मराठी गाण्यांमधील कविता

श्रोता म्हणून गाणं ऐकताना त्यातील कविताही ऐकायलाच हवी. त्या शब्दांनाही प्रेमाने जवळ करायला हवं.
Poetry in Marathi Songs
Poetry in Marathi Songssakal

- ऋचा थत्ते

श्रोता म्हणून गाणं ऐकताना त्यातील कविताही ऐकायलाच हवी. त्या शब्दांनाही प्रेमाने जवळ करायला हवं, तरच ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकारांचं शब्दांवरचं प्रेम, काव्यावरची निष्ठा आणि कवितेचा आशय पुढच्या पिढ्यांमध्ये झिरपत राहील... २१ मार्च रोजी जागतिक काव्य दिन साजरा झाला. त्यानिमित्त गाण्यात गुंफलेली कवितेची मैफल.

पानावरची कविता... मनापर्यंत आली

साज सूरांचा लेऊनि... कविता सुरेल झाली

अशी भावना मनाला स्पर्शून जाते, जेव्हा जेव्हा मी कवितेची गाणी झालेली ऐकते किंवा गाण्यातील कविता पाहते. चालीवर लिहिलेली किंवा चित्रपटातील प्रसंग व पात्रानुरूप लिहिलेली अनेक गाणी नक्कीच आशयघन आहेत.

अभिजात कवितेच्या उंचीची आहेत; मात्र कवितासंग्रहापर्यंत जे श्रोते पोहोचत नाहीत किंवा संतवाणी ज्यांच्या घरात फक्त शोकेसमधील ग्रंथात असते, त्यांच्या मनापर्यंत हे पानावरचे शब्द कानाद्वारे नेण्याचं मोलाचं योगदान दिलं ते प्रतिभावंत आणि सजग अशा संगीतकारांनी! अशाच गीतात रूपांतरित झालेल्या काही कवितांचं स्मरण जागतिक काव्य दिनाच्या निमित्ताने करू या.

आधी म्हटल्याप्रमाणे चालीवर किंवा कथेनुसार शब्द लिहिणं म्हणजे रचलेलं गीत! आणि कवीला त्याच्या मनस्थितीनुसार किंवा डोक्यात चालू असलेल्या विचारानुसार सुचलेली ती कविता, जी नंतर कधी गीतात रूपांतरित झालेली दिसूही शकते. मराठी साहित्यात एक काळ असा होता, की कविता सुचणंच श्रेष्ठ! गीत रचणं म्हणजे कारागिरी!

गीतकारांना कमी लेखणाऱ्यांना गदिमांनी कवितेतूनच उत्तर दिलं होतं.

गीत हवे का गीत

एका मोले विकतो घ्या रे

विरह आणिक प्रीत

गीत हवे का गीत...

कारण अर्थातच प्रतिभा दोन्हीकडे हवी आणि प्रत्येक कवी गीतकार होऊ शकतोच असंही नाही, कारण दिलेला प्रसंग, व्यक्तिरेखा, चाल, मर्यादित वेळ, भाषेचा लहेजा, इतकंच नाही तर चित्रीकरणाचं बजेट वगैरे सगळ्याचा विचार करून गीत लिहिणं, तेही स्वतःचा मूड बाजूला ठेवून सोपं नक्कीच नाही. त्यामुळेच अशा सर्व थोर गीतकारांनाही मनापासून अभिवादन!

आणि आता आठवणीतील सुरेल झालेल्या कवितांचा विचार करताना मनात गंध दरवळू लागलाय तो चाफ्याचा! कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची ही कविता चाफा. ‘फुलांची ओंजळ’ या त्यांच्या एकमेव काव्यसंग्रहातील ही कविता. हा संग्रहदेखील त्यांच्या पन्नाशीनंतर प्रकाशित झाला. अवघ्या ३८ कविता असलेला हा संग्रह नावाजलाही गेला. हीच गंमत आहे, माणसाच्या आयुष्याला कधी कलाटणी मिळेल सांगता येत नाही.

‘चाफा बोलेना...’ हे गाणं तर अवीट गोडीचं; पण ही कविता स्वरबद्ध होण्यामागेही एक गोष्ट आहे. साक्षात लतादीदींनी ही कविता वाचताक्षणीच ती त्यांच्या मनाला इतकी स्पर्शून गेली की ती स्वरबद्ध व्हायलाच हवी, असं सर्वप्रथम त्यांना तीव्रतेने वाटलं. प्रतिभावंत संगीतकार वसंत प्रभू यांना त्यांनी तसं सुचवलं.

आशयाच्या दृष्टीने गहन असलेली ही कविता अप्रतिम चालीत बांधण्याचं आव्हान पेलून वसंत प्रभू यांनी अजरामर गीतात त्याचं रूपांतर केलं. वर वर ही प्रेमकविता भासली, तरी तरुणी म्हणजे जीव आणि चाफा म्हणजे परमात्मा असा हा मधुराभक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे ही कविता असं म्हणतात. असे अजूनही अर्थ हाती येऊ शकतात.

पण यानिमित्ताने ठळकपणे जाणवलेला लतादीदींचा हा पैलूही विलक्षण वाटतो. हिंदी-मराठी चित्रपट संगीतात इतकी प्रचंड लोकप्रियता मिळत असताना त्या आवर्जून मराठी साहित्य अभ्यासत होत्या. इतकंच नाही, तर ते सामान्यांपर्यंत गाण्याच्या माध्यमातून पोहोचावं यासाठी झटत होत्या. संतकाव्याचीही त्यांना विशेष ओढ होती आणि ‘अभंग तुकयाचे’ या अल्बमची संकल्पना त्यांचीच.

तुकाराम महाराजांचे हे अभंग स्वरबद्ध कसे झाले याचीही कहाणी विलक्षणच म्हणावी लागेल. दत्ता मारुलकरांनी ही आठवण लिहिली आहे. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी हा प्रकल्प हाती घेतला, तेव्हा त्यांनी तुकोबांची संपूर्ण गाथाच वाचून काढली. आठ-दहाच अभंग हवे होते; पण तुकोबांच्या शब्दांची किमया अशी, की खळेकाकांनी अडीचशे अभंग वेगळे काढले.

गोनिदांची मदत घेतल्यावर त्यांनी त्यातील बावीस निवडले आणि वसंत बापट यांनी त्यातील वीस नक्की केले. शेवटी खळेअण्णांनी वीसही अभंगांना सूरांचा साज चढवला आणि लतादीदीच काय ते निश्चित करतील असं ठरलं. लतादीदी एकेक रचना ऐकू लागल्या. दहा रचना झाल्यावर त्या म्हणाल्या, या सर्वच अप्रतिम आहेत.

पुढे ऐकत राहिले तर मला ठरवणं खूप कठीण होईल, तर आपण हेच अभंग नक्की करू या. अखेरीस आपण ऐकतो तो अनमोल ठेवा असा साकार झाला. तर ही या कलावंतांची खरी साधना! त्यासमोर खरोखर नतमस्तक होतो आपण.

हे लिहीत असताना लतादीदींचाच ‘ज्ञानेश्वर माऊली’ हा प्रकल्प आठवला, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेला. तेही संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. आपण फक्त चाल ऐकतो, वाह म्हणून दाद देतो; पण त्यामागे किती विचार असतो, काव्याचा अभ्यास असतो हे कळलं, की तितकेच थक्क होतो. उदाहरणार्थ ‘मोगरा फुलला’ हा अभंग.

काही गायिका ‘गगनावरी’ असा उच्चार करतात; पण तो ‘गगनावेरी’ शब्द आहे. आता याचा नेमका अर्थ काय याचा अक्षरशः ध्यास पंडितजींनी घेतला. अनेक अभ्यासकांशी चर्चा केली आणि गगनापर्यंत हा त्याचा नेमका अर्थ गवसला! मुळात असे प्रश्न पडणं आणि उत्तरं मिळवण्यासाठी झटणं हे दोन्ही प्रत्येकाला खरंच किती शिकण्यासारखं आहे. शब्दांना चाल लावताना अर्थाचा शोध किती महत्त्वाचा असतो हे यातून दिसतं.

पंडितजींच्या योगदानामुळे ‘शिवकल्याण राजा’च्या माध्यमातून गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह उत्तमोत्तम कवींची काव्यं आपल्यापर्यंत पोहोचली. कबीर, मीरा, सूरदास हे संतकवी; तर भा. रा. तांबे, ग्रेस, सुरेश भट, ना. धों. महानोर, शांता शेळके यांची सुंदर शब्दरत्नं त्यांच्या संगीताने मनामनात तेजाळत राहिली.

यापैकी ‘सागरा प्राण तळमळला’ हे शब्द सावरकरांच्या मनात उमटले, तेव्हा ते ब्रायटनच्या किनाऱ्यावर होते आणि त्यांनी स्वतःचे मनोगत सागराजवळ व्यक्त केले होते. ही त्यांची एकट्याची भावना होती. असं असलं, तरीही पंडितजींची या गीतासाठी मंगेशकर भावंडांचा समूहस्वर वापरला आहे. यामागचा त्यांचा विचार असा, की प्रत्येक भारतीयाला मातृभूमीबद्दल अशीच ओढ असायला हवी, त्यामुळे ते गाणं प्रत्येक भारतीयाचं आहे. खरंच केवढी ही विशाल दृष्टी!

असाच शब्दाशब्दाचा विचार करणारे, कवितेचा भाव जपणारे आणि शब्दप्रधान गायकीचा पुरस्कार करणारे संगीतकार म्हणजे यशवंत देव! त्यांचे खरे सूर जुळले ते कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांशी! खूप गोड भावगीतं किंबहुना, सुरेल झालेल्या कवितांची अनमोल भेट या जोडीने रसिकांना दिली असं म्हणता येईल.

त्यांचंच एक नितांतसुंदर गीत ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ पाडगावकरांनी ही कविता लिहिली, यशवंत देवांना ऐकवली आणि हे गीत अरुण दातेच गातील यावर दोघांचं एकमत झालं आणि ती शाई वाळायच्या आतच त्यांना त्यांनी तसं कळवलंही. अरुणजींनीही त्याचं अक्षरशः सोनं केलं आणि केवळ गाण्याचा आनंदच नाही, तर जगण्याची प्रेरणाही या गीताने अनेकांना दिली.

निराश झालेल्या मनांना संजीवनी दिली, जगण्यावर प्रेम करायला शिकवलं. या गीतातली एकेक ओळ मनात जपावी अशीच आहे आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे तर प्रत्येकाच्या जगण्याचं सूत्रच असायला हवं इतकी या शब्दांची ताकद आहे.

यशवंत देव स्वतःही कवी-गीतकार होतेच; पण त्यांनी स्वरबद्ध केलेली ‘बहिणाईची गाणी’ कशी विसरता येतील. आपल्या मनाच्या भुईमधून उगवलेल्या या सकस शब्दांची गाणी होतील, एवढंच काय ते शब्द छापले जातील, असा विचार त्या माऊलीच्या मनाला स्पर्शणंही शक्य नव्हतं. त्यांचे सुपुत्र सोपानराव चौधरी आणि साक्षात आचार्य अत्रे यांच्यामुळे ही ‘बहिणाईची गाणी’ पुस्तकरूपाने प्रकाशित झाली, तीच मुळी त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी!

मला नेहमी वाटतं, की बहिणाबाई गात असताना जात्यातून पीठ पडत असलं तरी जगण्याचं विद्यापीठ त्याच वेळी उभारलं जात होतं आणि खरोखरीच आज बहिणाबाईंच्या नावाचं विद्यापीठ आहे. महाराष्ट्राला हा ठेवा गवसला आणि त्यातील काही शब्दफुलांना चालीच्या धाग्यात गुंफून मराठी संगीताचा खजिनाच अधिक समृद्ध होऊ शकला तो मुख्यतः दोन संगीतकारांमुळे. यशवंत देव आणि वसंत पवार!

दोघांनीही या बहिणाईंच्या कवितेमधला मातीचा गंध तसाच जपला आहे. ‘माझी माय सरसोती’सारख्या उत्तरा केळकर यांनी गायलेल्या गीतातून यशवंत देवांच्या चालीतून याचा नक्कीच प्रत्यय येतो आणि ‘अरे संसार संसार’ यासह अनेक श्रवणीय गीतं ‘मानिनी’ चित्रपटासाठी संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केली आणि आशाताईंचा स्वर त्या शब्दांशी अर्थातच अगदी एकरूप झाला.

भा. रा. तांबे यांच्या कविता तिनीसांजा, घनतमी, बालकवींची आनंदी आनंद गडे, वा. रा. कांत यांची बगळ्यांची माळ फुले, सूर्यकांत खांडेकर यांची त्या फुलांच्या गंधकोषी अशा असंख्य शब्दरचना स्वरांशी एकरूप होऊन आपल्या मनात आजही रुंजी घालत आहेत. खरोखर उत्तम आणि अर्थपूर्ण काव्य, विचार पोहोचवण्याचं भरीव योगदान या सर्व कवी, संगीतकार व गायक मंडळींनी केलं.

सगळ्याच स्वरबद्ध झालेल्या कवितांविषयी एकाच लेखात लिहिणं शक्य नाही; मात्र आवर्जून विचार पोहोचवायचा तो हा, की श्रोता म्हणून गाणं ऐकताना त्या गाण्यातली कविताही ऐकायलाच हवी. त्या शब्दांनाही प्रेमाने जवळ करायला हवं, तरच ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकारांचं हे शब्दांवरचं प्रेम, काव्यावरची निष्ठा आणि कवितेचा आशय पुढच्या पिढ्यांमध्ये झिरपत राहील आणि मराठी रसिकांच्या भेटीला अशा सुंदर अन् उत्तमोत्तम अनेक कविता गाण्यांमधून भेटत राहतील.

rucha19feb@gmail.com

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com