दिवे तर लावले पण डोक्‍यात प्रकाश पडेल का? 

योगेश कानगुडे 
रविवार, 5 एप्रिल 2020

कोरोनामुळे अमेरिकेची जी अवस्था आहे ती या संकटाला सुरुवातीस गांभीर्याने घेतले नाही म्हणून. अमेरिकेत १५ फेब्रुवारी रोजी फक्त १५ जण बाधित होते. एक महिन्यानंतर १५ मार्चला ही संख्या ३,६१३ झाली. सुरुवातीला वयस्कर आणि इतर आजार असणारे लोक दगावत होते. या संकटाची चाहूल लागलेल्या अनेक राज्यांनी पावले उचलली. अनेक ठिकाणी त्यांनी लॉकडाउन केले. 

देशात लॉकडाउन लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील नागरिकांनी रविवारी (ता. 5) रात्री 9 वाजता नऊ मिनिटांसाठी प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती, पणती, दिवे, मोबाईलचा टॉर्च किंवा फ्लॅशलाईट लावून प्रतिसाद दिला. हे आवाहन करतानाच लोकांनी रस्त्यावर येऊ नये, असं सांगितले होते. आपल्या घरातील बाल्कनीत किंवा अंगणात दिवे लावावेत, असं सांगितलं. पण प्रत्यक्षात किती लोकांनी पाळले हा मोठा प्रश्‍न आहे. 

पुण्यातील माझ्या भागातील लोक टॉर्च लावताना जोरजोरात ओरडत होते. काही जणांनी तर फटाके फोडले. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं आव्हान होतं, ते म्हणजे कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही. याला सर्रास हरताळ फासला गेला. एका वृत्तवाहिनीवर संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीच्या बाल्कनीतील दृश्‍य बघून मला आपण या व्हायरसबद्दल किती गंभीर आहोत याची जाणीव झाली. कारण एका गॅलरीमध्ये जवळपास सहा ते सात लोक होते. बरं परिस्थिती तिथेच होती असं नाही. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे ते प्रकार चालले होते. मुंबईत तर एका ठिकाणी प्रचंड मोठा घोळका जमला होता. सोलापुरात एका ठिकाणी आग लागल्याची माहिती आहे. यातून आपण सगळ्यांनी एकतेची ऊर्जा नक्कीच घेतली असेल. पण सोशल डिस्टन्सिंगचं काय? सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केल्यास काय होते अमेरिकेच्या उदाहरणातून पाहूयात. 

सध्या अमेरिकेची काय परिस्थिती 

कोरोनामुळे अमेरिकेची जी अवस्था आहे ती या संकटाला सुरुवातीस गांभीर्याने घेतले नाही म्हणून. अमेरिकेत १५ फेब्रुवारी रोजी फक्त १५ जण बाधित होते. एक महिन्यानंतर १५ मार्चला ही संख्या ३,६१३ झाली. सुरुवातीला वयस्कर आणि इतर आजार असणारे लोक दगावत होते. या संकटाची चाहूल लागलेल्या अनेक राज्यांनी पावले उचलली. अनेक ठिकाणी त्यांनी लॉकडाउन केले. अनेक ऑफिस, शाळा, खासगी कंपनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली. घरात राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा हे आवाहन वारंवार तेथील राज्यांनी केले पण लोकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. पुढच्या १५ दिवसात म्हणजे एक एप्रिलला बाधितांची संख्या या केसेस ३,६१३ वरून एकदम २४४,८७७ वर गेली. आता हा देश संपूर्ण लॉकडाउन करायला निघाला आहे.  

हे पण वाचा - सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी वकीलावर गुन्हा दाखल

यातील सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे कोरोना टास्क फोर्सचे प्रवक्ते डॉ. अँथोनी फॉसी आणि डॉ. डेब्रा बिर्क्स यांनी वर्तवलेला अंदाज. या दोघांच्या अंदाजाने डिसेंबर अखेर अमेरिकेत एक ते दोन लाख लोक कोरोना विषाणूमुळे बळी पडतील. आणि तेही जर लोकांनी स्वयंस्फूर्तीने सोशल डिस्टन्सिग पाळले आणि घरातच थांबले तरच. नाहीतर हे प्रमाण प्रचंड वाढू शकते. कोणतीही विशेष तयारी न केल्याने जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेची आज जगभरात नाचक्की झाली आहे. 

सोशल डिस्टन्सिंगच नाही पाळलं तर काय? 

सुरुवातीला अशी अपेक्षा होती, की फक्त रोगी आणि ज्यांना या आजाराची लक्षणे दिसत आहेत अशांनीच फक्त मास्क घालावेत. निरोगी माणसांनी मास्क घालायची गरज नाही. पण जसे हे सिद्ध झाले की ज्यांना आजाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत पण जे इन्फेक्टेड आहेत असे लोकही या रोगाचे वाहक आहेत. मग आता अशा सूचना आहेत की, सार्वजनिक ठिकाणी जाताना सगळ्यांनीच मास्क घाला. एन-९५ मास्कचा तुटवडा असल्याने ते फक्त आवश्यक लोकांनीच वापरावेत जसे की डॉक्टर आणि नर्सेस. बाकी साऱ्यांनी सर्जिकल मास्क किंवा घरी शिवलेले मास्क वापरावेत. या विषाणूने जगभर थैमान घातले आहे. सध्या तरी परवडेल आणि प्रभावी असेल असा एकच उपाय आहे सोशल डिस्टन्सिंग.

हे पण वाचा - ब्रेकिंग - बेळगावात तबलिगीतील आणखी चार जण कोरोना पॉझिटीव्ह

आपल्याकडे काय परिस्थिती?

आपल्याकडील सोशल डिस्टन्सिंग बघितले तर आपणसुद्धा अमेरिकेसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. भाजीपाला मार्केटमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊन देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नाही. अशावेळी सोशल डिस्टन्स ठेवा, मास्क घाला, सॅनिटाझरचा वापर करा, हात स्वच्छ धुवा, घरातच रहा घराबाहेर निघू नका, असे आवाहन वारवार केले जात आहे. पण याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. 

कालचे उदाहरण घ्या, वर्धा जिल्ह्यातील एका आमदाराने आपल्या वाढदिवसांनिमित एक कार्यक्रम आयोजित केला. संचारबंदीचं उल्लंघन तर केलंच शिवाय सोशल डिस्टन्सिंग न पाळून लोकांच्या जीवाशी खेळ केला.

हे झालं आपल्या राज्यातील परिस्थितीबाबत. दुसरं उदाहरण म्हणजे राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये झालेला ‘तब्लिगी जमात’चा कार्यक्रम. या समाजाने कार्यक्रम रद्द न करता येणाऱ्या संकटाकडे लक्ष दिले नाही. या कार्यक्रमामुळे देशात कोरोना संक्रमित होणाऱ्या लोकांचा वेग दुप्पट वाढला आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजच स्पष्ट केले आहे. या सर्व घटना बोलक्या आहेत. यातून आपण बोध घेतला पाहिजे.

हे पण वाचा - देवा तुझ्या डोंगरावर लॉकडाऊनचा पहारा ; गुलाल तुझ्या नावाचा आता उधळावा कसा ? 

आपल्या देशाचे पंतप्रधान असो, की राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानांकडे दुर्लक्ष करू नका. जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवे लावले तसे त्यांचे बाकीचे पण ऐका. सांगितलेल्या गोष्टी जर ऐकल्या नाही तर येणारा काळ माफ करणार नाही. कारण 'फेज-१'मध्ये असतानाच मोठ्या प्रमाणात चाचण्या करणे, पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा माग काढून त्यांचे विलगीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउन या सगळ्या उपायांच्या एकत्रित वापराने हे संकट काबूत ठेवता येते हे जर्मनीने दाखवून दिले आहे. जर आपण असं करणार नसू तर असं म्हणावे लागेल 'दिवे तर लावले, पण आमच्या डोक्यात प्रकाश नाही पडला.'

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people nothing serious pm narendra modi challenge