सर्वसामान्यांचा आरोग्यसंघर्ष (पोपटराव पवार)

पोपटराव पवार
रविवार, 23 डिसेंबर 2018

सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत आनंद' या संकल्पनेवर जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे.

सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत आनंद' या संकल्पनेवर जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे.

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत येणारे 25 टक्के फोन हे आजारपणात दवाखान्यात सवलती मिळण्यासंदर्भात असतात. त्यातून सर्वसामान्यांच्या आरोग्याची परिस्थिती आणि उपचारांची अवस्था किती विदारक आहे आणि त्यांना आर्थिक मदतीची आणि आधाराची गरज आहे, हे लक्षात येतं. आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणासाठी वेळप्रसंगी जमीन विकणं किंवा तारण ठेवणं यांशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर राहत नाही. असंच एकदा पुण्यामध्ये आगीमध्ये जखमी झालेल्या पेशंटला भेटण्यासाठी गेलो असताना, तिथं एका महिलेनं आपल्या पतीच्या उपचारासाठी गळ्यातलं मंगळसूत्र विकताना मी पाहिलं. "तो जिवंत राहिला, तर पुन्हा घेऊन देईन,' अशी त्या महिलेची प्रतिक्रिया पाहिल्यावर मन विषण्ण झालं.

शासनाच्या आरोग्यसेवेचा विचार केल्यास आरोग्य केंद्रं, तालुका आणि जिल्हा स्तरावरच्या शासकीय दवाखान्यांची निर्मिती ही मुळातच आर्थिक क्षमता नसणाऱ्या घटकांसाठी आहे; पण त्यांची सेवा पाहिल्यास सर्वसामान्य माणसं खासगी दवाखान्यांमध्ये जाणं पसंत करतात. यामध्ये काही अपवादही आपल्याला पाहायला मिळतात. नगर जिल्ह्यातल्या रुई प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. संदीप चोपडे अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळं खासगी डॉक्‍टरांकडं न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसभर रांग लागलेली दिसते. डॉ. गोयल यांच्या प्रयत्नांमुळं नगर तालुक्‍यातल्या टाकळी खातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. अमरावती जिल्ह्यात सध्या आदर्श गाव योजनेत सहभागी असलेल्या पापळ गावातसुद्धा अशाच प्रकारचं आदर्श आरोग्य सेवेचं उदाहरण पाहायला मिळतं. नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिशय चांगली आरोग्य सेवा सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत दिली जाते. त्यामुळंच त्यांचं दालन सर्वसामान्य रुग्णांनी कायम भरलेलं असतं. अशी अनेक उदाहरणं राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं अनुकरण सर्वत्र होण्याची गरज आहे. त्यासाठी अशा प्रकारची प्रामाणिक सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांचा समाजानं सन्मान करण्याची गरज आहे. कारण हे लोकं केवळ आंतरिक प्रेरणेतून ही कामं करतात.

आज सगळीकडं हृदयविकार, मानसिक आजार; वेगामुळं होणारे अपघात वाढत आहेत. अशा वेळी तातडीची आर्थिक मदत न मिळाल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकदा अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्‍टर यांच्यात संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. यासाठी निव्वळ कायदे करून चालणार नाही, तर त्याची प्रामाणिक अंमलबजावणीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री अर्थसाह्य योजनची खूप चांगली चर्चा चालू आहे. सन 2014 मध्ये केवळ चार कोटींची असलेली ही आरोग्य अर्थसाह्य योजना आता सातशे कोटी रुपयांवर जाऊन पोचली आहे. या योजनेचे विशेष लाभ घेण्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. अर्ज केल्यानंतर बरोबर सातव्या दिवशी पैसे रुग्णाच्या खात्यावर गेलेले दिसतात. मंत्रालयालयातल्या सातव्या मजल्यावर पाच बाय पाचच्या खोलीत अवघ्या सात-आठ माणसांच्या मदतीनं ओमप्रकाश शेटे नावाचा एक अवलिया यासाठी प्रामाणिकपणे काम करतो. 27 ऑक्‍टोबरला एक बैठक आटोपून मी त्यांच्या दालनात गेलो असता, एका 16-17 वर्षाच्या मुस्लिम मुलाला आपल्या वडिलांच्या उपचारासाठी तातडीची मदत मिळावी, म्हणून अक्षरशः धाय मोकलून रडत असताना पाहिलं. ओमप्रकाश यांनी जेवण सोडून संबंधित हॉस्पिटलला फोन करून तातडीनं ऑपरेशन सुरू करायला सांगितलं आणि संबंधितांना पुरेशी कागदपत्र जमा करायला सांगून एका तासाच्या आत निधीच्या मंजुरीचे कागद देण्यात आले. सेवेमागचा हेतू प्रामाणिक असेल, तर जात आणि धर्माच्या पलीकडं जाऊन केवढी मोठी मदत सरकारच्या माध्यमातून होऊ शकते, हे यातून दिसतं.

अर्थात यासाठी मुख्यमंत्र्यांचं पाठबळ आणि आरोग्य कक्षाचं टीमवर्क हे खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री साह्यता निधी हा आपत्कालीन काळात अथवा नियोजनात नसणाऱ्या गोष्टींसाठी तातडीची मदत देणारा आहे आणि आता हा खर्च कमी न होता हजारो कोटींवर गेला, तर नवल नाही. कारण यामुळं अनेक सर्वसामान्य कुटुंबांच्या जमिनी वाचतील आणि सावकाराचं कर्ज घेण्यासाठी जायची गरज पडणार नाही. मात्र, आता निव्वळ आजारपणासाठी अर्ज करून मदत मिळवून देण्यात समाधान मानण्यापेक्षा आपली सरकारी आरोग्यव्यवस्था ही प्रामाणिकपणाच्या पायावर उभी करण्याची गरज आहे. त्यासाठी काही धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा आज सर्वांनाच आहे. त्यासाठी आयुर्वेद आणि ऍलोपॅथी यांचा मेळ घालण्यासाठी काही सुनियोजित गोष्टी करण्याची गरज आहे. प्रत्येक गावात, प्राथमिक आरोग्य केंद्रांत डॉक्‍टरांची, तज्ज्ञांची गरज आहे. एकदा डॉक्‍टरांची भेट झाल्यानंतर बाकी सर्व कामं तिथल्या आरोग्य सेविकांना पाहावी लागतात. त्यामुळं अनेकदा रुग्ण सरकारी दवाखान्यांत जायला घाबरतात. वॉर्डमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर कायम उपलब्ध झाल्यास सामान्यांना खासगी सेवेची गरज भासणार नाही आणि त्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही. खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरांनंतर आयुर्वेदिक डॉक्‍टरादिंच प्रमाण जास्त दिसतं. हा असाच समन्वय नेहमी राहिला, तर सर्वसामान्य माणसाची आरोग्याची सेवा चांगली होईल आणि त्यामुळं मुख्यमंत्री अर्थसाह्य योजनांची गरजच उरणार नाही.

याच गोष्टीबरोबर वैद्यकीय शिक्षणाचा विषय पाहिला, तर तेही सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात राहिलेलं नाही. शेवटी प्रचंड खर्चाचं शिक्षण हे निव्वळ सेवेचं व्रत घेऊ देत नाही. डॉक्‍टर होताना जर एक कोटी रुपये खर्च येणार असेल, तर त्यांच्याकडून केवळ सेवेची अपेक्षा करणं योग्य वाटत नाही. वैद्यकीय गुन्ह्यांमध्ये डॉक्‍टरांना दोषी धरायचं, की पैसे घेऊन पदव्या देणारी आमची शिक्षण व्यवस्था दोषी, याचाही विचार होण्याची आता गरज आहे. शेवटी या चक्रामधे भरडला जातो, तो केवळ सर्वसामान्य माणूस- ज्याच्यासाठी कल्याणकारी लोकशाहीचा जन्म झाला! या व्यवस्थेत एक पत्नीला पतीच्या उपचारांसाठी मंगळसूत्र विकावं लागत असेल, किंवा एका पतीला पत्नीवरच्या स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी आपली दोन एकर जमीन सावकाराकडं गहाण टाकावी लागत असूनही उपचारासाठी डॉक्‍टर टाळाटाळ करत असतील, तर ती मात्र खूप मोठी दुर्देवी घटना आहे. म्हणून आता आपण आजारी पडल्यानंतर मदत करणारी व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच मानसिक आणि शारीरिक आरोग्य मजबूत करणारी, रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना रोखणारी व्यवस्था निर्माण करणं आवश्‍यक आहे. म्हणूनच आता मनोरंजन आणि करमणुकीबरोबरच क्रीडांगण विकास, आरोग्यदायी आहार यांच्या शिक्षणाची खरी गरज आहे. अनेक युरोपियन देशांमध्ये डायबेटिस, हृदयरोग, कर्करोग आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं सरकारी पातळीवर उपाययोजना केल्यामुळं हे देश आज उत्तम आरोग्याकडं वाटचाल करत आहेत. भारत मात्र आता या सर्व आजारांच्या विळख्यात अडकत आहे. यातून बाहेर पडायचं असेल, तर आमच्या हिवरेबाजारच्या "शाश्‍वत विकास शाश्‍वत आनंद' या संकल्पनेवर जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे. तरच उदयाचा आरोग्यदायी भविष्यकाळ आपल्या भावी पिढ्यांना अनुभवता येईल.

Web Title: popatrao pawar write water article in saptarang