
मुलं आपल्या करिअरमध्ये स्थिरस्थावर झाली आहेत. आपण सुरू केलेल्या दोन्ही कंपन्या अगदी व्यवस्थित सुरू आहेत.
- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com
मुलं आपल्या करिअरमध्ये स्थिरस्थावर झाली आहेत. आपण सुरू केलेल्या दोन्ही कंपन्या अगदी व्यवस्थित सुरू आहेत. अशावेळी कुणी निवृत्त होत नाहीत. अजून काही तरी करूया, असा विचार करतात आणि पन्नासाव्यावर्षी निवृत्ती घेण्याचा विचार कोण करेल? जर निवृत्ती घेतली तर मग आता आराम करुया, फिरुया अशा मनःस्थितीमध्ये ती व्यक्ती जाईल. यातला ‘फिरुया जग बघुया’ हा भाग तर आनंद गानू यांनी केला. पण आराम हा शब्द जणू काही त्यांच्या शब्दकोशात नव्हता. कारण निवृत्ती घेतल्यावर त्यांनी एका नव्या उद्योगाला सुरुवात केली आणि तो उद्योग असा होता की ज्यामुळे जवळपास दिवसाचे २४ तास ते सतत काम करत असतात. हा नवीन उद्योग म्हणजे ‘गर्जे मराठी’.
आनंद गानू मुळचे चिपळूणचे. त्यांचे वडील मुंबईत आले तेव्हा त्यांना ना रहायला जागा होती ना काही ओळख. सुरुवातीला ते फुटपाथवर राहिले. पण त्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि गानूंना विश्वास दिला, हवं ते करून पाहण्याची मुभा दिली.
एकीकडे कष्टातून वर आलेले वडील तर दुसरीकडे समाजसेवेला वाहून घेतलेली आई असं त्यांचं कुटुंब. त्यांच्या आईने सुरू केलेली शाळा, संस्था आज मुंबईत एक नावाजलेली शिक्षण संस्था आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गानूंनी कायमच स्वप्न बघितलं ते व्यवसाय करायचं. पार्ल्याच्या टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून फार्मसीमध्ये पदवी पूर्ण केली. पदवी पूर्ण झाल्यावर त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यावेळी ते मुंबई परिसरातील डॉक्टर्सना औषधं सप्लाय करायचे. पुढं त्यांना झांबिया मध्ये प्रोव्हिन्शियल फार्मसिस्ट इन्चार्ज फाँर इस्टर्न प्राँव्हिन्स म्हणून नोकरीची संधी मिळाली. आणि महाविद्यालयातच ओळख मैत्री आणि प्रेम असा प्रवास झालेल्या सुनिता साठेंशी वयाच्या तेविसाव्या वर्षी लग्न करुन ते परदेशी रवानाही झाले. काही वर्ष झांबियाला काम केल्यानंतर ते भारतात परतले. १९८४ मध्ये गानू दाम्पत्यानं एजी फार्मास्युटीकल्स ही कंपनी सुरू केली. काही काळ दुसऱ्यांसाठी औषधे तयार केल्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये अपोथिकार्स नावाची कंपनी सुरू केली. त्यानंतर सुनंद फार्मा नावाची कंपनी सुरू केली. २००७ पर्यंत ही कंपनी चालवल्यावर त्यांनी वयाच्या ५१ वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला. अर्थात ही निवृत्ती फक्त फार्मसीच्या क्षेत्रातून होती. कारण एकीकडे जगभ्रमंती करत असतानाच जगभरातील माणसं जोडत त्यांनी ‘गर्जे मराठी’ ही संस्था सुरू केली.
गर्जे मराठीची सुरुवात झाली ती आमच्या अज्ञानातून असं गानू सांगतात. 'मी आणि माझ्या पत्नीनं बोईंगच्या दिनेश केसकर यांची कहाणी वाचली. पूर्वी सत्तरच्या दशकात असं होतं की परदेशी जायचं ते म्हणजे पैसा कमावण्यासाठी. पण हे पुस्तक वाचल्यावर आमच्या लक्षात आलं ती सगळेच लोक काही यासाठी जात नाहीयेत. अनेकांनी यशाची शिखरं गाठली पण त्यांचा पैसा हा उद्देश नव्हता. त्यातून आम्ही जगभरातल्या मराठी माणसांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि त्यांच्याशी बोलून गर्जे मराठी भाग १ आणि २ हे पुस्तक लिहिलं. पण पुस्तकाला शेवटी मर्यादा आहेत. हे जगभरात पोहोचवायचं तर ‘गर्जे मराठी’ ही आम्ही ‘गर्जे मराठी’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. जगभरात आज या संस्थेचे जवळपास दहा हजारांहून अधिक सदस्य आहेत. यात संख्येपेक्षा जी गुणवत्ता आहे ती महत्त्वाची आहे या संस्थेकडून जगभरातून अर्ज मागवले जातात. स्टार्टअप सारखं पीच, बिझनेस प्लँन मागवला जातो. त्यांना ६ ते ८ आठवडे प्रशिक्षण दिलं जातं. आणि मग ते गुंतवणुकदाराकडं जायला तयार होतात त्यासाठी संस्थेची मदतही होते.
गानू सांगतात, पूर्वी अनेक भारतीयांना देणगी किंवा मदत करायची इच्छा असायची. पण ते काय आणि कसं द्यायचं न कळल्याने ते फक्त पैसे देऊन मोकळे होतात. त्या पैशांचं काय होतं ते कळत नाही. त्यामुळे आमच्या सारख्या प्लँटफाँर्मचा उपयोग होतो. अगदी साध्या गोष्टी म्हणजे मुलाखत संपल्यावर जाताना तुम्ही पुन्हा कधी संपर्क साधू हे विचारायचं सुद्धा अनेकांना माहीत नसतं. सहसा लोक आभार मानून बाहेर पडतात. अशा सगळ्या गोष्टींसाठी हे शिक्षण उपयोगी पडतं.
या मार्गदर्शनासह ‘गर्जे मराठी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करणे, भाषा शिकवण्यासाठी कार्यक्रम करणे अशी अनेक कामं सुरू आहेत. दोन हजार या वर्षात गानूंच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. गानूंची मोठी बहीण कँन्सरनं वारली. यानंतर गानूंनी कँन्सरसाठी जनजागृती सुरू केली. त्यासाठी अक्षरशः रेल्वेत पत्रकंही वाटली. कँन्सरचं लवकर डिटेक्शन व्हावं यासाठी कँम्पही आयोजित करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.