esakal | सर्वोत्कृष्ट देश: कॅनडा
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोत्कृष्ट देश: कॅनडा

सर्वोत्कृष्ट देश: कॅनडा

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

‘जग हे एक पुस्तक आहे आणि जे प्रवास करत नाहीत ते केवळ एकच पान वाचतात,’ असं सेंट ऑगस्टिन ऊर्फ ‘ऑगस्टिन ऑफ हिप्पो’ यांनी म्हटलंय. आपण कधीही कुठंही गेलो नाही तर जगाकडे बघण्याची आपली समज किंवा दृष्टी मर्यादित राहील असं या वाक्यातून सुचवण्यात आलं आहे. खरं आहे हे! आपण व्यापक झालो तर सर्वांगीण विचार आपल्यात रुजतो आणि त्यातून आयुष्य नीट उमजू लागतं. आपण पैसे तर कमावत राहूच. कुणी जास्त कमावेल, कुणी मध्यम प्रमाणात, तर कुणी कमी...पण ‘क्वालिटी लाईफ’ जगण्याचाही विचार करायला हवा. असं चांगलं, दर्जात्मक आयुष्य जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. ते ‘क्वालिटी लाईफ’ नागरिकांना देण्याची जबाबदारी काही प्रमाणात देशाच्या सरकारची असून, काही प्रमाणात आपल्यालाही त्यासाठी पावलं उचलावी लागतात.

‘आपल्यापैकी सर्वजण संपूर्ण जगात प्रवास करू शकत नाहीत; परंतु केवळ एका दिवसाच्या सैर-सहलीला नवीन ठिकाणी जाणं किंवा अगदी छोट्या प्रवासाला प्राधान्य देणं यामुळेही आपला दृष्टिकोन व्यापक व्हायला मदत होऊ शकते,’ अशा आशयाचं अमेरिकी साहित्यिक मार्क ट्वेन यांचं विधान आहे.

हे असे नामवंतांच्या सुभाषितांचे वेगवेगळे दाखले मी नेहमी देत असतो. कारण, आपण स्वत: प्रवास करू शकतो किंवा आयुष्यात अधिकाधिक प्रवास केला पाहिजे, हा दृष्टिकोन वाचणाऱ्यांच्या मनात निर्माण व्हावा!

माझं गेलं एक-सव्वा वर्षं तर न फिरताच गेलं! या काळात बऱ्याच जणांनी भरपूर वाचन केलं असणार. ‘वाचना’मुळे जशी आयुष्याला दिशा मिळते, तसंच ‘प्रवास’मुळे आयुष्य समृद्ध होत असतं, म्हणून कोरोनाच्या या महामारीतून बाहेर येऊन लवकरच कुठं तरी जाता यावं अशी इच्छा बऱ्याच जणांची आहे. प्रत्येकाची कारणं अर्थातच वेगवेगळी आहेत. कुणाला रोजच्या जीवनातून काही काळ थोडासा विराम हवा आहे, तर वाट्याला आलेल्या दुःखाचा विसर पडावा यासाठी कुणाला भ्रमंती करायची आहे.

नाशिकला राहणाऱ्या मित्राचा काही महिन्यांपूर्वी फोन आला होता. तो सध्या जागतिक शिक्षणक्षेत्रात त्याच्या ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून काम करत आहे. आम्हा दोघांचे जगभरात भरपूर मित्र आहेत, त्यामुळे जगाच्या सद्यस्थितीचा आढावा आम्ही नेहमी घेत असतो.

...तर त्यानं विचारलं : ‘‘तुला यदाकदाचित भारत देश सोडावासा वाटला तर तू कुठल्या देशात स्थायिक होशील? तसंच १८ ते २० या वयोगटातील तुझ्या जवळच्या मित्रांना जर दुसऱ्या देशात कायमचं शिफ्ट व्हायचं असेल तर कुठल्या देशाचं नाव तू सुचवशील?’’

मी क्षणाचाही विलंब न करता ‘कॅनडा’ असं उत्तर दिलं. भारत सोडून दुसऱ्या देशात जायचं अथवा जायचं नाही यावर भरपूर चर्चा होऊ शकते. ‘देश सोडून जावंच,’ असं मी ठामपणे म्हणणार नाही; पण संधी मिळाली तर जायला काही हरकत नाही. अनेकांची यावर मतं-मतांतरं असू शकतात. मात्र, ‘आपण वैश्विक व्हायला हवं,’ अशा मताचा मी आहे. मात्र, ‘कॅनडाच का’ याचा जर विचार केला तर त्याला अनेक कारणं आहेत. तुलनेत इतरही काही देश चांगले आहेतच; पण आज मला वायव्येकडील शेवटचं टोक असणाऱ्या व एकूण क्षेत्रफळानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या देशाबद्दल, म्हणजेच कॅनडाबद्दल, सांगायचंय...

‘यूएस न्यूज ॲँड वर्ल्ड रिपोर्ट’ या संस्थेनं ‘बीएव्ही ग्रुप’ आणि ‘व्हार्टन विद्यापीठा’च्या संयुक्त विद्यमाने २०२१ मधल्या सर्वोत्कृष्ट देशांच्या रॅँकिंगविषयीचा अहवाल नुकताच, म्हणजे ता. १३ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केला आहे.

सन २०१६ पासून नियमितपणे ७८ देशांचं सर्वेक्षण केलं जातं. या सर्वेक्षणात चपळता (Agility), उद्योजकता (Entrepreneurship), जीवनविषयक गुणवत्ता (Quality of Life), मूव्हर्स (Movers), सामाजिक उद्देश (Social Purpose), सांस्कृतिक प्रभाव (Cultural Influence), व्यवसायासाठी प्रोत्साहन (Open for Business), सत्ता (Power), साहस (Adventure) व वारसा (Heritage) अशा मापदंडांचा समावेश आहे. या रॅंकिंगनुसार ‘एकूणच सर्वोत्कृष्ट देश’चा किताब या वर्षी कॅनडानं पटकावला आहे. सन २०१६ मध्ये पहिला क्रमांक जर्मनीनं मिळवला होता, तर सन २०१७ ते २०२० मध्ये सलग चार वर्षं हा पहिल्या क्रमांकाचा किताब स्वित्झर्लंडकडे होता. भारत या यादीत सलग दोन वर्षं २५ व्या क्रमांकावर आहे. थोडक्यात, जागतिकीकरणामुळे आपल्या भौतिक सीमांच्या पलीकडेही सर्वच देशांचं अस्तित्व आणि महत्त्व आता वाढलेलं आहे.

कॅनडात प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं जातं व स्वातंत्र्यही असतं, त्यामुळे जगातील भरपूर लोक तिथं स्थलांतरित होत आहेत. विशेष म्हणजे, तरुणांसाठी तर या देशानं गेल्या काही वर्षांपासून त्यांची दारं कायम उघडी ठेवली आहेत. शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठीचं सर्वोत्तम पर्यावरण कॅनडात आहे.

ओटावा ही या देशाची राजधानी असून लोकसंख्या आहे तीन कोटी ७६ लाख. इंग्लिश व फ्रेंच या प्रमुख भाषा आहेत. ९० टक्के लोकसंख्या ही अमेरिकी सीमांच्या सरासरी १०० किलोमीटर अंतरावर वास्तव्य करते. कॅनडामध्ये बहुसांस्कृतिक समाज राहतो, ज्यात ब्रिटिश, फ्रेंच, आशियाई आणि जगातील जवळपास सर्व ठिकाणचे लोक कमी-अधिक प्रमाणात राहतात. ‘इंडो-कॅनेडियन’ लोकसंख्येचा विचार केला तर १४ लाख लोक तिथं आहेत. म्हणजेच भारतीय वंशाचे किंवा भारतीय असे एकूण लोकसंखेच्या चार टक्के लोक तिथं आहेत, या चार टक्क्यांपैकी दोन टक्के लोक पंजाबी आहेत. बहुसंख्य भारतीय हे टोरांटोत राहतात. कॅनडामध्ये कुठंही मोकळंढाकळं जगता येतं हे त्या देशाचं वैशिष्ट्य. कॅनडानं स्वत:ची प्रतिष्ठा जपत एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे.

युकॉनमधील क्लुआने नॅशनल पार्कच्या हिमनदीपासून ते नोव्हा स्कॉशियाच्या केप ब्रेटन हायलॅंडपर्यंतचं तिथलं नैसर्गिक सौंदर्य आफाट आहे. ज्याला आपल्याकडे ग्रामीण भाग असं म्हटलं जातं तशी तिकडची ‘कंट्रीसाईड’ तर भन्नाट आहेच;

हालचालींनी, घटना-घडामोडींनी भरलेली जितीजागती किती तरी शहरं कॅनडात आहेत. नायगारा धबधब्याचे नयनरम्य दृश्य, व्हिसलरचा पर्फेक्ट स्की स्पॉट, जागतिक वारसास्थळांच्या यादीतलं क्यूबेक हे ‘ओल्ड टाउन’, जलक्रीडाप्रेमींचं टोफिनो, रात्री सुंदर दिसणारी टोरांटोची स्कायलाइन, बे ऑफ फंडी, कॅपिलिनोचा हलता पूल, बॅंफ राष्ट्रीय उद्यान, प्रिन्स एडवर्ड आयलंड, व्हॅंकुव्हर शहर... अशी ‘एक से बढ़कर एक’ पर्यटनस्थळं कॅनडात आहेत. काळ्या व ग्रिझली अस्वलांसह इतर वन्य प्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे. ट्रेकिंगसाठी व इतर साहसी खेळांसाठीही बरीच ठिकाणं आहेत. ब्रिटिश कोलंबियन नानिमो शहरात दरवर्षी ‘बाथटबची शर्यत’ असते. ठरवून दिलेलं अंतर बाथटबपासून तयार केलेल्या बोटींमधून वेगानं पार करायचं असतं. विविध प्रकारच्या वाईन्स, समुद्री खाद्य, फ्रेंच पदार्थ ‘पुतीन’ व ‘मेपल सरबत’ हा तिथल्या दैनंदिन खाद्यसंस्कृतीचा भाग आहे.

कॅनडा हा देश अतिशय मोठा असून निसर्गसौंदर्याची समृद्ध अशी ती भूमी आहे. तिथं सर्व ऋतू अनुभवता येतात. अत्यंत विकसित, प्रगत अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान तिथं आहे. मानवी विकास निर्देशांकही जास्त असणाऱ्या अशा देशात एकदा जायलाच हवं. तर मित्रांनो, जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या भटकंतीबाबत उशीर करत असाल किंवा प्रवास करण्यास टाळाटाळ करत असाल तर फेरविचार करा....आणि आयुष्यातील एखादा प्रवास हा ‘लाईफ-चेंजिंग’ अनुभव ठरू शकतो हे कधीही विसरू नका!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

loading image