‘जन्म आणि मृत्यू’ या दोन महत्त्वाच्या टप्प्यांतील जो काळ आहे, ते म्हणजेच जीवन. जे जन्माला येते त्याचा मृत्यू होणे, हे एक अटळ सत्य आहे. त्यामुळे हे सत्य स्वीकारून, त्याची भीती न बाळगता आपल्याला कसे जगायचे आहे, हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.
आध्यात्मिक गुरू, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते सद्गुरू यांच्या ''डेथ ऑफ इनसाइड स्टोरी'' या पुस्तकाचे मराठी भाषांतर म्हणजे ‘मृत्यू : एक अटळ सत्य’, हे केवळ मृत्यूवरील विवेचन नाही, तर प्रत्येकाने आपले जीवन कसे सुंदर करायला हवे, याचा हा गुरुमंत्र आहे. सद्गुरूंनी जगण्याचे असंख्य प्रयोग या पुस्तकाच्या माध्यमातून अधोरेखित केले आहेत.
माणूस म्हणून जगताना अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडत नाहीत. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही टोकांचा आधार घेऊन आपले जगणे सुरू असते. आपल्याला जगायचे असते म्हणून शरीरासाठी ‘दवा’ आणि मनासाठी ‘दुवॉं ’ उपयोगी पडत असतात. मात्र त्या कुठल्याही माणसाची कायमस्वरूपी मृत्यूपासून सुटका करत नसतात.
जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे, हे सत्य असले तरी, मृत्यू कधी येईल, हे कुणालाच कधी कळत नसते. मृत्यू अटळ असला, तरी त्याची भीती न बाळगता आपल्याला कसे जगायचे आहे, हाच संदेश या पुस्तकाचे संचित आहे. हे पुस्तक तीन भागांत विभागले आहे. ‘जीवन आणि मृत्यू एकाच श्वासात’ या भागात एकूण पाच प्रकरणे आहेत.
प्रत्येक प्रकरणातील उपशीर्षकांमुळे तपशील नीट समजून घेणे, मुद्द्यांनुसार नोंदी करून घेणेही सोपे झाले आहे. ‘मृत्यूचे सौंदर्य’ या दुसऱ्या भागात पाच प्रकरणे आहेत आणि तिसऱ्या भागात ‘मृत्यूनंतरचं जीवन’ हे तीन प्रकरणांतून विशद केले आहे. सद्गुरूंनी मृत्यूवर कथन करताना जगण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य केले आहे.
देव आपल्या बाजूने आहे, असे समजणाऱ्यांना सल्ला देत ते म्हणतात, ‘देव माझ्यासोबत आहे,’ या विचाराने तुम्हाला मिळणारा आत्मविश्वास हा अतिशय भयावह आहे. देवाबद्दलच्या तुमच्या अशा भावनेमुळे तुम्ही आध्यात्मिक होणार नाही. उलट तुम्ही अधिकच बेदरकार आणि अविवेकी बनाल.
मृत्यू कसा होतो आणि मृत्यू झाल्यानंतर नेमके काय होते, त्यासाठी सद्गुरूंनी त्यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग ‘शोध मृत्यूचा’ या उपशीर्षकांतर्गत विशद केला आहे. त्यातून सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी काय-काय प्रयोग केले, याचीही प्रचिती येते.
अमरत्वाच्या संकल्पनेवर ते म्हणतात, जर तुम्हाला कुणी अमर होण्याचा शाप दिला किंवा तुमच्या आयुष्यातून मरण काढून घेतले गेले, तर ती तुमच्यासोबत होऊ शकणारी सर्वांत भयावह गोष्ट असेल. तुमचे आयुष्य कितीही सुंदर असलं, तरी जर वेळेवर मरण आलं, तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात.
जर ते उशिरा आलं आणि जीवन एका विशिष्ट मर्यादेपेक्षा ताणले गेले, तर ती सर्वांत भयंकर पीडा ठरेल. 'मृत्यू' झाल्यानंतर आपल्या शरीरातून किती वेळात काय-काय निघून जाते, याविषयी सद्गुरूंनी केलेले विश्लेषण सर्वसामान्य माणसाला चकित करणारे आहे.
एखाद्या माणसाचा मृत्यू झाला; पण तो अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच जिवंत होऊन उठून बसतो आणि चालायला लागतो, असे आपण ऐकलेले आहे. त्याला आपण आश्चर्यकारक घटना समजतो. पण हे नेमके कशामुळे झाले, याचे सद्गुरूंनी विस्तृतपणे तपशीलवार कथन केले आहे.
‘मृत्यूचा क्रम’ या उपशीर्षकांतर्गत ‘प्राण निघून जाण्याच्या प्रक्रियेचा सारांश’ या तक्त्यातून समान वायू, प्राण वायू, उदान वायू, अपान वायू, व्यान वायू किती वेळानंतर शरीरातून बाहेर जातात, हा तपशील वाचकांना ज्ञानसंपन्न करणारा आहे. मृत्यूचे भाकीत, आत्महत्या, परकाया-प्रवेश, समाधी, मुक्ती, दयामरण अशा काही नेहमीच चर्चेत येणाऱ्या मुद्द्यांवरचे विवेचन खिळवून ठेवणारे आहे.
अविनाश बर्वे यांनी सोप्या भाषेत पुस्तकाचा अनुवाद केला आहे. काही गोष्टी अद्भुत वाटतात, आपल्याला चकवतात, त्याची कारणं आपल्याला ठावूक नसतात. साधनेत असणारी शक्ती आपण सामान्य जीवन जगत असताना कळत नसते.
सद्गुरूंनी त्यांच्या जगण्यातले काही प्रयोग, त्यांनी स्थापन केलेल्या ईशा केंद्रातील साधकांचे दाखले, देशविदेशांतील काही निरीक्षणे, पुराणकथा, विज्ञान आणि अध्यात्म अशा विविध स्तरांवर भाष्य करताना आपण कसे जगले पाहिजे, हे सांगितले आहे. त्यामुळे सद्गुरूंचे हे तत्त्वज्ञान आयुष्य सुंदर करण्याची ऊर्जा देणारे ठरणार आहे.
सद्गुरू म्हणतात...
तुम्ही मृत्यूला घाबरत असाल, तर केवळ जीवन टाळाल, मृत्यूला टाळू शकत नाही.
अर्धवट जगणं हा नेहमीच छळ असतो.
‘मृत्यू जगणं’ हा एक भन्नाट अनुभव आहे; पण ‘मृतवत जगणं’ हे भयंकर दु:खद असतं.
मृत्यूच्या भीतीचा सामना केला, तर तुमच्यामध्ये अत्यंत स्पष्टता येईल आणि तुमच्या आयुष्याचा कायापालट होईल.
पुस्तकाचे नाव : मृत्यू : एक अटळ सत्य
लेखक : सद्गुरू
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
(संपर्क : ०२०-२४४०५६७८, ८८८८८४९०५० )
पृष्ठे : ३९० मूल्य : ३९९ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.