अद्भुत निसर्गसौंदर्याचं लडाख

आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना फिरताना पाहतो किंवा त्यांना जे आवडतंय ते करताना पाहतो आणि मग ‘मला जे करायचंय ना...ते करायला पुरेसा वेळच मिळत नाही,’
Ladakh
LadakhSakal

‘व्यग्र असणं पुरेसं नाही. तशा तर मग मुंग्यादेखील व्यग्र असतात. आपण कशात व्यग्र असतो हा प्रश्न महत्त्वाचा...’ अमेरिकी विचारवंत हेन्री डेव्हिड थोरो यांचं हे वचन.

आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना फिरताना पाहतो किंवा त्यांना जे आवडतंय ते करताना पाहतो आणि मग ‘मला जे करायचंय ना...ते करायला पुरेसा वेळच मिळत नाही,’ असं बोलून मोकळे होतो. खरं तर बहुसंख्य लोक व्यग्र आहेत; पण त्यातील जे त्यांच्या आवडी-निवडींना प्राधान्य देतात तेच चांगलं आयुष्य जगू शकतात. आता तर कोरोनाच्या महामारीनं हेही दाखवून दिलंय की ‘अर्जंट’ असं काही नसतं! जेव्हा आपण व्यग्रतेतून स्वत:ला व कुटुंबाला प्राधान्य देऊ ना, तेव्हा आपली ‘जिंदगी वसूल’ व्हायला सुरुवात होईल. ‘आपण कशात व्यग्र आहोत?’ हे जर स्वतःला अधूनमधून विचारलं तर आयुष्यात आपल्याला जसं जगायचंय तसं आपण जगू शकू. गेल्या सहा महिन्यांपासून या सदरातून बरंच काही तुम्हा सर्वांसमोर मांडता येतंय याचा आनंद तर आहेच; परंतु ‘तुम्ही नेहमी परदेशातलं लिहिता...जरा भारतातलंही लिहा की,’ असा काही जणांचा सूर असल्यामुळे आज लेह-लडाख या भागाबद्दल तुम्हाला सांगायचंय...

सन २०१६ मध्ये माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं आणि विश्वास काशिद, राम फुगे, प्रशांत जाधव, नीलेश धावडे व संतोष दरेकर या, माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या, काही मित्रांबरोबर मी लेह-लडाखची बाईक-मोहीम आखली होती. एकूण काय तर, ‘सहप्रवासी’ कुणीही असू शकतं. त्याला वयाची मर्यादा नसते. त्याच मोहिमेत प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक हाही होता. मग काय...तेव्हाचं जम्मू काश्मीर (लेह-लडाख हा तेव्हा त्याचाच एक भाग होता), पंजाब, हिमाचल प्रदेश व हरियाना अशा चार राज्यांत पंधरा दिवस नुसती धमाल केली. ३५ बायकर्समध्ये मी आणि सुयश कायम पुढं असायचो. दोघांनाही फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्यावर गप्पा तर झाल्याच; पण एकमेकांना खूप काही शिकायला मिळालं आणि तिथून पुढं सुयशची आणि माझी घट्ट मैत्री झाली. बघा ना...प्रवासात नेहमी अशी चांगली माणसं जोडली जातात, म्हणून प्रवास करताना थोडं सैल होऊन लोकांशी मोकळंढाकळं बोललं पाहिजे.

जगभर कितीही फिरलो तरी भारताची तुलना कशाशी होऊ शकत नाही, म्हणूनच तर आपल्या देशाला Incredible India असं म्हटलं जातं. भारताचाच अद्भुत भूभाग म्हणजे लेह-लडाख. लडाखमध्ये कारगिल व लेह असे दोन जिल्हे आहेत. विशेष म्हणजे, याच वर्षी महाराष्ट्राचे दोन भूमिपुत्र या दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी झाले. संतोष सुखदेवे हे कारगिलचे, तर श्रीकांत सुसे हे लेहचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाकाळातून आपण अद्याप पूर्णपणे बाहेर येऊ शकलो नाहीत म्हणून परदेशात जायला मर्यादा आहेत; परंतु भारतात काही नियम व अटींसह पर्यटन करता येतं. त्यात जम्मू काश्मीर व लडाखलाही जाता येतं. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे लडाखला जाण्यासाठी उत्तम महिने आहेत. दुर्गम पर्वतांचं सौंदर्य आणि वेगळी संस्कृती यांसाठी लडाख प्रसिद्ध आहे. तिथं ‘लडाखी’ आणि ‘पुरगी’ या भाषांबरोबरच हिंदी व इंग्लिश याही भाषा बोलल्या जातात.

‘कुशोक बकुला रिंपोशी’ हे

लेहमधील सुंदर, छोटसं विमानतळ समुद्रसपाटीपासून दहा हजार ६८२ फुटांवर आहे. माउंटन बायकिंग, माउंटन क्लायंबिंग, रिव्हर राफ्टिंग, शॉपिंग व ट्रेकिंग अशा अफलातून गोष्टी लडाख इथं करता येतात. Mountains are calling & I must go असं सध्या सगळे इन्स्टाग्रामर्स पोस्ट करताना दिसतात.

लडाख म्हणजे अनुपम, अद्भुत निसर्गसौंदर्य. इथले नितांतसुंदर सौंदर्यपूर्ण ‘लॅंडस्केप’ बघण्यासाठी या भागात जायलाच पाहिजे. तिथलं हवामान दर काही मिनिटांनी सतत बदलत असतं, त्यामुळे आभाळाच्या अनेक रंगच्छटा पाहायला मिळतात. बायकर्सना किंवा कारनं रोड ट्रिप करणाऱ्यांसाठी लडाख म्हणजे पर्वणीच. अठरा हजार ३८० फुटांवर असलेला ‘खारदुंग ला’ हा जगातला ‘हाय्येस्ट मोटरेबल रोड’ आहे, तसंच ‘खारदुंगला’नंतर ‘तांगलांग ला व ‘चांग ला बाबा’ हे दोन सर्वात उंच रस्ते आहेत. बाईक असो अथवा चारचाकी, लडाखमध्ये रस्ते भन्नाट आहेत. अर्थात्, ते सुस्थितीत आहेत. याचं कारण, ते ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’नं (BRO) बांधलेले आहेत. पॅंगाँग (Pangong), त्सोमोरीरी (Tsomoriri) व त्सोकर (Tso Kar) ही तिन्ही सरोवरं (Lakes) याच भागात आहेत. लडाखमध्ये शे (Shey), स्पिटुक (Spituk), हेमिस (Hemis), थिक्से (Thiksey), झांग ला (Zangla), डिस्किट (Diskit), लामायुरू (Lamayuru) असे अनेक प्राचीन मठ (Ancient Monastery) आहेत. त्याचबरोबर नुब्रा व्हॅली इथं सॅंड ड्यून्स ऑफ हंडर (Sand Dunes of Hunder) हे शीत वाळवंट आहे. इथं ‘बॅक्ट्रियन उंट’ आढळतात. हंडर गावात एखादा मुक्काम करता येतो. ‘मॅग्नेटिक हिल’ किंवा ‘ग्रॅव्हिटी हिल’ हे रायडर्ससाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. याशिवाय सुरू व्हॅली व झंस्कार व्हॅली ही अतिशय प्रेक्षणीय ठिकाणं. इथला पठ्ठार साहीब गुरुद्वारा हा गुरू नानक यांच्या स्मरणार्थ बांधलेला असून तो खूप सुंदर आहे. सिंधू व झंस्कार या दोन नद्यांचा संगम इथं पाहता येतो. लेह इथलं लष्कराचं Hall of Fame War Musuem पाहताना इतिहास कळतो. याशिवाय, कारगील जिल्ह्यातील ‘कारगील वॉर मेमोरिअल’ इथं १९९९ मधली आपल्या लष्कराची शौर्यगाथा समजून घेता येते.

लडाखमध्ये तिबेटी, मोनपस, दर्ड आणि मुस्लिम असे अनेक वांशिक गट आहेत. तिथल्या संस्कृतीत समृद्ध विविधता आहे. पाककृतींपासून ते पोशाखपद्धतीपर्यंत ती आढळून येते. नद्या, नद्यांचे संगम, पर्वत, दऱ्या, खिंडी, राजवाडे, महाल, मंदिरं, बुद्धांचे पुतळे, अनुपम, अद्भुत निसर्गसौंदर्य...लडाखची किती वैशिष्ट्यं सांगावीत! दुर्गम आणि अती उंचीवरच्या वेगवेगळ्या खिंडींमुळे लडाखला The Land of High Passes असं म्हटलं जातं.

व्यवस्थित नियोजन जर केलं तर लडाखची ट्रिप ‘बजेट’मध्ये नक्कीच करता येते. येणाऱ्या महिन्यांमध्ये बाईकवर अथवा चारचाकीतून लडाखची ट्रिप करता येईल. संपूर्ण लडाख भाग बघण्यासाठी आठ ते पंधरा दिवस पाहिजेत.

लडाखच्या ट्रिपनंतर, प्रवासानंतर पर्यटकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो. आपण फक्त आपल्या व्यग्र जीवनातून स्वत:साठी थोडा वेळ काढायचाय आणि फिरायला निघायचंय. थोडक्यात काय तर, स्वत:ला व प्रवासाला प्राधान्य देऊन कुठंही भ्रमंती करायला निघालात तर आयुष्याची काही औरच मजा घेता येते...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com