esakal | झुंजार क्यूबा
sakal

बोलून बातमी शोधा

Cuba Country

झुंजार क्यूबा

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

असं समजा की तुम्ही काही कामानिमित्त किंवा भ्रमंतीसाठी महाराष्ट्रात फिरताय. एक तर तुम्ही आतापर्यंत ग्रामीण भागातून पुण्या-मुंबईला किंवा औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूरला गेला आहात, नाहीतर मोठ्या शहरातून विदर्भ-मराठवाड्यात किंवा कोकणात गेला आहात. पहिल्यांदाच त्या ठिकाणी जात असल्यामुळे तुम्हाला रस्ते नीट माहीत नाहीत अथवा कुठला तरी पत्ता सापडत नाहीये. मग अशा प्रसंगी एक तर तुम्ही कुणाला तरी पत्ता विचाराल, नाहीतर गुगल मॅप्स वापराल आणि तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी पोहोचाल. हो ना? तर मग देशातील विविध भागांत व जगातील इतर देशांतही असंच फिरायचं असतं...! तीन-चार दशकांपूर्वी जी अवघड परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. जग छोटं झालंय आणि सोपंही झालंय. फक्त मनात भीती नव्हे, तर आत्मविश्वास पाहिजे. तंत्रज्ञानानं सर्व काही सोपं करून टाकलंय. मग तुम्ही म्हणाल, ‘अहो पण भाषेची अडचण येते ना...’ त्यावरही उत्तर असं की, अनुवाद करणारी विविध ॲप्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या भाषेत बोलायचं नि संबंधित ॲप जगातील कुठल्याही भाषेत अनुवाद करतं. संपूर्ण जग आता एका बोटाच्या आधारावर फिरता येऊ शकतं. थोडक्यात काय तर, Everything is just one click away!

आवश्यकता आहे ती जग फिरण्याच्या दृष्टीची आणि प्रबळ इच्छाशक्तीची!

कुठल्याही देशाला दूरदर्शी व प्रबळ इच्छाशक्ती असणारा नेता लाभला की त्या देशाचा कायापालट होतो याची अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यातलं एक उदाहरण म्हणजे क्यूबा! सन १८०० च्या उत्तरार्धात अमेरिकेनं तिथं वसाहती स्थापन केल्यापासून ते १९५३-१९५९ च्या ‘क्यूबन क्रांती’पर्यंत क्यूबा या देशाचा प्रवास खडतर राहिला. फिडेल कॅस्ट्रो, चे गवेरा व राऊल कॅस्ट्रो हे क्यूबन क्रांतीचे प्रणेते. पुढं १९७६ ते २००८ पर्यंत दूरदर्शी फिडेल कॅस्ट्रो यांनी क्यूबाचं नेतृत्व केलं. देशात बदल घडला व विकास होऊ लागला.

क्यूबा हा कम्युनिस्टांचा देश आहे. या देशावर अनेकदा आर्थिक संकटं आली आहेत; पण त्यांची लढाऊ वृत्ती कायम टिकून असते. विशेष म्हणजे, तिथं खासगी रुग्णालयांना परवानगी नसून तिथली आरोग्यसेवा ही क्यूबाच्या नागरिकांना सरकारतर्फे विनामूल्य आहे. तिथल्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान ७२ वर्षं आहे. सध्याच्या कोरोनाच्या महामारीचा सामना या देशानं खूप चांगल्या पद्धतीनं केला.

क्यूबा हा द्वीपसमूहांचा सर्वात मोठा असा जगातील आठवा देश असून त्याची लोकसंख्या एक कोटी १३ लाख आहे. हवाना (Havana) ही त्याची राजधानी, तर स्पॅनिश ही मुख्य भाषा आहे.

‘पर्यटनाच्या स्रोताशिवाय आपल्याला पर्यायच नाही,’ अशी क्यूबातील लोकांची भावना आहे. कोरोनाच्या महामारीमुळे तिथल्या पर्यटनात ११ टक्के घट झाली आहे. परिणामी, क्यूबा सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे. क्यूबाची व जगातील इतर अनेक देशांचीही बिकट परिस्थिती लवकरच बदलेल अशी आपण आशा करू या.

सर्जनशील उद्योजकांनी गेल्या शतकापासून अन्न, निवास आणि कला या क्षेत्रांत मोठी प्रगती केली असली तरी पर्यटनाचं क्षेत्र हा तिथल्या अर्थकारणाचा मुख्य स्रोत आहे. तिथं वैद्यकीय पर्यटनासाठी विविध देशांतील लोक येतात, तसंच बायकिंग (Biking), डायव्हिंग (Diving), केव्हिंग (Caving) व गिर्यारोहण (Mountaineering) हे प्रकारही तिथं आता झपाट्यानं विकसित होत आहेत.

हवाना हे शहर आर्किटेक्चर, लाईव्ह म्युझिक व समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिथली संस्कृती अनुभवण्यासाठी ‘ओल्ड हवाना’ इथं जायला हवं. हबाना विएजा (Habana Vieja) हे पारंपरिक वसाहतींचं ‘युनेस्को’नं मान्यता दिलेलं वारसास्थळ आहे. अशा ठिकाणी पायी फिरण्यात फार मजा असते. वारादेरो (Varadero) इथं भव्य गोल्फ कोर्स आणि पार्क्स आहेत. स्पॅनिश वसाहती व ऐतिहासिक संग्रहालयं ही सँटिॲगो-द-क्यूबा (Santiago de Cuba) इथं पाहायला मिळतात. मातांझास (Matanzas), कायो गुइलर्मो (Cayo Guillermo), बाराकोआ (Baracoa), कायो कोको (Cayo Coco) इत्यादी ठिकाणी सुंदर असे समुद्रकिनारे आहेत व तिथं विविध ‘वॉटर-स्पोर्टस्’चा आनंद घेता येतो. वाल्ले-द-विनालेस (Valle de Vinales) हे थोडं शांत ठिकाण असून तिथं जंगलभाग तर आहेच; पण शेतीही उत्तम होते. सी-फूड आणि पारंपरिक व म्युझिक फेस्टिव्हलचा हा देश आहे, असं म्हटलं तरी चालेल. याशिवाय, खाद्यसंस्कृतीपैकी इथले अजियको स्ट्यू (Ajiaco Stew), बिअर, मक्याचे व बटाट्यांचे विविध पदार्थ स्वादिष्ट असतात. इथले बहुसंख्य लोक सिगार ओढताना दिसतात. बेसबॉल हा त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे, त्यामुळे गल्ली-बोळात हा खेळ खेळला जाताना दिसतो. रंगीबेरंगी व्हिटेंज गाड्यांचं इथं एक वेगळंच आकर्षण आहे, म्हणून प्रवास करताना त्यांचं सतत दर्शन घडतं. एवढंच नव्हे तर, त्या क्लासिक गाड्यांमधून पर्यटन करून वेगळाच अनुभव आयुष्यभरासाठी पर्यटकांना मिळतो. दक्षिण अमेरिका किंवा उत्तर अमेरिकेतील क्यूबा खऱ्या अर्थानं संस्कृती, निसर्ग, इतिहास आणि परंपरा यांनी समृद्ध असा देश आहे. कॅरेबिअन पट्ट्यातील विविध देश हे खरं ‘बॅकपॅकिंग’चे देश आहेत असं मला नेहमी वाटतं. तिथं ‘सोलो’च गेलं पाहिजे (कुणी सोबत असलं तरी तशी हरकत काहीच नाही म्हणा). फक्त तिथं फसवणूक होऊ शकते म्हणून विशेष काळजी घेतली पाहिजे.

तर मित्रांनो, आयुष्यात जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, तुम्ही निराश व्हाल, आत्मविश्वास गमावून बसाल किंवा एकटं वाटेल ना... तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांचं ‘एकला चालो रे’ हे गीत वाचा अथवा ऐका. फार ताकद आहे या काव्यात. संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात उभं राहिलं तरी तुम्ही तुमची कथा, तुमचे विचार, तुमचा दृष्टिकोन एकटेच सांगत राहा व तुमचा जगण्याचा प्रवास एकटेच करत राहा...

हे गीत तुम्ही कुठल्याही प्रसंगी ऐकू शकता. ते तुम्हाला नक्कीच ऊर्जा देईल. ‘बजेट ट्रॅव्हल’च्या अनेक गोष्टी मी या सदरातून सांगतच असतो; पण आज मला ‘डू इट युवरसेल्फ’बद्दलही तुम्हाला सांगायचं होतं म्हणून हे सगळं सांगितलं. बघा... पटलं तर विचार करा, स्वीकारा, आचरणात आणा, प्रवास करा अन् इतर कुणाला तरी प्रेरितदेखील करा...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

loading image