मुलगी पळून जाण्याची भीती वाटते ? मग 'हे' करा

स्मिता जोशी
Sunday, 21 July 2019

समस्यांवर बोलू काही - स्मिता जोशी
- मुलगी पळून जाण्याची भीती वाटते

मुलगी पळून जाण्याची भीती वाटते

प्रश्‍न : माझी मुलगी नुकतीच बारावी पास झाली आहे. ती मैत्रिणींबरोबर बाहेर जाते, असे सांगून घराबाहेर पडून एका मुलासोबत फिरते, असे आमच्या लक्षात आले. रात्री उशिरापर्यंत ती घरात नसते आणि आमच्याशी खोटे बोलते. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने त्या दोघांना एकांत ठिकाणी विचित्र वागताना पाहिले आहे. तिने आम्हाला सांगितल्यानंतर माझे पती खूप चिडले. त्यांनी तिला मारहाण केली. त्या मुलाची पोलिस चौकीत तक्रार दाखल केली. आमच्या जवळच्या सर्व नातेवाइकांना बोलावून मुलीला समज दिली आणि त्या मुलाला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घरी जाऊन त्याच्या नातेवाइकांसमोर त्याला दोन थोबाडीत देऊन समज दिली. परंतु, हे प्रकरण संपण्याऐवजी अधिकच चिघळले आहे. त्याचे नातेवाईक आम्हाला त्रास देऊ लागले आहेत. या सर्व गोंधळामुळे मुलगी चिडचिडी झाली आहे. ती काहीच ऐकत नाही. आमच्या नकळत ती त्या मुलासोबत पळून जाईल की काय, अशी सतत भीती वाटते. मुलीला यातून बाहेर काढण्याचा काहीतरी मार्ग सांगा. 

उत्तर : तरुण वयामध्ये मुलांकडून अशाप्रकारच्या अनेक चुका घडत असतात. परंतु, अशा प्रकरणांना पालकांनी योग्य पद्धतीने सामोरे जाणे गरजेचे असते. मुलांना मारहाण करून सर्वांसमोर त्यांना अपमानित करून हा प्रश्न सुटत नसतो. तुमचे नेमके हेच चुकलेले आहे. आपल्या मुलीकडून काही चूक होत असल्यास तिला जवळ बसवून एकांतात समजावून सांगणे गरजेचे असताना, तुम्ही सर्व नातेवाइकांना बोलावून त्यांच्यासमोर तिचा अपमान केला. तसेच, त्या मुलाचीही पोलिस तक्रार करून त्यालाही सर्वांच्या समोर अपमानित केले. यामुळे मुलं सुधारण्याऐवजी अधिकच बंड करून उठतात. हे प्रकरण तुम्ही अतिशय नाजूकपणे हाताळणे गरजेचे आहे. मुलीचे कुठे चुकते आहे, हे तुम्ही आई-वडील म्हणून एकांतात तिला समजावून सांगा. नातेवाईक केवळ चर्चा करतात. मदत करतातच असे नाही, यात आपलीच बदनामी होत असते. त्या मुलाच्या नातेवाइकांशी वाद घालण्यापेक्षा त्यांच्या मुलालाही त्यांनी आवरणे किती गरजेचे आहे, हे पालक म्हणून चर्चा करा. जे घडले ते संतापाच्या भरात घडले, याबाबत थोडा कमीपणा घेऊन क्षमा मागा. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा. आपली मुलगी आपल्यापासून दूर जाऊ नये, यासाठी प्रयत्न करणे, तिची मानसिकता सांभाळणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parents afraid about girl to flee