चला, जबाबदार प्रवासी होऊ या!

चिली (दक्षिण अमेरिका) इथली पॅटागोनियन पर्वतरांग.
चिली (दक्षिण अमेरिका) इथली पॅटागोनियन पर्वतरांग.

The ‘traveller’ is active; he/she goes strenuously in search of people, of adventure, of experience. The ‘tourist’ is passive; he/she expects interesting things to happen to him/her. He/she only goes “sight-seeing,” असं अमेरिकी इतिहासकार डॅनियल बूर्स्टिन म्हणायचा. टूरिस्ट (पर्यटक) होण्यापेक्षा मलाही ट्रॅव्हलर (प्रवासी) होणंच नेहमी आवडलं. दोहोंतला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे  आणि आपल्या आजूबाजूलादेखील ‘ट्रॅव्हलर कम्युनिटी’ तयार व्हावी असंच मला नेहमी वाटत राहतं. लोकांना भेटणं, मैत्री करणं, गप्पा मारणं, विचारांची देवाण-घेवाण करणं, संस्कृती समजून घेणं अन् स्वानुभवानं आयुष्य समृद्ध करणं हे ‘पर्यटका’पेक्षा एखाद्या ‘प्रवाशा’ला अधिक चांगल्या प्रकारे जमतं.

आयुष्यात आपण सारेच ‘पर्यटक’ म्हणून कधी ना कधी फिरत असतो. आपण जेव्हा केव्हा फिरायला जातो तेव्हा ठरावीक पद्धतीनं, ठोकळेबाज पद्धतीनंच सगळं पाहतो; पण हळूहळू आपण जर ‘प्रवासी’ म्हणून फिरू लागलो तर आपण अधिक प्रगल्भ होतो. आपण गोष्टी विचारपूर्वक करू लागतो; मग प्रवास अर्थपूर्ण होऊ लागतो असं मला वाटतं आणि तिथून पुढं आपली पावलं ‘रिस्पॉन्सिबल टूरिझम’ म्हणजेच जबाबदार पर्यटनाकडे पडू लागतात.

आपण फिरताना अधिक जबाबदारीनं व सुसंस्कृतपणे वागणं म्हणजेच जबाबदार पर्यटन होय! आपण सारेच आपापल्या परीनं जबाबदार पर्यटनाला हातभार लावू शकतो. ते कसं? तर ते असं :

  • आपण प्रवासी काहीच दिवसांसाठी पर्यटनस्थळी जात असतो, त्यामुळे स्थानिक लोकांच्या चाली-रीतींचा आदर करून त्यांच्या नियमांनुसार आपण वागायला हवं.
  • शासकीयदृष्ट्या पर्यटनधोरण ठरवताना स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा मानला गेला पाहिजे.
  • आपल्याकडून नैसर्गिक-सांस्कृतिक-ऐतिहासिक वारशाचं नुकसान होणार नाही याची दक्षता प्रवाशांनी घेतली पाहिजे.
  • स्थानिक लोकांशी अधिक अर्थपूर्ण संवाद साधत तिथल्या सांस्कृतिक-सामाजिक-पर्यावरणविषयक समस्यांविषयी आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यासंदर्भात सकारात्मक मदत केली पाहिजे, तर प्रवास आनंददायक होईल.
  • स्मारकं, धार्मिक स्थळं व इतर सर्वच पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापकांनी ज्या त्या जागा शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी प्रवेश करण्यायोग्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  • कुठलीही वास्तू बघताना आपण संवेदनशीलपणे वागलं पाहिजे व आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही असं वर्तन केलं पाहिजे.
  • सुंदर पर्यटनस्थळं पुढच्या पिढीला बघता यावीत यासाठी आपण अधिक जबाबदारीनं वागून काळजी घेतली पाहिजे. 
  • It is our responsibility to pass on the pride & heritage to the next generation.
  • स्थानिक लोकांना अधिक रोजगार कसा निर्माण होईल याचा विचार सतत केला पाहिजे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या व यांसारख्या इतर बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास प्रवास अजून सुखकर होईल व पर्यटनस्थळांचं नुकसान होणार नाही, खऱ्या अर्थानं वारशाचं जतन होईल व पुढच्या पिढीला तो बघता येईल. जगभरात काही प्रवासी कंपन्या, काही शासनकर्ते, काही स्थानिक लोक हे जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देताना दिसतात व त्यासाठी कष्ट घेतात. या साऱ्यांचं आपण वेळोवेळी कौतुक केलं पाहिजे. त्यांचे आभार मानले पाहिजेत. अशाच काही देशांबद्दल व तिथल्या योजनांबद्दल मला थोडं सांगायचंय...

भूतानच्या पर्यटन -उपक्रमांमुळे तो देश जगातल्या ‘सर्वोच्च जबाबदार आणि शाश्वत पर्यटनस्थळां’मध्ये समाविष्ट झाला आहे यात काहीच शंका नाही. उर्वरित जग अधिक जागतिकीकरणाच्या मागं लागलं असताना भूताननं मात्र आपली संस्कृती जपण्यास प्राधान्य दिलं आहे. भूतानमध्ये फिरताना काही प्रमाणात ‘प्रवासकर’ घेतला जातो, त्याचा पर्यावरणासाठी उपयोग होतो. भूतान हा देश इतिहास-संस्कृती-नैसर्गिक सौंदर्य आदी बाबींनी समृद्ध आहे, हा त्यांचा ‘बोनस’ आहे; पण तेवढ्यावरच न थांबता तिथलं सरकारही पर्यटनविषयक सकारात्मक पावलं टाकताना दिसतं. भूतान हा देश छोटा जरी असला तरी तो ‘रोल मॉडेल’ असून त्याचा उल्लेख ‘जगातला सर्वात आनंदी-सुखी देश’ असा होतो.

इंडोनेशियातलं सुमात्रा हे अनेक बेटांपैकी सर्वात रोमांचक आणि वैविध्यपूर्ण आहे. शक्तिशाली ज्वालामुखी आणि ‘व्हर्जिन रेनफॉरेस्ट्स’पासून ते लपवलेले समुद्रकिनारे आणि भाताच्या शेतीपर्यंत, तसंच प्राचीन मंदिरांपासून ते रसरशीतपणानं ओतप्रोत असलेल्या स्फूर्तिदायक संस्कृतीपर्यंत सुमात्रामध्ये सर्व काही आहे. एवढा विपुल असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा असूनही या बेटाचं नाव लोकांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये क्वचितच असतं. उत्तर सुमात्रातली ग्रीन हिल, पश्चिम सुमात्रातलं रिंबा इकोलॉज, तसंच विविध डोंगर व जंगलं ही ठिकाणं तिथं बघण्यासारखी आहेत. जवळपासची जंगलं आणि अखंड समुद्र अशा नैसर्गिकतांमुळे तिथल्या रहिवाशांचं आरोग्य निरोगी असावं असं मला वाटतं. इथं जाणं म्हणजे जबाबदार पर्यटनाला हातभार लावणं आहे.

तिकडे दक्षिण अमेरिकेतही अब्जाधीश उद्योजक डग टॉम्पकिन्स व चिली सरकार यांच्या काममुळे आणि गुंतवणुकीमुळे चिली देशातला बहुतेक वाळवंटी भाग आता संरक्षित झाला आहे. पॅटागोनियन लॅंडस्केप्सची शिखरं हे तिथलं प्रमुख आकर्षण राहिलेलं आहे. सन २०१८ मध्ये ‘ रूट ऑफ द पार्क्स’ ची निर्मिती झाल्यामुळे दोन हजार ८०० किलोमीटर जमीन ही संरक्षित भूमी म्हणून घोषित करून तिथं राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे प्यूमा आणि नंदू (इमूचा एक प्रकार) यांसह काही पशू-प्राण्यांचा तो अधिवास झाला आहे. याशिवाय ‘द मापुचे’ या आदिवासी लोकांनी त्यांची दारं पर्यटनासाठी खुली केली आहेत. या जमातीनं त्यांच्या पद्धतीची घरं, त्यांची खाद्यसंस्कृतीही पर्यटकांसाठी खुली केली आहे. त्यामुळे तिथं मोठा रोजगार निर्माण झाला आहे. इंग्लिश बोलणारे गाईडही तिथं सहज उपलब्ध होतात.

कोलंबिया, केनिया, पलाऊ, जर्मनी, लाओस, कोस्टा रिका आदी देशांनी ‘जबाबदार पर्यटन’च्या दिशेनं पावलं टाकली, त्यामुळे तिथल्या पर्यावरणाचंही संरक्षण होत आहे आणि स्थानिक लोकांनाही रोजगार मिळत आहे. आपण जगभर फिरत असताना काही शिष्टाचार पाळले तर चांगल्या जगाच्या निर्मितीमध्ये आपलाही सहभाग असेल याचं समाधान तर वाटेलच; परंतु आपण जबाबदार पर्यटनाकडून शाश्वत पर्यटनाकडे वाटचाल करू लागलो आहोत याचा वेगळाच आंतरिक आनंदही आपल्याला मिळेल.
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com