समन्वय कुटुंब आणि करिअरचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Sangita De

महिलांच्या आयुष्यात कधी ना कधी करिअर की मुलं अथवा कुटुंब असा प्रश्न येतोच. यात अनेकजणी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतात.

समन्वय कुटुंब आणि करिअरचा!

- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com

महिलांच्या आयुष्यात कधी ना कधी करिअर की मुलं अथवा कुटुंब असा प्रश्न येतोच. यात अनेकजणी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतात. मात्र, या ब्रेकनंतर पुन्हा करिअर सुरू करायचं तरी कसं, या पेचात अडकतात. डॉ. संगीता डे नेमकं याचंच उत्तर देतात. स्वतःला आलेल्या अनुभवाचा उपयोग करत त्या खास करून महिला आणि याबरोबरच एकूणच कामाच्या ठिकाणी होत जाणाऱ्या बदलांची नोंद घेत त्यावर अभ्यासपूर्ण उपाय सुचवतात.

आडनाव डे असलं तरी त्या अस्खलित मराठी बोलतात. जन्म अमरावतीचा आणि लहानपण गेलं ते नागपुरात. लहानपणीच मराठी साहित्याचीही भुरळ पडली आणि त्यातून मराठीप्रेम इतकं की, आपली मातृभाषा कोणती याचा गोंधळ त्यांच्याही मनात होतो. मराठीविषयी प्रेम असतानाच त्यांनी उर्दूचाही अभ्यास केला आहे.

भाषांवर तर प्रभुत्व मिळवलं; पण शिक्षणातही हीच कथा. त्यांनी बी.ए., बी.एस्सी. आणि मग एमबीएसुद्धा केलं. डे सांगतात, ‘घरात खूप वकील होते, मीही वकिली करणार हे गृहीत धरलं गेलं होतं; पण त्या वेळी मार्क चांगले मिळाले आणि मी विज्ञान शाखेकडे वळले. पण हे करताना लक्षात आलं की, आपल्याला आवड आहे ती इव्हेंट मॅनेजमेंट, पीपल स्किल्सची; आणि मग ‘एच.आर.’मध्ये करिअर करण्याचं ठरवलं.’ दरम्यान त्यांनी मनोविज्ञानाचादेखील अभ्यास केला.

वयाच्या २१-२२ व्या वर्षी त्यांच्या मैत्रिणींची लग्नं व्हायला लागली. पण डे यांना माहीत होतं की, आपल्याला करिअर करायचं आहे. करिअरची सुरुवात झाली ती औरंगाबादमधून. तिथं नोकरी करताना नाडकर्णी म्हणून ट्रेनर होते, ते कीर्तनातून ट्रेनिंग द्यायचे. यातून डे यांना लक्षात आलं की, आपल्याला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. रोटरीकडून त्यांना कल्चरल स्कॉलरशिप मिळाली, त्यातून शिक्षण घेत त्यांना अमेरिकेत जायची संधी मिळाली. तिथं थ्री एम कंपनीत संधी मिळाली. अमेरिकेत काम करायचं नाही म्हणून त्यांनी थेट बंगलोर गाठलं. असाच प्रवास करत त्या विप्रोमध्ये सीनियर मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचल्या. पण, याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बंगलोरमध्ये त्यांनी स्वतःचं घर बांधायला घेतलं होतं. आपल्याला हवं तसं आपलं घर असावं, ही इच्छा इतकी तीव्र होती की, त्या थेट आपली आवडती शेड शोधायला दगड खाणीत पोहोचल्या होत्या. याच टप्प्यावर त्यांना एका कॉन्फरन्ससाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी डॉ. सुधीर काळे यांच्याशी संवाद सुरू होता.

डॉ. काळे त्यांना म्हणाले की, तुम्ही गोल्डकोस्टला यायला हवं. त्यांना भेटायला त्या त्यांच्या विद्यापीठात गेल्या खऱ्या; पण पाहताक्षणी प्रेमात पडल्या. पण ते व्यक्तीच्या नव्हे, तर त्यांच्या कपाटातल्या पुस्तकांच्या. त्यातूनच नात्याची सुरुवात झाली आणि लग्नही. अर्थात, लग्नानंतरही वेगवेगळ्या देशांमध्ये राहणं सुरूच होतं. पण वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला आणि त्यांच्यासाठी सगळंच बदललं आणि मग डे यांनी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला.

हे ट्रान्झिशन अत्यंत घुसमट होणारं असल्याचं त्या सांगतात. अनेक महिलांशी बोलताना सोडलेला कम्फर्ट झोन आणि मागे सोडलेली ओळखीची, नात्याची माणसं आणि त्यात व्यक्त होण्यासाठीचं माध्यम नोकरी असं वाटत असलं, की हे सगळंच अवघड होतं. त्यात परदेशात गेल्यावर ओळखी नाहीत. एचआर क्षेत्रात असताना रेफरन्स कुठला द्यायचा हा प्रश्न येणं हे फारच मोठं संकट असल्याचं डे सांगतात.

या सगळ्यातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राकडं वळण्याचा निर्णय घेतला. पीएच.डी.ला प्रवेश मिळाला. मोठा मुलगा तीन वर्षांचा; पण त्यात त्यांना दुसरं मूल होणार असल्याचं लक्षात आलं आणि पीएच.डी.ची सुरुवातच प्रसूती रजेतून झाली. अनेकांनी ‘पीएच.डी.चा नाद सोडून दे’ हे सांगणं हीच त्यांना प्रेरणा ठरली. दोन लहान मुलं, त्यामुळे काम करायचं, ते दोन तास झोपून उरलेल्या वेळात काम, असं नियोजन करून. असा त्यांनी थिसीस पूर्ण केला आणि मग कधी पार्ट टाइम नोकरी असं करत करत त्यांनी करिअरची घडी पुन्हा बसवली.

आता अशा महिलांसाठी त्या गर्जे मराठी या संस्थेबरोबर ‘मोगरा फुलला’ नावाचा एक प्रकल्प चालवतात. अनुभवांची शिदोरी प्रत्यक्ष लोकांसाठी कळावी, अशा पद्धतीने सांगण्याच्या संवादाचा हा कार्यक्रम.

डॉ. डे सांगतात, ‘मॅनेजमेंटच्या भाषेत मदरहुड पेनल्टी असं म्हटलं जातं. आता चित्र बदलतंय. अशा महिलांसाठी नवे प्रोग्रॅम सुरू केले आहेत. रिस्किलिंग किंवा अपस्किलिंगच्या माध्यमातून महिलांना शिकवलं जातंय. अगदी मानसिकताच बदलतेय, कारण ग्रेट रेजिग्नेशन ट्रेंडसुद्धा आला आहे; आणि महिला आणि पुरुष दोघंही पालकत्वासाठी करिअरचा ब्रेक घेत आहेत. आता पुरुषांनाही पालकत्वाची जबाबदारी तितकीच घ्यायची आहे. अर्थात, हा बदल काही ठिकाणीच होतोय. मिलिंडा गेट्स यांच्या शब्दांत we are sending our daughters to workplaces designed for men. कोरोनानंतर तर खूपच चित्र बदलतंय. करिअर आता एका सरळ रेषेत नाहीये. लोक करिअर बदलतात, मल्टिपल करिअर एकाच वेळी घडवले जातायेत.’

या सगळ्या गोष्टी करत असतानाच, अभ्यास करताना, शिकवतानाच डॉ. डे यांनी आता योगासन आणि ध्यानधारणेचाही अभ्यास करायला सुरुवात केली आहे. परदेशात राहण्याचा अनुभव सहज सोपा नाहीच. त्यांच्या मुलीला तिथं त्रासही सहन करावा लागला; पण त्यावर शाळेत जाऊन तक्रार करण्याऐवजी खास भारतीय वेशात त्या शाळेत गेल्या आणि त्यातून भारतीय संस्कृती समजावण्याचा प्रयत्न केला.

मला वेळ नाही किंवा मी कसं करू या दोन्ही गोष्टींच्या पलीकडं जात काम करणं हाच धडा डॉ. डे आवर्जून देतात.

टॅग्स :familyCareersaptarang