

Role of Play in Indian Culture
esakal
आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा सांगावमधील डी. एम. हायस्कूल ही आमची शाळा. शाळेत पीटीच्या तासाला आम्ही लेझीम खेळायचो. हलगीच्या तालात ठेक्यावर पाय पडत, लयीत अंग झुलत असे. रात्री गल्लीतही तेच. चौकात लेझीम व्हायची, बाजूला कुस्तीची तालीम असायची, कुणी धनगर घोंगडीसाठी धागा विणायचा, कुठूनतरी भजनं ऐकू यायची. शाळेतल्या शिक्षणात आणि रोजच्या जगण्यात खेळ होता, ताल होता, लय होती आणि हे सगळं वेगवेगळं नव्हतंच. ''इंटरडिसिप्लिनरी'' हा आजचा बझ वर्ड, पण आमच्या गावात तो जगण्यातला सहज भाव होता. या सगळ्याला जोडणारा शब्दही एकच होता. तो म्हणजे खेळ. लेझीमचा खेळ, कुस्तीचा खेळ, बुद्धिबळाचा खेळ आणि नाटकाचाही खेळच. कोणताही खेळ घ्या, त्यात शारीरिक ताकद, बुद्धी आणि खंबीर मन ही तिन्ही कामाला लागतात. म्हणून तर संत जनाबाईंच्या अभंगात परमेश्वराने मांडलेल्या परमार्थाच्या खेळातही बुद्धीचा कस लागतो. त्या म्हणतात, ‘अहो मांडियला खेळ । बुद्धि रंग बुद्धिबळ.’
खेळ हा शब्द क्रीडा आणि नाट्यप्रयोग अशा दोहोंसाठी वापरतात. इंग्रजीतही तीच गंमत. ''Play'' म्हणजे खेळणं आणि ''play'' म्हणजे नाटक. हा योगायोग नाही. खेळ आणि सादरीकरण संस्कृतीत तसे नेहमी एकत्र गुंफलेले राहिलेत. भारुडात एकनाथ महाराजांनी शब्दांचे खेळ मांडले. स्त्रियांच्या अभिव्यक्तीसाठी झिम्मा-फुगडीचे रंगमंच साकारले. आपल्या परंपरेत तर एक चिंतनगर्भ शब्द आहे तो म्हणजे, लीला. परमेश्वराचा रूप-खेळ म्हणजे लीला. भक्ती, अध्यात्म आणि आत्मज्ञान यांची अनुभूती मांडण्यासाठी थोर विद्वान तसेच कलाकार रूपकातून बोलत आले आहेत. खेळणं, सादर करणं आणि जगणं या तिन्हींची वीण भारतीय परंपरेत घट्ट आहे.