वाजपेयींच्या काळात नेहरू कलनायक नव्हते

politics history Destroying Nehru during
politics history Destroying Nehru during sakal

‘व्हॉट्‌स ॲप विद्यापीठा’त शिकून ‘द्विपदवीधर’ झालेले किंवा ‘पीएच.डी’साठीही पात्र ठरलेले अशा अनेकांना त्यांच्या संशोधनातून एक नवीन शोध लागला असेल की, ‘पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे नायक नव्हते, तर खलनायक होते!’ आणि त्यामुळेच, नेहरूंची प्रतिमा मलीन करणं, त्यांचं नाव आणि स्मृतीही भारतीय जनमानसातून पुसून टाकणं, हे आपलं देशाबद्दलचं कर्तव्यच आहे, असं या ‘पदवीधरां’ना वाटतं.

सोव्हिएत-काळातला रशियाचा अत्यंत निष्ठूर असा साम्यवादी हुकूमशहा स्टॅलिन आणि नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांमधला नेहरूद्वेषी गट यांच्यात काहीतरी साम्य निश्‍चितच आहे. ‘राजकारणासाठी इतिहासाची मोडतोड’ हे ते साम्य होय.

सन १९२४ मध्ये लेनिन यांच्या मृत्यूनंतर स्टॅलिननं सोव्हिएत महासंघावर पोलादी पकड राखत राज्य केलं. ही पकड १९५३ पर्यंत, म्हणजे त्याचा मृत्यू होईपर्यंत, कायम होती. सत्ताकालावधीत त्यानं अत्यंत पद्धतशीरपणे समकालीन इतिहास नव्यानं लिहिला. त्या काळात छायाचित्रांमध्ये फेरफार करू शकणारी डिजिटल साधनं नसली तरी, त्यानं अनेक छायाचित्रं बाद करण्याचे, त्यांच्यात काटछाट करण्याचे आदेश देत आधीच्या सर्व सहकाऱ्यांचे पुरावे नष्ट केले, त्यापैकी हजारो जणांना मारून टाकण्यात आलं, अनेकांना कोठडीत डांबण्यात आलं. भारतात सध्या जो प्रकार सुरू आहे, तशाच पद्धतीनं स्टॅलिनच्या नियंत्रणाखालील माध्यमांनी स्टॅलिनच्या विरोधकांचा - मारून टाकण्यात आलेल्या विरोधकांचा - अपप्रचार केला किंवा त्या विरोधकांचे सर्व प्रकारचे संदर्भ गाळून टाकले.

भारत हा काही सोव्हिएत-पद्धतीच्या हुकूमशाहीच्या अमलाखाली नाही आणि तसा तो कधीही नसेल. लोकशाही ही आपली सर्वांत मोठी ताकद असून विरोधकांच्या मतांचाही आदर राखण्याची भावना आपल्या प्राचीन हिंदू विचारसरणीत आणि संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे.

तरीही, ‘भारतीय’ आणि ‘हिंदू’ यांच्याशी संबंध नसलेलं काही तरी करण्याचा मोदींच्या राज्यात प्रयत्न होत आहे. विशेषत:, नेहरूंच्या आयुष्याबाबत आणि त्यांच्या योगदानाबद्दल चुकीची माहिती कशी पसरवली जाईल किंवा त्यांची माहिती नष्ट कशी केली जाईल, याचा खटाटोप केला जात आहे. याचा पुरावा म्हणजे, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त सरकारनं जाहीर केलेल्या ‘आझादी का अमृतमहोत्सवा’त नेहरूंचं नाव अभावानंच घेतलं गेलं होतं.

या सगळ्याची सुरुवात ‘भारतीय इतिहास संशोधन परिषदे’पासून झाली. त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या संकेतस्थळावर स्वातंत्र्यचळवळीतील अनेक नेत्यांची छायाचित्रं प्रसिद्ध केली होती, नेहरूंना वगळून. अनेक राज्यांमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनीही या वर्षीच्या १५ ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतही हेच केलं. त्या प्रत्येक जाहिरातीत नेहरू कुठं दिसलेच नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनीही नेहरूंचा ओझरताच उल्लेख केला. व्हॉट्‌स ॲप ग्रुप आणि इतर सोशल मीडियावर, जिथं कोट्यवधी भारतीय उपलब्ध माहिती वाचू शकतात आणि मतप्रदर्शनही करतात, तिथं नेहरूंबद्दलचा द्वेष अधिक ठळकपणे दिसून येतो. नेहरूंबद्दलची खोटी माहिती मोदी सरकार अधिकृतपणे पसरवू शकत नसल्यानंच, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पसरवण्यास भाजपच्या अतिसक्रिय असलेल्या

आयटी विभागाला परवानगीच नव्हे तर, प्रोत्साहनही दिलं जातं. ज्या वेळी नेहरूंची चुकीची प्रतिमा लक्षावधी वेळा लोकांसमोर आणली जाईल, त्या वेळी तीच माहिती सत्य वाटू लागेल. हिटलरचा एक मुख्य प्रचारक होता, जोसेफ गोबेल्स. ‘खोटी माहिती वारंवार सांगा आणि तिचं सत्यात रूपांतर झालंच म्हणून समजा,’ असं तो म्हणत असे.

पण, कुणालाही नाकारता येणार नाही, असं नेहरूंबाबतचं सत्य कोणतं आहे? थोडक्यात सांगायचं तर, नेहरू हे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील अत्यंत महत्त्वाचे नेते होते. त्यांना ब्रिटिशांनी नऊ वेळा तुरुंगात टाकलं होतं आणि त्यांनी ३२५९ दिवस (जवळपास नऊ वर्षं) विविध तुरुंगांत काढले. स्वतंत्र भारताचे ते पहिले आणि सर्वाधिक १७ वर्षं पदावर राहिलेले पंतप्रधान होते. जे भक्त नेहरूंना हिंदूविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ आणि इतर अभिजात पुस्तकांबरोबरच १९५४ मध्ये त्यांनी लिहिलेलं ‘विल अँड टेस्टामेंट’ हे पुस्तकही वाचण्याचे कष्ट घ्यावेत. या पुस्तकात त्यांनी पवित्र गंगेचा आणि हिमालयाचा अत्यंत आदरानं उल्लेख केला आहे. ‘मुस्लिमविरोधी असणारा तो खरा हिंदू’ अशी व्याख्या आज प्रचलित झाली आहे, ही अत्यंत दु:खाची बाब होय. नेहरू हे अशा प्रकारचे हिंदू नव्हते.

भारतीय जनता पक्षानं कायमच नेहरूंचा द्वेष केला आहे का? तर असंही नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तुलनेत सध्याच्या भाजपचं वैचारिकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या किती अध:पतन झालं आहे, हे यावरून स्पष्ट होतं. एकदिवस मी अटलजींना नेहरूंबद्दलचं त्यांचं मत विचारलं होतं. ते म्हणाले होते : ‘माझ्या मनात नेहरूंबद्दल खूप आदर आहे. ते एक मोठे देशभक्त होते. त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील; पण आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांचं असलेलं योगदान प्रचंड आहे.’

नेहरूंबद्दल अटलजींना वाटत असलेल्या आदरामुळंच ‘काँग्रेसेतर पक्षांमधील नेहरूवादी’ असं त्यांना संबोधलं जात असे. नेहरूंचं ता. २७ मे १९६४ ला निधन झालं. त्यानंतर काही दिवसांनी अटलजींनी संसदेत केलेल्या एका अप्रतिम भाषणात आपलं दु:ख पुढील काव्यमय शब्दांत व्यक्त केलं होतं : ‘एक स्वप्नं अधुरंच राहिलं, गाणंही मौन झालं आणि एक ज्योत अज्ञाताच्या दिशेनं निघून गेली. जग भयमुक्त आणि भूकमुक्त व्हावं, हे ते स्वप्नं होतं; गाणंही ‘गीते’चाच प्रतिध्वनी वाटावं इतकं महान आणि गुलाबाप्रमाणेच सुगंधित होतं आणि ती ज्योत, संपूर्ण रात्र तेवत राहून आम्हाला मार्गदर्शन करते आहे.’

आपल्याच पक्षातल्या (तेव्हाचा ‘भारतीय जनसंघ’) कट्टरतावाद्यांना उद्देशूनच कदाचित वाजपेयी म्हणाले होते की, ‘हे नुकसान केवळ एका कुटुंबाचं किंवा एका समाजाचं किंवा एका पक्षाचं नाही. ‘आपला लाडका राजपुत्र चिरनिद्रेत गेला,’ म्हणून भारतमाता दुःख करत आहे. संपूर्ण मानवता व्यथित झाली आहे. कारण, तिचा ‘सेवक’ आणि ‘पुजारी’ तिला कायमचा सोडून गेला आहे. जगाच्या रंगमंचावरचा मुख्य नायक त्याचा अखेरचा प्रवेश आटोपल्यावर निघून गेला आहे.’

अटलजी त्यानंतर जे काही बोलले आहेत ते अनेक मोदीसमर्थकांना अडचणीचं ठरेल, किंवा ते संतापूनही जातील. वाजपेयींनी नेहरूंची तुलना थेट श्रीरामाबरोबर केली होती. ते म्हणाले होते, ‘पंडितजींच्या आयुष्यात आपल्याला वाल्मीकींच्या महाकाव्यात व्यक्त झालेल्या शुद्ध भावना आढळून येतात. श्रीरामाप्रमाणेच, नेहरूंनीही अशक्य आणि अप्राप्य ते साध्य करून दाखवलं.’

‘अढळपदावर पोहोचलेले,’ असं नेहरूंचं वर्णन करताना वाजपेयी म्हणतात, ‘असं सामर्थ्यशाली व्यक्तिमत्त्व, ते स्वतंत्र आणि जागरूक मन, विरोधकांनाही आपलंस करण्याची क्षमता, तो सज्जनपणा, ती महानता- हे कदाचित् भविष्यात आपल्या आढळून येणार नाही.’ मोदींनी या विधानांवर विचार केला तर बरं होईल.

सर्वांनाच माहीत आहे की, नेहरूंच्या जाण्यानं भारत अनिश्‍चिततेच्या गर्तेत लोटला गेला होता. एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. दु:खात बुडालेल्या देशानं भविष्याबद्दल अस्वस्थपणे विचार करत शून्यातूनच सुरुवात केली. हे ओळखूनच वाजपेयींनी भारतीयांना नेहरूंनी मानलेले आदर्श समोर ठेवून वाटचाल करण्याचं आवाहन केलं होतं.

‘‘एकता, शिस्त आणि आत्मविश्‍वास यांचा आधार घेत आपण आपलं हे प्रजासत्ताक समृद्ध करणं आवश्‍यक आहे. नेता निघून गेला आहे, अनुयायी उरले आहेत. सूर्यास्त झाला आहे; पण चांदण्यांच्या प्रकाशात आपल्याला आपला मार्ग शोधला पाहिजे. हा कसोटीचा काळ आहे; पण आपण त्यांच्या महान उद्दिष्टासाठी समर्पित होणं गरजेचं आहे, तरच भारत सशक्त, क्षमतापूर्ण आणि समृद्ध बनेल.’

भाषणाच्या अखेरीस नेहरूंना प्राणप्रिय असलेला आदर्श आपलासा करताना जनसंघाच्या या उत्तुंग नेत्यानं देशवासीयांना आठवण करून दिली की : ‘जगात शाश्‍वत शांतता निर्माण करण्याकडे भारतानं पुन्हा आपलं लक्ष केंद्रित केलं तरच आपण नेहरूंना योग्य श्रद्धांजली अर्पण करू शकू.’

भारतातील सर्वोत्तम विरोधी पक्षनेत्यांपैकी असलेल्या आणि नंतर जे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान झाले, त्या वाजपेयी यांनी नेहरूंना ही अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याच्या घटनेला जवळपास सहा दशकं उलटली. कालौघात त्यांची ही श्रद्धांजली अर्थहीन ठरली आहे का? नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचं मत इथं उद्‌धृत करणं सयुक्तिक ठरेल. नेहरू हे संघावर टीका करत आणि संघही नेहरूंवर टीका करत असे. तरीही, नेहरूंचं निधन झालं तेव्हा गोळवलकर गुरुजींनी भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली लिहीत, नेहरूंच्या देशभक्तीचं आणि त्यांच्या आदर्शवादाचं कौतुक केलं आणि त्यांचं ‘भारतमातेचा महान पुत्र’ असं वर्णन केलं होतं.

हे खरंच की, नेहरू हे परिपूर्ण नव्हते. त्यांनी चुका केल्या; पण कोणत्या देशातल्या कोणत्या नेत्यानं चुका केलेल्या नाहीत? शेवटी, मी मोदीभक्तांचं लक्ष एका वाक्प्रचाराकडे वेधू इच्छितो : ‘दुसऱ्याची मेणबत्ती फुंकर मारून विझविल्यानं तुमची मेणबत्ती अधिक प्रकाशमान होणार नाही.’

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून,‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com