एका युद्धाचा दुःखदायक शेवट

अफगाणिस्तान युद्ध एक असं युद्ध होतं, जे समाप्त करण्यासाठी डेमोक्रॅट, रिपब्लिकनसह सर्व जण वाट पाहत होते. या युद्धात अनेक अमेरिकन सैनिक लढले.
Afghanistan
AfghanistanSakal

दोन दशके चाललेल्या युद्धाचा शेवट अमेरिकेसाठी दुःखदायक होता. २० वर्षांपूर्वी अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानमध्ये पाऊल ठेवलं तेव्हाही अफगाणिस्तानवर तालिबानींचा एकछत्री अंमल नव्हता. या युद्धात अमेरिकेने ट्रिलियन डॉलर ओतले. २ हजार ४४८ अमेरिकन सैन्य गमावले. ६६ हजार अफगाणी पोलिस, सैनिकांचा या युद्धात बळी गेला; तर ५० हजाराच्या जवळपास निष्पाप अफगाणी नागरिक हिंसाचारात मारले गेले. मात्र एवढं गमावूनही अफगाणिस्तान आज पहिल्यापेक्षा अधिक अस्थिर झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोन दशकात महिलांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीची चाके आता पुन्हा मागे फिरणार आहेत.

अफगाणिस्तान युद्ध एक असं युद्ध होतं, जे समाप्त करण्यासाठी डेमोक्रॅट, रिपब्लिकनसह सर्व जण वाट पाहत होते. या युद्धात अनेक अमेरिकन सैनिक लढले. अनेकांनी जीव गमावला. शेकडो सैनिक जायबंदी झाले. अनेकांवर मानसिक आघात झाला. या युद्धाला आतापर्यंत अमेरिकेचे चार अध्यक्ष सामोरे गेले. बराक ओबामा यांना हे युद्ध संपवायचे होते; मात्र ते संपवू शकले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीच्या दिशेने पाऊल उचललं. एप्रिल २०२१ पर्यंत सर्व सैन्य माघारी बोलावण्याची घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात बायडेन यांच्या खांद्यावर दोन दशके सुरू असलेल्या या युद्धाला पूर्णविराम देण्याची जबाबदारी आली. अमेरिकन दूतावासाच्या संरक्षणासाठी छोटी तुकडी सोडली, तर संपूर्ण अमेरिकन सैन्य माघारी बोलावलं. युद्ध अधिकृतपणे संपलं, मात्र या दरम्यान काबूलमध्ये जे घडलं त्याची कुणी कल्पना केली नव्हती.

एप्रिल महिन्यात अध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य माघारीची घोषणा केली. त्यानंतर तालिबानींनी संपूर्ण देश ताब्यात घेण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली. तालिबानी फौजांची आगेकूच एवढी वेगवान होती, की १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे अमेरिकन सैन्याच्या संपूर्ण माघारीच्या दोन आठवड्यांपूर्वी, तालिबानी सैन्य काबूलमध्ये दाखल झालं होतं. इतक्या लवकर काबूल शहर तालिबानींच्या ताब्यात येणं, हा अमेरिकन गुप्तचर संघटनांनादेखील एक धक्का होता. त्यांनी काबूल कोसळणार असल्याचा इशारा दिला होता, अशा आशयाचे वृत्त माध्यमांमध्ये येत असताना, जाईंट चीफ ऑफ स्टाफचे चेअरमन मार्क मिले यांनी १८ ऑगस्टला पेंटॅगॉनमध्ये प्रेस ब्रिफिंग घेतली. त्यात ते म्हणाले, ‘‘मी यापूर्वी पेंटॅगॉन आणि काँग्रेसमधील सुनावणीदरम्यान यातील काही शक्यता सांगितल्या होत्या. गुप्तचर संस्थांनी अनेक गोष्टींची शक्यता वर्तवली होती. पहिली शक्यता म्हणजे अफगाण फौजा पूर्णपणे कोसळतील आणि तालिबान वेगाने अफगाणिस्तानचा ताबा घेतील. दुसरी म्हणजे अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध भडकू शकते आणि तिसरी शक्यता होती वाटाघाटीने तोडगा काढण्याची. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर काबूलपर्यंत धडक मारण्यासाठी तालिबानींना काही आठवडे, महिना किंवा एक वर्षापर्यंत अवधी लागेल, असा आमचा अंदाज होता. मात्र केवळ ११ दिवसांत अफगाणी फौजा आणि सरकार पूर्णपणे कोसळेल, अशी कल्पना मी किंवा कुणीच केली नव्हती.’’

सैन्य माघारीचा निर्णय अंमलात आणणारे अध्यक्ष बायडेन यांनी काबूलचा पाडाव झाल्यानंतर अमेरिकेला संबोधित केलं. मात्र सैन्य माघारीचा निर्णय योग्य आहे, यावर ते ठाम होते. बायडेन म्हणाले, ‘‘२० वर्षांच्या कालावधीनंतर, अनुभवानंतर माझ्या लक्षात आले की, अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेसाठी चांगली वेळ कधीच येणार नव्हती; मात्र तालिबान एवढ्या वेगाने अफगाणिस्तान गिळंकृत करेल, याची कल्पना प्रशासनाला नव्हती,’’ हे त्यांनी कबूल केले. मात्र त्यासाठी बायडेन यांनी अफगाणिस्तानचे कमजोर राजकीय नेतृत्व आणि लष्कराला जबाबदार ठरवलं. अल कायदाचा बीमोड करणे आणि ओसामा बिन लादेनला पकडणे हाच अमेरिकेच्या अफगाणिस्तान मोहिमेमागचा मुख्य उद्देश होता. तो आम्ही पूर्ण केला, असा बायडेन यांचा युक्तिवाद आहे. विषेश म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना बायडेन यांनी २००९ मध्ये अफगाणिस्तानात अतिरिक्त सैन्य पाठवण्यासाठी कडाडून विरोध केला होता.

अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याच्या बायडेन यांच्या निर्णयाला अमेरिकन जनतेचा तसा पाठिंबा आहे; मात्र सैन्य माघारीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना उडालेल्या गोंधळावर मात्र अमेरिकन जनतेने नाराजी व्यक्त कली आहे. बायडेन यांनी माघारीची घोषणा केल्यानंतर खऱ्या अर्थाने तालिबानी सैन्यांनी आगेकूच करायला, एकापाठोपाठ शहरे ताब्यात घेण्यास सुरुवात केली; मात्र त्यापूर्वी अमेरिकन सैन्याची मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांना देशाबाहेर काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात का केली नाही, यावर अनेकांनी आक्षेप नोंदवले आहेत.

तालिबानींच्या शक्तीला जोखण्यात चूक झाल्यामुळे १६ ऑगस्टला काबूलच्या हमीद करझाई आंतराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ उडाला. तालिबानींच्या तावडीतून निसटण्यासाठी हजारो अफगाणी नागरिकांनी विमानतळावर धाव घेतली. देशाबाहेर पडता येईल, या आशेने अनेक जण विमानात शिरण्याचा प्रयत्न करत होते, अनेक जण विमानाला लटकले. या सर्व गोंधळामुळे काही काळासाठी विमानतळ बंद करावा लागले. विमानतळ सुरक्षित करण्यासाठी, एअर ट्राफिक नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेला अतिरिक्त सैन्य काबूलला पाठण्याची वेळ आली.

दुसरीकडे पेंटॅगॉनमधील पत्रकार परिषदेत संरक्षण सचिव लॉयड ऑस्टीन आणि जनरल मार्क मिले हे दोघेही काबूल विमानतळ कसा सुरक्षित आहे, तालिबान लोकांना विमानतळापर्यंत पोहोचू देताहेत हे सांगत होते. मात्र विमानतळाच्या मार्गात तालिबानी लोकांची अडवणूक करताहेत हे सांगायला ते कचरत होते. जवळपास दहा हजार अफगाणी नागरिक ज्यांनी अमेरिकेसाठी दुभाषी, भाषांतरसह अमेरिकन लष्करासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काम केलं, मदत केली त्यांची तालिबान अडवणूक करत आहे. त्यांना लक्ष्य केले जात आहे.

काबूलमध्ये तालिबानींनी पत्रकार परिषद घेऊन जगापुढं आपला आधुनिक चेहरा समोर ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रत्यक्षात ते वेगळे वागत आहेत. अनेक शहरात महिलांना त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली. महिलांना कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अमेरिकेसोबत काम करणाऱ्यांना, त्यांना मदत करणाऱ्यांना हूडकून काढण्यासाठी घराघरांची तपासणी सुरू आहे. काबूल शहराबाहेर अनेक विरोधकांना ठार करण्याचे, नरसंहार करण्याचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या २० वर्षांच्या काळात अफगाणी महिला आणि मुलींनी सामाजिक, शैक्षणिक विकास केला होता. मात्र महिलांच्या प्रगतीची चाक आता उलटी फिरणार आहेत. तालिबानी राजवटीत महिला, मुली आणि अल्पसंख्याकाचे भविष्य अंधकारमय झाले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या डोळ्यादेखत जगातील सर्वात मोठे संकट ओढावले आहे. अफगाणिस्तानच्या फौजा त्यांच्या देशाचे संरक्षण करायला तयार नाही; मग अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानचे संरक्षण करावे, ही अपेक्षा चुकीची असल्याचा बायडेन यांचा युक्तिवाद योग्य आहे; मात्र एवढी भीषण परिस्थिती असूनही, अफगाण नेते जनतेच्या भल्यासाठी एकत्र येत नाहीत. देशाच्या भविष्यासाठी एकत्र येऊन वाटाघाटी करणे त्यांना जमत नसेल, तर मग भविष्यात अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये राहूनही त्यांनी काही केले असते, याची सूतराम शक्यता नव्हती. मग या परिस्थितीत अमेरिकेने तालिबानशी का लढावे, हा प्रश्न आहे.

अमेरिकेसाठी २० वर्षे चाललेल्या या युद्धाचा शेवट दुःखदायक होता. २० वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेने सैन्य पाठवले तेव्हा अफगाणिस्तानवर तालिबानींचा एकछत्री अंमल नव्हता. दोन दशकाच्या या युद्धात अमेरिकेने ट्रिलियन डॉलर ओतले. २ हजार ४४८ अमेरिकन सैन्य गमावले. ६६ हजार अफगाणी पोलिस, सैनिकांचा बळी गेला; तर ५० हजाराच्या जवळपास निष्पाप अफगाणी नागरिक या युद्धात मारले गेले. मात्र एवढं गमावूनही आज अफगाणिस्तान पहिल्यापेक्षा अधिक अस्थिर झाला आहे. अमेरिकेने अफगाणी लष्कराला दिलेली अत्याधुनिक शस्त्रे आता तालिबानींच्या हाती सापडली आहेत. अफगाण युद्धात मदत करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला अब्ज डॉलर दिले. मात्र पाकिस्तानने डबल गेम करत तालिबान्यांना आपल्या सीमेजवळ सुरक्षित आश्रय दिला. या युद्धात पराभव होण्यात पाकिस्तानच्या या कृतीचा सर्वाधिक वाटा होता.

अमेरिकन सैन्य माघारीनंतर मित्रराष्ट्रसुद्धा अफगाणिस्तानमधून बाहेर पडताहेत. अमेरिकेला मदत करण्यासाठी आम्ही या युद्धात उडी घेतली होती. आता अमेरिका बाहेर पडल्यामुळे ग्रेट ब्रिटनसह इतर राष्ट्रांसाठी अफगाणिस्तानमध्ये थांबण्याचे कारणच नाही, असे ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी स्पष्ट केले. जर्मनीपासून ते इतर मित्रराष्ट्रांचीही हीच भूमिका आहे.

अफगाणिस्तानमधून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने ३१ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती; मात्र सध्याची काबूलमधील परिस्थिती बघता अमेरिकन नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सैन्य अधिक काळ ठेवण्याचा मानस अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवला. बायडेन यांचे हे विधान अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानबाहेर काढण्यासाठी येत असलेल्या अडचणी, आव्हानांना अधोरेखित करतात. त्यामुळे अमेरिकेला मदत करणाऱ्या अफगाणींच्या भविष्याचे काय, हा प्रश्न कायम आहे.

अफगाणिस्तानमधील आर्थिक बाबी अमेरिकेच्या हातात आहेत. त्याचा फायदा अमेरिकेला उचलता येईल. काबूल तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर बायडेन प्रशासनाने अमेरिकन बँक खात्यातील अफगाणी सरकारचे पैसे गोठवले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तान सरकार नाणेनिधीच्या संसाधनाचा वापर करू शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तालिबान्यांची कोंडी करण्यासाठी, त्यांना जाग्यावर आणण्यासाठी हे उपाय पुरेसे आहेत का, हे येणारा काळ ठरवणार आहे.

- पूनम शर्मा

(लेखिका ‘इंडिया अमेरिका टुडे’ या मॅगझीनच्या कार्यकारी संपादक असून, त्या राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जागतिक आरोग्य या विषयांच्या अभ्यासक आहेत.)

managingeditor@indiaamericatoday.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com