काही पुस्तकं...विचार करायला लावणारी!

‘राजा शिवछत्रपती’मुळे माझ्या मनातल्या जातीयवादाचा कोळसा झाला. आधी तो फारसा नव्हताच.
popular thought provoking books by pratap pawar
popular thought provoking books by pratap pawarsakal

‘राजा शिवछत्रपती’मुळे माझ्या मनातल्या जातीयवादाचा कोळसा झाला. आधी तो फारसा नव्हताच. घरातही सर्व जाती-धर्मांचे लोक काम करत असत. आपण जातपात वगैरे अनेक कारणांनी जगाच्या मागेपण राहिलो आणि त्या स्थितीतून काही शिकलोही नाही.

आजही राजकीय परिस्थितीमुळे हेच चित्र दिसतं. स्पर्धक चीनबद्दल आपल्याकडे चर्चाही नाही. चीन अमेरिकेच्या पुढं जाण्याच्या प्रयत्नात तर आम्ही जातीयवाद, आरक्षण मिळवण्यात गुंतलो आहोत. फक्त राजकारण.

आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात; परंतू त्यांतल्या काही आपण विसरू शकत नाही. काही गोष्टींचा आपल्यावर चांगला परिणाम होतो, तर काही आपल्या मनात राग, द्वेष निर्माण करतात. त्याचबरोबर आपल्या वाचनामुळे, चर्चांमुळे किंवा समोरच्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीमुळे आपली मतं बनतात किंवा बनवली जातात.

आता काही पुस्तकांच्या अनुषंगानं काही सातत्यानं झालेले मनावरील परिणाम याबाबत ‘माझी वाटचाल भाग-१’ मधला उल्लेख करावासा वाटतो. अकरावीची परीक्षा सुरू असताना बाबासाहेब पुरंदरे यांचं ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक हाती आलं.

परीक्षा सुरू असतानाही वाचण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. नंतर पुन्हा निवांतपणे वाचलं. भारतीयांचा स्वभाव, अभिमान, काही वेळा अनेक पिढ्यांचं वैर, भाऊबंदकी, अनेकदा प्रलोभनं यांचे परिणाम गेली एक हजार वर्षे दिसतात.

एकत्रितपणाचा अभाव, वैयक्तिक द्वेष किंवा वैर, स्वार्थ अशा अनेक गोष्टींमुळे आपण आपापसात लढलो, अगदी प्राणपणानं; परंतू फायदा झाला मुघलांना अथवा इंग्रजांना. आपल्याला ते चाललं; तथापि, चीननं जशी त्यांच्या देशात भिंत बांधली तशी आपण एकत्र बसून खैबर खिंडीत भिंत बांधली नाही.

शत्रूला सतरा वेळा माफ करून राज्य आणि जीव गमावला, यातून फारसं शिकलो नाही. माझ्या मते यामागं बरीच कारणं आहेत. हिंदू धर्मातली जाती-प्रणाली...मुघलांच्या आक्रमणाआधी असलेली सुबत्ता...काही हजार वर्षांत निर्माण झालेलं संस्कृतमधलं लिखित ज्ञान - जे मर्यादित लोकांनाच उपलब्ध होतं...

भारतीय समाज बराचसा आध्यात्मिक संस्कारांचाही असावा...जैन, बौद्ध यांसारख्या धर्मांनी शस्त्रं टाकली होती...एकंदर सगळी ही अशी परिस्थिती असताना समाज आक्रमक कसा होईल? मुघल हे सुबत्तेच्या शोधात होते,

आक्रमक होते, दऱ्या-डोंगर पार करून भारतीयांची सुबत्ता मिळवायला उत्सुक होते. प्रयत्नवादी असल्यानं दोनशे-तीनशे वर्षांत त्यांनी यशही मिळवलं. मग, छोट्या-मोठ्या राज्यांवर कब्जा करण्यासाठी त्यांना आपल्याच लोकांची मदत झाली.

उदाहरणार्थ : मानसिंह विरुद्ध राणा प्रताप. सरशी अकबराची आणि मृत्युमुखी रजपूत. याची पुनरावृत्ती देशभर झाली आणि मुघल छानपैकी स्थायिक झाले. तोच इतिहास इंग्रजांचा. मी १९९१ मध्ये वॉशिंग्टन ते लंडन या प्रवासात एक पुस्तक वाचलं. डॉ. डीन ऑर्निश यांचं.

Reversing Heart Disease या शीर्षकानं माझं लक्ष वेधून घेतलं आणि मग वाचन. थोडक्यात, जगातल्या अनेक औषधोपचारांचा त्यांनी मुळापासून अभ्यास केला होता. अगदी चिनी, युनानी, शेवटी आयुर्वेद आणि योग. या प्रणाली शेकडो वर्षं चालत आलेल्या आहेत, त्याअर्थी त्यासुद्धा उपयुक्तच असल्या पाहिजेत.

मग फक्त ॲलोपॅथीच का? या सगळ्याचा अभ्यास करून आपण आपलं मत निश्चित केलं पाहिजे असे डॉ. अर्निश यांना वाटलं. त्यांना भारतीय पद्धतीनं आकर्षित केलं आणि त्यांनी वीस-पंचवीस वर्षे त्याचा अमेरिकी लोकांवर प्रयोग केला.

प्रत्येक व्यक्तीच्या उपचारापूर्वी व नंतर असं बारकाईनं टिपण केलं. याला अमेरिकेत प्रचंड विरोध झाला; परंतू त्यांनी त्याला दाद दिली नाही आणि आपले उपचार, संशोधन सुरूच ठेवलं. त्यांनी आपल्या अनुभवांवर पुस्तक प्रसिद्ध केलं तेव्हा त्याच्या लाखो प्रती जगभर हातोहात खपल्या.

त्या पुस्तकातलं सार असं आहे की : आपलं अन्न हेच आपलं औषध आहे. योगासनं ही शरीर व मन सक्षम ठेवण्यास मदत करतात. सूर्यनमस्कार हा त्यांच्या मते जगातला सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे.

या पुस्तकाच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही; तथापि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे : ‘दिवसातल्या चोवीस तासांपैकी फक्त किमान अर्धा-पाऊण तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी द्यावा...म्हणजे योगासनं, व्यायाम करा. हे तुम्हाला ‘वेळ नाही’ या सबबीखाली करायला जमत नसेल तर तुमच्या दिवसाच्या व्यापाला काही अर्थ नाही.

त्यासाठी मनोनिग्रहच पाहिजे. मग ते निश्चितपणे शक्य होतं. हे रोजचं देणं आहे. ते न दिल्यास आयुष्यात कधी तरी तुम्हाला त्याचं सर्व एकत्र देणं द्यावंच लागतं. म्हणजे वर्ष-सहा महिने झोपून राहायला लागणं किंवा दवाखान्यात मुक्काम करणं.’

त्या दिवसापासून मी सहसा योगासनं, व्यायाम चुकवला नाही. याचा अर्थ, कधी आजारी पडलो नाही असा नव्हे; परंतू तो काळ सोडला तर आरोग्य, मनःस्थिती चांगली राहिली. आपण आपल्या वाहनाची नियमितपणे देखभाल करतो ना, तशीच शरीराचीही केली पाहिजे.

मी काही महिन्यांपूर्वी Factfulness या शीर्षकाचं पुस्तक वाचलं. आपली मतं अनेकदा, म्हणजे बहुतांशी, कुणाच्या सांगण्यावर, वाचण्यावर निर्माण होत असतात. जसं असत्य हे रेटून शंभर वेळा सांगितल्यावर त्यात काही तरी तथ्य असावं असं आपल्याला वाटू लागतं. अनेकदा पटतंही. राजकीय लोक याचा उत्तमपणे उपयोग करून घेतात.

आपल्या भावनेला ते हात घालत असतात; तथापि या पुस्तकात अनेक प्रकारे विवेचन केलं आहे की, सामान्य माणूस असो वा सुशिक्षित, तो सत्य जाणण्याचा प्रयत्न करत नाही. अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकलं की त्याला खरं वाटू लागतं.

आम्ही सर्व याचे बळी आहोत. ‘उचलली जीभ’ या माझ्या लेखाबद्दल मी अनेकदा सांगतो. इतरही पुष्कळ प्रसंग आहेत, जे आम्ही पवार कुटुंबीय या ना त्या माध्यमांतून गेली चाळीस-पन्नास वर्षे भोगतो आहोत. असं सांगण्यात विचारवंतही असतात.

विशेषतः निवडणुका जवळ आल्या की याचं पेव फुटतं किंवा फोडलं जातं. त्यात आणखी मसाला घातला जातो. (आम्हां पवार कुटुंबीयांना तर याचा वारंवार प्रत्यय येतो). हे आमच्याच बाबतीत घडतं असं नाही. अनेकांच्या बाबतीत सातत्यानं घडतं.

Factfulness हे पुस्तक या विषयावर लिहिलेलं आहे. मी ‘सकाळ’मध्ये १९८५ मध्ये धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे व तो म्हणजे, कुणी काही गौप्यस्फोट केल्यास दुसऱ्याची बाजूही आवर्जून मांडा. मग जनतेला सत्य कळेल. खूपदा असं दिसतं की, काही वार्ताहरांना कुठून तरी तुम्हाला ठोकायचं असतं. मग ‘अगं अगं म्हशी’प्रमाणे सोईस्कर लिहायचं.

अनेकदा त्यांना त्यांच्या संस्थेकडून तशा सूचनाही असतात. मग दुसरी बाजू कशी समजणार? समाजापर्यंत हा प्रयत्न, विचार कसा पोहोचणार? पुनःपुन्हा केल्या गेलेल्या आरोपाची दुसरी बाजू किंवा सत्य सांगितलं नाही तोपर्यंत समाज प्रगल्भ कसा होणार!

या पुस्तकात हेच अनेक वेगवेगळ्या प्रसंगांतून मांडलेलं आहे. समाजानं फक्त दुसरी बाजू काय आहे, हे समजून घेऊन मग आपलं मत बनवावं एवढाच प्रामाणिक संदेश आहे.

अफवांना, खोट्या भावनिक प्रचाराला आपण बळी पडू नका हे जरूर सांगावंसं वाटतं. याचा आपण सर्व मार्गदर्शक म्हणून विचार कराल अशी आशा आहे. यात मी कुणाचीही बाजू घेत नाहीये किंवा विरोधी लिहीत नाहीये,

हे आपण मान्य करावं एवढीच विनंती. समाजातले, आपापसातले गैरसमज, राग यातून दूर व्हावेत एवढीच अपेक्षा. सामान्य माणसाला प्रेरित करा. इतिहास घडेल. पटत असेल तर लागू या कामाला...प्रयत्न करू या!

(पुढच्या लेखात सद्यःस्थितीतील जगभरातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीविषयी भाष्य करणाऱ्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com