कामगारहितासाठी ॲमेझॉन ‘ऑनट्रॅक’

जेफ बेझोस यांनी १९९४ मध्ये सुरू केलेल्या ॲमेझॉनने आता मोठी मजल मारली आहे. सुरुवातीला त्यांचे केवळ ऑनलाईन बुक स्टोअर होते.
Amazon
AmazonSakal

- पूनम शर्मा

केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील ग्राहकांची खरेदीची सवयच बदलून टाकणाऱ्या ॲमेझॉनवर कामगारांची पिळवणूक केल्याचे आणि ग्राहकांवर पाळत ठेवल्याचे आरोप होत होते. सतत झालेल्या टीकेनंतर आता ॲमेझॉनने कामगारहिताची पावले उचलली असून, त्याचे जगभर चांगले परिणाम होतील का, याकडे आता पाहिले जात आहे.

जेफ बेझोस यांनी १९९४ मध्ये सुरू केलेल्या ॲमेझॉनने आता मोठी मजल मारली आहे. सुरुवातीला त्यांचे केवळ ऑनलाईन बुक स्टोअर होते. त्यानंतर त्यांनी हळूहळू ॲमेझॉन प्राईममार्फत संगीत, चित्रपट, क्लाऊड कॉम्प्युटिंग, लोकांना घरपोच वस्तू पोचवणे अशी सुरुवात करत भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगलाच जम बसवला. या वर्षी तर ॲमेझॉनचा अमेरिकेतील व्यवसाय ४० टक्के, तर इतर देशांतील व्यवसाय ६० टक्क्यांवर गेला आहे. ऑनलाईन शॉपिंग हा सध्याचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. त्याने बेझोस आणि त्यांच्या भागधारकांना चांगलाच परतावा मिळवून दिला; मात्र हे यश मिळवण्यासाठी कोणाला काय किंमत मोजावी लागली, हे जाणून घेणं क्रमप्राप्त ठरते.

सन २००० मध्ये बेझोस यांनी ‘ब्ल्यू ओरिजिन एलएलसी’ ही एरोस्पेस उत्पादक आणि अंतराळ पर्यटनासाठीची कंपनी स्थापन केली. २० जुलै २०२१ रोजी ब्ल्यू ओरिजिनने शेफर्ड रॉकेटमधून स्वतः बेझोस, त्यांचा भाऊ आणि अन्य व्यक्तींचे पहिले पथक दहा मिनिटांसाठी अंतराळात नेले. या यशस्वी सफरीनंतर बेझोस यांनी सर्व कर्मचारी आणि ग्राहकांचे आभार मानले. तुमच्यामुळेच ही सैर यशस्वी झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अलेक्झांड्रा कोरट्रेच यांनी बेझोस यांना प्रत्युत्तर दिले. ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी या सहलीसाठी स्वतः कमी पगार घेऊन पैसे भरले. अमानवी परिस्थितीत काम करून आणि साथीच्या काळात आरोग्यविमा नसताना डिलिव्हरी बॉयला कामावर पाठवून हे पैसे पुरवले... हे त्यांचे उत्तर फारच बोचरे होते.

एकीकडे कोरोना साथीच्या काळात जगात अनेक व्यवसाय उद्योग बंद पडत असताना ॲमेझॉनसारख्या ऑनलाईन रिटेल शॉपिंग कंपन्यांनी चांगलाच व्यवसाय केला. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ॲमेझॉनने मोठ्या संख्येने नोकरभरतीही केली. कोरोना काळातच जेफ बेझोस यांची मालमत्ता ७० अब्ज अमेरिकन डॉलर्सने वाढली. जगभरातील त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्याही पंधरा लाखांपर्यंत वाढली; मात्र वेगवान आणि कार्यक्षम तत्पर सेवा देण्याचे ॲमेझॉनचे घोषवाक्य पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कामगारांना याची प्रचंड किंमत मोजावी लागली.

कोरोना काळात ॲमेझॉनच्या गोदामातील परिस्थिती कशी वाईट आहे, याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त प्रकाशित केले. ॲमेझॉनने कार्यक्षमतेला प्राधान्य देतानाच एखाद्या कर्मचाऱ्याची तीन वर्षे सेवा झाली की त्याला नोकरीवरून काढले जाते. अर्थातच त्यांच्या जागी कमी वेतनावर नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ लागली. गोदामांतील कामगारांना प्रचंड तणावात काम करावे लागे. कामाची मोठमोठी उद्दिष्ट आणि अल्प विश्रांती कर्मचाऱ्यांना दिली जात असे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मिनिटाच्या कामाचा हिशेब ठेवला जात असे. अगदी स्वच्छतागृहात गेले तरी तो वेळही मोजला जायचा. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची उत्पादकता दीडशे टक्क्यांनी वाढली, परंतु त्याबाबत कुणाला आश्चर्य वाटलं नाही. यापूर्वी २०१९ मध्ये ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी सेलच्या प्रमुख दिवशी म्हणजे प्राईम डेच्या दिवशी जगभरात निदर्शने केली. कामाच्या ठिकाणची दयनीय अवस्था आणि अपुऱ्या वेतनाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला. अमेरिकेचे सिनेटर बेरिन सँडर्स आणि एलिझाबेथ वॅरन यांनी या संपकरी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. त्यापूर्वीही अलाबामा येथील ॲमेझॉनच्या गोदामातील कर्मचाऱ्यांनी संघटना तयार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

ॲमेझॉनने तिथे कर्मचाऱ्यांची सक्तीने सभा घेऊन युनियनच्या विरोधी मतदान करण्यास त्यांना भाग पाडले. सिनेटर एलिझाबेथ वॅरन यांनी ॲमेझॉनच्या या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. एरवी ॲमेझॉन कर्मचाऱ्यांकडून घोड्याच्या वेगाने काम करून घेते किंवा त्यांच्या मानेवर नोकरकपातीची टांगती तलवार ठेवली जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते, असे खुद्द कर्मचारी सांगतात; मात्र या युनियनविरोधी सक्तीच्या बैठकांसाठी कामात खंड पडलेला ॲमेझॉनला चालणार होता, हे विचित्रच आहे, असेही त्यांनी दाखवून दिले.

ॲमेझॉनने आपल्या गोदामातील कर्मचाऱ्यांच्या वेळेचे सूक्ष्म नियोजन केले होतेच; पण त्यांनी त्यांच्या वाहनचालकांवरही बारीक नजर ठेवली होती. त्यासाठी त्यांनी ट्रकमध्ये कॅमेरे लावले होते. या उपकरणांना ‘ड्रायव्हरी’ असे म्हणतात. त्याचा एक कॅमेरा ड्रायव्हरच्या दिशेने रोखलेला असे. अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियनने (एसीएलयू) त्याचा एक व्हिडीओ तपासला असता चालकाचा प्रत्येक सेकंद, प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात टिपली जात असे. त्यात अपघातांबरोबरच आपला ट्रक दुसऱ्या वाहनाच्या फार जवळ नेणे, धोकादायक पद्धतीने यू-टर्न घेणे, सीट बेल्ट न लावणे, कॅमेऱ्यात दृश्य दिसणार नाही यासाठी प्रयत्न करणे, जोरात ब्रेक मारणे, जोरात एक्सिलेटर दाबणे, ड्रायव्हरचे लक्ष विचलित होत असेल, अशा काही गोष्टी या कॅमेऱ्यात नोंदवून ते व्हिडीओ अपलोड केले जात होते; परंतु ही यंत्रणा काही वेळा चुकादेखील करत होती आणि चुकीची माहितीही कंपनीला पोहोचवत होती. त्यामुळे त्या चालकाला विनाकारण दडपण येत होते, असेही आढळून आले.

एका उदाहरणात तर या उपकरणाला रस्त्यावर समोर थांबण्याची खूण असल्याचे जाणवले आणि तसे यंत्रणेला कळवले, पण प्रत्यक्षात तिथे तशी कोणतीही खूण नसल्यामुळे चालकाने गाडी थांबवली नाही. त्यामुळे चालकाला व्हायची ती शिक्षा झालीच. ही यंत्रणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे ॲमेझॉनचे म्हणणे असले तरी चालकांवरच लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा बसवल्याचा चालकांचा समज होता. विशेष म्हणजे हा समज खोडून काढण्यासाठी ॲमेझॉनने फारसे काही केले नाही.

ॲमेझॉन व्यवस्थापनाच्या दडपशाहीविरुद्ध आणि तणावपूर्ण वातावरणाविरोधात कर्मचारी नेहमीच निषेध नोंदवत असे; पण ट्रकचालकांनाही आता अशा वाईट अवस्थेचा सामना करावा लागतो, त्यांच्याकडून अधिकाधिक काम करून घेण्यासाठी त्यांना वेगाने वाहन चालवायला सांगत असे. मात्र त्यामुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी ॲमेझॉन स्वतःवर न घेता वाहनचालक हे कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत हात वर करत असे, असेही ‘एसीएलयू’ने दाखवून दिले.

ग्राहकांची गोपनीयता धोक्यात

ॲलेक्सासारख्या उपकरणांमार्फतही ॲमेझॉनकडे ग्राहकांच्या इत्थंभूत माहितीची नोंद होते, असाही आरोप करण्यात येत आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारे शॉपिंग करता यावे, यासाठी तसेच त्यांना शॉपिंगचा पुरेपूर आनंद घेता यावा, याकरिता या माहितीचा उपयोग आम्ही करतो, असा ॲमेझॉनचा दावा आहे. अर्थात त्यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यासंदर्भात ग्राहकांचे संरक्षणासाठी अमेरिकेतील अनेक राज्यांनी कायदे करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यास ॲमेझॉनने जोरदार विरोध केला. या संदर्भात संपूर्ण अमेरिकेत एकच धोरण असावे, प्रत्येक राज्यात वेगवेगळे कायदे नसावेत, असे म्हणणे त्यांनी मांडले.

या वर्षी ॲमेझॉनने ‘साईडवॉक’ ही यंत्रणा अमेरिकेत कार्यान्वित केली. ग्राहकांच्या घरातील ॲमेझॉन ईको किंवा रिंग सेक्युरिटी कॅमेरा अशा स्मार्ट होम डिव्हाईसना ही ‘साईडवॉक’ यंत्रणा ॲमेझॉनच्या सर्व्हरशी जोडते. यामुळे ग्राहकांवर लक्ष ठेवण्याच्या ॲमेझॉनच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. ग्राहकांनी प्रत्यक्ष या सेवेतून बाहेर पडण्याचे ठरवल्याखेरीज ती उपकरणे स्वतःहून ‘साईडवॉक’शी डिस्कनेक्ट होत नाहीत. किंबहुना त्या घराबाहेर अर्धा किलोमीटर परिसरात नेली तरीही ती उपकरणे ‘साईडवॉक’शी जोडलेली असतात. त्याचा वापर करून ग्राहकांवर पाळत ठेवली जाऊ शकते, असे आक्षेप घेतले जात आहेत. ॲमेझॉनचे ‘अलेक्सा’ हे उपकरण सर्वच व्हॉइस रेकॉर्डिंग साठवून ठेवते, असेही सांगितले जात आहे.

‘ओपनसिक्रेट्स डॉट कॉम’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ॲमेझॉनने या वर्षभरात लॉबिंग करण्यासाठी दीड कोटी अमेरिकी डॉलर एवढी रक्कम खर्च केली आहे. कामगार कायदे, कामगारांच्या कामाच्या ठिकाणाची स्थिती, माहिती-तंत्रज्ञान, ग्राहक संरक्षण, ग्राहकांची सुरक्षा, संरक्षणविषयक आणि अमेरिकेचा अर्थसंकल्प इत्यादी विषयांवर हे लॉबिंग केले जाते. अमेरिकेतील व्हाईट हाऊससह एकूण ४१ सरकारी संस्थांमध्ये त्यांनी हे लॉबिंग केले आहे. ग्राहकांचा तपशील नोंदवणे आणि त्यासाठी त्यांची परवानगी घेणे, यासंदर्भात ग्राहकांना माहिती देण्याची सक्ती करणाऱ्या विधेयकाविरोधातही ॲमेझॉनने लॉबिंग केल्याचे ‘रॉयटर’चे म्हणणे आहे. आपले लॉबिंग आणखी धारदार करण्यासाठी त्यांनी व्हाईट हाऊसचे माजी माध्यम सचिव जे. केरनी आणि माजी फेडरल ट्रेड कमिशनर ॲटर्नी ब्रायन हसमन यांची सेवा घेतली होती. ग्राहक संरक्षणाचे उपाय योजले जाऊ नयेत, याकरिता काँग्रेस सदस्यांवर दबाव आणण्यासाठी ॲमेझॉनमुळे किती रोजगार निर्मिती झाली ते पाहा, असेही दडपण संबंधितांवर आणले गेले.

किंचित उपरती झाली...

ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणाच्या दुरवस्थेबाबतच्या टीकेनंतर ॲमेझॉनने तीस कोटी डॉलर खर्च करून काही सुरक्षाविषयक उपाय योजले. कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्यायाम देण्यासाठी, तसेच त्यांचे खाणेपिणे आरोग्यदायी असावे, यासाठीही त्यांनी एक विशेष कार्यक्रम आखला. अर्थात यामुळे या कर्मचाऱ्यांची अवस्था आणि त्यांचे कामाचे वातावरण सुधारेल का, हे आताच सांगता येणार नाही; मात्र या दिशेने टाकलेले ते एक पाऊल आहे एवढे निश्चित.

बेझोस यांच्याकडे मालकी असलेल्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्रातून राजकारण्यांवर नेहमीच टीका केली जाते. त्यामुळे हे वृत्तपत्र राजकारण्यांच्या टीकेचे धनी होते. अर्थात या वृत्तपत्रातील दैनंदिन वृत्तांकन किंवा संपादकीय धोरणे यांच्याशी बेझोस यांचा संबंध नसतो. या वृत्तपत्रात आपल्याला अनुकूल असे वृत्तांकन न झाल्यामुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टीका केली होती. २०२० मध्ये बेझोस भारतात आले होते, तेव्हा त्यांना नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाली नाही. भाजपकडून वॉशिंग्टन पोस्टच्या संपादकीय धोरणावर नेहमीच टीका केली जाते. मोदी यांनीही देशातील छोट्या व्यापाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंगबाबत विरोधी भूमिका घेतली होती; मात्र वॉशिंग्टन पोस्टने मोदी यांचे ज्याप्रकारे वार्तांकन केले होते, त्याविरोधात नाराजी दाखवण्यासाठीच मोदींनी बेझोस यांना भेट नाकारल्याची चर्चा झाली होती.

अमेरिकन सिनेटर बेरिन सँडर्स हेदेखील ॲमेझॉनवर नेहमीच टीका करतात. ऑनलाईन रिटेल कंपन्यांनी सुयोग्य करभरणा करावा, तसेच कर्मचाऱ्यांनाही योग्य वेतन द्यावे, अशी मागणी ते नेहमी करतात. या सर्व दडपणामुळे अमेझॉनने सन २०१८ मध्ये प्रत्येक तासाला किमान १५ डॉलरपर्यंत वेतन वाढवले. हे पाऊल केवळ अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर जगातील कामगारांसाठी महत्त्वाचे ठरेल, अशी प्रतिक्रियाही सॅंडर्स यांनी याबाबत ट्विट करून व्यक्त केली. जगातील सर्वच बड्या भांडवलदारांनी याचे अनुकरण करावे, असेही आवाहन त्यांनी केले. अर्थात ताशी १५ डॉलर वेतन हे कमीच आहे आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणाची परिस्थिती आणखी सुधारण्याची गरज आहे; मात्र ॲमेझॉनने जगातील ग्राहकांच्या शॉपिंगविषयक सवयी जशा बदलल्या, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्यायलाच हवी. ज्या कर्मचाऱ्यांनी ॲमेझॉनला एवढे यश मिळवून दिले, त्यांची काळजी घ्यायलाच हवी आणि आपल्या ग्राहकांबद्दल पारदर्शकता दाखवलीच पाहिजे, हेही आता सर्वांनाच जाणवले आहे.

managingeditor@indiaamericatoday.com

(लेखिका ‘इंडिया अमेरिका टुडे’ या मॅगझीनच्या कार्यकारी संपादक असून, त्या राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जागतिक आरोग्य या विषयांच्या अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com