जागर दुष्काळनिवारणाचा (पोपटराव पवार)

popatrao pawar
popatrao pawar

नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे.

भारतीय संस्कृतीला विविध सण आणि उत्सवांची हजारो वर्षांची परंपरा आहे आणि ही परंपरा मानवी मूल्यांशी जोडली गेलेली आहे. या परंपरांचा आपण बारकाईनं अभ्यास केला, तर यामागची संकल्पना ही पर्यावरण, स्वच्छता, पाण्यावर आधारित पीकनियोजन आणि मातीचं आरोग्य या सर्वांशी जोडलेली आहे. सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाबाबत सांगायचं झालं, तर हा उत्सव या संकल्पनेला अतिशय उत्तमरित्या अधोरेखित करतो. स्वच्छता, पाणी, पीक आणि पर्यावरणाबरोबरच शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक आरोग्याची परंपरा या उत्सवातून घराघरांत पाहायला मिळते.

नवरात्रोत्सवाच्या आठ दिवस अगोदरपासूनच घराघरात स्वच्छतेची सुरवात होते. कपडे, भांडी आणि घरातल्या इतर स्वच्छतेबरोबरच आसपासच्या परिसराचीदेखील स्वच्छता केली जाते. स्वच्छतेला धार्मिक उत्सवाची जोड दिल्यानं दरवर्षी अतिशय उत्साही मनानं हा उपक्रम चालू राहतो. शारीरिक श्रमांनी थकवा आला, तरी घर परिसरातली साफसफाई केल्यानं कुटुंबातल्या प्रत्येकाचं आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहतं. पावसाळ्यानंतर सुरू होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार या संकल्पनेमुळं टळतो. दुष्काळाचं सावट असतानादेखील गावोगावी मुला-माणसांनी टॅंकरनं विकत पाणी आणून ही परंपरा कायम ठेवली. कुठल्याही स्पर्धा आणि बक्षिसांची आशा न ठेवता ही परंपरा याचमुळं केवळ श्रद्धा मनामध्ये ठेवून आजही अविरतपणे चालू आहे.

स्वच्छतेबरोबरच मातीच्या आरोग्याची विशेष चाचणी घटस्थापनेच्या माध्यमातून केली जाते. घडाभर पाण्याच्या आधारावर शेतातील मातीमध्ये आपल्या शेतात घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या बियाणांची एका अर्थाने तपासणीचं केली जाते. एका घड्यामध्ये शेतातली माती आणि पाणी घेऊन त्यातही बियाणं रुजवली जातात. त्या घटाला दररोज वेगवेगळ्या पाना-फुलांचे हार घालून नऊ दिवस त्याची निगा राखली जाते. वेगवेगळी फुलं लावल्यानं या कालावधीत गाव परिसरात साहजिकच मधमाश्‍या, किटक यांच्या माध्यमातून परागीभवन होतं. ज्यामुळं शेतीची उत्पादकता वाढते. दसऱ्याच्या दिवशी घटांमध्ये वाढलेल्या विविध पिकांचा कस बघून मातीचा आणि पाण्याचा कस कळून येतो. त्यावरूनच शेतातल्या मातीची, बियाणांची लागवडीसाठीची गुणवत्ता समजते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत पहाटे ब्राह्ममुहूर्तावर आरतीसाठी उठणं, स्नान करून अनवाणी पायांनी मंदिरात जाणं याचबरोबर सामुदायिक आरती करताना सहजीवनाचा एक संदेश यातून लोकांमध्ये जात असतो. नवरात्रीची सांगता दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला होते. गावोगावी विविध परंपरांद्वारे दसरा साजरा केला जातो. या दिवशी गावकरी सीमोल्लंघन करतात आणि आपल्या विकासाच्या सीमा विस्तृत करतात. घरोघरी पारंपरिक शेतीची अवजारं पूजली जातात, तर विद्यार्थी पाटी-पुस्तकांचं पूजन करतात. यातून उत्पादकता आमि ज्ञान या दोन्हींची वृद्धी करणारी शेतीची अवजारं आणि पाटी-पुस्तकं यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. आता घरोघरी आधुनिकतेमुळं या पारंपरिक गोष्टींऐवजी तांत्रिक अवजारं आली आहेत. त्यामुळं ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर आदींची किंवा पाटी-पुस्तकांऐवजी कॉंप्युटर आणि मोबाईलची पूजा केली जाताना दिसत आहे. असं असलं, तरी त्यामागचा मूळ भाव आणि संकल्पना ही नेहमी अशीच राहिली पाहिजे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या किंवा इतर झाडांची पानं सोनं म्हणून एकमेकांना दिली जातात. गावोगावी सीमोल्लंघनानंतर मंदिरांममध्ये सार्वजनिकरित्या आपट्याच्या फांदीची पूजा केली जाते. अशा या सगळ्या गोष्टी या ना त्या मार्गे पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश देतात.

नवरात्रोत्सवात विविध राज्यांमध्ये विविध खेळ, स्पर्धा आयोजित केल्या जातात. विविध प्रकारचे कार्यक्रम पाहायला मिळतात. परंतु या पारंपरिक खेळांची जागा आता डिस्को दांडिया, डीजे यांनी घेतली आहे. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठांच्या माध्यमातून पर्यटनातही वाढ होते. त्याचा ताण या मंदिर समित्यांवर पडतो. दर्शनाच्या काळात परिसरात प्रचंड कचरा आणि निर्माल्य साचतं. त्याचा ताण संबंधित गाव आणि मंदिर परिसरावर पडतो. याबाबत काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम सुरू करण्याची गरज आहे.

आम्ही हिवरेबाजारमध्ये सहाव्या माळेला सर्व ग्रामस्थ मिळून उन्हाळी पाण्याचा ताळेबंद मांडतो. आज राज्यभर परतीचा मॉन्सून न पडल्यामुळं दुष्काळाचं सावट आहे आणि पुढचे आठ महिने सर्वांसाठीच अतिशय कठीण असतील. अशा परिस्थितीत सर्व गावकऱ्यांनी आपल्या गावात पडलेल्या पावसाचा अंदाज घेऊन पिण्यासाठीचं, शेतीचं आणि जनावरांसाठीचं पाणी; तसंच दुष्काळी भागातल्या पळबागा यांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला या दुष्काळात धैर्यानं सामोरं जाण्याचा संकल्प या नवरात्रोत्सवात करण्याची गरज आहे. पैशाच्या पिकांपेक्षा जनावरांचा चारा उगवणं याला आपली प्राथमिकता असली पाहिजे.
नवरात्रोत्सवाची एक बाजू भूमी आणि पर्यावरण असली, तरी दुसरी बाजू ही स्त्री-शक्तीची पूजा असते. "स्त्री-शक्ती' आणि "भू-शक्ती' हे दोन्हीही उत्पत्तीचं आणि पोषणाचं प्रतीक आहे. स्वच्छतेमुळं स्त्रीचं आरोग्य उत्तम राहतं, तर सेंद्रीय कर्बामुळं भूमीचं आरोग्य उत्तम राहतं. म्हणून हिवरेबाजारमध्ये आम्ही स्त्रीचं आणि मातीचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वर्षभर प्रयत्नशील असतो. महिलांच्या पोषण, आहाराबरोबरच व्यायाम आणि इतर आरोग्याची तपासणी आम्ही करत असतो. महिलांसाठी गावात ग्रीन व्यायामशाळा आम्ही बनवली आहे. मासिक आरोग्यतपासणी आम्ही गावातल्या आरोग्य उपकेंद्रात करत असतो. आजवरच्या गावाच्या कामामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळं गेली तीस वर्षं स्वच्छता, पर्यावरण आणि पाणीनियोजन यात सातत्य राहिलं.

सेंद्रीय शेतीमुळं भूमीचं आरोग्यदेखील उत्तम राहिलं आणि यातही आम्ही सातत्य टिकवून आहोत. हे सर्व सामूहिक शक्तीचं फळ म्हणू या. नवरात्रात वाड्या-वस्त्यांवरील लोक एकत्र जमतात. याता फायदा घेऊन भूमी आणि स्त्रीच्या आरोग्याबरोबरच येत्या दुष्काळाचा व पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पाणीनियोजनाचा जागर करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com