दैनंदिन जीवनात सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा

डॉ. अनुपमा साठे
मंगळवार, 19 मे 2020

परिस्थितीवर आपलं पूर्णपणे नियंत्रण नसतं, पण त्यावर आपला प्रतिसाद काय असणार हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपल्या सकारात्मक विचारांमुळे अंतरमनाला सकारात्मक वळण मिळतं व वाईटातून चांगलं बघण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यास मदत मिळते.

 भागवत पुराणातल्या अकराव्या अध्यायाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण उद्धवाला महाराज यदू व श्रीदत्तात्रेयांचा संवाद सांगतात. यात श्रीदत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंचे फार सुरेख वर्णन आहे. त्यातलाच एक भृंगी या कीटकाला ते गुरू का मानीत? श्रीदत्तात्रेय भगवान म्हणतात-
कीटः पेशस्कृतं ध्यायन्‌ कुड्यां तेन प्रवेशितः।
याति तत्सात्मतां राजन्‌ पूर्वरूपमसन्त्यजन्‌  

भृंगी नावाचा हा किडा कुठल्याही किड्याला आपल्या बिळात बंद करून टाकतो व आपल्या पंखाने भयंकर आवाज करतो. त्याच्या भयाने बिळात बंद असलेला किडा संपूर्ण वेळ भृंगीच्याच ध्यानात मग्न असल्यामुळे भृंगीचेच रूप प्राप्त करतो. दत्तात्रेय भगवान म्हणतात, त्याचप्रकारे मनुष्य भय, राग, द्वेष किंवा प्रेम, कोणत्याही भावाने आपलं मन एकाग्रचित्त करून ज्याचं ध्यान करतो त्या वस्तूला किंवा स्थितीला तो प्राप्त होतो. एकनाथ महाराज आपल्या सुरेख ओवीबद्ध निरूपणात म्हणतात-
स्नेहे द्वेषें अथवा भयें । दृढ ध्यान जेणें होय
तेणेंचि तद्रूपता लाहे। उभवूनि बाहे सांगतु  

कंस, शिशुपाल आदींनी कृष्णाचा सतत द्वेष केला. दिवस रात्र ते कृष्णाला पराभूत करण्याचेच स्वप्न बघायचे व त्याच विचारात असायचे. कृष्णाच्या हातून मृत्यू झाल्यावर त्याना परम गती प्राप्त झाली असे म्हणतात कारण वैरभावाने का होईना त्यांनी सतत श्रीकृष्णाचेच ध्यान केले.

आसीन: संविशंस्तिष्ठन्‌ भुन्जानः पर्यटन्‌ महीम्‌ ।
चिन्तयानो हृषिकेशमपश्‍यत्तन्मयं जगत  
जसे तत्वविद्‌ ब्रह्मवरिष्ठ जनांना सर्व जगत्‌ ब्रह्ममय दिसतं, तसेच कंसालाही सदा सर्वदा सर्वत्र कृष्णाचेच दर्शन व्हायचे. परिणामतः भृंगी-कीट- न्यायाप्रमाणे त्याला परम गती प्राप्त झाली.
याच स्वरूपाचे वाल्मीकी रामायणात एक सुंदर आख्यान आहे. अशोक वाटिकेत सीता रावणाच्या कैदेत असताना सतत श्रीरामचन्द्रांच्या ध्यानात मग्न असायच्या. विभीषण पत्नी सरमाजवळ एकदा त्या म्हणतात, "सरमा, मी सतत प्रभूंच्या विचारात असते. भृंगी कीट न्यायाप्रमाणे जर मी रामस्वरूप झाले तर कसं होईल?' यावर विभीषण पत्नी उत्तर देतात, "देवी, प्रभू पण सतत तुमच्या विचारात मग्न असतील. तुम्ही राम स्वरूप झाल्या तर ते सीता स्वरूप होतील!'

आपण लहान मुलांना गंमत म्हणून घाबरवत असतो-अमुक ठिकाणी जाऊ नको, तिकडे भूत आहे. किंवा अंधारात प्रेत किंवा पिशाच्च येतात. असल्या भयप्रद गोष्टी त्यांच्या मनावर इतक्‍या पक्‍क्‍या बसतात की त्यांना खरंच भूत-प्रेत दिसायला लागतात. झाडं, हलण्याऱ्या फांद्या, सावल्या, सगळीकडे त्यांना भूत दिसतात. कधी कधी त्यांचा व्यवहारावर ही इतका परिणाम होतो की असं वाटत त्यांच्यावर कुणी आत्मा किंवा पिशाच्चाचा प्रभाव झाला आहे.

प्रसूतीसाठी नाव नोंदवायला आलेली होणारी माता, तिचा पती व घरचे लोक प्रत्येक वेळेला एक प्रश्न अवश्‍य विचारतात. "सिझेरियन तर नाही करावं लागणार ना ?' प्रसूतीसाठी दाखल होताना व प्रसूती होत पर्यंत एखाद्या स्त्रीच्या मनात एकच विचार सतत असतो, "ऑपरेशनची गरज नाही पडली पाहिजे.' याबाबतीत माझं एक निरीक्षण आहे नेमक्‍या याच पेशंटला ऑपरेशनची गरज पडते. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना पण आपण सर्वांना असाच काहीसा अनुभव येतो. एखादा विषय वाचलेला नसतो म्हणून आपल्याला येत नाही. आपण प्रश्नप्रत्रिका हाती पडेपर्यंत प्रार्थना करत असतो या विषयाचा हा प्रश्न यायला नको. नेमका तोच प्रश्न पेपरमध्ये असतो.

"मला आजारी पडायचं नाही, मला दवाखाना, इंजेक्‍शन सलाईन या सर्वांची खूप भीती वाटते.' असं म्हणणाऱ्या लोकांच्या डोळ्यासमोर सतत हॉस्पिटल व डॉक्‍टरचेच चित्र असते. याचा नकारात्मक परिणाम होऊन त्यांची तब्येत अवश्‍य बिघडते आणि दवाखान्यात जावं लागतं. किंवा कुठल्या छोट्या कारणामुळेही जावं लागलं तर ही मंडळी इतकी घाबरलेली असतात की अनावश्‍यक भीतीमुळेच आजारात भर पडते किंवा उपचारात व्यत्यय येतो.

मुळात हे सगळे मनाचे खेळ असतात. मनाला जशा सूचना मिळाल्या तशी त्याची प्रवृत्ती होते. म्हणून मानसिक उपचारांमध्ये सकारात्मक सूचनांचा समावेश असतो. सकारात्मक सूचनांमुळे मनाची शक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो व प्रतिकूल परिस्थितींवर मात देण्याची क्षमता निर्माण होते. परिस्थितीवर आपलं पूर्णपणे नियंत्रण नसतं, पण त्यावर आपला प्रतिसाद काय असणार हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपल्या सकारात्मक विचारांमुळे अंतरमनाला सकारात्मक वळण मिळतं व वाईटातून चांगलं बघण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यास मदत मिळते. नेहमी सकारात्मक विचार ठेवणारे लोक व्यक्तिगत व सामाजिक जीवनात सुखी होतात. आपल्या व्यवसायात व कारकिर्दीत उंचीवर पोहोचणाऱ्या लोकांच्या विचारसरणीचा अभ्यास केला तर लक्षात येईल की त्यांनी सतत सकारात्मक दृष्टिकोन बाळगला व नकारात्मक अनुभवांना शिकण्याची पायरी करून उंची गाठायचा प्रयत्न केला. या उलट सतत नकारात्मक विचार करणाऱ्यांना चांगल्यात पण खोड काढायची सवय असते. कुठलीच गोष्ट यांच्या मनासारखी होत नसते व आपल्या अपयशाचं खापर हे परिस्थितीवर वा सभोवतालच्या लोकांवर फोडताना दिसतात.

म्हणून दैनंदिन जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं फार आवश्‍यक आहे. "आज देव जाणे नशिबात काय वाढून ठेवलं आहे' म्हणण्यापेक्षा "आजचा दिवस फार उत्तम जाणार आहे', असं म्हणून बघायचं. मला आजारी पडायचं नाही या वाक्‍याऐवजी मी स्वस्थ राहणार आहे, असं म्हणायचं. नकारात्मक विचारांना दूर लोटायचं आणि आपल्या आयुष्यात काय चांगलं घडतंय या विचारांना प्राधान्य द्यायचं. आपल्या दिनचर्येत रोज थोडा वेळ काढून जर ध्यान अर्थात मेडिटेशनमध्ये मन एकाग्र केलं आणि सकारात्मक विचांरावर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच लाभ होतो. ही काही जादू नाही की लगेच निकाल लागेल आणि सगळ चित्रं पालटून जाईल. परंतु, सकारात्मकतेची सवय लागली की हळूहळू परिवर्तन अवश्‍य होतं. भृंगी सारखं नकारात्मकतेला कैद करून त्यावर सकारात्मक विचारांचा मारा केला की तेही सकारात्मकतेत बदलतात. इच्छाशक्ती वाढली की निसर्ग पण अनुकूल कौल देतो. जी व्यक्ती सकारात्मकतेने पुढे जाते, तिच्या मागून आनंद, यश व प्रतिष्ठा आपसूकच येते.
"ओम शांति ओम' या अलीकडच्या प्रसिद्ध चित्रपटात शाहरुख खानच्या तोंडी वाक्‍य आहे नं, "अगर किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है.' हा फक्त सिनेमातला संवाद नाही तर सत्यच आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive attitude is very important in life