
खेळाडू ते क्रीडा विभागाचा बॉस!
लहानपणी शारीरिकदृष्ट्या कमजोर दिसणारा ‘टीनेज’ मुलगा धडधाकट बनावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर तो धावायला लागला. पुढे मेहनत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. गावखेड्यातील खेळाडू ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचा बॉस (संचालक) अशी गरुडझेप घेणारे डॉ. सूर्यवंशी यांचा हा संघर्षमय प्रवास वर्तमान पिढीतील शेकडो युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत...
गोंदियाच्या नूतन कन्या विद्यालयात शिकत असताना अभ्यासात हुशार असलेला मी खेळात अगदीच शून्य होतो. तेव्हा खेळाडू बनेल असा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. शाळेतील नखाते सर शाळेच्या गॅदरिंगमध्ये पहेलवान विद्यार्थ्यांसोबत कुस्ती लावायचे. त्यात हरणाऱ्याची अन्य विद्यार्थी टिंगल उडवायचे. त्या गोष्टीचा कुठेतरी माझ्याही मनावर परिणाम झाला. कारण शरीरयष्टीने मी खूप कमजोर होतो. मी धडधाकट बनावं, असं वडिलांना सारखं वाटायचं. त्यामुळे ते मला रोज सकाळी धावायला घेऊन जायचे. तेथूनच खेळाबद्दल माझ्या मनात आवड निर्माण झाली. गॅदरिंगमध्ये लांबउडीत तिसरे स्थान पटकावल्यानंतर आणखी हुरूप चढला.
हेही वाचा: नात्यातला गोडवा हरवतोय!
कृषी विभागात नोकरी करणाऱ्या वडिलांची बदली झाल्यानंतर आम्ही नागपूरला शिफ्ट झालो. काँग्रेसनगर येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर एनसीसी होतं. एकदा नांदेडला कॅम्पदरम्यान परेडमध्ये (क्रॉसकंट्रीमध्ये) ८४ व्या स्थानावर आल्यानंतर काढून टाकण्यात आलं. त्यावेळी आयुष्यात दुसऱ्यांदा अपमानित झाल्यासारखं वाटलं. मात्र मी हताश न होता, तो क्षण पॉझिटिव्हली घेतला. पुढे सी. पी. अँड बेरार कॉलेजमध्ये शिकत असताना अविनाश पानतावणे सरांच्या संपर्कात आलो. खेळाला गांभीर्याने घेत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने तेथूनच खेळाडू म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली.
त्रिवेंद्रम येथील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत १५०० मीटरमध्ये नागपूर शहराला पहिल्यांदा पदक मिळवून दिल्यानंतर दिल्ली व गुवाहाटी नॅशनल्समध्ये पदके जिंकल्यानंतर १९८७ मध्ये पोलंडमधील वर्ल्ड क्रॉसकंट्रीसाठी भारतीय संघात निवड झाली. माझ्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण होता. त्याच वर्षी अ. भा. अॅथलेटिक्स स्पर्धेतील साडेबारा किमी शर्यतीत ‘बेस्ट टायमिंग’ दिले. मात्र नंतर पायाला झालेल्या दुखापतीने माझं उर्वरित करिअरच संपवलं. ओव्हरलोडमुळे माझ्यावर ती परिस्थिती ओढवली. त्यावेळी योग्य उपचार झाले नाही. थोडं दुर्लक्षही झालं. तीन-चार वर्षे दुखापतीत गेल्यानंतर मानसिक दडपण आलं. डिप्रेशनमध्ये गेलो. त्यामुळे कधीकाळी पाहिलेलं एशियाडचं स्वप्नही भंग पावलं. दोन वर्षांचा काळ खूप कठीण गेला. मात्र घरच्यांनी सावरलं. निराशेच्या काळात ‘फॅमिली सपोर्ट’ किती महत्त्वाचा असतो, हे त्यावेळी मला कळले.
हेही वाचा: एक अक्षर संत...
बीपीएड व एमपीएड केल्यानंतर धवड कॉलेजमध्ये नोकरीला लागलो. क्रीडामध्ये तो माझा एकप्रकारे पुनर्जन्मच होता. त्यानंतर काही काळ कोचिंग केले. जिल्हा संघटनेत सक्रिय झालो. गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूंच्या हिताची अनेक चांगली कामे केलीत. उशिरा का होईना आता मला त्याचे फळ मिळाले. आज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या संचालकपदी कार्यरत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयुष्यात अनेकवेळा कठीण प्रसंग येतात. मीही त्याला अपवाद ठरलो नाही. परंतु त्यामुळे खचून न जाता सकारात्मक राहून, त्यातून मार्ग काढत पुढे गेलो. युवा खेळाडूंनाही माझा हाच सल्ला राहील. आयुष्यात संधी मिळतात. त्यांचा फायदा घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच मी यशस्वी झालोय.
- डॉ. शरद सूर्यवंशी
Web Title: Players He Is The Boss The Sports Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..