मोठ्या कानांचा लाडका उंदीर!

सांताक्लॉजपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या जागतिक ओळख असणारे पात्र म्हणजे मिकी माऊस. ‘द मिकी माऊस क्लब’चे जगभरात असंख्य चाहते आहेत.
mickey mouse
mickey mousesakal

सांताक्लॉजपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या जागतिक ओळख असणारे पात्र म्हणजे मिकी माऊस. ‘द मिकी माऊस क्लब’चे जगभरात असंख्य चाहते आहेत. जगाचा लाडका असलेला मिकी आता सर्वांचा झाला आहे. आता त्याचा वापर विनामूल्य कुठेही आणि कोणत्याही कारणासाठी करता येऊ शकणार आहे.

अनेक वर्षे तपस्या करून देव भेटत नाही आणि अचानक एके दिवशी तो आपल्या घरी येऊन पाणी भरू लागला तर? नाताळच्या दिवशी खरोखरीच्या सांताक्लॉजने येऊन खऱ्याखुऱ्या असंख्य भेटवस्तूंचा वर्षाव आपल्यावर केला तर? अचानक कोणीतरी आपल्या ओंजळीत रत्नजडित हिऱ्या-मानकांचा नजराणा भेट दिला तर?

कला, सृजनशीलता व तंत्रज्ञानाच्या जोरावर जगात अनेक पात्रे चित्रित व त्रिमितीमध्ये तयार करण्यात आली. त्यातील काही अजरामर झाली, तर काही काळाच्या कुशीत लुप्त झाली. अमेरिका स्थित ‘डिस्ने’ने १९२८ मध्ये ‘स्टीमबोट विली’ लघुपटाद्वारे दोन पात्रे जन्मास घातली. मिकी माऊस आणि मिनी माऊस. प्रसिद्धीचे सर्व विक्रम मोडणारी. त्यांनी मागच्या महिन्यात इतिहास घडविला.

अमेरिकन कायद्याप्रमाणे कोणतीही कलाकृती ९५ वर्षांनंतर ‘कॉपीराईट’ कायद्यातून मुक्त होते. त्याचीच परिणिती म्हणून दोन्ही पात्रे प्रथम आवृत्ती कॉपीराईटमधून मुक्त झाली. आता त्याचा वापर विनामूल्य कुठेही आणि कोणत्याही कारणासाठी करता येऊ शकणार आहे. ‘डिस्ने’ने चित्रपट, कार्टूनपट, जाहिरातदार, समारंभ आयोजक आणि सार्वजनिक कार्यक्रम सादर करणारे, इतकेच काय; तर छोटासा वाढदिवस साजरा करणाऱ्यांना त्या पात्रांची पहिली आवृती विनामूल्य आणि विनाकाळजी वापरण्यास दिली आहे.

जणू ‘डिस्ने’ने त्यांना एक प्रकारचा नजराणाच दिला आहे. कलाप्रेमींना पूर्वी ती पात्रे वापरायची असल्यास हजारो रुपये खर्च करावे लागत होते. अनेक परवानग्या अमेरिकेतून घ्याव्या लागत. अतिशय जोखमीचे काम... मला आठवतेय, मी एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करत असताना एका वस्तूच्या जाहिरातीसाठी मिकीचा वापर करण्याचे ठरले. त्यासाठी परवनगी घेणे व इतर कायदेशीर बाबी इत्यादी करणे डोकेदुखी कसे ठरले, ते आजही आठवते.

‘डिस्ने’चा ब्रॅण्ड ठरलेली पात्रे कोणालाही वापरतात येणार आणि तीही विनामूल्य, म्हणजे दुग्धशर्करा योगच की... मिकी माऊस व मिनी माऊसमध्ये कालांतराने अनेक बदल होत गेले. अशा पात्रांवर ‘डिस्ने’चा कॉपीराईट हक्क राहील. त्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पीटर पॅन (जे. एम. बॅरी), ओरलँडो (कंपनी व्हर्जिनिया वुल्फ) आणि ‘विनी द पूह’ अशा पात्रांचा मित्र ‘टिगर’ही कॉपीराईट कायद्यातून मुक्त झाले आहेत. डबल धमाका!

असामान्य व्यक्तिमत्त्व, चलचित्रपटकार, टीव्ही लघुपट निर्माता, ॲनिमेशन फिल्मचा प्रणेता-उद्‍गाता, जगात सर्वात प्रसिद्ध मनोरंजन करणाऱ्या कंपनीचा मालक, ‘डिस्नेलॅण्ड’चा निर्माता डोनाल्ड डक आणि मिकीचा जनक म्हणजे अमेरिकास्थित वॉल्ट डिस्ने. त्यांची जन्मकहाणी अतिशय लक्षवेधक आणि रोचक आहे. शिकागोमध्ये ५ डिसेंबर १९०१ साली जन्म.

वडील एलिस डिस्ने सुतारकाम करणारे... शेतकरी, बांधकाम करणारे... आई फ्लोरा शालेय शिक्षिका. त्याच काळात ते संपूर्ण कुटुंब अमेरिकेतील मिसोरीला स्थायिक झाले. त्याच ठिकाणी वॉल्ट यांनी आपल्या शालेय शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. पेस्टल आणि वॉटर कलर्समध्ये चित्रकला करणे त्यांचा छंद झाला. त्यांचे वडील अतिशय कष्टाळू होते. त्यांनी कन्सास शहरात पेपर टाकायचे काम सुरू केले.

त्यामधून काही रक्कम जमा करण्याच्या हेतूने ते वॉल्टना आपला मदतनीस म्हणून पेपर टाकायचे काम देऊ लागले. शाळा आणि वर्तमानपत्रांच्या वाटपामुळे वॉल्टना वक्तशीरपणाची सवय लागली. चित्रकलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी व्यंगचित्रकला शिकण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर आर्ट इन्स्टीट्यूट आणि स्कूल ऑफ डिझाईनमध्ये वर्ग शिकवणुकीचे काम तरुण वयात सुरू केले.

उपयोजित चित्रकला, ड्राफ्ट्समन, इंकिंग इत्यादी कामे ते स्टुडिओत करू लागले. त्याच स्टुडिओत वॉल्ट डिस्नेंच्या यशस्वी कारकिर्दीचा आलेख उंचावण्यास कारणीभूत ठरलेला तरुण युकी आयवर्कसशी त्यांची मैत्री झाली. दोघांची एकत्र वाटचाल सुर झाली. त्यासाठी त्यांनी जुना मूव्ही कॅमेरा विकत घेतला व त्यावर ते एक ते दोन मिनिटांची अॅनिमिशन फिल्म तयार करू लागले.

त्यानंतर सात मिनिटांची खरीखुरी माणसे-निसर्ग व ॲनिमेशन यांचा वापर करून ‘अॅलिस इन कार्ट लॅण्ड’ फिल्म तयार केली; परंतु जसे इतर तरुणांना सुरुवातीच्या काळात फसवले जाते तोच प्रकार न्यूयॉर्कच्या वितरकांकडून त्यांना अनुभवायला आला. पण, त्यांनी धीर सोडला नाही. अचानक ‘अॅलिस इन कार्ट लॅण्ड’ला सुगीचे दिवस आले.

त्यांचा भाऊ रॉय व त्यांनी पार्टनरशिपमध्ये स्टुडिओ चालू केला. हॉलीवूडला यू बी आयवर्क्स त्यांना येऊन मिळाला. ड्रॉईंगचा सपाटा लावला. त्यांनी अनेक प्रयत्न करून ‘ओसवाल्ड द लकी रॅबिट’ नावाचे पात्र तयार केले. वितरकाला ती फिल्म वितरणासाठी प्रत्येकी १,५०० डॉलर मोबदल्यात देऊन टाकली.

काहीतरी नवीन साकारण्याची धडपड वॉल्टना स्वस्थ बसू देईना... त्यांनी पुन्हा नवीन पात्र निर्माण करण्यासाठी प्रयोग चालू ठेवला. मनासारखे पात्र तयार होत नाही म्हणून ते अतिशय बेचैन असत. एकदा असेच विमनस्क मनःस्थितीत ड्रॉईंग बोर्डच्या समोर बसलेले असताना अचानक एक पाळीव उंदीर येऊन त्यांच्या बोर्डवर बसला आणि क्षणात उडी मारून पळून गेला.

ते दृश्य पाहून वॉल्ट यांची प्रज्ञा जागृत झाली आणि हा उंदीरच आपले पात्र आहे याची खूणगाठ बांधून ते दोघेही रेखाटने करायला लागले. त्या प्रयत्नातूनच चुळबुळीत, चुणचुणीत, चपळ, खोडकर आणि कानात हवा भरलेला मिकी माऊस तयार झाला. जो आज शंभरेक वर्षे मनोरंजनाच्या जगात आपले अधिराज्य गाजवतोय. ज्याने मनोरंजनाची व्याख्या आणि व्याप्ती बदलून टाकली. त्याचा जन्म एखाद्या छोट्याशा प्रसंगातून व्हावा, हे पण नवलच!

अर्थातच कोणतीही अजरामर कलाकृती निर्माण होण्यास प्रेरणेची आवश्यकता असतेच. नाही तर ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी स्थिती तयार होते. परंतु वॉल्ट यांना मानववंशीय उंदीर तयार करताना चार्ली चॅप्लीन व डग्लस फेअर बॅक्स यांच्या मूकचित्रपटातून प्रेरणा मिळाली.

मिकी माऊसचे रेखाटन करण्याअगोदर मांजर, कुत्रा, गाय, घोडा इत्यादींची पात्रे यू बी आयवर्क्स याने केली. परंतु, ती त्याला समाधान देऊ शकली नाहीत. त्यानंतर त्यांनी दोन लघुचित्रपट तयार करण्याचे आयोजन केले. प्लेन क्रेझी व गॅलोलीपिन गौचो, ज्यामध्ये मिकी माऊसची प्रमुख भूमिका होती. त्यात प्रथमच संगीताचा वापर करण्यात आला. त्यासाठी प्रसिद्ध गायक अल जॉलसन याला गाण्याची संधी दिली.

त्यानंतर ताबडतोब तिसरी फिल्म मिकी माऊसवर बेतलेली. ज्यामध्ये मिकी माऊस बोलतो आणि संगीताचा अतिशय परिणामकारक वापर केला गेला. त्या ॲनिमेटेड फिल्मचे नाव ‘स्टीम बोट विली.’ १९२८ मध्ये तयार झालेल्या फिल्मचा खूप गाजावाजा झाला. त्याच्या यशानंतर वॉल्ट डिस्नेंनी नवीन मालिका सुरू केली, सिली सिम्फनीज. मिकीचे पूर्वीचे नाव ‘मोर टाइम माऊस’ असे होते.

वॉल्ट यांच्या पत्नी लिलियनला ते पसंत पडले नाही म्हणून तिने त्याचे नामकरण ‘मिकी’ असे केले. जे सर्वांनी आपलेसे केले. मिकीचे रूपडे मानवाकृती, लाल अर्धी चड्डी, मोठाले पिवळे शूज आणि हातात पांढरे मोजे. डोळ्यांची बुबुळे काळी... सुरुवातीच्या काळात मिकी माऊसला नायक म्हणून मान्यता नव्हती, तर तो मैत्रीण मिनी माऊसचा कुचकामी मित्र म्हणून ओळखला जायचा. ‘व्हेन कॅटर्स अवे’ (१९२९) मध्ये मिकीचा असामान्य असा सीन होता.

मिकी आणि मिनीची मानववंशीय वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली. त्यांना सैनिकी पोशाख परिधान केला गेला. चुळबुळा, खट्याळ मिकी साधारण तीन फूट उंचीचा साकारण्यात आला. ॲनिमेटेड प्राण्यांचे विशिष्ट बोलणे, त्यांच्यामध्ये असलेल्या कला-कसब, एकंदर त्यांचे विनोदात्मक पेहराव व वागणे हे अनुभवताना सामान्य लोक त्यांच्याकडे फॅन्टसी म्हणून आकृष्ट होऊ लागले. त्याचाच फायदा घेत वॉल्ट यांनी अशी इतरही पात्रे तयार केली. डोनाल्ड डक, कुत्रा - प्लुटो आणि गुफी.

मिकीच्या निर्मितीपासून त्याला आवाज देण्याचे काम १९४७ पर्यंत स्वतः वॉल्ट डिस्ने करीत होते. त्यानंतर दुसऱ्या कलाकारांना संधी देण्यात आली. जिमी मॅकडोनाल्ड्स व नंतर अॅलन यंग कार्निवल कीडमध्ये मिकी हॉट डॉग्स विकणारा दाखवण्यात आला. त्याने पहिल्यांदाच गाणे गायले. ‘हॉट डॉग्स हॉट डॉग्स’ असे शब्द तो उच्चारत असे. १९२९ वर्ष मिकीच्या परिवर्तनाचे वर्ष. तो गाणे गाऊ लागला, वेगवेगळे कपडे परिधान करू लागला.

‘मिकीज फॉलीज’ चित्रपटातील गाणे ‘मिनीज यू-हू’ पुढील काही वर्षे मिकीच्या चित्रपटाचे थीम साँग म्हणून वापरले गेले. दुधात मिठाचा खडा पडावा असा प्रसंग वॉल्ट यांच्या आयुष्यात आला आणि तो त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. डिस्ने यांनी उत्कृष्ट दिग्दर्शक, मिकीचा डिझायनर आणि ॲनिमेशनची जबाबदारी सांभाळणारा विश्वासू मित्र गमावला.

‘चाळीसाव्या दशकात’ फ्रेड मूरने मिकीची पुनर्रचना केली. काळ्याकुट्टऐवजी पांढरे डोळे व त्यामध्ये काळे बुब्बुळ... कॉकेशियन त्वचेचा रंग ट्रेडमार्कमध्ये दिसते तशी पॅन्ट वापरली. शेपटी गमावली, शरीररचनेला शोभेचे वास्तववादी कान तयार केले. पुन्हा पन्नासाव्या दशकात आणखी बदल केले. डोक्यावर भुवया चितारण्यात आल्या. त्यानंतरच्या चित्रांमध्ये पुन्हा त्या भुवया काढून टाकण्यात आल्या.

ॲनिमेटेड फिल्म्सची घोडदौड चालू असताना वॉल्ट डिस्ने दुसऱ्याही माध्यमांकडे वळले. मिकी, मिनी व इतर जणांचा सहभाग असलेल्या अनेक व्हिडीओ गेमवर तरुणाई तुटून पडली. त्या गेममध्ये मिकीने अनेक भूमिका वठविल्या. ज्यामध्ये निन्टेंडो एंटरटेन्मेंट सिस्टीममधील ‘मिकी माऊस कॅपिड, मिकीज अल्टिमेट चॅलेंज, मिकी माऊस मॅजिक बॅण्ड’ इत्यादींचा समावेश होता.

‘मिकी माऊस कॉमिक’च्या अनेक मालिका प्रकाशित केल्या गेल्या. १९४३ ला पहिले कॉमिक चार रंगांत वितरित केले गेले. मिकी माऊस कॉमिकसाठी कलात्मक कॉमिक्स स्ट्रीप तयार केली फ्लॉईड गोटर फ्रेडसन यांनी. १९३० ते १९७५ पर्यंत त्यांनी न थकता सतत स्ट्रीपचा पुरवठा केला.

चित्रकार पॉल मरे याने मिकीच्या कथांसाठी १९५० ते १९८४ पर्यंत काम केले. ‘द अमेरिकन मिकी माऊस’ कॉमिक पुस्तकासाठी ते चित्रकार होते. त्याची किंमत, प्रकाशक आणि प्रिंटिंगच्या दर्जात ते सतत बदल करीत. ‘वॉल्ट डिस्ने कॉमिक्स ॲण्ड स्टोरीज’ ते वर्षातून सहा वेळा प्रकाशित करीत. ग्लॅडस्टोन आणि गेमस्टोनसारख्या प्रकाशकांनी मिकी माऊस कॉमिक्स प्रसिद्ध केले.

जगामध्ये अनेक देशांमधून अनेक भाषांमध्ये मिकी माऊस स्ट्रीप कॉमिक्स पुस्तके प्रकाशित झाली. लाखो वाचकांनी त्यांचा आस्वाद घेतला आणि अगणित संपत्तीही कमावली. १९५५ मध्ये डिस्ने पार्कची निर्मिती केली. मिकी विशिष्ट कलाकारांच्या वेशभूषा करून न बोलता, लोकांशी हस्तांदोलन करत, त्यांच्याशी पोज देऊन फोटो काढणे अशा अनेक समारंभांमध्ये मिकी सर्वांचे स्वागत इतर पात्राबरोबर करीत असे.

मिकी असंख्य सार्वजनिक परेडमध्ये अनेकांचे मनोरंजन करतो, हे पाहून बराक ओबामा म्हणाले होते, ‘माझ्यापेक्षा मोठे कान असलेला नेता.’ अमेरिकन अध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांचा अपवाद वगळता हॅरी ट्रूमनसहित सर्व अध्यक्षांशी मिकीने हस्तांदोलन केले आहे. सांताक्लॉजपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या जागतिक ओळख असणारे पात्र म्हणजे मिकी. मिकी माऊस व त्याच्या सहकारी पात्रांवर आधारित अनेक टीव्ही कार्यक्रम आहेत.

त्यामध्ये ‘द मिकी माऊस क्लब’ १९५० पासून अमेरिकन मुलांचा आवडता कार्यक्रम आहे. मिकी व त्याचे सवंगडी असलेल्या पात्राने अनेक वस्तू सजल्या. पेनपासून ते टिफिन बॉक्स, गाड्या, कपडे, विमाने, मूर्ती इत्यादींवर तो चमकतो आहे. जगभरात त्याची प्रचीती सर्वांना येत आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.

मिकी माऊसने जगभर लोकांना चित्रकलेची आवड निर्माण केली. चित्रकार घडवले, व्यंगचित्राबद्दल जागृती निर्माण केली. अनेकांच्या हातांना काम दिले. मैत्री, प्रेम जुळवले. फाटलेली मने पुन्हा सांधली गेली. सामान्यांना संपत्तीचा आस्वाद घेता आला. एका मसिहाचे काम मिकीने केले. एक प्रकारे ‘वसुधैव कुटुंबकम’ संज्ञा सार्थ ठरविली.

एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के रक्कम मिकीच्या कारभारातून मिळते. अमेरिकेत सार्वजनिक निवडणुकीत ‘नाटो’ वापरायचा असेल तर त्या ठिकाणी मिकीची प्रतिमा उमटवली जाते. मिकी माऊस व इतर पात्रांवर असलेल्या फिल्मसाठी वा टेलिव्हिजन मालकांसाठी अनेक पुरस्कार मिकीने म्हणजे वॉल्ट डिस्ने यांनी मिळविले.

मिकीने एकूण १३० चलचित्रपटांमधून व लघुपटांमधून आपल्या ॲनिमेटेड अभिनयाचे गारुड लोकांवर केले, करीत आहे... अनेक पुरस्कार मिळवून वॉल्ट डिस्ने समृद्ध झाले. मिकीच्या रूपात वॉल्ट डिस्ने यांनी आपली सर्व मिळकत जनतेस अर्पण केली.

सांताक्लॉजपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या जागतिक ओळख असणारे पात्र म्हणजे मिकी माऊस. ‘द मिकी माऊस क्लब’चे जगभरात असंख्य चाहते आहेत. जगाचा लाडका असलेला मिकी आता सर्वांचा झाला आहे. आता त्याचा वापर विनामूल्य कुठेही आणि कोणत्याही कारणासाठी करता येऊ शकणार आहे.

Wairkarp@gmail.com

(लेखक प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com