esakal | जबरदस्त जपानचे स्पोर्ट्स टूरिझम
sakal

बोलून बातमी शोधा

Saptarang

जबरदस्त जपानचे स्पोर्ट्स टूरिझम

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक (pradnyesh.molak@gmail.com)

‘२१ व्या शतकासाठी २१ धडे’ या पुस्तकात युवाल नोआ हरारी यांनी वर्तमानावर मार्मिक भाष्य केले आहे. जगापुढील तातडीच्या समस्यांची थरारक सफर आपल्याला या पुस्तकात घडते. आपल्याला सातत्याने गोंधळात टाकणाऱ्या बदलाला सामोरं जाताना, व्यक्तिश: आणि सामूहिकपणे आपलं लक्ष केंद्रित करणं हेच एक मोठे आव्हान आहे. या आव्हानांना सामोरं कसं जायचं याचा सोनेरी धागा या पुस्तकात मिळतो. आपण निर्माण केलेलं जग जाणून घेण्यासाठी ‘आपण खरंच सक्षम आहोत का ?’ असा सवालही युवाल नोआ हरारी विचारतात. मित्रांनो, हे मी आज का सांगतोय? याचा पर्यटनाशी काय संबंध? जगायचे कसे, फिरायचे कसे हे सर्व सांगताना याचा काय संदर्भ ? असे प्रश्न तुमच्या मनात येतील. बरोबर आहे... परंतु जग राहील, जग नीट असेल तरच आपण सुखात जगू शकतो हेही गेल्या दीड वर्षात आपल्याला समजलंय. कोरोनाच्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आपण सर्व जगायला शिकलोय अथवा शिकतोय. आता इथून पुढे प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक जगावं लागेल. हवामान बदल होत असताना सृष्टीचा विचार करणं हे प्रत्येकाच्या केंद्रस्थानी असेल तर पर्यटन टिकेल. आपल्या सर्वांना वेगवेगळ्या पातळीवर एकत्र येऊन पुढे जावं लागेल.

अशा अनेक समस्या पुढे येत असताना मी नेहमी विचार करतो की जग एकत्र कुठल्या गोष्टींमुळे येते? तर त्याच्या विविध उत्तरांपैकी प्रमुख उत्तर मला ‘स्पोर्ट्स’ म्हणजेच खेळ हे दिसतं. बघा ना, खेळ सर्वांना एकत्र आणतो याचे मूर्तीमंत उदाहरण आपण नुकतेच जपान येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक २०२० मध्ये बघितलं. आपल्या देशाला यंदा ऑलिम्पिक मध्ये सात मेडल मिळाली आणि येणाऱ्या पिढीला ‘स्टार आयकॉन्स’ ही मिळाले. तसेच पॅरालिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंनी अव्वल कामगिरी करत दहापेक्षा अधिक मेडल्स पटकावले. कुठल्याही परिस्थितीत योद्ध्यासारखी टक्कर द्यायची हे यातून प्रकर्षाने जाणवले. कुठलाही खेळ खूप काही शिकवतो, मैत्रीचे संदेश देतो, शांतता प्रस्थापित करण्यास मदत करतो आणि जगाला एकत्र आणतो हे खरंय. याच खेळांच्या भोवती फिरतं ते म्हणजे ‘स्पोर्ट्स टुरिझम’. आपण ही या स्पोर्ट्स टुरिझमचा कधी न कधी भाग असलो पाहिजे. कुठल्याही खेळाच्या जागतिक स्पर्धांना उपस्थित राहून त्या खेळाचा आस्वाद घेत इतर वेळी तो देश आपण फिरु शकतो. मात्र बऱ्याचवेळा याचा खर्च अधिक होतो. तरीही तरुणांसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे आपण या स्पर्धांमध्ये ‘स्वयंसेवक’ होण्यासाठी अर्ज करुन त्यास पात्र होण्याचा प्रयत्न करायचा आणि जर का आपली निवड झाली तर मात्र आपला ‘स्पोर्ट्स टुरिझम’ करण्याचा उद्देश नक्कीच यातून साध्य होईल. स्वयंसेवक म्हणून कदाचित एक महिन्यासाठी तर कधी सहा महिन्यांसाठी निवड होऊ शकते. अशा वेळेस आपलं ‘बजेट ट्रॅव्हल’ साध्य होऊ शकतं. अर्थात त्यासाठी आपल्याकडे लागणारी कौशल्ये हवी आहेत.

आज पॅरालिम्पिकची सांगता. टोकियो, जपान येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक या दोन्ही स्पर्धा भन्नाट ठरल्या. कोरोना काळात जगाला उभारी देणाऱ्या या स्पर्धा होत्या अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जपान मुळातच अप्रतिम देश आहे. पूर्वेकडे असणाऱ्या या देशात अविश्वसनीय सूर्योदय पहायला मिळतो. जपानची लोकसंख्या बारा करोड ६३ लाख असून टोकियो ही देशाची राजधानी आहे. जपानी ही तेथील प्रमुख भाषा. जपान हे त्या ठिकाणांपैकी एक आहे जे तुमच्या अपेक्षा पूर्ण करते आणि गोंधळातही टाकते.

जपानमध्ये २१ जागतिक वारसा ठिकाणं आहेत. हिमेजी किल्ला (Himeji Castle), क्योटो (Kyoto) व नारा (Nara) येथील ऐतिहासिक स्मारकं ही त्यातील प्रमुख प्रेक्षणीयस्थळं. लोकप्रिय परदेशी आकर्षणांमध्ये टोकियो आणि हिरोशिमा, माउंट फुजी, होक्काइडो (Hokkaido) व ओकिनावा (Okinawa) मधील निसेको (Niseko) सारख्या स्की रिसॉर्ट्स, शिंकान्सेन (Shinkansen) म्हणजेच बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करणे आणि जपानच्या हॉटेल व हॉटस्प्रिंग नेटवर्कचा लाभ घेणे असं नियोजन करु शकता. आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा सांस्कृतिक संसाधने आणि व्यावसायिक प्रवास यासाठी जगात जपान पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. झेन गार्डन, सुमो कुस्तीगीर, बुलेट ट्रेन, गीशा जपानी कलाकार सर्वत्र दिसतात आणि हे सर्व पाहून आपण भारावून जातो. प्रमुख शहरांमध्ये स्ट्रीटवर बियर व नेकटाईसाठी वेंडिंग मशीन बसवलेल्या आहेत.

जपान म्हणजे ‘Endless Discovery’ आहे. जपान पर्यटनासाठी नऊ भागात बघता येतं. क्युशू (Kyushu) हे जपानच्या दक्षिणेत येतं. तिथे खडबडीत भूगोल प्रदेश असून गरम पाण्याचे झरे, निद्रिस्त ते धूरयुक्त ज्वालामुखी व अविकसित किनारे आहेत. चुगोकू (Chugoku) हे गरमीचे ठिकाण असून पर्यटक पाहतात आणि येथील लोकांचे आयुष्य संथ गतीने चालते. शिकोकू (Shikoku) येथे बरीच बेटे फिरता येतात, सायकलिंग करता येते, तसेच आध्यात्मिक ठिकाणी भेटी देऊ शकता. कानसाईतील (Kansai) ओसाका व कोबे या ठिकाणी चमकणारे दिवे पाहता येतात आणि क्योटो व नारा येथील सांस्कृतिक वारसा अनुभवता येतो. टोकाई (Tokai) या भागात वारसा ठिकाणं तर आहेतच सोबत साहसी प्रवाशांसाठी माऊंट फुजी देखील आहे. कानटो (Kanto) भागात टोकियो शहराची मजा घेता येते. येथील स्ट्रीटस् भन्नाट आहेत. आधुनिक शहर कसं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे टोकियो शहर. होकुरीकू शिनेत्सु (Hokuriku Shinetsu) या भागात मस्त समुद्रकिनारे, डोंगर व साहसी प्रकार करता येतात. टोहोकू (Tohoku) भाग खरं तर अनुभवण्यासाठीच आहे. काही प्रमाणात येथे बर्फ पडतो तर काही हटके सण होतात. निश्चितच नवा दृष्टिकोन येथे मिळतो. होक्काइडो हा भाग उत्तर जपान येथे असून नैसर्गिक समृद्ध प्रदेश आहे.

जपानी खाद्यसंस्कृती वेगळी असून सुखद अनुभव देणारी आहे. पिण्यासाठी सोचू व राईस वाईन तेथे प्रसिद्ध आहेत. जपानी लोक एकमेकांना फळं भेट देतात. सतत कामात व्यस्त असणाऱ्या लोकांचा हा देश २१ व्या शतकात सर्व क्षेत्रात अव्वल राहण्याचा प्रयत्न करतो हे दिसून येते. कठीण काळात ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक २०२० झाल्यामुळे जपान नक्कीच वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचला आहे. या ‘जबरदस्त जपान’ला खरंच भेट दिली पाहिजे. युवाल नोआ हरारीने उपस्थितीत केलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलून शाश्वत जगण्याकडे वाटचाल केली पाहिजे. तसेच कुठल्याही प्रवासाचे नियोजन आखताना येणाऱ्या काळात ‘स्पोर्ट्स टुरिझम’चा देखील विचार करुन ते साध्य करता येतं का या दिशेने प्रयत्न केले तर नक्कीच आयुष्य सर्व बाजूंनी समृद्ध होण्यास मदत होईल.

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युलरसेल्फ पद्धतीचे पर्यटक आहेत.’)

loading image
go to top