लिंकन यांच्या आदर्शांचे काय?

चारित्र्य, निवड, राजकीय संघर्षातील व्यवस्थापन, यश आणि नेतृत्व कौशल्य या पाचही गुणांनी सिद्ध असलेले अब्राहम लिंकन हे राष्ट्राध्यक्षांच्या सर्वात वर होते.
lincoln
lincolnsakal
Summary

चारित्र्य, निवड, राजकीय संघर्षातील व्यवस्थापन, यश आणि नेतृत्व कौशल्य या पाचही गुणांनी सिद्ध असलेले अब्राहम लिंकन हे राष्ट्राध्यक्षांच्या सर्वात वर होते.

- पूनम शर्मा

चारित्र्य, निवड, राजकीय संघर्षातील व्यवस्थापन, यश आणि नेतृत्व कौशल्य या पाचही गुणांनी सिद्ध असलेले अब्राहम लिंकन हे राष्ट्राध्यक्षांच्या सर्वात वर होते. साध्या अमेरिकन नागरिकाने महान राष्ट्राध्यक्ष म्हणून लिंकन यांना त्याचे मत दिले होते. प्रत्यक्षात लिंकन यांची महानता जगभरात मान्य होती. लिंकन यांची उक्ती आणि कृती अनेकांसाठी प्रेरणादायी होती. आज (ता. १२) लिंकन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण...

‘कुणाहीविरुद्धही आकस नसलेले, सर्वांप्रति सद्‍भाव असलेले, योग्य आणि न्याय्य असलेले स्थितप्रज्ञ कार्य आम्ही आमच्या शिरावर घेतले आहे, ते पूर्ण करण्यासाठी, राष्ट्राच्या जखमा सांधण्यासाठी, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या जवानाची काळजी वाहण्यासाठी आणि त्याच्या माघारी वैधव्य आलेल्या महिला आणि पोरक्या झालेल्या मुलांसाठी, साध्य होईल असे सर्वकाही मिळविण्यासाठी, आमच्यात आणि सर्व राष्ट्रांमध्ये न्याय्य आणि चिरंतन शांतता टिकविण्यासाठी आमचा प्रवास सुरू राहू द्यात.’

४ मार्च १८६५ रोजी दुसऱ्या उद्‍घाटनीय भाषणातील लिंकन यांचे हे अविस्मरणीय शब्द वॉशिंग्टनमधील लिंकन स्मृतिस्थळाच्या दर्शनी भागात कोरण्यात आले आहेत. लिंकन यांनी त्यांच्या या विचाराच्या जोरावरच संपूर्ण राजकीय आयुष्य पूर्णत्वास नेले. १८६० मध्ये अमेरिकेचे पहिले अध्यक्ष म्हणून लिंकन यांची निवड करण्यात आली. संयुक्त अमेरिकेतील पहिल्या प्रजासत्ताकाचे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते. राष्ट्रध्यक्ष म्हणून ते निवडून आल्यानंतर सात गुलामी राष्ट्रांनी युनियनमधून स्वतःला अलग करवून घेत अमेरिकी राष्ट्रांचा महासंघ स्थापन केला. अंतर्गत कलहाचा कडेलोट झाल्यानंतर लिंकन हे अटळ फाळणी टाळण्यासाठी लोहपुरुष म्हणून उभे राहिले. संयुक्त अमेरिकेचे कायदे त्यांनी अत्यंत कठोर पद्धतीने राबविण्यास सुरुवात केली आणि फुटीरतावादी शक्तींचा बीमोड करण्यास सुरुवात केली. अमेरिकेतील यादवी चार वर्षांहून अधिक काळ सुरू होती. या युद्धाच्या काळात सहा लाख जणांचा बळी गेला.

यादवी आणि लिंकन

यादवी सुरू झाल्यानंतर गुलामांनी त्यांचे स्वातंत्र्य सुरक्षित करण्यासाठी सुरुवात केली. १ जानेवारी १८६३ रोजी लिंकन यांनी मुक्तता करार जाहीर केला. बंडखोर राष्ट्रांमधील ज्यांना गुलाम म्हणून अटक करण्यात आली आहे, त्यांना यापुढे मुक्त केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, लिंकन यांच्या या घोषणेने देशातील गुलामी नष्ट झाली नाही. मात्र, त्यामुळे युद्धाचे रूपांतर मुक्तिलढ्यात झाले. म्हणजे गुलामांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी त्यांचा लढा सुरू ठेवला. मुक्तीच्या घोषणेमुळे कृष्णवर्णीयांना लष्कर आणि नौदलांत भरतीसाठी उभे राहण्याची परवानगी मिळाली. याचा अर्थ असा होता, की जे गुलामीत खितपत पडले आहेत, त्यांना मुक्त करण्यासाठी गुलामी सोडून आलेल्यांना सक्षम करायचे. युद्धाच्या अखेरीस सुमारे दोन लाख कृष्णवर्णीय सैनिक आणि नौदल जवान संघांचे संवर्धन आणि स्वातंत्र्यासाठी लढत होते. संघ राजकीय आणि लष्करीदृष्ट्या मजबूत करण्यासाठी लिंकन यांच्या मुक्ततेच्या घोषणेची मदत झाली.

राष्ट्राध्यक्ष म्हणून लिंकन यांनी रिपब्लिकन पक्षाची एक सक्षम राष्ट्रीय संघटना म्हणून स्थापना केली. हे करताना त्यांनी डेमोक्रॅट्सनाही संघात सहभागी करून घेण्यास सुरुवात केली. गॅटिसबर्ग येथील भाषणात लिंकन म्हणाले होते, की यापुढे मरणाऱ्याचे मरण फुकट जाणार नाही. देवाने उभारलेल्या राष्ट्रात भविष्यात स्वातंत्र्य जन्माला येईल आणि म्हणूनच लोकांनी लोकांसाठी लोकांकडून सुरू केलेले सरकार या पृथ्वीवरून कधीच नष्ट होणार नाही. १८६४ मध्ये लिंकन नव्याने अध्यक्षपदी निवडून आले. तेव्हा देशातील यादवी संपुष्टात आली होती. त्यांनी या काळात राष्ट्रांना एक करण्यास सुरुवात केली. विजयाने त्यांची दिगंत कीर्ती पसरली. त्यांचे व्यक्तिमत्त्व भव्यरूपाने जनतेसमोर आले. याचा प्रभाव असा पडला, की फुटून बाहेर पडण्याच्या इच्छेने हाती शस्त्र धरलेल्या सैनिकांनी संघ उभारणीस मदतीचा हात पुढे केला.

कॉन्फेडरेट दले शरण येऊन एक आठवडा उलटल्यानंतर लिंकन यांची हत्या करण्यात आली; परंतु त्यानंतरही अमेरिका संघ म्हणून उभा राहण्यास कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. त्यांच्या भव्य विचारांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांच्या मनावर इतका खोलवर बिंबला होता, की फुटीचा एक हुंकारही देशांत उमटला नाही.

आणि आजचे रिपब्लिकन...

आजच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रवासात लिंकन यांच्या वारशाच्या काही खुणा दिसतात, असे काही वाटत नाही. रोनाल्ड रेगन यांच्या काळात रिपब्लिकन पक्षाची पूर्वीची ओळख अगदी पुसट झाल्याचे दिसले. व्हाईट हाऊसचा वरिष्ठ प्रतिनिधी ब्रायन करीम यांनी रेगन यांच्या काळातील सर्व प्रशासकीय निर्णयांचा पडताळा अगदी जवळून घेतला होता. त्यात ते असे म्हणतात, की अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या काळात रचलेल्या पायावर रिपब्लिकन पक्षाची इमारत रेगन यांच्या काळात अगदीच ठिसूळ होत गेल्याचे आपल्याला दिसेल. करीम म्हणतात, की निक्सन यांच्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या नैतिक, वैचारिक ऱ्हासाला सुरुवात झाली. निक्सन यांनी घटनात्मक विधिनिषेध पाळले नाहीत. निक्सन हे गुन्हेगार होते, त्यांचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

वाईटाच्या बदल्यात अतिवाईट

एक वाईट झाले, तर त्या बदल्यात काहीतरी चांगले येईल, अशी अपेक्षा बाळगायची असतेच; परंतु अमेरिकेच्या बाबतीत एका वाईटाच्या बदल्यात दुसरे अतिवाईट आले. रोनाल्ड रेगन हे अमेरिकेला मिळालेले सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष होते. निक्सन यांच्या दक्षिणी धोरणाचे भांडवल रेगन यांनी उभारले. रिपब्लिकन पक्षाचे पुरोगामित्व नष्ट करण्याचा विडाच जणू या दोघांनी उचलला होता. पुरोगामी विचार मांडू इच्छिणाऱ्यांना अनुल्लेखाने मारण्याचा मोठा डाव मांडण्यात आला, असे मत करीम नोंदवतात. निक्सन आणि रेगन यांनी रसातळाला नेलेला रिपब्लिकन पक्ष टेडी रुझवेल्ट यांनी लोकांचा पक्ष म्हणून त्याला नवे रूप दिले. निक्सन यांच्या काळात या पक्षाची नीती ही वर्णीय आणि अनैतिक मूल्यांवर उभारलेली राहिली. रेगन यांनी त्यावर कळस चढवल्याचे दिसले, असे मत करीम नोंदवतात.

गौरवर्णीयांची खदखद

करीम पुढे नमूद करतात, लोकप्रतिनिधी गृहाचे ५० वे अध्यक्ष न्यूट गिनरीच (१९९५ ते ९९) यांनी काँग्रेसमधील समस्या सोडविण्याऐवजी ती अधिक जटील केली. आज ज्या वळणावर अमेरिका आहे, त्याची ती सुरुवात होती. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी तयार केलेल्या अनेक आवृत्त्या. अर्थात त्यांचे चेले. हा काही लोकांचा वा उच्च मूल्यांचा पक्ष नाही, असे ते म्हणाले होते. निक्सन यांनी द्वेषमूलक, उग्र आणि झापडबंद राजकारणाची विषवल्ली पेरली. ती पुन्हा ट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेत पसरत गेली. काळेकुट्ट युग असे या राजकीय प्रवासाचे वर्णन करावे लागेल. इलिनॉइस प्रांतातील रहिवासी व इलिनॉइस स्टेट सोसायटीचे संचालक अँड्‍यू क्रेग यांच्याशी मी बोलले. दक्षिणी धोरणाचे क्रेग यांनी सविस्तर विश्लेषण केले. यात त्यांनी रिपब्लिकन पक्षातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास कसा झाला, हे सांगितले. साधारण ५० वर्षांपूर्वी रिपब्लिकनच्या दक्षिण धोरणाला आरंभ झाला. गौरवर्णीयांच्या मनातली खदखद आणि राजकीय सत्ता बळकावण्यास सुरुवात केली. खेरीज शिक्षणाची सुविधा असूनही त्यात फारशी प्रगती करू न शकलेल्या गौरवर्णीयांची लोकसंख्या अधिक असलेल्या प्रांतात भेदमूलक भावनेचा वणवा अधिक वेगाने पेटत गेला. आम्ही म्हणू तो राष्ट्रवाद. अन्य काही नाही. अशी भावना गौरवर्णीयांमध्ये दृढ होऊ लागली आहे. लिंकन यांनी अमेरिका अभेद्य ठेवण्यासाठी वा फाळणी टाळण्यासाठी शक्य ते सर्व बळ वापरले. मात्र, रिपब्लिकनचा पराभव झाल्यास सत्तेत येणाऱ्या विरोधी पक्षाला संयुक्त अमेरिकेसाठी मदत करू, असे लिंकन यांनी जाहीर केले होते.

याउलट ज्यो बायडेन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका जिंकल्याच नसल्याचा खोटा प्रचार रिपब्लिकन करीत सुटले आहेत.

६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यातील खटल्यात दोन रिपब्लिकन संसद सदस्या लिझ चेनी आणि सदस्य ॲडम किसिंजर या दोघांनी सहकार्याची तयारी दाखवली आहे. या दोघांवर रिपब्लिकन पक्षाने त्यासाठी निर्बंध घातले आहेत.

...आणि भारत

अमेरिकेच्या एकीकरणात लिंकन यांनी काही नैतिक मूल्ये घालून दिली. त्याकडे पाहताना भारतातील स्थितीकडे नजर टाकल्यास इथली सेक्युलर राष्ट्राची संकल्पना मोडीत निघते की काय, अशी भीती सुज्ञांच्या मनात दाटून येते. सर्वांना समान लेखण्याची दृष्टी भारतीय राज्यघटनेने दिली. तीच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुस्लिमांविरुद्ध असलेली भेदाची भावना देशात पाहायला मिळत आहे. देशवासीयांमध्ये दुजाभाव पसरू न देता त्यांच्यातील दरी सांधण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशा काळात नेत्यांचे मौन बरेच काही सांगून जाणारे आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ख्याती आहे. त्यामुळे एवढी मोठी लोकशाही टिकवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com