
जवळपास सर्वच प्रवासी कालांतराने आयुष्याकडे एका विशिष्ट चौकटीबाहेर पाहू लागतात असं माझं ठाम मत आहे. पण त्याआधी आपण ‘पर्यटक’ की ‘प्रवासी’ आहोत हा प्रश्न सातत्याने स्वत:ला विचारत राहिलं पाहिजे. काही वर्षांकरिता या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर जर शोधलं तर नकळत आपण पर्यटकाच्या भूमिकेतून प्रवासी माणसाच्या भूमिकेत नक्की जाऊ असं मला वाटतं. मलाही उत्तर शोधण्यासाठी काही वर्षे लागली तेव्हा कुठे स्वत:ला ‘प्रवासी’ म्हणून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. मुळात हा अंतर्मुख करणारा प्रवासच मोलाचा आहे. त्यामुळे दोस्तहो, जगाकडे पहायचे असेल तर अधिक व्यापक दृष्टिकोनातून पहायला शिकलं पाहिजे. त्यासाठी ‘विचारांची स्पष्टता’ हवी व आयुष्यात सतत ‘ग्रोथ’च्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आयुष्यात साधं राहणं व हटके जगणं जमलं पाहिजे.
आज अशाच एका साध्या परंतु हटके देशाबद्दल तुम्हाला सांगायचंय. ‘Pearl of the Pacific’ किंवा ‘Soft Coral Capital of the World,’ असं ज्याला संबोधलं जातं त्या देशाचे नाव म्हणजे फिजी (Fiji). हा ‘विलक्षण देश’ दक्षिण पॅसिफिक स्वप्नाचे मूर्त स्वरूप आहे. नैऋत्य प्रशांत महासागरातील हा द्वीपसमूह स्वच्छ पाण्याने वैशिष्ट्यीकृत असून खऱ्या अर्थाने एक उत्तम बेट जो की स्वर्गासारखा (like paradise) आहे. हा देश एकूण तीनशे तीस द्वीपसमूहांचा असून त्यातील वसलेली बेटं एकशे दहा आहेत. फिजी देशाची लोकसंख्या नऊ लाख इतकी असून सुवा (Suva) ही राजधानी आहे. तसेच तिथे इंग्रजी व फिजीयन या प्रमुख भाषा बोलल्या जातात. सतराव्या शतकात प्रथम युरोपियन लोकांनी फिजी येथे भेट दिली. पुढे १८७४ नंतर काही ब्रिटिश वसाहती देखील निर्माण झाल्या. न्यूझीलंडच्या ईशान्य बाजूस असणाऱ्या फिजी देशाला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली. तिथे संसदीय लोकशाही आहे. सध्या फिजी प्रशांत महासागरातील सर्वात विकसित अर्थव्यवस्थांपैकी एक असून तिथे मुबलक जंगल, खनिज आणि मासे संसाधने आहेत.
स्वदेशी फिजीयन संस्कृती आणि परंपरा खूप चैतन्यशाली आहेत आणि फिजीच्या बहुसंख्य लोकसंख्येसाठी दैनंदिन जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. फिजीच्या विविध संस्कृतींनी एकत्र येऊन एक अद्वितीय बहुसांस्कृतिक राष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे. फिजीमध्ये खेळांना प्राधान्य व प्रोत्साहन दिले जाते. ज्यात रग्बी हा त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे, तर क्रिकेट व फुटबॉल हेही खेळ खेळले जातात. फिजीयन अर्थव्यवस्थेचा पर्यटन हा कणा आहे. ‘Our BULA spirit awaits you,’ असं तेथील पर्यटनाचे घोषवाक्य आहे. BULA हे लोकांना अभिवादन करण्यासाठी किंवा हॅलो/नमस्कार म्हणण्यासाठी वापरले जाते. जेव्हा तुम्ही एखाद्याला बुला म्हणता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्यांना आयुष्याची शुभेच्छा देता. तसेच अप्रत्यक्षपणे त्यांना उत्तम आरोग्य व आनंद लाभण्यासाठी सदिच्छा देता. फिजीतील पर्यटन उद्योग साधारण पंच्चेचाळीस हजार लोकांना रोजगार देतो. तसेच २०१९ मध्ये जगभरातील नऊ लाख प्रवाशांनी या छोट्याश्या देशाला भेट दिली. फिजीमघ्ये मध्यम ते जास्ती खर्च होऊ शकतो. ते तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. तसेच बजेटनुसार प्रवास करता येऊ शकतो, परंतु त्यासाठी नियोजित पद्धतीने करणे योग्य आहे. फिजी हे रोमॅंटिक ठिकाण असल्यामुळे तिथे हनिमूनसाठी बरीच जोडपी जातात.
फिजीला जाण्यासाठी भारतीयांना ‘Visa on arrival’ची मुभा असून तो ४ महिन्यांसाठी वैध राहतो. ऑस्ट्रेलिया, अमेरिका व न्युझीलँड येथून सर्वाधिक प्रवासी तिथे भेट देतात. फिजी देश जरी छोटा असला तरी फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत. मॅनुका बेटे (Mamanuca Islands), कोरल कोस्ट, नाडी, दिनाराऊ बेटे, कडावू बेटे, लोमाविटी बेटे (Lomaiviti Islands), द यासावा (The Yasawa) पॅसिफिक हर्बर, वनुआ लेवू (Vanua Levu), सुवा, नॉर्थ कोस्ट व वाटूलेले बेटे अशी विविध ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. ‘बीच लाईफ’ अनुभवायचं असेल तर शहर सोडून कोरल कोस्टला जायला हवं. तिथे साहसी गोष्टी व सांस्कृतिक वारसा पहायला मिळतो. स्वत:चे लाड करण्यासाठी, तसेच मसाज किंवा निवांत राहण्यासाठी सर्व वयोगटातील प्रवाशांनी दिनाराऊ बेट येथे गेलं पाहिजे. ‘द ग्रेट ॲस्ट्रोलेब रीफ’ - जगातील सर्वात मोठ्या अडथळ्यांच्या खडकांपैकी एक हे कडवूच्या किनाऱ्याला मिठी मारते.
तिथे डाईव्ह व स्नॉर्कलिंगचा भन्नाट अनुभव मिळू शकतो. स्थानिक संस्कृतीच्या दर्शनासाठी मॅनुका बेटे व द यासावा ही उत्तम ठिकाणं आहेत. नवला हे फिजीचे सर्वात सुंदर असं पारंपारिक गाव आहे. विटी लेवुवर (Viti Levu) प्रचंड वारा वाहणारा सिगाटोका वाळूचा ढिगारा एक अविस्मरणीय क्षण ठरु शकतो. फिजीमध्ये काही हिंदू मंदिरंही आहेत. दक्षिण भारतीय फायर-वॉकिंग फेस्टिव्हलमध्ये इंडो-फिजीयन हे चमकत्या निखाऱ्यांवरून चालताना पाहणं फार चित्तथरारक अनुभव ठरतो.
कोरल संगीत ऐकणं, तसेच खाद्य पदार्थांमध्ये फिजीयन ‘Pit-cooked lovo’ हे खाणं व तुमचे मन आणि ओठ तृप्त करण्यासाठी पारंपारिक याकोनाचा (Yaqona) वाडगा प्या! विशेष म्हणजे तिथे इंडो-फिजीयन लोकांनी हिंदू मंदिरं व खाद्य पद्धती रुजवल्या, चिनी लोकांनी नूडल्स सर्वव्यापी केले तर युरोपियन लोकांनी पिझ्झा व वसाहती आर्किटेक्चरच्या खुणा फिजीमध्ये आढळतात. किनाऱ्यावर सूर्य किरणांमध्ये तासनतास पडणे, वाऱ्यामध्ये पामच्या झाडांचा आवाज ऐकणे आणि निळ्याभोर समुद्रात डुबकी मारणे म्हणजे फिजीतील प्रवास वसूल करणं होय ! आणि होय येथे गेलाच तर फिजी एअरवेजने ‘The least visited place or country on Earth,’ अशा तुवालू या जगावेगळ्या देशाला जरुर भेट द्या.
तर मित्रांनो, कमावलेल्या पैशातून बचत करुन, साधं राहून, हटके वागून बजेट ट्रॅव्हल केलं पाहिजे. जगभर कुठेही फिरताना या तत्वावर जगलात तर खरंच आयुष्यात काही तरी साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि निश्चितच ‘पर्यटकापासून ते प्रवासी’ होण्याची वाटचाल तुम्ही तुमची अनुभवाल. एका मर्यादित चौकटीतून आयुष्य अन् जगाकडे न पाहता व्यापक दृष्टिकोनातून हे सुंदर जग पाहिलं तर स्वत:बद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल !
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युलरसेल्फ पद्धतीचे पर्यटक आहेत.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.