
अमेरिकेसारख्या देशात जिथं मुळातच क्रिकेटवेडी माणसं शोधायची वेळ यावी, तिथं या माणसानं क्रिकेट नुसतं खेळलंच नाही, तर रुजवलंही.
माणसं जोडा, आव्हानं स्वीकारा !
- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com
अमेरिकेसारख्या देशात जिथं मुळातच क्रिकेटवेडी माणसं शोधायची वेळ यावी, तिथं या माणसानं क्रिकेट नुसतं खेळलंच नाही, तर रुजवलंही. पण क्रिकेट हा त्यांच्या कर्तृत्ववान आयुष्यातला एक छोटासा भाग.. रिस्क है तो इश्क है हे खऱ्या अर्थाने जगलेले... भारतासह चार देशांमध्ये यशाची शिखरं गाठत आता अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या नीलेश म्हात्रेंचा प्रवास वेगळाच आहे.
म्हात्रे मूळचे मुंबईचे. मुंबईतूनच त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली. पण ते रूढ अर्थानं दहावी-बारावी करून मग इंजिनिअरिंग या मार्गाने मात्र गेले नाहीत. शाळेत शिकत असतानाच त्यांच्या पालकांनी त्यांना बांद्र्याच्या फादर अग्नेल टेक्निकल स्कूलमध्ये घातलं. त्यांचं लेथ मशिनवर काम सुरू झालं ते असं लहानपणीच. साहजिकच पुढे इंजिनिअरिंग करायचं हे ओघाने आलंच. याच संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली.
इंजिनिअरिंग झालं आणि पहिली नोकरी मिळाली ती महिंद्रा ॲण्ड महिंद्रामध्ये, त्याबद्दल ते सांगतात, ‘‘माझी मुलाखत मुंबईत झाली; पण त्यांनी सांगितलं की नोकरीसाठी नाशिकला जावं लागेल. तेव्हा महिंद्रा कंपनी त्यांची ‘अर्माडा’ ही नवी गाडी लाँच करणार होते, त्यामुळे त्यांनी नाशिकला जावं लागेल, असं सांगितलं होतं. मी ही संधी स्वीकारली, कारण तिथं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.’’
महिंद्रातली नोकरी सोडल्यावर त्यांनी ओटीस एलिव्हेटर आणि टेल्कोमध्येही काहीकाळ नोकरी केली. पण त्यानंतर एकदम डायव्हर्जन घेतलं आणि थेट जेट एअरवेज जॉइन केलं. म्हात्रे सांगतात, ‘‘तेव्हा अशी मानसिकता होती की, या कंपनीमध्ये रिटायर व्हायचं.’’
माझे नातेवाईक म्हणायचे की, तू नोकरी का सोडतोस? पण मला मात्र पुढे शिकत रहायचं होतं. तेव्हा खासगी विमान कंपन्या सुरू होत होत्या. दमानिया एअर होतं, तसंच जेट एअरवेज होतं. तिथं काम करण्याची संधी आली आणि मी ती नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पर्चेसिंग मॅनेजर म्हणून मी तिथं रुजू झालो. तेव्हा एअरपोर्टवर जाणं, ताजची सप्लाय चेन सांभाळणं, हा अनुभव एकदमच ग्लॅमरस आणि भन्नाट होता.’’
एअरवेजमध्ये काम करत असताना त्यांनी सॉफ्टवेअरच्या कोर्सला प्रवेश घेतला. त्या वेळी म्हात्रेंच्या जुन्या बॉसने त्यांना एका लेक्चरला जाण्याचं सुचवलं. गोपालन म्हणून सीमेन्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं लेक्चर होतं. १९९६ मधला काळ हा सॉफ्टवेअर बुमचा, त्यामुळे या लेक्चरमधून इम्प्रेस झालेले म्हात्रे गोपालन यांच्याशी बोलायला गेले आणि चक्क नोकरीची ऑफर घेऊन आले. दुसऱ्याच दिवशी नोकरीसाठी बोलावणं आलं.
परदेशवारीची संधी मिळाली ती सीमेन्समधून शिंडलरसाठी प्रकल्पावर काम करताना. त्या वेळी म्हात्रेंच्या पत्नीची बाळंतपणाची वेळ आली होती. पण प्रकल्प सुरू होणार होता, त्यामुळे त्यांनी आधी ते काम संपवलं आणि मग पत्नीला दवाखान्यात नेलं. ही कमिटमेंट पाहून साहजिकच शिंडलरमधल्या त्या प्रकल्पाच्या प्रमुखांनी त्यांना तातडीने नोकरी ऑफर केली. ही संधी होती स्वित्झर्लंडमध्ये. अनोळखी भाषा आणि देश, त्यात लहान मूल असताना जायचं का, हा निर्णय मोठा होता. पण काही काळ पाहू, तरी असं म्हणत त्यांनी हा निर्णय घेतला. परदेशी गेले, ते २३ वर्षं झाली ते परदेशातच आहेत. त्यातही स्वित्झर्लंड, त्यानंतर शांघाय आणि आता अमेरिका अशा देशांमध्ये त्यांची भ्रमंती झाली आहे.
एकीकडे करिअरची घोडदौड सुरू होतीच; पण भारतीय आणि मुंबईकराच्या मनातलं क्रिकेटचं वेड मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. स्वित्झर्लंडमध्ये एका फ्रोझन लेकवर क्रिकेटची स्पर्धा भरते. तिथं म्हात्रे क्रिकेट खेळायला दरवर्षी जायचे. नंतर हाँगकाँगमध्ये क्रिकेटचं कोचिंगही होतं. इथून म्हात्रे आणि त्यांचा मुलगा दोघंही एकत्र टुर्नामेंट खेळायला लागले. अर्थात, इथं क्रिकेटची किमान थोडी
तरी पार्श्वभूमी असणारी मंडळी आणि वातावरण होतं. तिथे गेल्यावर मात्र खेळणारी ४-५ माणसंच असायची. तीच टीम बॅटिंग करतेय आणि मग बॉलिंगही असं चित्र होतं. २०१६-२०१७ लिव्हिंगस्टनमध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी बेसबॉलचा गेम व्हायचा, त्याच ठिकाणी म्हात्रेंच्या पुढाकाराने क्रिकेटचा प्रदर्शनीय खेळ झाला. या खेळाचा परिणाम म्हणून त्यांना एक डेडिकेटेड ग्राउंडही मिळालं. आता या ग्राउंडवर पुरुष, मुलं आणि महिलांच्या क्रिकेट टीम सराव करतात. महिलांची ही टीम टुर्नामेंटमध्येही सहभाग घेतेय.
म्हात्रेंचं आता स्वप्न आहे ते भारताने त्यांना जे घडवलं त्याची परतफेड करण्याचं. शाळेत शिकवण्यापासून, एनजीओंना मदत करण्यापासून स्टार्टअप्सना मदत करण्यापर्यंत अनेक पर्यायांचा विचार ते करतायत. या प्रवासात म्हात्रेंचा मंत्र एकच राहिलाय - माणसं जोडा; त्यातून प्रवास होत रहातो, सोपा होत जातो.
Web Title: Prachee Kulkarnee Writes America Cricket Nilesh Mhatre Journey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..