आजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)

पोपटराव पवार
रविवार, 19 ऑगस्ट 2018

हिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या पाहुण्यांपासून नातेवाईक आणि कुटुंबाचं सर्वांत मोठं आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. त्या बागेमधल्या समृद्धीच्या आठवणींमुळंच हिवरेबाजारमधल्या प्रत्येक घरात अशी बाग तयार करण्याची प्रेरणा मिळाली.

हिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या पाहुण्यांपासून नातेवाईक आणि कुटुंबाचं सर्वांत मोठं आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. त्या बागेमधल्या समृद्धीच्या आठवणींमुळंच हिवरेबाजारमधल्या प्रत्येक घरात अशी बाग तयार करण्याची प्रेरणा मिळाली.

हिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे फार वर्षांपासून आजपर्यंत गावात येणाऱ्या पाहुण्यांपासून नातेवाईक आणि कुटुंबाचं सर्वांत मोठं आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. कुठलाही पाहुणा आला, तर तो या बागेला अवश्‍य भेट देणार. विहिरीला भरपूर पाणी असायचं. "नहेराचा मळा' म्हणून मोसंबीचा बाग खूप प्रसिद्ध होता. या बागेबरोबरच विहिरीवर बैलांची मोट चालवायची. बावऱ्या आणि हलक्‍या ही बैलजोडी दैठणेगुंजाळच्या खंडोबाच्या यात्रेत शर्यतीत नेहमीच प्रथम क्रमांक मिळवायची. ज्या वेळी विहिरीवरती बावऱ्या आणि हलकऱ्याची मोट चालायची, त्या वेळी त्यांच्या पाठीवर पिवळे संत्र्यांचे घड अक्षरशः टेकायचे. बैलाची मोट चालवायची ती मोटेच्या धावपट्टीवरून आणि तिच्या कडेनं संत्री, केळी आणि आंब्याची झाडं असायची. मे महिन्याच्या उन्हातही या झाडांच्या गर्द सावलीमुळे बैलांना कधीच ऊन लागत नसायचं. थारोळ्यात मोटेचं पाणी पडायचं. छोट्या हौदात पडायचं ते पाणी माणसांना पिण्यासाठी वापरलं जायचं आणि तिथून मोठ्या हौदात ते पाणी पडायचं. ते जनावरांच्या पिण्यासाठी आणि आम्हा छोट्या मंडळाच्या पोहण्यासाठी वापरलं जायचं.

दोन एकराच्या या मोसंबीच्या बागेमध्ये सर्व प्रकारची फळं असायची. एका बाजूला केळी, विहिरीच्या आणि धावेच्या बाजूनं संत्र्यांची आणि आंब्यांची झाडं आणि बागेच्या चहूबाजूंनी सगळ्या प्रकारची देशी आंब्यांची झाडं होती. त्यामध्ये रसाचा आंबा, पाडाचा आंबा, लोणच्याचा आंबा, त्यानंतर पेरू, पपई, बोर, रामफळ, सीताफळ, कवठाचं झाड अशी सर्व प्रकारची फळं वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आम्हाला खायला मिळायची. यात बोनस म्हणजे सगळ्या ऋतूंत बागेतल्या झाडांवर फुलं असायची आणि बागेला काटेरी कुंपण असायचं. त्यावर मधमाशांची पोळं असायची आणि मग आमची मध खायला चंगळ व्हायची. पोपट, चिमण्या, बुलबुल, सुतार, मैना, खड्या, वटवाघूळ यांसारखे अनेक पक्षीसुद्धा पाहायला मिळायचे. त्यामुळं ढोल वाजवणारं एक मंडळ फक्त पाखरांसाठी असायचं. बागेत मधोमध एक मचाण केलेली असायची. जेणेकरून पाखरांपासून फळबागा वाचवता याव्यात.

परिसरात या बागेचा मन मोहून टाकणारा सुगंध दरवळायचा. त्यामुळं कधी एकदा शाळा सुटते आणि मळ्यात जातो असं आम्हाला व्हायचं. परंतु मळा गावापासून लांब असल्यामुळं शनिवारी सुट्टीची आम्ही वाट पाहायचो. कारण गोठ्यातली वासरं सोबत घेऊन दिवसभर बागेत राहायला मिळायचं. वडील आणि तीन चुलते मिळून आम्ही सगळे 25-30 जण असायचो. प्रत्येकाची मळ्यात स्वतंत्र फळाची अढी असायची आणि प्रत्येकजण दुसऱ्याला चोरून बागेत कुठल्या तरी बांधाला केळी, आंबा, पपईसारखी पिकवता येणारी फळं अढी लावून त्याला काहीतरी खूण करून ठेवायचा. मात्र, मजा म्हणजे अढीमालकाला ते फळ मिळेपर्यंत अढी गायब झालेली असायची. कारण आम्हा काही जणांची टोळी फक्त या अढींचीच माहिती ठेवायचो आणि मग अख्खी अढीच फस्त करून टाकायचो.

काळ्या आंबा हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय असायचा. कारण तो खायला सर्वांत चवदार आंबा होता. मात्र, तो सर्वांत उंच म्हणजे जवळजवळ शंभर फूट उंचीचा डेरेदार आंबा होता आणि इतक्‍या उंचीवर चढणं सर्वांना शक्‍य व्हायचं नाही. यामध्ये मी सर्वांत तरबेज असायचो. गावामधल्या चार-पाच झाडांवर चढण्यात पटाईत असणाऱ्या मुलांमध्ये मी एक होतो. आंब्याच्या सीझनमध्ये मला प्रचंड लाल-मुंग्याही चावायच्या; पण आम्ही हार मानत नव्हतो. माझ्या अंगाला चिखल लावून मी झाडावर चढायचो आणि मग मुंग्यांचा काहीही त्रास न होता सर्वांत जास्त पाड खायला मिळायचे.
प्रत्येकाचं मित्रमंडळ वेगळं असायचं. आमचे मित्र नेहमी मोठ्या वर्गांतले असायचे. मोसंबीची बाग ज्या वेळेस बागवानाला विकली जायची, त्या वेळी त्यांचे काही रखवालदार असायचे. ते नेहमी उत्तर भारतीय असल्यानं हिंदी बोलायचे. त्यांच्याशी घरच्यांची अगदी जेवण देण्यापर्यंत दोस्ती असायची. मग आमच्या घरच्यांचं त्यांच्याशी होणारे तोडकेमोडके हिंदी संवाददेखील आमच्या मनोरंजनाचे विषय असायचे.

यानंतर खरा मोसंबी खाण्याचा आनंद आम्हाला मिळायचा. बागेच्या रखवालदारांना चोरून कुंपणाच्या चोरवाटेनं बागेत शिरणं आणि त्यांच्या नकळत मोसंबी चोरून खाणं यापेक्षा वेगळा आनंद आमहाला हक्कानं मोसंबी खाताना आजही येत नाही. नेहमी फळ तोडायला मी आणि बाहेर खायला मित्र असायचे. असाच एकदा आमचा कार्यक्रम सुरू असताना चुलतभावानं आम्हाला पकडलं आणि मग दंड म्हणून शंभर बैठका मारायला लावल्या. कारण घरात कुस्तीची परंपरा असल्याने हाच दंड मिळायचा. एक असायचं, की झाडाचं केवळ गोड फळ मी पोपटासारखं खायचो. या बागेमुळं मोठं मित्रमंडळ नेहमी सोबत असायचं- जे आजही सोबत आहे. त्यांना घेऊन बागेतली ती फळं चोरून खाण्याइतका मोठा आनंद आजही कशात नाही. या बागेतल्या सर्व फळांची रोपं सगळ्या पाहुण्यांच्या घरी आजही पाहायला मिळतील. फळांसोबतच बागेतल्या विहिरीच्या नितळ पाण्यात पोहणं आणि पाण्यात असंख्य खेळ हासुद्धा आमचा फार आवडीचा छंद असायचा. विहिरीच्या अगदी तळातून काहीही आणण्यात आम्ही सगळे पटाईत होतो. मोटेत बसून वर यायचं, मोटेच्या पाण्यात आंघोळ करायची, असं सगळं करीत मित्रांसोबत दिवस कसा जायचा, हे कळायचं नाही. केळफुलांची लाल रंगाची पाकळी काचेसारख्या स्वच्छ विहिरीच्या पाण्यात टाकायची आणि दुसऱ्यानं बुडी मारून तळातून ती काढून आणायची, ही स्पर्धा फार आवडीची होती.

आज गावात काम करताना या जुन्या आठवणींचा समृद्ध ठेवा सतत प्रेरणा देत राहतो. आजोबांची दूरदृष्टी, चुलते आणि वडिलांची मेहनत आणि त्यातून आम्हाला मिळालेला हा समृद्ध वारसा टिकवणं गरजेचं होतं. 1972 च्या दुष्काळात पाण्याअभावी मोटेची जागा किर्लोस्कर इंजिनानं घेतली. तंत्रज्ञानाच्या या आविष्काराचा पहिला फटका विहिरीला बसला. विहिरीचा कोरडा तळ आम्हाला त्या वेळी पहिल्यांदा पहायला मिळाला. त्याच कालावधीत विद्युत पंप आला. तरीही विहिरीचं उपसलेलं पाणी मूळ जागी यायचं. विद्युत पंप आणि पाण्याच्या पातळीची स्पर्धा खूप जवळून पाहिली. 1976-77 च्या दुसऱ्या दुष्काळात मात्र मोसंबीची बाग सुकायला लागली. मग हळूहळू बागेतली खूप जुनी झाडं वाळून गेली. त्याच कालखंडात पुढील शिक्षणासाठी मी आजोळी गेलो. दुष्काळाचे चटके वाढतच होते. तंत्रज्ञानानं पाणीपातळीवर विजय मिळवला. मग "दुष्काळात तेरावा महिना' म्हणतात तो पाहायला मिळाला. चुलत्या काकांचं एकत्र कुटुंब विभक्त झालं. बागही तुटली. मधमाश्‍यांची पोळं गेली. पक्ष्यांची आणि सोबत माणसांचीसुद्धा स्थलांतरं झाली. तंत्रज्ञान आणि प्रतिकूल झालेला निसर्ग यामुळं गावचं गावपण कुठंतरी हरवलं. या सगळ्यामधून आजोबांची जुनी बाग गावातल्या प्रत्येक घरात तयार करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच तंत्रज्ञानाच्या युगातही पाणी आणि पिकाचं नियोजन केल्यानं आज आख्ख्या शिवारात बालपणी पाहिलेल्या भरलेल्या विहिरी, पाखरं आणि बागेतलं प्रत्येक ऋतूत फळ पुन्हा पाहण्याचा आनंद पुढच्या प्रत्येक पिढीला आम्हाला देता आला. या आजोबांच्या बागेतले फक्त तीन साक्षीदार म्हणजेच उंबर, घराजवळचं आंब्याचं आणि चिंचेचं झाड. ही झाडं आजही जुन्या समृद्धीची साक्ष देत आम्हाला खुणावत आहेत.

Web Title: popatrao pawar write water article in saptarang