चित्रकलेतली बनवेगिरी (प्रभाकर वाईरकर)

prabhakar wairkar
prabhakar wairkar

इतर सृजनशील क्षेत्रांप्रमाणेच चित्रकलेच्या क्षेत्रातही बनवेगिरीचं प्रमाण आता वाढू लागलं आहे. या वाढत्या प्रकारांमुळे चित्रकलाक्षेत्रावर व त्यासंबंधीच्या बाजारपेठेवर वाईट परिणाम झाला आहे. बनवेगिरीचा असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला, त्यानिमित्त...

"ज्यांना कोणत्याही प्रकारची नक्कल (Imitation) करावीशी वाटत नाही, ते कोणतीही निर्मिती करू शकत नाही,' हे वचन आहे जगप्रसिद्ध चित्रकार साल्वादोर दाली यांचं!
जन्माला आल्यापासून प्रत्येक मनुष्यप्राण्यानं नक्कल केली नसती तर त्याला चालणं, बोलणं, खाणं-पिणं, इतर चांगल्या-वाईट गोष्टी करता आल्याच नसत्या. म्हणजेच नक्कल करणं/कॉपी करणं हे निसर्गतःच मनुष्याला मिळालेलं "वरदान' आहे! मात्र, ज्या वेळी एखादा कलाकार अथक परिश्रम करून एखादी स्वनिर्मिती करतो व दुसराच कुणीतरी त्या निर्मितीची नक्कल वा कॉपी करून "ही निर्मिती मूळची माझीच आहे,' असं छातीठोकपणे सांगून टाकतो, त्या वेळी बनवेगिरीचा (Art Forgery) जन्म होतो!
इतर सृजनशील क्षेत्रांप्रमाणेच चित्रकलेच्या क्षेत्रातही बनवेगिरीचं प्रमाण आता वाढू लागलं आहे.

अलीकडंच मुंबईतल्या एका इंग्लिश दैनिकानं यासंदर्भात एक वृत्तान्त प्रसिद्ध केली होता. दिल्लीस्थित Osian's Connoisseurs of Art Private Limited या लिलावकेंद्रानं आपल्या आगामी चित्रांच्या लिलावासाठी एक पुस्तिका (कॅटलॉग) प्रसिद्ध केली, ती पाहून कलातज्ज्ञ, कला-इतिहासकार, समीक्षक, चित्रकारांचे नातेवाईक-मित्र, कलारसिक यांच्यात एकच खळबळ उडाली. कारण, त्या पुस्तिकेत जी चित्रे छापली होती त्यापैकी अनेक चित्रं बनावट असल्याचं व ती हास्यास्पद पद्धतीनं चितारलेली असल्याचं या सगळ्यांना जाणवलं. त्यानुसार, इंटरनेट, फोन यांद्वारे त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.

त्यावर "ओसियन्स'चे सर्वेसर्वा नेरिल तुली यांनी "ती सर्व पेंटिग्ज त्या त्या चित्रकारांनीच तयार केली असून त्यासंबंधीचे पुरावे, सत्यता-प्रमाणपत्रे आमच्याकडं आहेत,' असं सांगून सर्व आरोप फेटाळून लावले. त्या पुस्तिकेमध्ये एफ. एन. सूझा यांचं "टायटन्स ग्रॅंडफादर', भूपेन खक्कर यांचं "शॅडो ऑफ डेथ', जहॉंगीर साबावाला यांची "इकॅरस' मालिकेतली चित्रे, अकबर पदमसी यांची "प्रॉफेट' मालिकेतली चित्रे अशा अनेक मातब्बर चित्रकारांच्या चित्रकृतींचा समावेश होता. चित्रकलेच्या क्षेत्रातल्या या बनवेगिरीच्या जरा खोलात जावं असं मला तो वृत्तान्त वाचून वाटलं. त्यानुसार मी माझ्या परीनं शोध घेतला.

सभोवतालच्या समाजात अनेक कलाकारांनी उपजत गुणांच्या जोरावर यशाची शिखरं पार केलेली असतात. मात्र, समाजातल्या काही मंडळींना अशा कलाकारांचं यश, त्यांना मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा, पैसा या बाबी पाहवत नाहीत. एक प्रकारची असूया त्या यशस्वी कलाकारांबद्दल या मंडळींमध्ये निर्माण होते. त्याचीच परिणती म्हणून ही मंडळी हमरस्त्यानं न जाता वाकड्या वाटेनं प्रवास करायला प्रवृत्त होतात.

जे मूळ चित्रावरून बनावट चित्रे तयार करतात तेही खरंतर ताकदीचेच चित्रकार असतात. संशोधनवृत्ती, रंगसंगतीची जाण, रचना, कल्पना, शैली यांचं ज्ञान त्यांनाही असतंच; परंतु स्वतःच्या कलेच्या आणखी खोलात जाऊन, तिच्या सगळ्या शक्‍यता अजमावून पाहून आपल्या सृजनशीलतेचा आविष्कार जगासमोर मांडण्याचं कौशल्य, धडाडी अशा मंडळींकडं असतेच असं नाही. त्यामुळे "क्रीएटर' म्हणून ते आपलं स्थान निर्माण करू शकत नाहीत. मात्र, पैशाची लालसाही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग अनेक क्‍लृप्त्या लढवून ते पैसा मिळवण्याचा "सोपा' मार्ग निवडतात. अशा वृत्तीतूनच कलाक्षेत्रातली बनवेगिरी जन्माला येते.
***

विसाव्या शतकातलं पहिलं बनावट पेंटिंग करणाऱ्याचं नाव होतं हान वॅन मिगेरेन (1889 ते 1947). हा डच चित्रकार होता. यानं सन 1837 मध्ये "येशू आणि त्यांचे सहकारी' असं मूळ चित्रावरून एक बनावट चित्रं तयार केलं. हे चित्र मूळचं आपलंच आहे हे त्याला समाजाला पटवून द्यायचं होतं. तेव्हा, आपण ख्रिश्‍चन धर्माचे पाईक आहोत, असं तो समाजाला भासवू लागला. चित्रकलेचा त्या काळचा प्रसिद्ध टीकाकार अब्राहम ब्रेडिअस त्याच्या जाळ्यात फसला. वर ज्या चित्राचा उल्लेख केला आहे, ते चित्र मूळचं मिगेरेनचंच आहे, असं सत्यता-प्रमाणपत्रच ब्रेडिअसनं त्याला बहाल करून टाकलं!

वस्तुस्थिती अशी होती की सतराव्या शतकातला गाजलेला चित्रकार जॉन वारमेर याच्या चित्रांची हुबेहूब नक्कल मिगेरेन करायचा. मिगेरेनची नक्कलचित्रं पाहून भल्या भल्या चित्रकारांचीही फसगत व्हायची. ही नक्कलचित्रंच आपला सांस्कृतिक ठेवा आहे, असं डच नागरिकांना वाटायचं. त्या काळी नाझींना चित्र विकणं हे सोपं काम नव्हतं. मात्र, "वारमेरचं आहे' असं भासवून मिगेरेननं एक नक्कलचित्र जर्मनीतला त्या वेळचा दुसऱ्या क्रमांकाचा नाझी नेता हरमन गोअरिंग याला विकण्याची किमया करून दाखवली होती! ते चित्र म्हणजे तर डचांची सांस्कृतिक ठेव व ती जर्मनांना विकली म्हणून डच नागरिकांनी मिगेरेनवर खटला भरला व त्याला एका वर्षाचा कारावास झाला. अखेर, कारावासात असतानाच हृदयविकाराच्या झटक्‍यानं तो निधन पावला.
चित्रे फार जुनाट वाटण्यासाठी मिगेरेन अनेक क्‍लृप्त्या करायचा. सतराव्या शतकातले जुने कॅनव्हास तो शोधून काढायचा. त्या काळातले कलाकार जे रंग वापरायचे ते रंग तो स्वतः तयार करायचा. ते कलाकार ज्या प्रकारचे ब्रश वापरत असत तसेच ब्रश तयार करून मिगेरेन ही चित्रे रेखाटायचा. चित्र खरंखुरं आहे की नाही हे तपासण्यासाठी चित्रविक्रेते पूर्वी चित्रावर दारूनं घासकाम करायचे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ही पद्धत अवलंबली जात असे. त्यामुळे त्या चित्रावरचे रंग ओले व्हायचे. त्या रंगांत टाचणी टोचली तर ती आतमध्ये सहज जायची. हे टाळण्यासाठी व जुनाट चित्रांचे रंग कडक झालेले असतात हे सिद्ध करण्यासाठी मिगेरेन रंगामध्ये बॅकेलाईट प्लास्टिक मिसळायचा, म्हणजे रंगांमध्ये कुणी टाचणी घुसवण्याचा प्रयत्न केला तरी ती टाचणी त्या रंगांमध्ये घुसायची नाही, एवढे ते रंग कडक व्हायचे. जुनं चित्र जे असतं त्यावर बारीक बारीक भेगा पडलेल्या असतात. तशा भेगा आपल्या चित्रांवर पाडण्यासाठी 100 सेंटिग्रेड तापमान असलेल्या भट्टीत ती तो भाजायचा (बेक) व नंतर ते चित्र रोलरवर गुंडाळून चित्रावर भेगा निर्माण करायचा. त्या भेगा अधिक दृश्‍यमान होण्यासाठी त्यांच्यावर इंडियन इंक लावून त्या तो अधिक ठळक करायचा.
***

सन 1970 च्या पूर्वी भारतीय चित्रांना बाजारपेठ नव्हती. असली तर अगदीच किरकोळ असे. चित्रकार हौस म्हणूनच चित्रे काढायचे. त्यामुळे कोणताही मोबदला न घेता आपल्या खास व्यक्तींना ते चित्रे भेट म्हणून द्यायचे.
कधी लग्नाच्या रुखवतात, कधी वाढदिवसानिमित्त वा कधी घरी आलेल्या पाहुण्यांना ही चित्रे भेट दिली जायची. मात्र, "चित्रे हीसुद्धा विक्रीची वस्तू आहे व त्याद्वारे संपत्ती निर्माण होऊ शकते' ही जाणीव सन 1970 च्या दशकात चित्रकारांना होऊ लागली. चित्रांना भविष्यात जास्त किंमत येऊ शकते, हे ध्यानात आलेल्या "दूरदृष्टी'च्या धनिकांनी चित्रांमध्ये पैसा ओतायला सुरवात केली. भारतीय चित्रे अचानकच विक्रीचा उच्चांक गाठू लागली.

लेखाच्या सुरवातीलाच म्हटल्यानुसार, काही असंतुष्ट आत्मे या क्षेत्रातही वावरू लागले होतेच. पैशाच्या हव्यासापायी ते यशस्वी कलाकारांच्या चित्रकृतींच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करू लागले. मात्र, बनवेगिरी करणाऱ्या युरोपतल्या चित्रकारांप्रमाणे इथली मंडळी चित्रकलेत वा तंत्रात तेवढी पारंगत नव्हती. प्रसिद्ध चित्रकार जेमिनी रॉय यांचं चित्र कुण्या चित्रकारानं सन 1970 मध्ये तयार केलं. मात्र, ते बनावट असल्याचं संशोधनाअंती सिद्ध झालं. हे चित्र ज्या गॅलरीत प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलं होतं, त्या गॅलरीतली अनेक चित्रे बनावट असल्याचं पुढं निष्पन्न झालं. चित्रांच्या बनवेगिरीचा हा क्रम पुढंही सुरूच राहिला. सन 2009 मध्ये एस. एच. रझा यांच्या चित्रांचं प्रदर्शन दिल्लीतल्या धूमिल आर्ट गॅलरीत भरवण्यात आलं होतं. स्वतः रझा पॅरिसहून या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनासाठी आलेले होते. त्यांनी जेव्हा हे प्रदर्शन पाहिलं तेव्हा त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. कारण, प्रदर्शनातली बहुतेक चित्रे बनावट होती. ते संपूर्ण प्रदर्शनच नंतर रद्द करण्यात आलं!
सन 2011 मध्ये कोलकत्यात रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्या वेळीही असाच प्रकार घडला होता. त्यातली 20 चित्रं बनावट असल्याचं आढळून आलं होतं. एस. एच. रझा, एम. एफ. हुसेन, एफ. एन. सूझा अशासारख्या चित्रकारांच्या चित्रांवरून काढलेली बनावट चित्रे "मूळ चित्रे' म्हणून विकण्याचे प्रकार जगभरात आजही घडतात.
***

यान वॉल्थर हे स्वित्झर्लंडमधल्या "एसजीएस आर्ट सर्व्हिसेस'चे कार्यकारी संचालक आहेत. चित्रांची सत्यासत्यता तपासणारी आणि त्यावर संशोधन करून त्यासंबंधीचे दस्तावेज तयार करणारी ही जगातली एकमेव खासगी संस्था आहे. वॉल्थर यांच्या मते, जगात विक्रीला असलेल्या चित्रांपैकी 50 टक्के चित्रे बनावट आहेत!
आपल्याकडंही जुन्या चित्रांच्या प्रतिकृती (बनावट) तयार करण्यासाठी जुने कॅनव्हास घेऊन त्यांच्यावर कॉफी किंवा चहा लावून वॉर्निशिंग केलं जातं. त्यानंतर गरम भट्टीत ठेवून कॅनव्हास भाजले (बेक) जातात. चित्र जुनाट वाटण्यास त्यामुळं मदत होते. शिवाय, मूळ चित्रकारांच्या रंगसंगतीची व ब्रशच्या फटकाऱ्यांची नक्कल करून चित्र तयार केलं जातं. त्यावर बर्न्ट अंबर रंगाचा पातळ थर लावून जुन्या चित्राचा परिणाम साधला जातो आणि "हेच मूळ चित्र आहे' असं बघणाऱ्यावर बिंबवलं जातं!

यशस्वी चित्रकारांच्या चित्रांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याचे "कारखाने' चीनमध्ये अनेक ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं. मूळ चित्र जसं आहे अगदी तसंच चित्र तयार करून देण्याचं काम तिथं चालतं. हे चित्र एवढं हुबेहूब केलं जातं की मूळ चित्र ओळखणं केवळ अशक्‍य होऊन जावं! अशा प्रकारे बनवेगिरीचे अनेक प्रकार अनेक चित्रकार वापरतात.

काही जण रचना, रंगसंगती, विषय तसाच ठेवून कोणताही बदल न करता मूळ चित्रांप्रमाणे चित्र तयार करतात, तर काही चित्रकार चित्रात किंचितसा बदल करून त्यावर मूळ चित्रकाराच्या सहीसारखी सही ठोकून देतात! मात्र, बनावट चित्रे काढणारा एक असा चित्रकार जगात आहे, जो मूळ चित्रकाराच्या चित्राची हुबेहूब प्रतिकृती तयार न करता त्याच्या शैलीचा, रंगसंगतीचा वापर करून स्वतःचा विषय घेऊन चित्रे चितारतो व त्यांवर मूळ चित्रकाराची सही जशीच्या तशी ठोकतो! त्यानं कधीही मूळ चित्रकाराच्या चित्रांचा विषय जसाच्या तसा वापरलेला नाही. तरीही त्यानं तयार केलेलं चित्र हे मूळ चित्रकाराचंच वाटतं! जगातल्या सुमारे 50 चित्रकारांच्या शैलीतली बनावट चित्रं तो लीलया काढतो आणि "हे चित्र बनावट आहे' असा शिक्का कोणताही परीक्षक/समीक्षक त्या चित्रावर मारू शकत नाही! "किंग ऑफ फोर्जर' अशी पदवीच त्याला मिळालेली आहे! अशी बनावट चित्रे काढणाऱ्या चित्रकाराचं नाव आहे वूल्फगॅंग बेलस्ट्रास्सी. याचा जन्म सन 1951 चा. हा मूळ जर्मनीचा; पण त्याचं "कार्यक्षेत्र' आहे पॅरिस! आता सत्तरीच्या घरात असलेल्या बेलस्ट्रास्सीनं बनावट चित्रनिर्मितीसाठी अनेकानेक क्‍लृप्त्या वापरल्या. सन 1910 ते 1920 या कालावधीतल्या फ्रेंच वा जर्मन आर्ट गॅलऱ्यांमधल्या चित्रांची पुस्तिका (कॅटलॉग) पाहून त्यातली जी चित्रं आता अस्तित्वात नाहीत, मात्र जी केवळं "नाम'धारी (म्हणजे ज्यांचं अस्तित्व शीर्षकापुरतंच उरलं आहे) आहेत अशी चित्रे तो हेरायचा आणि त्या त्या चित्रकाराच्या शैलीनुसार ती चित्रे काढायचा व मूळ चित्रकाराची हुबेहूब सही करून ती चित्रे "मूळची चित्रे' असल्याचं भासवून विकायचा. अशा बनावेगिरीतून त्यानं अपार माया कमावली. यात त्याला त्याच्या पत्नीचीही साथ असे. ही बनावट चित्रे विकण्याचं काम तिच्याकडं असायचं. स्वतः बेलस्ट्रास्सीनं एकही चित्र कधी विकलं नाही.

बेलस्ट्रास्सीच्याच बनवेगिराचा आणखी एक प्रकार म्हणजे, जुन्या काळातल्या चित्रकारांच्या शैलीवरून बनावट चित्रे तयार करून झाल्यावर तो एक कृत्रिम भिंत तयार करत असे. त्या भिंतीवर जुन्या काळची रंगसंगती वा डिझाईन तो तयार करायचा. या कृत्रिम भिंतीवर बनावट चित्रे टांगली जायची. तो विशिष्ट कालखंड अधिक प्रभावीपणे दर्शवण्यासाठी तो त्या काळातल्यासारखी टेबल-खुर्ची त्या कृत्रिम भिंतीलगत मांडून एका वृद्ध स्त्रीला विशिष्ट पोज देऊन त्या टेबलसमोर बसवायचा. तिची वेशभूषा, मेकअप वगैरे त्या जुन्या काळाला साजेसंच असे. ती स्त्री म्हणजे दुसरी-तिसरी कुणी नसून त्याची बायकोच असायची. अशा "नाट्यमय'रीत्या त्या काळातल्या जुन्या फोटोंसारखे फोटो तो तयार करत असे. विशिष्ट कालखंडाचं चित्रण त्या फोटोंमध्ये प्रकटत असल्यामुळे जी चित्रे त्या फोटोत दिसायची ती चित्रे त्याच कालखंडातल्या चित्रकारांची आहेत, हे खरेदीदारावर बिंबवण्यात तो यशस्वी होई. अशा प्रकारे, "बनावट चित्र हेच मूळ चित्रं आहे,' असं "खात्रीशीरपणे भासवून' हजारो डॉलर्सची कमाई तो करत असे.

बनावट चित्रकार (आर्ट फोर्जर) व्हायचं असा चंगच जणू बेलट्रास्सीनं बांधला असावा! ज्या मूळ चित्रकारांच्या शैलीवरून तो बनावट चित्र काढायचं, त्या काळच्या कॅनव्हास फ्रेम्स मिळवण्यासाठी तो अनेक देशांत फिरला. आपण अभ्यासू व संशोधक वृत्तीचे आहोत, हेही त्यानं अनेक वेळा सिद्ध केलं आहे! उदाहरणार्थ ः फार जुनाट जी चित्रं असतात त्यांचा कॅनव्हास आणि तो कॅनव्हास ज्या फ्रेमवर (स्ट्रेचर) लावलेला असतो या दोन्हींच्या मध्ये जी फट वा खाच असते तीत धुरळा साचून धूळ तयार होते. ही धूळ जेवढी जास्त तेवढं चित्र जुनं, या "तत्त्वा'चा तो नेमका फायदा उचलत असे. त्या विशिष्ट चित्रकाराच्या शैलीतली चित्रं तो स्वतः तयार करायचा व त्या चित्रांवरच्या इतर सोपस्कारांनंतरही ते चित्र जुनाट वाटण्यासाठी वर उल्लेखिलेली धूळही तो स्वतःच तयार करायचा आणि त्या चित्राच्या खाचेमध्ये ती धूळ पेरायचा-पसरायचा! प्रत्येक जुनाट पेंटिंगच्या वासावरून ते चित्र कोणत्या देशातले आहे हे तो अचूक ओळखतो. त्याच्या मते, जुन्या चित्रांना त्या त्या देशाच्या मातीचा वास असतो! बनवेगिरी करताना हेही तत्त्व त्याला "फायद्या'चं ठरलं!

बेलास्ट्रास्सीनं पिकासो, मोने, मॅक्‍स अर्न्स्ट, गोगॅं, हेन्री कॅम्पेनडॉन्क यांसारख्या दिग्गजांच्या मूळ चित्रांची बनावट चित्रं तयार करून ती हजारो डॉलर्सना जगभरात विकली. कॅम्पेनडॉन्क याच्या "लॅंडस्केप वुइथ हॉर्स' (1915) या चित्रावरून त्यानं "रेड पेंटिंग वुइथ हॉर्स" हे चित्र तयार केलं आणि अमेरिकी अभिनेता स्टीव्ह मार्टिन याला अवाच्या सवा किमतीला विकलं. तेच पेंटिंग 2005 मध्ये "क्रिस्तीज्‌' या लिलावकेंद्रानं बऱ्याच मोठ्या किमतीला विकलं. कधी कधी त्याची अशी बनावट चित्रे मूळ चित्रांपेक्षाही कित्येक पटींनी जास्त किमतीला विकली गेली. अंदाजे 40 वर्षांच्या कालावधीत त्याची शेकडो बनावट चित्रे ही "मूळ चित्रे' समजून जगप्रसिद्ध "मोमा म्युझियम', "सॉथबाईज' व "क्रिस्ती' यांसारखा लिलावकेंद्रांनी लाखो डॉलर्सना विकली. मात्र, केव्हा ना केव्हा चोरी उघडकीला येतेच. कॅम्पेनडॉन्क या चित्रकाराचं चित्र (1914) त्यानं नेहमीप्रमाणे तयार केलं व मोठ्या किमतीला विकलंही; परंतु त्यानं त्या चित्रात टिटॅनिअम व्हाईट हा रंग वापरला होता आणि हा रंग सन 1914 मध्ये अस्तित्वातच नव्हता, असं संशोधनाअंती आढळून आलं. याच चुकीमुळे तो पकडला गेला व त्याला सहा वर्षांचा व त्याच्या पत्नीला चार वर्षांचा कारावास झाला. आता तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र, आता तो जी चित्रे तयार करतो, त्यांवर त्याला आता स्वतःची सहीसुद्धा करावी लागते. तसं करण्याचा त्याला न्यायालयाचा आदेश आहे.
तर असे हे बनावट चित्रकलेच्या गुहेतले एक से एक किस्से!
***

बनावट चित्रकलेच्या वाढत्या प्रकारांमुळे चित्रकलाक्षेत्रावर व त्यासंबंधीच्या बाजारपेठेवर वाईट परिणाम झाला आहे. अशा स्थितीमुळे
सर्वसामान्य ग्राहक चित्रे खरेदी करण्यापूर्वी बारीक विचार करणारच. कारण, त्याचा या बाजारपेठेवरचा विश्‍वास उडत चालला आहे.
यासंदर्भात मुंबईच्या "पिरॅमल म्युझियम ऑफ आर्ट"चे संचालक अश्‍विन राजगोपालन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले : ""बनावट चित्रांची महागडी बाजारपेठ तयार झाली आहे. मूळ चित्रांपेक्षा ही चित्रं अतिशय स्वस्तात मिळतात; त्यामुळे त्यांना मागणीही खूप असते. ज्यांना चित्रकलेसंदर्भात काहीही माहीत नसतं असेच लोक ही बनावट चित्रे खरेदी करतात. कधी कधी असंही घडतं की मूळ चित्रकाराच्या चित्रापेक्षाही बनावट चित्र दुप्पट किमतीला विकलं जातं! कारण, खरेदीदाराचं चित्रकलेसंबंधींचं अज्ञान.''

""एखाद्या विशिष्ट चित्रकाराचं चित्र खरेदी करायचं असल्यास त्या चित्रकाराचा इतिहास, त्याच्या चित्रांविषयीची, त्याच्या शैलीविषयीची बारीकसारीक माहिती असणाऱ्या तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊनच चित्रे खरेदी केल्यास फसवणूक होणार नाही,'' असा उपाय सुचवून राजगोपालन म्हणाले :""संबंधित चित्रांविषयीची सर्वांगीण माहिती ज्या गॅलरीला आहे, त्या गॅलरीमधूनच चित्रे खरेदी केली पाहिजेत. उदाहरणार्थ : "पंडोल आर्ट गॅलरी' ही त्या त्या चित्रांचा बिनचूक इतिहास/माहिती नोंदवून ठेवते. त्यामुळे कुणाचीही फसवणूक होण्याचा 99 टक्के तरी प्रसंग येत नाही. गॅलरीमध्ये जी चित्रे प्रदर्शित केली जातात, त्यांच्याबद्दलचा सर्वांगीण तपशील, सर्वांगीण माहिती त्या प्रदर्शनाच्या क्‍युरेटरला असणं आवश्‍यक आहे; जेणेकरून खरेदीदाराची टळेल.
एस. एच. रझा यांच्या चित्रांची संपूर्ण नोंद जशी करून ठेवण्यात आली आहे, तशीच इतरांनीही आपल्या चित्रांची नोंद करून ठेवली तर सत्यता-प्रमाणपत्राची सत्यता अबाधित राहील.'' (सध्या पैशाच्या लालसेपायी बनावट
सत्यता-प्रमाणपत्रंही सहज उपलब्ध होतात!)

गेल्या वर्षी मुंबईच्या मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये राजा रविवर्मा यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. त्यातली दोन-तीन चित्रे मला बनावट वाटली होती. ही बाब मी राजगोपालन यांना सांगताच ते म्हणाले : ""रविवर्मा यांच्या चित्रांच्या नोंदी कुणाकडंच उपलब्ध नसल्यानं असे प्रकार होणारच. अशा वेळी सत्यता-प्रमाणपत्राला काहीच मोल राहत नाही! अशी बनावट चित्रे तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आपल्याकडं कडक कायदे नाहीत. फक्त फसवणुकीचा खटला दाखल केला जाऊ शकतो. सरकारनं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन काही कडक कायदे केले तरच बनवेगिरीला आळा बसेल.''

लोअर परळमधल्या "पिरॅमल आर्ट म्युझियम'नं अलीकडंच एक चित्रप्रदर्शन भरवलं होतं. त्यात मूळ चित्रे व त्याच चित्राची बनावट चित्रे शेजारी शेजारी ठेवण्यात आली होती. त्यामुळे मूळ चित्र व बनावट चित्र यातला फरक व्यासंगी चित्ररसिक अजमावून पाहू शकतो. चित्रे कशी पाहावीत याची दृष्टी अशा प्रदर्शनांमुळे चित्ररसिकांमध्ये निर्माण होते व त्यातलं मर्म शोधण्याचीही सवय लागते. ज्यांना चित्रखरेदीची आवड आहे अशांनी नेहमीच वेगवेगळ्या गॅलऱ्यांमध्ये जाऊन तिथल्या चित्रांची शैली, चित्रकाराची रंगलेपनाची पद्धत, विषय, कल्पना यांचा अभ्यास करायला हवा. त्यामुळे कोणता चित्रकार कोणत्या प्रकारचं काम करतो याचं ज्ञान होतं व भविष्यात त्या चित्रकाराचं चित्र खरेदी करताना या गोष्टी उपयोगी पडतात. संभाव्य फसगत टळू शकते. अशी अनेकानेक चित्रप्रदर्शनं पाहण्याचा फायदा असा होतो, की बनावट चित्रांचे साठेबाज जेव्हा "बनावट चित्रे हीच मूळ चित्रे आहेत' असं भासवून सार्वजनिक ठिकाणी ही चित्रे विक्रीसाठी ठेवतात त्या वेळी ही चित्रे बनावट असल्याचं आपण ओळखू शकतो व प्रदर्शनकर्त्यांनी केलेली फसवेगिरी उघडकीस आणू शकतो.

सध्याच्या इंटरनेटच्या युगात संगणकावरून एखाद्या चित्रकाराचे ब्रशचे स्ट्रोक्‍स सहज कॉपी करून चित्र तयार केलं जाऊ शकतं. अनेक प्रसिद्ध चित्रकारांना या गैरप्रकाराचा फटका बसलेला आहे.
अनेक मातब्बर चित्रकारांची मूळ चित्रे त्यांच्या स्टुडिओत पडून असून या मूळ चित्रांवरून तयार केलेल्या बनावट चित्रांच्या विक्रीतून बनवेगिरी करणाऱ्या "चित्रकारां'नी लाखोंची कमाई केलेली आहे.
इन्फ्रारेडचा वापर करून वा संशोधन करून बनावट चित्रे ओळखू येतात; परंतु त्यासाठी दिवंगत चित्रकारांच्या नातेवाइकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. पैशाचा लोभ बाजूला ठेवून चित्राची योग्य तपासणी करणं आवश्‍यक आहे. असं झाल्यास चित्र विकत घेणारा व मूळ चित्रकार अशा दोघांचंही यात हित आहे.
चित्रकलेच्या क्षेत्रात बनवेगिरी करणारा अमेरिकी चित्रकार (1935-1999) डेव्हिड स्टेन वा जर्मन चित्रकार वूल्फगॅंग बेलस्ट्रास्सी यांच्यासारखी मंडळी आपल्याकडं निर्माण झाली नाहीत, ही समाधानाची बाब. बनवेगिरी करणाऱ्या या चित्रकारांवर चित्रपटही निघाले आहेत. डेव्हिड स्टेनवर "द मॉडर्न्स' आणि बेलस्ट्रास्सीवर "द आर्ट ऑफ फोर्जरी'!

...तर बनवेगिरीच्या या गुहेत फिरता फिरता अचानक एका बनावट चित्रापाशी रेंगाळलो आणि मनात विचार तरळून गेला : पैशाची लालसा जोपर्यंत माणसाच्या मनाला गोचिडासारखी चिकटून बसलेली आहे तोपर्यंत कितीही संशोधन केलं तरी, कडक कायदे केले तरी आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या चित्रांची काळजी घेतली तरीही जगात अनेक "बेलस्ट्रास्सी' निर्माण होत राहतील...त्यांचे हात कायमचे बांधून ठेवता येतील का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com