खुर्सापारची राणी ‘बारस’

‘बारस’ वाघीण नर वाघासारखीच दिसायची. भारदस्त शरीर, बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्त्व लाभलेली ही वाघीण पर्यटकांच्या पसंतीची होती.
Tiger
Tigersakal

- संजय करकरे

‘बारस’ वाघीण नर वाघासारखीच दिसायची. भारदस्त शरीर, बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्त्व लाभलेली ही वाघीण पर्यटकांच्या पसंतीची होती. ‘बारस’ने आपल्या आईलाच आव्हान दिले आणि तिचे क्षेत्र काबीज केले होते; पण तिने आपल्या आईबाबत जे केले तेच तिच्याही बाबतीत घडले...

अलीकडेच मे महिन्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या खुर्सापार वनपरिक्षेत्रात असलेल्या बांद्रा तलावातील एका व्हिडीओने माझे लक्ष वेधून घेतले. समाजमाध्यमांवर असलेल्या या व्हिडीओत एक वाघीण पाण्यात निवांत बसली असून साधारणतः आठ-नऊ महिन्यांची तिची दोन पिल्ले तिच्या जवळपास पाण्यामध्ये घुटमळताना, दंगामस्ती करताना दिसत आहेत. आई आणि पिल्लांमधील भावनिक नाते या सुंदर व्हिडीओमध्ये टिपले गेले आहे.

पाण्यातून बाहेर पडल्यावर या वाघिणीची ही दोन्ही पिल्ले तिच्याशी लगट करत पुढे जातात. पाण्यात बसलेल्या या वाघिणीचे नाव आहे ‘बारस’ (T ६५). खुर्सापारच्या जंगलाची ही राणी अनेक पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे. वाघीण असूनही एखादा नर वाघ असल्याची जाणीव तिला बघितल्यावर होते. नर वाघासारखे असणारे भारदस्त शरीर, बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्त्व लाभलेली ही वाघीण पर्यटकांना आवडली नाही तरच नवल!

मला आठवते ‘बारस’चे पहिले दर्शन... खुर्सापार जंगलातील चायपत्ती नावाच्या पाणवठ्यावर आम्ही उन्हाळ्यातील दुपारच्या फेरीत आलो होतो. या पाणवठ्याजवळ एक वाघीण तिच्या तीन पिल्लांसह हमखास दिसते, अशी गाईडची माहिती होती. साहजिकच जंगलात शिरल्याबरोबर जिप्सीचालकाने आपली गाडी या पाणवठ्याच्या दिशेने वळवली. आम्ही तेथे पोहोचण्यापूर्वीच व्याघ्र दर्शनाचा सोहळा सुरू झाला होता.

एक वाघीण पाणवठ्याच्या समोरच्या बाजूला असलेल्या झाडाच्या सावलीत आपल्या दोन पिल्लांसह बसल्याचे आम्हाला दिसले. उन्हाचा तडाखा असल्याने वाघाला मिळणारी सावली आपल्याही नशिबी यावी, या अनुषंगाने प्रत्येक जिप्सीचालकाने सोयीनुसार झाडांच्या सावलीत गाडी लावण्याचा प्रयत्न केला होता. वाघीण झोपली असल्यामुळे साहजिकच गाडीतील पर्यटकही निवांत होते.

झाडांच्या सावल्या लांबलचक होऊ लागल्यावर वाघीण उठली आणि टाक्यातील पाण्याजवळ येऊ लागली. त्याबरोबरच तिची आठ ते नऊ महिन्यांची पिल्लेही पाण्यात आली. तिसरे पिल्लू मात्र काहीसे दूर झाडीत बसले होते. ते नर पिल्लू असावे, असा माझा कयास होता. तेही पाण्यात उतरून पाणी प्यायले आणि आम्ही ज्या ठिकाणी रस्त्यावर गाड्या थांबवल्या होत्या त्या दिशेनेच थेट सरळ चालत आले.

या वयातील पिल्लाला मोठे कुतूहल असते, याची जाणीव होती; पण ते बिनधास्त गाड्यांकडे चालत येत, दोन गाड्यांतून रस्ता पार करून पलीकडच्या बाजूला निघून गेले. रस्ता पार करत असतानाच ते पिल्लू वाघीण असल्याचे लक्षात आले. ही तीच ‘बारस’... बिनधास्त, बेधडक आणि बोल्डही. २०१७ मध्ये घडलेल्या या प्रसंगात या पिल्लांची आई होती ‘दुर्गा’. तिच्या तीन पिल्लांची नावे ‘बारस’, ‘बिंदू’ आणि ‘संभाजी’.

मध्य प्रदेशचे पेंच आणि महाराष्ट्राचे पेंच व्याघ्र प्रकल्प ही एकमेकांना जोडलेली जंगले आहेत. साहजिकच महाराष्ट्रातील वाघ मध्य प्रदेशात जाणे आणि मध्य प्रदेशातील वाघ महाराष्ट्रात येणे हे स्वाभाविक आहे. वाघांना हद्द असते. मात्र, सीमा नाही. मध्य प्रदेशातील बाघीननाला या वाघिणीच्या पोटी ‘दुर्गा’चा जन्म झाला. ‘दुर्गा’ वाघीण मग आपले क्षेत्र शोधत महाराष्ट्रातील खुर्सापारच्या जंगलात आली. या वेळी ‘हॅण्डसम’ नावाच्या नरापासून दुसऱ्या बाळंतपणात २०१६-१७ च्या सुमारास तिला तीन पिल्ले झाली. २०१९ मध्ये ही तिन्ही पिल्ले मोठी झाल्यानंतर स्वतंत्र झाली.

‘बारस’ या वाघिणीने आपल्या आईलाच आव्हान दिले आणि आईचे क्षेत्र काबीज केले. ‘बिंदू’ वाघीण या क्षेत्राला लागून असलेल्या क्षेत्रात स्थिरावली, तर ‘संभाजी’ हा नर मध्य प्रदेशच्या रुखड क्षेत्राकडे गेला.

वाघाच्या नावाबाबत मी प्रत्येक भागात चर्चा केली आहे. ‘बारस’ हे नाव कसे पडले याबाबतही काहीसे गमतीशीर सांगितले जाते. या वाघिणीच्या डाव्या डोळ्याच्या वर मराठी ‘१२’ असे लिहिल्याचे काही छायाचित्रकारांच्या लक्षात आले आणि बाराचे ‘बारस’ झाले. खरे तर हा प्रकार काहीसा हास्यास्पद आहे. प्रत्येक जण वाघाच्या शरीरावरून कोणत्या ना कोणत्या पट्ट्याच्या आधारे नाव ठेवू शकतो, हेही तितकेच खरे आहे.

‘बिंदू’ आणि ‘बारस’ या दोघीही वाघिणी अंगाने अतिशय भरभक्कम व दणकट आहेत. त्यांचा आकार, त्यांच्या गळ्याजवळ असणारा केसांचा झुबका हा खरे तर नर वाघांच्या चेहरेपट्टीकडे नेणारा आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच या दोघी बहिणी सौंदर्याचे लेणे घेऊन जन्माला आल्या, हे मात्र खरे. ‘बारस’चे सौंदर्य तर भुरळ घालणारे आहे.

खुर्सापार प्रवेशद्वारावर गाईडचे काम करणारा संजू भलावी सांगतो, ‘या क्षेत्रातील चायपत्ती, सेंटर पहाडी, बांद्रा तलाव आणि अन्य क्षेत्रांमध्ये ‘दुर्गा’ या वाघिणीचा वावर होता. मात्र जशी ‘बारस’ मोठी झाली तसे तिने आपल्या आईला या क्षेत्रातून बाहेर काढले. आता ‘दुर्गा’ सिल्लारी आणि खुर्सापारच्या मधल्या जंगलात वावरत आहे.

‘बारस’ने हे क्षेत्र मिळवल्यानंतर बांद्रा तलाव परिसरात दिसणाऱ्या नरासोबत घरोबा केला. हा नर ‘बांद्रा मेल’ या नावाने ओळखला जातो. ‘बारस’ला आतापर्यंत तीन वेळा पिल्ले झाली आहेत. पहिल्या वेळी तिला दोन पिल्ले झाली. दुसऱ्या वेळी तीन आणि तिसऱ्या वेळीही तिला तीन पिल्ले झाली. त्यातील दुसऱ्या बाळंतपणातील तिन्ही पिल्ले मृत्युमुखी पडली.

म्हणजेच दुसऱ्या नर वाघांनी त्यांना मारले. तिसऱ्या बाळंतपणातील तीनपैकी एक पिल्लू मृत्युमुखी पडले असून आता ती आपल्या दोन पिल्लांसह फिरत आहे. पहिल्या बाळंतपणातील ‘B १’ आणि ‘B २’ या दोन वाघिणींनी आपल्या आईच्या म्हणजेच ‘बारस’च्या क्षेत्रातच घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यात ‘B २’ यशस्वी झाली.

तिने आईला तिचे क्षेत्र सोडण्यास भाग पाडले असून आता ‘बारस’ बांद्रा तलावाच्या बाजूला, गावाच्या क्षेत्रात तसेच महामार्गापर्यंत बाहेर फिरायला लागली आहे. अर्थातच या भागात दुसरा एक नर येऊ लागल्याने साहजिकच पिल्लांच्या काळजीपोटीही ‘बारस’ने आपले क्षेत्र गावाजवळ केले. बकरी तिचे आवडते खाद्य आहे. ‘बारस’ने जे ‘दुर्गा’बाबत अवलंबले तेच चक्र तिच्याही बाबतीत झाले.

आपल्या आईला पराभूत करणाऱ्या या वाघिणीला आपल्या मुलीकडून पराभूत व्हावे लागले. वाघांच्या दुनियेतील सत्य तिच्याही नशिबी आले. साधारणपणे २०१६-१७ पासून खुर्सापारमध्ये आपले भक्कम पाय रोवणाऱ्या ‘बारस’ला फार काळ या क्षेत्रात आपले स्थान टिकवता आले नाही. खुर्सापार जंगलाचे हे क्षेत्र खरे तर २०१३-१४ नंतर जगापुढे आले.

हे जंगल जरी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी क्षेत्राशी जुळलेले असले, तरी उंच-सखल डोंगराळ भाग आणि काहीसे विरळ जंगल येथे आहे. सुरुवातीच्या काळात एफडीसीएमच्या अधिपत्याखालील या क्षेत्राने आता खऱ्या अर्थाने बाळसे धरले आहे. हा जंगलाचा भाग मध्य प्रदेशच्या जंगलालगत असल्याने प्रामुख्याने या जंगलात मध्य प्रदेशातील टुरिया, कोहका या भागातील पर्यटकांचा ओघ या प्रवेशद्वाराकडे आणि या क्षेत्राकडे असतो. वाघाचे हमखास दर्शन अशीच या क्षेत्राची ओळख आहे.

डिसेंबर २०२० च्या एका घटनेने या वाघिणीला मोठी प्रसिद्धी मिळाली. या सुमारास ‘बारस’ला तीन लहान पिल्ले होती. या तिन्ही पिल्लांना दुसऱ्या नर वाघाने मारले असावे. या सुमारास या वाघिणीने आपल्या एका मृत पिल्लाचे शरीर तोंडात धरल्याचे वन कर्मचाऱ्यांना दिसले. त्यानंतर तिनेच आपल्या पिल्लांना मारले असावे, अशा स्वरूपाची चर्चा झाली. मात्र अन्य नर वाघाने तिच्या पिल्लांना मारले की अन्य कुठल्या प्राण्यांकडून ती मारली गेली, याबाबत फारसा तपशील पुढे आला नाही. मात्र, वाघ आपल्या पिल्लांना खातो अशा स्वरूपाची चर्चा, बातम्या मात्र त्यावेळेस आल्या.

गेल्या महिन्यात मी एक संध्याकाळची सफारी या जंगलात केली होती; मात्र त्या वेळेस मला ना ‘बारस’ भेटली ना ‘B २’... रानकुत्र्यांच्या दर्शनावरच मला समाधान मानावे लागले. दुसऱ्याच दिवशी सकाळच्या सफारीत ‘B २’ ही वाघीण आपल्या अडीच ते तीन महिन्यांच्या पिल्लांना घेऊन पर्यटकांना सामोरी गेली. तिची चार लहान पिल्ले बघून आपले नशीब किती ‘जोरदार’ आहे, याची प्रचीती मला पुन्हा एकदा आली.

गेल्याच आठवड्यात या ‘B २’ वाघिणीने एका गाईचा फडशा पाडला होता. त्या वेळेस ती जंगलातील रस्त्यावर निवांत बसली होती आणि तिच्या आजूबाजूला तिची चार गोंडस पिल्ले फिरत होती. या जंगलात आता एक नवा अध्याय सुरू झाला आहे.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com