esakal | पर्यावरणप्रिय डेन्मार्क
sakal

बोलून बातमी शोधा

Denmark

पर्यावरणप्रिय डेन्मार्क

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

‘जागतिक पर्यावरणदिन’ काल (ता. पाच जून) होऊन गेला, तर आज (ता. सहा जून) ‘शिवराज्याभिषेकदिन’ आहे. याच दिवशी सन १६७४ ला शिवराय हे छत्रपती शिवाजीमहाराज झाले. त्यांचं शेतीबद्दलचं व पर्यावरणाबद्दलचं धोरण अतिशय दूरदर्शी व शिस्तबद्ध होतं. याचे अनेक दाखले शिवाजीमहाराजांच्या आज्ञापत्रांत व इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या कोरोनामहामारीत पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला पुन्हा नव्यानं कळलं आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण कमी झाल्यानं पर्यावरण सुधारलं, जंगलांची स्थिती सुधारली, पशू-प्राणीही जास्त आनंदी दिसू लागले याविषयीचे किती तरी व्हिडिओ व्हायरल झाले.

महामारीच्या सध्याच्या या दुसऱ्या लाटेत मात्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. म्हणजेच काय तर, पर्यावरणाबद्दल पुन्हा एकदा नव्यानं चर्चा होऊ लागली. पुढील पिढ्यांसाठी आपल्याला काही द्यायचंच असेल तर असंख्य झाडं लावू या, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घेऊ या.

असं केलं तरच शिवाजीमहाराजांचे विचार आपल्याला खऱ्या अर्थानं समजले आहेत असं म्हणता येईल. आपण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या. जागतिक पर्यावरणदिनाला व शिवराज्याभिषेकदिनाला तेच खरं अभिवादन असेल असं मला वाटतं.

पर्यटन, फिरणं, आयुष्य जगणं, पर्यावरण, इतिहास, राजकारण, अर्थकारण, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा इत्यादी गोष्टी या हातात हात घालून पुढं घेऊन जायच्या असतात. जसा ‘जीडीपी’ (Gross Domestic Product) देशासाठी महत्त्वाचा असतो तसाच ‘एचडीआय’ही (Human Development Index) महत्त्वाचा असतो, तरच कुठल्याही देशाचा खऱ्या अर्थानं विकास होतो. मात्र, याला बऱ्याच गोष्टींची जोड हवी. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘ईपीआय’ म्हणजेच (Environmental Performance Index).

गेल्या काही वर्षांत व येणाऱ्या काळात हा घटक महत्त्वाचा ठरणार असून त्याकडे प्रत्येक देशानं लक्ष दिलं पाहिजे. आज आपण त्याच्याशी निगडित एका आगळ्यावेगळ्या देशाबद्दल जाणून घेणार आहोत. सन २००२ पासून संयुक्त राष्ट्रांच्या ‘Millennium Development Goals’ अंतर्गत येल विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम व युरोपियन कमिशन द्वारे Environmental Performance Index (ईपीआय) काढला जातो आणि त्यात सन २०२० मध्ये ८२.५ स्कोअर मिळवून अव्वल ठरलेला देश म्हणजे ‘पर्यावरणप्रिय डेन्मार्क’!

डेन्मार्क हा उत्तर युरोपमधील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसित असून त्याचं दरडोई उत्पन्न अत्युच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. डेन्मार्कची लोकसंख्या ५६ लाख असून कोपनहेगन ही राजधानी आहे. तेच सर्वात मोठं शहरही आहे. डॅनिश ही तेथील प्रमुख भाषा आहे. डेन्मार्कचा विशेष म्हणजे तेथील व्यवस्थितपणा आणि सहजपणे दळणवळण करता येऊ शकेल अशी साधी-सुंदर-छान ठिकाणं. तिथं जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा देश ‘यूजर-फ्रेंडली’ वाटतो. डेन्मार्कचा मुख्य भूप्रदेश ज्यूटलॅंड नावाचा द्वीपसमूह आहे. याशिवाय स्यीलंड, फुनेन, व्हेंडिसिसेल, लोलॅंड, फाल्स्टर आणि बॉर्नहोमसह शेकडो छोटी बेटं ही डेन्मार्कचा भाग आहेत. फेरो द्वीपसमूह व ग्रीनलॅंड हे डेन्मार्कच्या आधिपत्याखालील प्रदेश आहेत. तेथे स्थानिक स्वराज्य असून हे दोन्ही भाग युरोपीय संघाचे भाग नाहीत. डेन्मार्कचा इतिहास तिथं काटेकोरपणे जपला जातो. स्थापत्यशास्त्र, देशातील सामाजिक घडामोडी, विनात्रास चालणारी सार्वजनिक वाहतूक व डोळ्यांत भरणारी अप्रतिम हॉटेल्स या सर्व गोष्टी पर्यटकांना विशेष आकर्षित करतातच; परंतु या सर्व बाबींकडे सरकारचं जातीनं लक्ष असतं. या देशात जाण्यासाठी मे ते सप्टेंबर हा कालावधी उत्तम आहे.

डेन्मार्कनं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘सामाजिक आणि कामगार-बाजार सुधारणा’ केल्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, देशाचा झपाट्यानं विकास झाला व आज त्याची ओळख एक ‘कल्याणकारी देश’ म्हणून आहे. डेन्मार्कमध्ये संस्कृती, क्रीडा, खाद्यसंस्कृती, पेंटिंग व फोटोग्राफी, साहित्य व तत्त्वज्ञान, आर्किटेक्चर व डिझाईन, म्युझिक, मीडिया, मानवी हक्क व पर्यटन या सर्व क्षेत्रांना अनन्यसाधारण महत्त्‍व असून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहनदेखील मिळतं. पर्यटनासाठी हा देश म्हणजे पर्वणीच आहे. बॉर्नहोम (Bornholm) इथं सुंदर समुद्रकिनारे आहेत; परंतु तिथं सायकल किंवा बाईकवर फिरण्याची मजाच वेगळी आहे. रॉस्किल्ड् महोत्सव (Roskilde Festival) हा उत्तर युरोपातील भव्य संगीतमहोत्सव आहे. किमान लाखभर रसिक त्याला उपस्थिती लावतात. त्याच शहरात ‘व्हायकिंग शिप म्युझियम’ व रॉस्किल्ड् चर्च प्रसिद्ध आहे. कोपनहेगन इथं ‘मिशिलिन स्टार’च्या (Michelin Star) जवळ जाणारी अनेक सुप्रसिद्ध हॉटल्स आहेत. त्याच शहरात आर्ट म्युझियम्स, नॉर्डिक क्युझिन्स, हार्बर, पार्क्स व उद्यानं, थिएटर्स व फिल्म आणि नाईटलाईफ या बाबींशी निगडित असंख्य गोष्टी आहेत.

येथील अनुभव हा अविस्मरणीय ठरू शकतो यात वाद नाही. रिब (Ribe) या शहरातील जुने गल्ली-बोळ फार आखीव-रेखीव आहेत, तसंच पक्ष्यांचं ‘वाडेन सी’ राष्ट्रीय पार्क, सन १२५० चं रिब चर्च व ग्लॅड झू हे बघण्यासारखे आहेत. स्केगेन (Skagen) येथील आर्ट म्युझियम, लाईट हाऊस व दुसऱ्या महायुद्धातील बंकरसंग्रहालयही पाहण्याजोगं. रबजर्ग मैल (Rabjerg Mile) येथे सॅंड ड्यून्स (Sand Dunes) म्हणजेच थंड वाळवंटाचा अनुभव घेता येतो. याचबरोबर रोमो (Romo), मोन (Mon), रोन्ने (Ronne), वेज्ले (Vejle), ओडेन्स (Odense), आल्बोर्ग (Aalborg), आऱ्हूस (Aarhus), झीलंड (Zealand) इत्यादी छोटी-मोठी शहरं ही निसर्गरम्य आहेतच. शिवाय कॅम्पिंग, फिशिंग, हायकिंग, संग्रहालयं पाहणं, समुद्रकिनारी मजा व चिंतन करणं, आर्किटेक्चरचं कौतुक करणं अशा अनेक गोष्टी डेन्मार्कच्या विविध भागांत करता येतात. देश तसा छोटा असल्यामुळे संपूर्ण फिरता येऊ शकतो. या देशात तुलनेनं तशी महागाई आहे, म्हणूनच कधीही प्लॅन करताना स्कॅंडिनेव्हियन देशांचा विचार करून एकत्र टूर आखायची, म्हणजे ‘बजेट ट्रॅव्हल’ साध्य करता येईल.

‘जिंदगी वसूल’ हे तुमचं सदर वाचून आम्हाला आनंद मिळतो; परंतु महामारी असल्यामुळे कुठंच जाता येत नाही हे दु:ख आहे,’ अशा आशयाच्या अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया मला येतात.

माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की, मित्रांनो, सध्या संयमी राहणं एवढंच आपल्या हातात आहे. जग फार सुंदर आणि भव्य आहे, त्याकडे बघण्याची आपली दृष्टी तयार झाली पाहिजे. हा वेळ आपण त्यादृष्टीनं खर्च करू या. प्रवासवर्णनं वाचू या, प्रवासाबद्दलचे सिनेमे पाहू या, आपण कुठं पूर्वी भटकंती केली असल्यास त्याबद्दल लिखाण करू या व ट्रॅव्हल ब्लॅाग्ज् बघू या. भविष्यात फिरण्यासाठी आपण आपली तयारी करू या!

पण एक गोष्ट विसरता कामा नये व ती म्हणजे, Environmental Performance Index (ईपीआय) मध्ये आपला भारत १८० देशांपैकी १६८ व्या क्रमांकावर आहे. या पर्यावरणदिनानिमित्त आपण अधिक झाडं लावू या, ती जपू या, जोपासू या व आपल्या देशात पर्यटन कसं वाढेल यावर सतत चर्चा करून काही कृतिशील पावलं उचलू या. या सदरातून जगातील अनेक देशांबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जे जे चांगलं त्या त्या देशांकडून आपल्याला घेता येईल ते ते आपण घेऊ या व एकत्र येऊन पुढं जाऊ या. त्याबरोबरच कुठं तरी स्वत:ही छोटीशी कृती करून आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावू या. हे सारं करणं म्हणजेसुद्धा ‘जिंदगी वसूल’ करणंच असतं, मित्र हो...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)