
मुंबईकर प्रतिभा पारकर यांनी इतिहासात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मग स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊ असं स्वप्न बघितलं.
- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com
मुंबईकर प्रतिभा पारकर यांनी इतिहासात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मग स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊ असं स्वप्न बघितलं. तीन प्रयत्न केल्यानंतर त्या यशस्वीदेखील झाल्या; पण स्पर्धा परीक्षा देऊन निवड झाली आणि प्रतिभा पारकर यांना कळालं की, त्यांना ‘इंडियन फॉरेन सर्व्हिसेस’मध्ये निवडलं गेलंय. जेव्हा निवड झाली तेव्हा त्यांना फॉरेन सर्व्हिसेसमध्ये नेमकं कसं आणि काय काम करतात हे माहीतही नव्हतं.
पारकर म्हणतात, ‘पर्याय निवडताना मी आयएएस आयपीएस आयएफएस हे निवडलं होतं; पण आजूबाजूला असं कोणी नव्हतं की, ज्यांनी हे केलं आहे. त्यामुळे मी अगदी कोरी पाटी घेऊन हा प्रवास सुरू केला.’
निवड झाली, प्रशिक्षण झालं आणि पहिलं पोस्टिंग मिळालं ते सध्या चर्चेत असलेल्या देशात - रशियामध्ये. ‘निवड झाल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि वेगवेगळ्या भागांत नेलं जातं. त्यानंतर विविध भाषा शिकवल्या जातात. मला रशियन भाषा दिली गेली. त्या भाषेचं प्रशिक्षण तुम्ही एक वर्ष त्या देशात जाऊन घ्यायचं असतं. तसं मग मी मॉस्को विद्यापीठात शिकले आणि मग तिथं काम सुरू केलं. पण, खऱ्या अर्थाने तो माझा पहिला परदेश प्रवास. मुंबईकर असणारी मी, जिने थंडी अनुभवली नव्हती, तिथून थेट उणे तापमानात गेले.’
पारकर यांना पहिली जबाबदारी मिळाली ती माहिती आणि सांस्कृतिक विभागाची. तिथल्या माध्यमांमध्ये भारताबद्दल काय आणि कसं छापून येतंय हे पाहणं आणि भारतातल्या संस्कृतीबद्दल लोकांना सांगणं, हे काम त्यांना मिळालं. अर्थात, त्यांच्यादृष्टीने चॅलेंजिंग टप्पा होता तो; मात्र भारतात परत आल्यानंतरचा. या काळात त्यांना म्यानमार आणि बांगलादेश या आपल्या शेजारी राष्ट्रांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. यातच भारत आणि बांगलादेशसाठी महत्त्वाचं ठरलेल्या लॅण्ड बाउंडरी ॲग्रिमेंटमध्ये पारकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘‘पूर्वी राजे बुद्धिबळात गाव लावायचे, त्यामुळे बांगलादेशात काही गावं होती, जी भारताचा भाग होती आणि भारतात काही गावं होती, जी बांगलादेशचा भाग होती. जवळपास ६० वर्षं हा प्रश्न भिजत पडलेला होता. त्यामुळे ज्या वेळी हा करार झाला, तेव्हा प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांना विचारलं गेलं की, तुम्हाला नक्की कुठं रहायचं आहे; आणि त्याप्रमाणे त्या लोकांना आणून भारतात सेटल करणं, हे मोठं टीम वर्क होतं.’’
पारकर यांना यानंतर अगदी दुर्मीळ अशी संधी मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये भारत आत्तापर्यंत फक्त आठ वेळा गेला आहे. त्यापैकी एकदा भारताचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी पारकरांवर होती. पारकर सांगतात, ‘‘सुरक्षा समितीमध्ये काम करणं म्हणजे एका अर्थाने इतिहास घडताना पाहणं. मी काम करत होते तेव्हा कर्नल गद्दाफी यांच्या सत्तेचा अंत होणं, हे त्याकाळात घडलं. सीरिया वॉर अरब स्प्रिंग हे तेव्हा घडलं. भारताने तेव्हा अगदी ठाम भूमिका घेतली होती. देश कसे वाटाघाटी करतात, हे तेव्हा बघायला मिळालं.’’
याचा पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा होता तो जर्मनीमध्ये फ्रँकफर्टमध्ये काम करण्याचा. भारताची पहिली महिला कौन्सिल जनरल म्हणून त्यांनी काम केलं. मोठं ट्रान्झिट हब असल्याने प्रोटोकॉलबरोबरच संकटात असणाऱ्या भारतीयांना मदत करण्याचे अनेक प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. अगदी तरुण मुलाचा मृत्यू झाल्यावर पालकांना मदत करण्यापासून ते आजारी लोकांना मदत पोहोचवण्यापर्यंत अनेक परीक्षा पाहणारे प्रसंग त्यांच्या वाट्याला आले.
घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या अनेक स्त्रिया मदतीसाठी दूतावासात येत असत. त्यांना मानसिक आधार दिलाच आणि त्याच बरोबर दिल की बात हा नवीन उपक्रम सुरू करून त्यात भारतातील तसेच जर्मनी मधील कायदेतज्ञ बोलावून मार्गदर्शन केलं.याच कार्यक्रमात स्त्रियांना करिअर कौन्सिलिंग देखील केलं.
याच दरम्यान कोरोनाचा टप्पा आला. मोठं केंद्र असणाऱ्या फ्रँकफर्टमधून भारतीयांना माघारी आणलं जात होतं. कोरोना काळात विविध भारतीय संघटनांच्या सहकार्याने जर्मनी मध्ये अडकून पडलेल्या अनेक भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मदत पुरवली. एकीकडे तिथं असणाऱ्या भारतीय नागरिकांना मदत पोहोचवणं आणि दुसरीकडे गरज असलेल्या भारतीयांना मायदेशी पोहोचवणं अशी दोन्ही कामं एकाच वेळी करावी लागत होती. पारकर सांगतात, ‘‘माघारी जायची सोय करून देण्यासाठी अक्षरशः हजारोंनी ई-मेल यायचे. त्यात नेमकं कोणाचं जाणं जास्त गरजेचं आहे, ते ठरवायचं काम अवघड होतं. कोणाकडे आजारपण किंवा मृत्यू झाला असेल, तर त्यांना प्राधान्य द्यायचं, असं काम तेव्हा करावं लागलं.’’
कोरोनाकाळातच त्यांच्याकडे अंगोलाच्या राजदूत म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली गेली. भारताचे आणि अंगोलाचे राजकीय आणि आर्थिक संबंध सुधारण्यासाठी काम करत आहेत. खऱ्या अर्थाने ग्लोबल महाराष्ट्र त्या जगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.