
- डॉ. भास्कर पाटील, drbhaskarpatil7@gmail.com
‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ म्हणजे साहित्य चळवळीप्रतीची एक कृतज्ञता आहे. एकूणच मराठी कोशवाङ्मयाला अधिक व परिपूर्णतेकडे नेणारा कोश म्हणून त्याकडे बघावे लागेल. काळाचा मोठा व्यापक पट ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोशा’ने व्यापलेला आहे.
कोशवाङ्मय आधुनिक काळाची देण आहे. कोशवाङ्मयाचे स्वरूप हे निव्वळ साहित्य अथवा वाङ्मय यांच्याशी संबंधित आहे असे नाही. आज आपण मराठीतील कोशवाङ्मयाचा आढावा घेतला तरी त्यातील विविधता लक्षात येईल. कारण मराठीतच शब्दकोश, ज्ञानकोश, ज्ञान व्यवहार कोश, संत साहित्य कोश, भारतीय संस्कृती कोश, चरित्र कोश, तत्त्वज्ञान कोश, विश्वकोश आणि आता फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश अशा प्रकारचे कोश निर्माण झाले आहेत.
या कोशाच्या शीर्षकावरून आपणास त्याअंतर्गत असणारी ज्ञानसामग्री काय असेल, याचे अनुमान करता येते. कोशाचे स्वरूप हे बहुविषयी, बहुज्ञानी आहे हे जागतिक पातळीवरील कोशाने सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ हा या शतकातील महत्त्वपूर्ण आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणारा आहे.
हा कोश म्हणजे साहित्य चळवळीप्रतीची एक कृतज्ञता आहे. एकूणच मराठी कोशवाङ्मयाला अधिक व परिपूर्णतेकडे नेणारा कोश म्हणून त्याकडे बघावे लागेल. या कोशात नोंद झालेले लेखक, कवी हे आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेले ध्येयप्रवण आहेत. यांची लेखणीही निव्वळ स्वतःसाठी झटली नाही तर समष्टीसाठी झिजली आहे.
म्हणून या कोशातील अनेक लेखक-कवी यांचे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन योगदान महत्त्वाचे आहे. कोशाची आणखी एक महत्त्वाची उपयुक्तता आहे ती म्हणजे साठोत्तरी प्रवाहातील साहित्यात वऱ्हाडी शब्दकोश सोडला तर इतर प्रवाहातील साहित्याचे कोणत्याच प्रकारचे कोश अद्याप निर्माण झाले नाहीत.
हा कोश निर्माण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र संपादक डॉ. महेंद्र भवरे यांनी वेळोवेळी धीर दिला, ऊर्जा दिली आणि संयमाने काम कसे करावे, याचा धडा दिला. त्यामुळे कामाला गती येत गेली.
‘फुले-आंबेडकर वाङ्मयकोश’ म्हणजे वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळात शब्द, ग्रंथ, प्रेरणा व चळवळी यांपासून दूर पळणाऱ्या व्यक्तींसाठी आणि आपला गतेतिहास जीवन हरविलेल्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
पारंपरिक कोशांपेक्षा हा कोश भिन्न स्वरूपाचा आहे; कारण यातील लेखक, कवी, विचारवंत हे मनोरंजक ललितरम्य असे विषय लिहिणारे नाहीत. काही अपवाद सोडले तर एक भूमिका घेऊन लेखन करणारे साहित्यिक यांचा समावेश या कोशात आहे. यातील सगळेच साहित्य मानवतावादी, धर्मनिरपेक्ष, समतावादी आहे. या कोशात नोंदीचे वर्णन अधिकाधिक वस्तुनिष्ठ असून विषयाच्या स्वभावानुसार रचनेची मांडणी केली आहे.
मजकूर अद्ययावत आणि विश्वसनीय असेल, याची खबरदारी घेतली आहे. म. फुले यांच्यापासून तो २०२२ पर्यंतच्या कालखंडातील लेखकांविषयीच्या साडेपाचशेपेक्षा अधिक नोंदी या कोशात आहेत. आंबेडकरपूर्व काळातील म. फुले आणि त्यांचे समकालीन लेखकांच्या लेखनातील मूल्यात्मकता अधोरेखित केली आहे.
आंबडेकरी वृत्तपत्रातील वैचारिक लेखन, कथा, कविता इत्यादी लेखन करणारे लेखक, आंबेडकरी जलसेकर, आंबेडकरी लोकगीतकार यांच्याविषयी संदर्भासह नोंदी लिहिलेल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर उदयाला आलेले दलित साहित्य, साहित्य चळवळीचे प्रवर्तक, साहित्य निर्माते, समीक्षक, विचारवंत यांच्यासह जागतिकीकरणोत्तर काळातील लेखन करणारे लेखक, कवी, नाटककार या सर्वांच्याच अतिशय विस्तारपूर्वक नोंदी लिहिताना ससंदर्भ चर्चा केलेली आहे.
५६० लेखकांविषयीच्या नोंदी हे या वाङ्मयकोशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्य वाचकांना माहीत नसणाऱ्या, आंबेडकरी चळवळीत स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या कितीतरी व्यक्तिमत्त्वांचे दर्शन या कोशात घडते. एवढेच नव्हे; तर पुरोगामी, प्रागतिक विचारांच्या अनेक लेखक, विचारवंतांना येथे जाणीवपूर्वक स्थान देण्यात आले आहे, हे वेगळेपणही जाणवते.
सावित्रीबाई फुले यांच्यापासून ते आजच्या काळातील अनेक कवयित्री, लेखिका येथे पाहावयास मिळतात. अधिकृत माहितीवर अधिष्ठित असणारे हे लेखन अभ्यासक विद्यार्थी, संशोधक, वाचक यांच्यासाठी फार उपयुक्त ठरणारे आहे. काळाचा मोठा व्यापक पट ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोशा’ने व्यापलेला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यांतील दलित साहित्यिकांची नोंद त्यात घेण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन देवराय इंगळे ते शंकरानंद शास्त्री यांचे दर्शन येथे घडते. तसेच, १९५७च्या निवडणुकीत हत्ती चिन्हावर निवडून आलेले खासदार हरिहरराव सोनुलेही आपणास भेटतात. कोशाच्या परिशिष्टात पहिल्या दलित साहित्य संमेलनापासून अनेक साहित्य संमेलनांची अद्ययावत सूची दिली गेली आहे.
अ. भा. दलित साहित्य संमेलने, अ. भा. दलित नाट्य संमेलने, अस्मितादर्श संमेलने, अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलने, विचारवेध संमेलने, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने इत्यादी... या सर्व साहित्य संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांचे संकलन केले तरी फार मोठा ऐवज प्राप्त होऊ शकतो. त्यावर संशोधनही करता येईल.
फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश
संपादक : डॉ. महेंद्र भवरे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
मूल्य : ५००० रु.
पृष्ठसंख्या : १४२८
(लेखक वाङ्मयकोश संपादक सदस्य आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.