#MokaleVha : आई-वडील लग्न करण्यास दबाव टाकतात

Mokale-Vya
Mokale-Vya

आई-वडील लग्न करण्यास दबाव टाकतात
माझे वय २८ वर्षे आहे. मी द्विपदवीधर असून, मला चांगली नोकरीही आहे. मी २५ वर्षांची असल्यापासून माझे आई-वडील माझे लग्न जमवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, अजूनही मला योग्य जोडीदार मिळालेला नाही. माझे आई-वडील आता माझ्या खूपच मागे लागले आहेत. मुलाकडून पसंती आली, की मला लगेच होकार देऊन लग्नाला हो म्हण, असे म्हणतात. ‘तू सगळ्या मुलांमध्ये काहीतरी दोष काढतेस,’ असे म्हणतात. परंतु, मला माझ्या योग्यतेचा जोडीदार मिळाल्याशिवाय लग्न करायचे नाही. त्यामुळे सध्या मी माझ्या आई-वडिलांशी बोलणेच बंद केले आहे. कारण, ‘माझे लग्न’ या विषयाशिवाय ते माझ्याशी काही बोलतच नाहीत. मी त्यांचे घर सोडून वेगळे राहण्याचा विचार करीत आहे. परंतु, द्विधा मनःस्थिती आहे. मी काय करू?

मुलगी वयात आल्यानंतर तिचे लवकर लग्न व्हावे, ही कोणत्याही आई-वडिलांची अपेक्षा असते. मुलीच्या बरोबरीच्या इतर मित्र-मैत्रिणींची, नात्यातील मुलांची लग्नं होत असतील आणि आपल्या मुलीचे लग्न जमत नसेल तर आई-वडिलांच्या मनावर ताण येतो. त्यामुळे ते तुझ्या सतत मागे लागत असतील. परंतु, यामुळे आई-वडिलांशी न बोलणे आणि घर सोडून वेगळे राहायला जाणे, हे पर्याय योग्य नाहीत. आई-वडिलांना तुझी काळजी आहे म्हणूनच ते तुझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत. ‘लग्न’ या विषयाकडे तू गांभीर्याने बघ. ‘मनासारखा जोडीदार’ म्हणजे नक्की काय? तू ज्या अपेक्षा या बाबतीत ठेवल्या आहेत त्या योग्य आहेत का? तुझ्यातील क्षमता आणि तुझ्या अपेक्षा या समतोल आहेत का? या सर्व गोष्टींचा विचार कर. स्वतःची ओळख करून घेण्यासाठी स्वतःचा मॅरेज बायोडाटा तयार कर. आई-वडिलांशी बोलणे टाळण्यापेक्षा मनमोकळेपणे त्यांच्याशी बोल. तुझे विचार त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न कर. आत्तापर्यंत तू किती मुलांना नकार दिलास, कोणत्या कारणामुळे दिलास, तुला किती नकार मिळाले आणि कोणत्या कारणामुळे मिळाले, याचा अभ्यास कर. तुझ्या अवास्तव अपेक्षा असतील, तर त्या कमी करण्याचा प्रयत्न कर. हे तुला एकटीला जमत नसेल, तर विवाहपूर्व समुपदेशन करून घे.

----------------------------------------------------------------------------------

पतीला करायचेय मुलाच्या नावे घर
माझे वय ७५ वर्षे आहे. मुलीचे लग्न झाले असून, ती सासरी आहे. नातवंडेही मोठी आहेत. माझ्या मुलाचेही लग्न झाले आहे. परंतु, त्याला अद्याप मूलबाळ नाही. माझे पती ८० वर्षांचे आहेत. मुलगा, सून आणि आम्ही दोघे एकत्र राहतो. आमचे दुमजली घर असून, ते माझ्या पतीच्या नावावर आहे. माझ्या मुलाने, ‘हे घर माझ्या नावावर करून ठेवा, नाहीतर तुमची मुलगी आणि नातू या घरावर हक्क सांगायला येतील,’ असे म्हणत वडिलांनी बक्षीसपत्र करून घर आपल्या नावावर करून द्यावे, असा हट्ट धरला आहे. माझा या गोष्टीला विरोध आहे. परंतु, मुलाने वडिलांचे कान भरून त्यांना माझ्या विरोधात केले आहे. माझे पती माझे काहीच ऐकत नाहीत आणि मुलगा सांगेल तसे वागतात. मीच घरातून निघून जावे म्हणतात. मी त्यांना कशी समजावून सांगू.

पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी नाती झुगारून देणारी अनेक उदाहरणे समाजात दिसतात. घर-दार आपल्या नावावर करून घेऊन आई-वडिलांना दुर्लक्षित करणारी मुलेही आहेत. त्यामुळेच, आपली मिळकत आपल्या हयातीत मुलांच्या नावावर करताना पूर्ण विचार व्हायला हवा. तुमच्या मुलाला असे वाटते आहे, की तुमच्या घरावर बहीण हक्क मागायला येईलच म्हणून तो घर त्याच्या नावावर करून मागतो आहे.

परंतु, वडिलांनाही हे घर मुलालाच द्यायचे असेल तर एक उपाय आहे; तो म्हणजे, आत्ताच इच्छापत्र करून त्याची नोंदणी करून ठेवायची. आपल्या हयातीनंतर आपली सर्व मिळकत कोणाला देण्यात यावी? त्याचे वाटप कसे करावे, याचा दस्त तयार करून ठेवल्यास तुमच्या मुलाला ती संपूर्ण मिळकत मिळू शकेल. यासाठी आत्ताच बक्षीसपत्र करण्याची कोणतीही गरज नाही. तुमच्या पतीला या गोष्टी समजावून सांगा. त्यांच्या विरोधात न बोलता आपण तुमच्या मनासारखेच करू. परंतु, तुम्ही हयात असेपर्यंत आपले छत कोणालाही देऊ नका. याबाबतीत तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता.

---------------------------------------------------------------------------------------

पत्नीचा माहेरी राहण्याचा हट्ट
मागील २ वर्षांपासून माझी पत्नी माहेरी निघून गेली आहे. मला ४ वर्षांचा मुलगा आहे. माझा व्यवसाय पुण्यात आहे आणि पत्नीला तिच्या माहेरच्या ठिकाणी बारामतीला राहायचे आहे. तिचे म्हणणे आहे, मी सर्व सोडून तिकडे राहायला यावे आणि नव्याने व्यवसाय सुरू करून बारामतीला स्थायिक व्हावे. मला वडील नाहीत. माझी आई वयस्कर आहे. पत्नीला किती वेळा समजावून सांगितले, तरी ती स्वतःचा हेका सोडायला तयार नाही. कायदेशीर नोटीस पाठवून नांदायला बोलावणे योग्य होईल का? मी नोटीस पाठवली, तर ती माझ्याविरुद्ध केस दाखल करू शकते का? मी नक्की काय करावे, हे मला कळत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

तुमच्या पत्नीला पुण्याला का राहायचे नाही, याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. केवळ तिचे माहेर बारामतीला आहे म्हणून तुम्ही बारामतीलाच येऊन राहावे, हे तिचे विचार असतील तर तिला योग्य समुपदेशनाची गरज आहे. नवीन ठिकाणी नव्याने व्यवसाय सुरू करायला भांडवल लागते आणि तेथे व्यवसाय योग्य चालेल, याची खात्रीही नाही. तिला या गोष्टी समजावून सांगणे गरजेचे आहे. एक मुलगा आहे आणि त्याच्या भविष्याचा विचार करून हातचे सोडून पळत्याच्या पाठी जाण्यात काहीच अर्थ नाही. या गोष्टी तिला पटवायला हव्यात. तिच्या आई-वडिलांना, नातेवाइकांना किंवा ती ज्यांचे कोणाचे ऐकते त्यांनाही सांगून त्यांची यासाठी मदत घ्या. तिला पुण्यात असुरक्षित वाटत असल्यास तिच्या सुरक्षिततेची हमी द्या. शक्‍यतो नातेवाइकांच्या मदतीने प्रयत्न करा. ते शक्‍य होत नसल्यास स्वयंसेवी संस्थांच्या समुपदेशन केंद्राची मदत घ्या. तेथेही ती आलीच नाही किंवा उपयोग झाला नाही, तर कायद्याची मदत तुम्ही घेऊ शकता. समजुतीने सर्वच मार्ग संपले, तर कायद्याचा आधार घ्यावाच लागतो. परंतु, हा पर्याय नंतरचा असावा. तुम्ही कायदेशीर नोटीस वकिलातर्फे अथवा न्यायालयात खटला दाखल करून पाठवली, तर तीही तिच्या माहेरच्या ठिकाणी खटला दाखल करू शकते. तिलाही तुमच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याचा अधिकार आहेच. परंतु, या गोष्टीला घाबरून तुमचे प्रयत्न करणे थांबवू नका. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन शक्‍य होईल तेवढे शांततेच्या मार्गाने प्रश्‍न मिटवण्याचा प्रयत्न करा. संपर्कासाठी काही स्वयंसेवी संस्थांचे क्रमांक देत आहे. 
 वंचित विकास : ०२०-२४४८३०५० 
 स्वाधार : ०२०-२५५११०६४ 
 आधार समुपदेशन केंद्र : ८३०८३ ८२११५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com