esakal | आनंदी फिनलंड
sakal

बोलून बातमी शोधा

Finland

आनंदी फिनलंड

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

तुमच्या आयुष्याचे केवळ काही महिने किंवा काही वर्षेच शिल्लक राहिली आहेत, अशी कल्पना करा. अशा वेळी या थोडक्या कालावधीत तुम्ही काय कराल? त्याचं नियोजन कसं कराल? कुठली स्वप्नं पूर्ण कराल? प्रत्येकजण आपापल्या परीनं उत्तरं शोधेल. वेगवेगळ्या पद्धतीनं याकडे बघता येईल. मात्र, मला वाटतं की दोन प्रमुख गोष्टी बहुसंख्य लोकांच्या बाबतीत घडतील. एक म्हणजे, त्या विचारानं बरेच जण खचून जातील आणि दुसरं म्हणजे, ‘प्रत्येक दिवस शेवटचा’ असं समजूनही काही जण हा काळ भरभरून जगतील. मला तर भरभरून जगायलाच आवडेल...पण सध्या कोरोनामहामारीला संपूर्ण जग सामोरं जात आहे व या महामारीनं आपल्या सर्वांना खूप काही शिकवलंय.

कोरोनाचा तडाखा असंख्य कुटुंबांना बसला असून, अनेकांना जीव गमावावा लागला आहे. या अशा परिस्थितीला सामोरं जाणं हे खूपच वेदनादायक असतं. तरीही आपल्याला नेहमीच सकारात्मक राहून जगावं लागेल; पण मग एवढी सकारात्मकता आणायची तरी कुठून? इतर लोक ज्या परिस्थितीतून जात आहेत ते आपण विविध वृत्तपत्रांमधून, विविध वृत्तवाहिन्यांमधून वाचतो-पाहतो. अशा लोकांहून आपण थोडेफार तरी बऱ्या परिस्थितीत आहोत याचं समाधान मानलं पाहिजे. हीच सकारात्मकता!

आपण काही छंद जपले पाहिजेत. पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा सिनेमे पाहिले पाहिजेत. त्यातून आपल्याला सकारात्मकता मिळू शकते. खरं तर जगण्याचा ‘नाद’ असला पाहिजे; मग ही नैराश्याची लढाई जिंकून आपण ‘जिंदगी वसूल’ करण्याकडे वाटचाल करायला लागू. थोडं अवघड तर नक्कीच असणारे; पण प्रयत्न तर करू या...!

सन २००७ मध्ये ‘द बकेट लिस्ट’ नावाचा एक भन्नाट सिनेमा आला होता. जॅक निकोल्सन व मॉर्गन फ्रीमन या दोघांचा त्यात उत्तम अभिनय आहे. एक अब्जाधीश असतो, तर दुसरा कार मेकॅनिक. दोघंही विविध आजारांशी झुंज देत असतात आणि आजारांमुळे दोघांचेही काही महिनेच उरलेले असतात. खचून जाण्याऐवजी ते भरभरून जगायचं असं ठरवतात. मरण्यापूर्वी आयुष्यात काय करायचंय याची यादी ते करतात अन् तिला ‘द बकेट लिस्ट’ असं नाव ते देतात. त्या लिस्टनुसार, दोघं ‘वर्ल्ड टूर’ आखतात आणि तो बेत अमलातही आणतात. तुम्हीदेखील कधी तरी अशी ‘बकेट लिस्ट’ केली असेल ना? नसेल केली तर करा आणि तसं जगण्याचा प्रयत्न करा...या महामारीनंतर तेवढं तरी आपण नक्की करू या! काही लोकांनी हा सिनेमा पाहिला असेल. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर पाहावा. जगण्याचे धडे या व अशा अनेक सिनेमांमधून, प्रवासातून, पुस्तकांतून व अनुभवातून मिळतात. सरतेशेवटी, आपण खूश असलो पाहिजे, म्हणजेच काय तर, Happiness मिळणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत.

आज पुन्हा एक वेगळा विषय तुमच्यासमोर मांडायचाय. दर वर्षी संयुक्त राष्ट्रांकडून ‘World Happiness Report’ जाहीर केला जातो. सन २०२१ च्या अहवालात १४९ देशांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात फिनलंड हा देश २०१८ पासून सलग चौथ्या वर्षी अव्वल ठरला. हा देश युरोपात असून त्याच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, तर पूर्वेला रशिया आहे. जीडीपी, सामाजिक पाठिंबा, आयुर्मान, स्वातंत्र्य, औदार्य, भ्रष्टाचार व इतर काही मापदंडांचा विचार अशा प्रकारच्या अहवालांमध्ये केला जातो. यंदाचा अहवाल मार्च महिन्यात जाहीर झाला आणि तो वेगळा असण्याचं कारण म्हणजे, गेल्या वर्षीपासून ज्या कोरोनामहामारीला जग तोंड देत आहे, त्यादृष्टीनं या अहवालाबाबत विचार करण्यात आला. सर्व देशांच्या सरकारांनी कसं काम केलं आहे हेही यात पाहण्यात आलं आणि मग कुठला देश सर्वात जास्त ‘आनंदी’ आहे हे घोषित करण्यात आलं. दहाव्या स्थानी ऑस्ट्रिया, पुढं न्यूझीलंड, लक्झेम्बर्ग, स्वीडन, नॉर्वे, नेदरलॅंड्स, आईसलंड, स्वित्झर्लंड, डेन्मार्क व अर्थातच World’s Happiest Country म्हणून फिनलंडनं बाजी मारली. दुर्दैवानं, या अहवालात भारत मात्र १४९ देशांपैकी १३९ व्या स्थानावर आहे.

फिनलंडची लोकसंख्या ५५ लाख असून तिथं फिन्निश किंवा स्विडिश या भाषा प्रमुख आहेत. हेलसिंकी (Helsinki) हे देशातील सर्वात मोठं शहर व राजधानी आहे. या देशाला डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात भेट दिली तर प्रचंड थंडी, बर्फ व नॉर्दन लाईट्स (Northen Lights) अनुभवायला मिळतात. मे ते सप्टेंबर हा कालावधीही फिरण्यासाठी उत्तम आहे. फिनलंडमधील नागरिक अतिशय शांत स्वभावाचे आहेत. ‘एकमेकांशी जास्त बोलावं लागू नये म्हणून याच देशातील नागरिकांनी ‘टेक्स्ट मेसेज’ सुरू केले असतील,’ असं गमतीनं म्हटलं जातं. या देशानं सन १९१७ रोजी रशियाकडून स्वातंत्र्य मिळवलं. सन १९५० पर्यंत फिनलंड कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जात असे.

दुसऱ्या महायुद्धानंतर फिनलंडचा झपाट्यानं विकास झाला. गेल्या काही दशकांत तिथं पर्यटनातही वाढ झाली. फिनलंड हा एक विशाल क्षेत्रफळाचा आणि विरळ लोकसंख्येचा देश आहे; परंतु एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. सर्व काही घड्याळाच्या काट्यावर आहे तिथं. हवाईमार्ग, रेल्वे आणि रस्ते यांद्वारे परिवहनाचं सर्वसमावेशक जाळं आहे. पर्यावरणाला अनुकूल असे पर्याय निवडावेत असं तेथील पर्यटनधोरण प्रवाशांना सुचवतं. एवढंच नव्हे तर, ‘Slow travel’ is the best way to travel असाही प्रचार त्या धोरणानुसार केला जातो.

फिन्निश लॅपलॅंड (Finnish Lapland) येथे ॲरोरा बोरिएलिस (Aurora Borealis) म्हणजेच नॉर्दर्न लाईट्स (Northern Lights) कमी-जास्त प्रमाणात वर्षातून २०० दिवस पाहायला मिळतात. याच भागात मे ते ऑगस्ट महिन्यात ‘मिडनाईट सन’ (Midnight Sun) अनुभवायला मिळतो. आकाशाच्या आश्चर्यकारक विविध रंगच्छटा पाहायला मिळतात. शरीराला व मनाला आराम मिळण्यासाठी फिनलंडमध्ये पारंपरिक पद्धतीनं सौना थेरपी दिली जाते. त्याला ‘फिन्निश सौना’ (Finnish Sauna) असं म्हटलं जातं. तब्बल वीस लाख सौना संपूर्ण देशात आहेत. क्योपीओ (Kuopio) इथं जगातील सर्वात मोठा ‘Smoke Sauna’ आहे. देशात छोटी-मोठी मिळून जवळपास एक लाख ८८ हजार तळी आहेत, त्यामुळे फिनलंडला ‘लॅंड ऑफ थाउजंड लेक्स’ असंही म्हटलं जातं. लेक इनारी (Lake Inari) व लेक साईमा (Lake Saimaa) ही तळी जगप्रसिद्ध असून तिथं सौना (Sauna), मासेमारी

(Fishing), कॅनॉईंग (Canoeing), रोविंग (Rowing) व सेलिंग (Sailing) करता येतं. बाल्टिक सी आयलंड (Baltic Sea Island) व साईमा भागात हजारो प्रकारचे वन्यजीव, प्राणी-पक्षी आढळतात. तिथं अंदाजे १५०० तपकिरी अस्वलं आहेत व त्यांना ‘किंग ऑफ द फिन्निश फॉरेस्ट’ असं म्हटलं जातं. लेक साईमा इथं World’s rarest seal, the Saimaa Ringed Seal हा पाण्यातील प्राणी पाहायला मिळतो. या प्राण्याची संख्या संवर्धनानंतर आता ३०० च्या आसपास झाली आहे. बर्फाळ भागात स्कीइंग, हस्की व रेनडिअर राईड्स, स्नोमोबायलिंग व आईस-फिशिंगचा आनंद घेता येतो. सांताक्लॉजचं गावही तिथं आहे. लहान मुलांचं हे खास आकर्षण. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही अफलातून वास्तू तिथं पाहायला मिळतात. कॉफीचं सर्वाधिक सेवन होणाऱ्या देशांमध्येही फिनलंडची गणना होते.

आपण भारतात किंवा महाराष्ट्रात जशी एसटीची बससेवा किंवा रेल्वेची सेवा वापरून प्रवास करतो, तशीच परदेशांमध्ये; विशेषत: युरोपात लोकल परिवहन सेवा अप्रतिम व स्वस्त आहे. या सेवेद्वारे प्रवास केला तर युरोपात नक्कीच बजेट ट्रॅव्हल करता येतं. त्याशिवाय कुठल्याही देशात स्वादिष्ट ‘लोकल स्ट्रीट फूड’ मिळतंच. त्यातही पैशांची बचत होते. आणि हे सर्व करत असताना अगोदरच थोडा रिसर्च करून परिपूर्ण नियोजन केलं तर झाला मग तुमचा ‘डू इट युवरसेल्फ’ प्रवास! आपण सर्वजण महामारीतून जात असताना ‘बकेट लिस्ट’ करायला विसरू नका. कारण, आयुष्याचा तसा काही भरोसा नसतो. एरवी जगतानाही हीच वस्तुस्थिती असते खरं तर. मात्र, अशा महामारीच्या काळात जीवनाचं क्षणभंगुरत्व प्रकर्षानं जाणवतं एवढंच.

तेव्हा तुमची ‘बकेट लिस्ट’ अर्थात् तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या इच्छांची यादी तयार करा...ती यादी अमलात आणण्याच्या दिशेनं पावलं टाकायला लागा...जग फिरण्याचा प्रयत्न करा...आनंदाचे छोटे छोटे क्षण शोधा...ते क्षण भरभरून जगा...इतरांशी हा आनंद शेअर करा व कायम साहसी राहून नावीन्याचा शोध घेत प्रवास करा. असं केल्यास ‘बजेट ट्रॅव्हल’ तर होईलच होईल; परंतु ‘जिंदगी वसूल’देखील होईल...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

loading image