सफर छोट्याशा देशाची!

मित्रांनो, नॉर्वेचा गन्नर गारफोर्स (Gunnar Garfors) हा ४६ वर्षीय एक अवलिया प्रवासी आहे. ‘No country deserves to be visited only once,’ असं त्याचं म्हणणं आहे.
Kiribati Country
Kiribati CountrySakal

आयुष्यात जवळपास सर्वच गोष्टी कधी ना कधी ‘पहिल्यांदा’ घडतात. काही गोष्टी आपण ठळकपणे म्हणतो की, ही गोष्ट मी आयुष्यात ‘पहिल्यांदाच’ केली आणि त्या गोष्टीचा आपण मनमुराद आनंद लुटतो. प्रत्येक गोष्ट ‘सेलिब्रेट’ करणं तसं शक्य होत नाही. तरीही काही गोष्टी आपल्याला ‘सेलिब्रेट’ करता आल्या तर त्याच्या आठवणी आपल्यासोबत कायमस्वरूपी जोडल्या जातात. काही गोष्टी पहिल्यांदा तरी होतील की नाही याची हमी नसते. आपण प्रवास करताना असं कितीतरी वेळा म्हणतो की, ‘या ठिकाणी मी परत येईन.’ काही वेळेस तिथे जातोही मात्र बहुतांशी तिथे पुन्हा जाणं होत नाही. महाराष्ट्रातील बरेच लोक कोकण, गोवा, लोणावळा किंवा महाबळेश्वरला पुन्हा पुन्हा जातात. जगात कुठेही गेलं, तरीही या वरील ठिकाणी जाण्याची मजा काही औरच आहे.

मित्रांनो, नॉर्वेचा गन्नर गारफोर्स (Gunnar Garfors) हा ४६ वर्षीय एक अवलिया प्रवासी आहे. ‘No country deserves to be visited only once,’ असं त्याचं म्हणणं आहे. जन्मल्यापासून ते २०१३ पर्यंत त्याने जगातील प्रत्येक देशाला भेट दिली. जगातील प्रत्येक देशाला दोनदा भेट देणारा हा पहिला माणूस आहे हे लई भारीये ! या हटके गोष्टीचा वर्ल्ड रेकॉर्ड गन्नर गारफोर्सच्या नावावर आहे. त्यानंतर त्याने ‘पाच खंडातील पाच देश’ त्याने २४ तासात केले आहेत. एवढंच नाही तर २४ तासात त्याने १९ देश केले आहेत. हे दोन्ही वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. काय काय करतात ना लोकं ? आपण जग दोनदा फिरु की नाही सांगता येत नाही परंतु अधिकाधिक देश तर फिरुयात...

फिजी (Fiji), मोनॅको (Monaco), व्हॅटिकन सिटी (Vatican City), तुवालू (तुवालू) व नाऊरु (Nauru) अशा छोट्या देशांबद्दल मी लिहिलं होतं. आज मी तुम्हाला पुन्हा एका छोट्या देशाबद्दल सांगणार आहे. तो देश म्हणजे मध्य प्रशांत सागरात असणारा किरिबाती (Kiribati). या देशाला ‘किरिबास’ असंही म्हटलं जातं. किरिबातीला १९७९ मध्ये इंग्लंडपासून १२ जुलैला स्वातंत्र्य मिळालं. ८११ चौरस किलोमीटर असलेल्या या देशात एक लाख १९ हजार लोकसंख्या आहे. तारावा (Tarawa) ही या देशाची राजधानी आहे. गिल्बर्टीज आणि इंग्रजी इथल्या प्रमुख भाषा आहेत.

विषुववृत्तासह ३३ बेटे आणि कोरल अटोल असं एकत्र भाग मिळून किरिबाती हा देश बनतो. प्रशांत महासागरातील सर्वात कमी ओळखले जाणारे, पांढरे-वाळूचे किनारे आणि रंगीबेरंगी तलाव बघायला मिळतात. किरिबाती हे कमी विकसित देशांपैकी एक आहे, परंतु हे प्रवासासाठी सुरक्षित ठिकाण आहे.

पारंपारिक संस्कृती आणि नृत्यासाठी एक किंवा अधिक बाह्य बेटे ‘एक्सप्लोर’ करण्यासाठी वेळ काढला तर खूप चांगले अनुभव येतात. द्वितीय विश्वयुद्धाच्या आठवणी, बेटांच्या गिल्बर्ट गटाकडे १९४१ च्या हल्ल्यातील अनेक ऐतिहासिक अवशेष आणि किल्ले आहेत. ब्रिस्बेन आणि नाडी, फिजी येथून आठवड्यातून दोनदा विमानं इथं येतात. किरिबातीला ३० दिवसांच्या मुक्कामासाठी पर्यटक व्हिसा आवश्यक नाही.

किरिबाती, त्याच्या एक्वा लगून्स आणि रोमांचक सूर्यास्तांसह वास्तविक जगातील साधेपणासाठी मोहक आहे. समुद्राचा आवाज आणि दृष्टी येथे वर्चस्व गाजवते, मासे मुख्य अन्न आहे आणि बोटी वाहतुकीचे मुख्य साधन आहे. तुम्ही भेटायला का आला असाल याचे स्थानिकांना आश्चर्य वाटेल, परंतु मैत्रीपूर्ण वृत्तीने तुमचे स्वागत स्मित हास्याने करत आमंत्रित केलं जातं. कुठल्याही प्रवाशाला ‘Mauri-i-Matang!’ असं म्हटलं जातं. याचा अर्थ ‘नमस्कार अनोळखी माणसा’ किंवा ‘तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ असा काहीसा होतो.

स्पोर्टस फिशिंग, डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, बर्ड वॉचिंग, सेलिंग, सर्फिंग, सांस्कृतिक वारसा व द्वितीय विश्व युद्धातील अवशेष असे सारे अनुभव येथे पाहायला मिळतात.

फिनिक्स आयलंड येथे वन्य व मत्स्य जीवन पहायला मिळतं. गिल्बर्ट, स्टारबक, किरितीमाती, कारोलाईन, फ्लिंट, वोस्तोक, बनबा, तमाना, रावाकी इत्यादी छोटे-मोठे आयलंड असून तिथे बोटीने प्रवास करता येतो. तारावा (आणि विशेषत: बेटियो), बुटारीतरी, अबेमामा आणि बनबा बेट हे दुसऱ्या महायुद्धातील सर्वात प्रमुख स्थळ आहेत, ज्यात किनारपट्टी येथे संरक्षण गन, बंकर आणि पिलबॉक्सचा समावेश आहे. तारावा आणि बुटारीतरीच्या किनारपट्टीवर, विशेषत: कमी भरतीच्या वेळी टाकी, जहाजांचे जहाज, एमट्रॅक आणि विमानाचे ढिगारे अजूनही दृश्यमान आहेत.

किरिबातीला पोहचणं तसं महाग आहे. परंतु ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड येथे जाणार असाल तर फिजी, तुवालू, नाऊरु व किरिबाती अशा देशांचा विचार करु शकता. या देशाचे तसे दोन पर्याय आहेत; एक तर दाट लोकवस्तीचे आणि वाढत्या आधुनिक तारावाचे (Tarawa) येथे फिरा किंवा बाह्य बेटांवर किरिबातीच्या ग्रामीण भागात निवातं जगा. मासे, ब्रेड-फ्रूट व भात हे येथील प्रमुख खाद्य असून नारळाची ‘काओकिओकी’ ही वाईन प्रसिद्ध आहे. जगभरातून सरासरी साडेतीन ते पाच हजार प्रवासी किरिबातीला भेट देतात. या देशात कुठेही गेलात तर वेळ पाळता येईल किंवा सर्व सुविधा असतीलच असं काही सांगता येत नाही. त्यामुळे अशा देशात स्वत:ला थोडं सैल सोडूनच जगायचं! विशेष म्हणजे जगातील सर्व ४ गोलार्धांमध्ये (उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम) हे एकमेव राष्ट्र आहे.

किरिबती म्हणजे पांढरे-वाळूचे किनारे, निळसर समुद्र, निळभोर आकाश आणि हिरवी झाडी असणारा सुंदर देश! गन्नर गारफोर्स हा प्रवासी एकदा नाही तर दोनदा किरिबातीला जाऊन आलाय. मित्रांनो, बघा ना… फार अफलातून माणसं असतात या जगात! काही ना काही हटके करत राहतात अन् वैविध्यपूर्ण जगण्याची प्रेरणा देतात. जगात १० ते १५ फारच लहान देश आहेत. तिथे जमेल तसं गेलं तर तुम्ही तिथे जाणाऱ्या मोजक्या प्रवाशांपैकी असाल. सगळ्याच ठिकाणी दुसऱ्या-तिसऱ्यांदा किंवा अधिक वेळा जाता येईल की नाही सांगू शकत नाही पण ‘पहिल्यांदा’ कुठल्यातरी ठिकाणी जाण्याचे स्वप्न पाहून त्याठिकाणी निश्चित जाण्याचा प्रयत्न करुया. हटके ध्येय असेल तर प्रवासाला अधिक संघर्ष करावा लागतो आणि जिथे संघर्ष आला तिथे ते साध्य केल्यानंतरचे समाधान फार मोठे असते. आणि हे सर्व झालंच तर ‘सेलिब्रेट’ केलंच पाहिजे. तर मग, असे साधे-सोपे तर कधी अवघड ‘फंडे’ वापरुन जिंदगी वसूल केली पाहिजे…!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून''डू इट यूवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com