सुरेश भटांचा गगनभेद

थोर कवी सुरेश भट यांच्या अनेक गगनभेदी गझलांपैकी एक म्हणजे ‘फुलावया लागलीस तेव्हा...’ ही गझल. या गझलेचं शीर्षक आहे : दीपदान. सन १९८३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘एल्गार’ या गझलसंग्रहात ती आहे.
poet suresh bhat gazal dipdan 1983 elgar gazal sangrah
poet suresh bhat gazal dipdan 1983 elgar gazal sangrahSakal

- चंद्रशेखर सानेकर

थोर कवी सुरेश भट यांच्या अनेक गगनभेदी गझलांपैकी एक म्हणजे ‘फुलावया लागलीस तेव्हा...’ ही गझल. या गझलेचं शीर्षक आहे : दीपदान. सन १९८३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘एल्गार’ या गझलसंग्रहात ती आहे. अनिबद्ध (गैरमुसलसल) बाजाची, तेरा शेरांची ही गझल. या गझलेतला एकेक शेर म्हणजे एकेक महाकादंबरी आहे.

एकेका शेरानं एकेक महाकादंबरी तोलून धरलेली आहे. हरेक शेर भटसाहेबांनी असा विराट बांधलेला आहे. या तेरा शेरांवर प्रदीर्घ अशा मीमांसेचा एकेक अध्याय लिहिला जाऊ शकतो. कमालीची कोरीव शब्दकळा; त्याहून अधिक कमालीचा आशय असा दुहेरी गोफ विणून भटसाहेबांनी हे थोर गझलशिल्प मराठी कवितेला दिलं आहे.

भटसाहेबांची ही गझल ‘एल्गार’मध्ये वाचली तेव्हा ती मला ‘प्रचंड मोठा चमत्कार’ वाटली होती. आजही ती तितकीच प्रखर वाटते. ज्या काळात मराठी भाषेत गझलेचं कुठलं मॉडेलच उपलब्ध नव्हतं, कुठली परंपरा नव्हती, कुठला वारसा नव्हता, कुठला माहौल नव्हता, कुठली दृष्टी नव्हती, कुठली अभिरुची नव्हती,

कुठलं ज्ञान नव्हतं अशा एकूण भाषिक-सांस्कृतिक-कवितिक वातावरणात भटसाहेबांनी ही गझल लिहिली आहे. ही गझल १९७५ ते ८० या काळात लिहिली गेली असावी. अशा तऱ्हेच्या कमालीच्या परिपक्व, प्रगल्भ,

विराट गझलेची परिकल्पना ते करू शकले आणि आपल्या भाषेतून तिचा त्याहून प्रखर प्रत्यय देऊ शकले. अशी ही गझल मला अनेक कारणांनी एक ‘फेनॉमिनन्’ वाटते. तशी भटसाहेबांची गझल आणि त्यांची गझलप्रतिभा मला कायम ‘फेनॉमिनन्’ वाटत आली आहे.

गझलेच्या मतल्यात ‘वर्तमान’ हा शब्द यमक म्हणून आलाय. या शब्दाचं इतकं कल्पक योजन थक्क करणारं आहे. गझलेची भाषा आणि शब्दकळा यांचा एक खास ढंग असतो याचा बोध या शब्दानं झाला. (समर्थ रामदासांच्या ‘दासबोधा’त हा शब्द वाचल्याचं स्मरतं).

‘वर्तमान असणे’ असा एक वाक्प्रचार भटसाहेबांनी या गझलेतून पुनःस्थापित केला आहे असं वाटतं. गझलेसाठी मात्र हा वाक्प्रचार नवा आहे असं म्हटल्यास ते चुकीचं ठरू नये.

या गझलेत व्यष्टी, समष्टी, व्यवस्था, राजकारण, अराजक, प्रेम, जीवन असे विषय आले आहेत. समकालीन मराठी कवितेत अशा विषयाच्या आणि संवेदनांच्या कविता विपुल आहेत, समृद्ध आहेत. मात्र, अशा संवेदनांचा साक्षात्कारी प्रत्यय, तोही ‘विद्युती’ प्रत्यय, या गझलेच्या शेरांतूनच येतो. यासाठी उदाहरण म्हणून कुठला एकच एक नव्हे तर, कुठलाही शेर घेतला तरी असा प्रत्यय तो देऊ शकतो.

गझलेतर काव्यशैलीत कवी आपल्या संवेदनांचं रूपांतर ऐसपैस, प्रशस्त, तपशीलवार, वर्णनात्मक रूपात करतो. गझलेत हेच रूपांतर थेट, सुस्पष्ट, विराट आणि तितकंच गहिरं असं करावं लागतं.

समकालीन अन्य कवींची अशा संवेदनांची कविता वाचताना तरंगमान व्हायला होतच; पण या गझलेचे शेर वाचताना मात्र आपल्या मनात विजा सळसळत आहेत असं वाटतं...आपल्याला आहेत त्यापेक्षा अधिकाधिक डोळे हे शेर आपल्यात निर्माण करत आहेत असं वाटतं...आल्हाद वाटणं, छान वाटणं,

नवल वाटणं, विस्मय वाटणं, नि:शब्द होणं अशा भावनांहून एखादा नवा, अपरिचित असा साक्षात्कार हे शेर आपल्याला घडवत आहेत की काय असं वाटतं... केवळ दोन ओळींच्या अवकाशात अजून दूरचा, अजून पलीकडचा, अजून बराच मोठा अवकाश हे शेर आपल्याला दाखवत आहेत असं वाटतं!

हे शेर अजिबात प्रासंगिक किंवा नैमित्तिक किंवा तात्कालिक नाहीत. या सृष्टीत ‘यथार्था’ची जी चिरंतन रूपं कालौघात कार्यरत असतात, जिवंत असतात आणि एकूण मानवी जीवनाला ग्रासत असतात त्याच ‘यथार्थ’ रूपांची नक्षी या शेरांनी रेखाटलेली आहे. उदाहरणार्थ : माणसाचा आणि समाजाचा दुटप्पीपणा हे ‘यथार्थ’ बघता येईल. म्हणजे, सुखाचा भोग फक्त एकमेव आपणच घ्यायचा; पण तो दुसऱ्या कुणी घेतला तर उच्छाद करायचा. यावर तीव्र धारदार भाष्य असलेला हा शेर पाहा :

सवाल माझ्या स्वतंत्रतेला करून आताच ते निघाले

स्वत:च जे चोरट्या सुखाचे निलाजरे बंदिवान होते!

(ज्या संवेदना कवीला जाणवलेल्या असतात तशा संवेदना सर्वसाधारण माणसालाही जाणवू शकतात. त्या संवेदनांचा सुस्पष्ट उलगडा मात्र सर्वसाधारण माणसाला झालेला नसतो. तोच उलगडा त्याला मोजक्या, चपखल शब्दात प्रभावीपणे करून द्यायचा असेल तर तो जे शब्दशिल्प धारण करेल तेच रूप या शेरांनी धारण केलेलं आहे).

तत्त्वज्ञानाची भाषा बोलणं हे मराठी कवितेला नवीन नाही किंवा कठीणही नाही. आपल्या तमाम साधू-संतांनी अशा भाषेची अप्रतिम मशागत आणि जडणघडण करून ठेवलेली आहे. आधुनिक काळात हीच तत्त्वचिंतनाची भाषा ठळकपणे ज्या कवींनी आपल्या कवितेत आणली त्यात भटसाहेब उच्च स्थानावर आहेत. त्यांनी ही तत्त्वचिंतनाची भाषा आपल्या गझलेला दिली...नव्हे, ही तत्त्वचिंतनाची भाषा त्यांनी आपल्या गझलेतून मराठी कवितेत पुन्हा खेळवली! या दृष्टीनं ‘असा कसा तो प्रवास होता’, ‘अताच कोणी फकीर माझ्या,’ ‘तुम्ही मला पाहिलेच कोठे’ या शेरांकडं बघता येतं.

कलावंत किंवा कवी आपल्या काळाला वाणी देतो. काळ हा आपल्या ओठावरची सत्ये बोलत असतो. कवी ती सत्ये अभिव्यक्त करतो. संख्येच्या दृष्टीनं फार कमी कवी, दुर्मिळ कवी काळाच्या अशा सत्यांना प्रभावी प्रत्ययकारी रूप देऊ शकतात. काळाच्या ओठावरची अशा सत्ये भटसाहेबांनी आपल्या गझलेतून प्रकट केली आहेत.

‘सवाल माझ्या स्वतंत्रतेला...’, ‘तुझ्यापुढे न्यायदेवतेने...’, ‘मुठीत घेऊन जीव माझा...’, ‘आम्हास फिर्यादही खुनाची...’ या शेरांकडं या दृष्टीनं पाहता येईल.

आपली गंभीर, गहिरी, सखोल अशी जीवनचिंतने भटसाहेबांनी अशा शेरांतून मांडली आहेत. त्यांच्या समकालीन कविताविश्वात यासाठी छंदोबद्ध-वृत्तबद्ध कवितेचे, तसंच मुक्तछंदाचे विविध प्रकार कवींना खुले होते. तसा त्या काळाचा रिवाजही बनला होता. या काव्यप्रकारातही गंभीर कविता लिहिता येऊ शकते.

अशाच काळात भटसाहेबांनी गझल स्वीकारली जी अत्यंत संपृक्त, आटीव, चपखल, अल्पाक्षरी अशा शब्दकळेची कविता आहे. अशा काव्यशैलीत आपल्या संवेदना तीव्र प्रत्ययकारी शेरात बांधण्याचं कौशल्य त्यांनी दाखवलं.

हे कौशल्य ज्या प्रभावी रूपात त्यांनी प्रकट केलं आहे त्याचा सतत तीव्र अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही; कारण, इतक्या संपृक्त, इतक्या ताशीव, इतक्या पैलूदार, इतक्या गतिमान ओळी अन्य कवींच्या गझलांत तर सोडूनच द्या, इतर कवींच्या कवितांमध्येही सहजी सापडत नाहीत.

भाषेची कमीत कमी भूमी व्यापून तिच्यावर जास्तीत जास्त विराट आशयाची कलाकृती उभी करणं हे कवीचं कवितेतलं आद्य आणि मूलभूत कौशल्य असतं. गझल हा याच प्रमुख कौशल्याची मागणी करणारा काव्यप्रकार आहे. या कौशल्याचा अत्यंत परमोच्च असा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही गझल : दीपदान. भटसाहेबांची ही गझल म्हणजे संवेदनांचं अफाट अवकाश आपल्या कवेत घेणारी आकाशगंगा आहे!

poet suresh bhat gazal dipdan 1983 elgar gazal sangrah
Man kills live-in partner: माणूस की हैवान? अंडाकरी बनवली नाही म्हणून लिव्ह-इन पार्टनरची हत्या; प्रेयसीवर हातोड्याने केले वार

दीपदान

फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते

वसंत आला निघून गेला...मला कुठे वर्तमान होते

असा कसा तो प्रवास होता दिले दगे सारखे तरूंनी

दुपारचे ऊन्ह सावलीच्या सुखातही विद्यमान होते

सवाल माझ्या स्वतंत्रतेला करून आताच ते निघाले

स्वतःच जे चोरट्या सुखाचे निलाजरे बंदिवान होते

तुझ्यापुढे न्यायदेवतेने कबूलही पिंजऱ्यात केले -

‘तुझ्या चुका वंदनीय होत्या! तुझे गुन्हे पुण्यवान होते!’

अताच कोणी फकीर माझ्या घरापुढे ओरडून गेला

शिकस्त झालास तू न बेटा, तुझे इरादे महान होते!

घरोघरी हीच एक चर्चा- तिचे घराणेच राजवंशी!

(जिते न जे बंडखोर ज्यांचे भिकारडे खानदान होते)

अता स्मरे एवढेच...तेव्हा कुठेतरी खोल दंश झाला...

खरेच का सोनकेवड्याचे मनात माझ्याच रान होते?

असे दिले शब्द शृंखलांनी...असा दिला त्वेष दुःखितांनी

दुभंग मी राहिलो तरीही अभंग माझे इमान होते

तुम्ही मला पाहिलेच कोठे? तुम्ही मला भेटलाच कोठे?

जिथे मला गाठले तुम्ही ते जिवंत माझे स्मशान होते

जरा तुझ्या अंगणात आलो...उनाड वाऱ्यासवे उडालो...

अता फुलांना विचार, ‘येथे खरेच का एक पान होते?’

मुठीत घेऊन जीव माझा कसातरी जन्म काढला मी

तयार बाहेर सूळ होता...घरात भिंतीस कान होते

अम्हास फिर्यादही खुनाची तुझ्यापुढे आणता न आली

तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते

म्हणू नका आसवात माझे बुडून केव्हाच स्वप्न गेले

उदास पाण्यात सोडलेले प्रसन्न ते दीपदान होते

(‘एल्गार’च्या (१९८३, बहुमत प्रकाशन, नागपूर) पहिल्या आवृत्तीतून साभार)

(लेखक हे ज्येष्ठ गझलकार, कवी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com