चयापचयाची क्रिया सुधारते. शरीरावर विपरीत परिणाम करणारे पदार्थ मी कधीच खात नाही. विशेषत: मी तेलकट टाळतो. माझ्या आहारातून मी मिठाचा अतिरिक्त वापर टाळतो; तसंच साखरेचे पदार्थही कमी खातो. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी माझा प्रयत्न असतो. माझ्या चहासाठीही मी रिफाइंड साखरेऐवजी गुळाचा चुरा वापरतो. मी शाकाहारी आहे. मी पूर्वी मांसाहारी होतो; पण बऱ्याच वर्षांपूर्वीच मी ते सोडलं. तुम्हाला कसदार शरीर कमवायचं असेल, तर चिकन आणि इतर मांसाहार करावा लागतो, असं लोकांना वाटतं; पण प्रोटिन्स ही प्रोटिन शेक्‍समधूनदेखील मिळतात आणि ती शाकाहारी असतात. 

व्यायामाची सुरवात काडिओनं 
दररोजच्या व्यायामाची सुरवात मी सर्वसाधारणपणे कार्डिओनं करतो. त्यामुळं दुसरा विशेष व्यायाम करण्यापूर्वी शरीर वॉर्म-अप होतं. व्यायामात स्ट्रेचेसदेखील मी आवश्‍यक करतो. तुम्ही स्ट्रेचिंग योग्य प्रकारे केलंत, तर मागाहून करायचा विशेष व्यायाम तुम्ही सहज करू शकता; कारण स्ट्रेचिंगमुळं तुमचे स्नायू शिथिल होतात. त्यानंतर मी दररोज किमान दोन प्रकारचे व्यायाम करतो. छातीचे व्यायाम केले, तर सोबत खांद्याचेही करतो. सोमवार ते शुक्रवार माझा व्यायामाचा दिनक्रम सक्रिय असतो आणि शनिवारी, रविवारी मी आराम करतो. कधी-कधी मी कामात गुंतलेला असीन, तर मी सोमवारी आणि मंगळवारी व्यायाम करतो आणि बुधवारी आराम करून पुन्हा गुरुवारी, शुक्रवारी व्यायाम करतो. कसंही करून मी आठवड्यात कमीत कमी चार दिवस तरी व्यायाम करतोच. असं म्हणतात, की एका दिवसात 45 मिनिटं व्यायाम करणं पुरेसं आहे; पण मी सुमारे 20-25 मिनिटे कार्डिओ करतो व नंतर सुमारे 45 मिनिटं वेटलिफ्टिंग करतो. मी सोमवारी चेस्ट आणि बायसेप्सचा व्यायाम केला, तर मंगळवारी पाठीचा आणि ट्रायसेप्सचा व्यायाम करतो. बुधवारी मांड्यांचा व्यायाम करतो आणि गुरुवारी पुन्हा याच दिनक्रमाची पुनरावृत्ती करतो. 

खरं तर माझा कोणीही फिटनेस गुरू नाही. मात्र, एक हॉलिवूड अभिनेता ज्याच्याकडून मला प्रेरणा मिळते, तो म्हणजे, ख्रिस हेम्सवर्थ. अलीकडंच 'ऍव्हेंजर्स एंड गेम' चित्रपटात थॉरची भूमिका केलेला हा अभिनेता. माझ्या दृष्टीनं त्याचं शरीर आदर्श आहे. त्याच्यासारखं शरीर असावं अशी माझी इच्छा आहे. शरीराबराबरच मी मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठीही प्रयत्न करतो. एक तर मी अत्यंत शिस्तप्रिय माणूस आहे. मी कधीच पार्ट्यांना जात नाही. मी धूम्रपान अन्‌ मद्यपान करत नाही. स्वत:ला शांत ठेवण्यासाठी मी आरामात सोफ्यावर बसतो आणि टीव्हीवर गमतिशीर असं काही तरी पाहतो. स्वत:ला आनंदी आणि शांत ठेवण्यासाठी मला 'द कपिल शर्मा' शो बघायला आवडतं. मोकळ्या वेळेत स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी मी माझे छंद जोपासतो. पुराणकथा हादेखील माझ्या आवडीचा विषय आहे. 

भूमिकेसाठी शरीरयष्टीमध्ये बदल 
सध्या मी सोनी टीव्हीवरच्या 'विघ्नहर्ता गणेश' या पौराणिक मालिकेत अभिनय करत आहे. यात मी रावणाची भूमिका साकारत आहे. त्यामुळं मला वाटतं, की देवानंदेखील मला जीवनात खूप मदत केली आहे. दरम्यान, या मालिकेतल्या रावणाच्या भूमिकेसाठी मला माझ्या शरीरयष्टीमध्ये बदल करावा लागला. त्यानुसार मी मसल्सवाइज बदल केला अन्‌ थोडंसं वजनही वाढवलं. यापूर्वीही मी 'दुर्योधन'मध्ये भूमिका साकारताना शरीरयष्टीमध्ये बदल केला होता. 

दरम्यान, कामाच्या व्यापामुळं जिममध्ये जाण्याव्यतिरिक्त मला वेळच मिळत नाही; पण जर मला कधी संधी मिळालीच आणि मोकळा वेळ मिळाला, तर तायक्वांदो शिकायला आणि डान्स क्‍लासला जायला आवडेल. मी माझे कुटुंबीय आणि मित्रांना व्यायाम व आरोग्याच्या बाबतीत अनेकदा मार्गदर्शनही करतो. बारीक होण्यासाठी काय करावं, असं अनेकदा माझ्या कुटुंबातल्या महिला मला विचारतात. त्यावेळी मी त्यांना आहाराबाबत सल्लाही देतो. मी त्यांना सांगतो, की रात्रीच्या जेवणात आणि त्यानंतर कार्ब्स आणि फॅट्‌स खाऊ नका. आहार कमी करण्यासाठी मी त्यांना सॅलड आणि फळं जास्त जास्त खायला सांगतो- कारण त्यात फायबर्स मुबलक असतात. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com