नाकारलेल्या कर्जानं इतिहास घडला...

एखादी छोटीशी घटनाही संपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊ शकते. सुधीर कदम यांच्या बाबतीत हे १०० टक्के खरं ठरलं. मुंबईत सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून रमलेले कदम हे आज सिनेसृष्टीबरोबरच अनेक स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन करत आहेत.
Sudhir kadam
Sudhir kadamSakal
Summary

एखादी छोटीशी घटनाही संपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊ शकते. सुधीर कदम यांच्या बाबतीत हे १०० टक्के खरं ठरलं. मुंबईत सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून रमलेले कदम हे आज सिनेसृष्टीबरोबरच अनेक स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन करत आहेत.

- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com

एखादी छोटीशी घटनाही संपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊ शकते. सुधीर कदम यांच्या बाबतीत हे १०० टक्के खरं ठरलं. मुंबईत सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून रमलेले कदम हे आज सिनेसृष्टीबरोबरच अनेक स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन करत आहेत. सुधीर कदम लहानाचे मोठे झाले ते मुंबईत. वडील चित्रपटसृष्टीत रमलेले. साहजिकच वडिलांची इच्छा होती, कदमांनीही आपल्यासारखंच चित्रपटसृष्टीत यावं. सुधीर कदम यांनी बालकलाकार म्हणून कामही केलं; पण कदम यांच्या आईला मात्र हा मार्ग मान्य नव्हता. वडिलांचा संघर्ष पाहून कदम यांच्या आईने त्यांना आधी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. कदम यांनी तो ऐकला आणि शिक्षण घेतलं. कुठून, तर थेट आयआयटीमधूनच. अर्थात, आयआयटी हा प्रकारदेखील कदम यांना माहीत नव्हताच. कदम सांगतात, ‘‘आयआयटी काय आहे, हे मला माहीतच नव्हतं. आमच्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज एकच होतं आणि ते म्हणजे व्हीजेटीआय. पण, माझा मुळात इंजिनिअरिंग करायचा प्लॅन नव्हता. मी बी.एस्सी. करत होतो. तेव्हा घर लहान होतं म्हणून मी लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जायचो. तिथं एक दिवस काही मुलं फॉर्म भरत होती. त्यांच्याबरोबर ते भरत आहेत म्हणून मीपण फॉर्म भरला. अर्थातच, क्लास वगैरे काही केला नाही, जाऊन सरळ परीक्षेला बसलो. लोक म्हणाले की, ही परीक्षा कठीण असते; पण पास झालो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असल्याने खरगपूरला गेलो.’’

आयआयटीनंतर कदमांनी मफतलाल कन्सल्टन्सीमध्ये काम केलं. त्याचवेळी यूकेच्या सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट करणाऱ्या एका कंपनीसाठी काम केलं. त्यात त्यांच्या मित्राचा फोन आला की, मी अमेरिकेहून परत येतोय. हातातलं काम सोडून कदमांनी मित्राबरोबर काम करायला सुरुवात केली आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बॅकग्राउंड असणाऱ्या कदमांचा सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. सॉफ्टवेअरच्या एका प्रदर्शनात झेनिथ कॉम्प्युटरचे चेअरमन ते प्रदर्शन बघायला आले. त्यांनी कदमांना नोकरी सोडून बिझनेस करायचा सल्ला दिला. भांडवलाची जबाबदारी घेत कदमांनी थेट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी घ्यावी असं सुचवलं. २९ वर्षांचे कदम गडबडून गेले. त्यांनी घरी जात वडिलांना विचारलं, ‘काय करू?’ वडील म्हणाले, ‘ते तुझ्यावर विश्वास दाखवत आहेत, तर तू जबाबदारी स्वीकारली पाहिजे.’ आणि मग मी जॉइन केलं, असं कदम सांगतात. त्यानंतर १५ वर्ष कदमांनी ही कंपनी चालवली. तुरळक सॉफ्टवेअर कंपनी असणाऱ्या काळात त्यांनी एक्झिक्युटिव्ह डेस्क नावाचं सॉफ्टवेअर प्रसिद्ध केलं. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या सॉफ्टवेअरच भाषांतर झालं, अनेक देशातून पुरस्कार मिळाले, भारतात सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

साहजिकच कदमांनी आता हा व्यवसाय वाढवायचा विचार केला. पण पुन्हा प्रश्न आला पैशांचा. त्यांनी अनेक नेत्यांचे उंबरे झिजवले; पण आश्वासनांशिवाय हातात काहीच पडलं नाही. दरम्यान, आयडीबीआय बँकेने अशा व्यवसायांसाठी कर्जाची योजना सुरू केली, त्यासाठी कदम यांनी अर्ज केला; पण पुन्हा पदरी निराशाच आली. हे का झालं, हे शोधायला त्यांनी अधिकाऱ्यांकडं चौकशी केली तेव्हा त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवलं. कदम थेट त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला गेले. ही भेट अर्थातच शिपायाने नाकारली. अर्थात, म्हणून कदम निघून गेले नाहीत. ‘‘मी आडोशाला उभा राहिलो आणि शिपाई नाहीये असं बघून पटकन त्यांच्या केबिनमध्ये शिरलो. कर्ज का नाकारलं, असा प्रश्न थेट त्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यांनी दिलेलं उत्तर मात्र धक्कादायक होतं. ते अधिकारी मला म्हणाले की, तू महाराष्ट्रीयन आहेस म्हणून तुला कर्ज देत नाहीये, कारण मराठी माणसाला पैशाचं महत्त्व नसतं.’’ कदम सांगतात.

हाच टप्पा कदमांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कदम यांनी भारत सोडायचा निर्णय घेतला. तेव्हा भारतातून अमेरिकेत जाणं अवघड नव्हतं. पण लोक जायचे, तर तिकडं जाऊन नोकरी करण्यासाठी. कदम यांना अर्थातच ते करायचं नव्हतं. भारत एक प्रॉडक्ट बनवू शकतो हे त्यांना सिद्ध करायचं होतं. यासाठी भारत सोडून सिलिकॉन व्हॅलीमध्ये दाखल झाले. तेव्हा भारतीयांना तिकडं मान-सन्मान मिळायचा. तिकडं गेल्यानंतर त्यांना एकापाठोपाठ एक संधीदेखील मिळत गेल्या. ज्या कंपन्यांमध्ये काम करायचे, त्या प्रत्येक कंपनीची भरभराट होत होती. व्हिसाच्या अटीमुळे ग्रीनकार्ड मिळेपर्यंत नोकरी करणं भाग असल्यानं ते काम तर करत होते; पण ते ध्येय नव्हतं. त्यातच कदम वळले ते स्टार्टअप्सना मदत करण्याकडं. २००९ मध्ये आयआयटीमधल्याच एका स्टार्टअपला सल्ला द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि २०११ मध्ये त्याचं स्थित्यंतर (दुसऱ्या मोठ्या कंपनीबरोबर विलीनीकरण होणं) देखील झालं. मग त्यांनी आणखी स्टार्टअपना मदत करायला सुरुवात केली.

आत्तापर्यंत इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सिक्युरिटी अशा जवळपास सहा कंपन्यांचं कदमांनी स्थित्यंतर केलं आहे. सध्या पैसे ट्रान्स्फर करण्याच्या एका स्टार्टअपच्या स्थित्यंतरासाठी कदम प्रयत्न करत आहेत. अर्थात, स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यापेक्षा या माध्यमातून अनेक व्यवसायांना मदत करणं हा एक व्यवसाय असू शकतो, याची त्यांना जाणीव करून दिली ती त्यांचा पत्नीने. आपल्याला जी मदत मिळाली नाही, ती आत्ताच्या धडपडणाऱ्या तरुण मुलांना मिळावी, हा कदमांचा यामागचा प्रमुख हेतू.

कदम म्हणतात, ‘‘स्टार्टअप म्हणजे काय हे लोकांना कळणं महत्त्वाचं आहे. स्टार्टअप आणि बिझनेसपैकी नक्की काय करतोय हे कळणं महत्त्वाचं आहे. स्टार्टअपमध्ये तुम्ही पूर्णपणे नवीन काही करायला हवं. आपल्या डोक्यात १० कल्पना येतात, म्हणजे आपण १० स्टार्टअप सुरू करू शकत नाही. ते लोकांना हवं आहे का, याचा विचार न केल्याने अनेक स्टार्टअप फेल होतात. तुमचा स्टार्टअप किती मोठा होऊ शकतो, याचादेखील विचार करायला हवा. गुंतवणूकदारांकडं तुम्ही तो कसा मांडता हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे.’’

कदमांच्या मते आज भारतात परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय स्टार्टअप्सना सिलिकॉन व्हॅलीच्या पद्धतीने तयार करून जागतिक पातळीवर त्यांना यशस्वी करणे हेच कदम यांचं ध्येय झालंय. व्यवसायाला नाकारलेल्या कर्जाच्या घटनेतून निराश न होता त्यांनी त्याचं संधीत रूपांतर करून अक्षरशः सोनं केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com