सिएरा लिओन : राकट देश...कणखर देश

जगातील प्रत्येक देशात निरनिराळ्या अडचणी असतात. आपण जेव्हा प्रवास करून तिथं प्रत्यक्ष जातो ना...तेव्हा सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, आर्थिक, सामाजिक इत्यादी क्षेत्रांतील तिथले प्रश्न कळतात.
sierra leone country
sierra leone countrySaptarang

‘शेवटी, कोरोनानं मानवतेला दिलेला सर्वात मोठा धडा म्हणजे, या महामारीमध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत,’’ असं भारतीय अब्जाधीश उद्योजक किरण मजुमदार-शॉ म्हणतात, तर दुसरीकडे Hang in there, as better times are ahead असं सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीव्हन मगी म्हणतात. कोरोनाच्या सध्याच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आहेतच; पण आपण सगळ्यांनी थोडा तग धरायला पाहिजे, तरच गोष्टी हळूहळू निभावल्या जातील. म्हणजेच नियमांचं व अटींचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. म्हणून वरील दोघांचंही म्हणणं बरोबरच आहे. यातून जर वाचलो/बचावलो तरच जगता येईल...नाही का? आणि मग जगणं समृद्ध करण्यासाठी, भविष्यात परिस्थिती सुधारल्यावर आपण जमेल तसा व जमेल तिथं सुरक्षित प्रवास करू या. सन २०२० हे वर्ष तर कोरोनाच्या महामारीतच सरलं, सन २०२१ ही यातच जाईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं पडतंय; परंतु येणारा काळ चांगलाच असेल अशी आशा आपण बाळगू या. कुणीही खचून जाऊ नये. आयुष्य नुसतं रोजची धावपळ करून व्यर्थ घालवण्यात फायदा नाही हे आपल्याला कोरोनानं शिकवलं आहे, त्यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये, अधिक प्रवास करा, असंच मी सांगेन. ‘बजेट ट्रॅव्हल’ करता येतं हे तर मी वारंवार सांगत आलो आहेच आणि त्याची काही उदाहरणंही दिली आहेत.

मात्र, आज मला एका अशा देशाची गोष्टी सांगायची आहे, ज्याचं नावही बऱ्याच लोकांनी ऐकलंही नसेल. तो देश म्हणजे पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन (Sierra Leone) हा होय.

गेल्या दशकात डिसेंबर २०१३ मध्ये आफ्रिकी खंडातील गिनी (Guinea) देशात ‘वेस्टर्न आफ्रिकन इबोला’ या विषाणूचा साथीचा रोग सुरू झाला. ती साथ जून २०१६ मध्ये संपली. तेव्हा इबोला विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुख्यतः गिनी, लायबेरिया (Liberia) आणि सिएरा लिओनमध्ये वाढल्यामुळे तिथं बरीच जीवितहानी झाली होती आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रांत व्यत्यय आला होता. एकूण, २८ हजार ६४६ लोकांना इबोलानं गाठलं होतं, तर त्यांपैकी ११ हजार ३२३ रुग्णांना जीव गमावावा लागला. मृत्युदर जवळपास ४० टक्के होता. यातील सर्वात जास्त रुग्णसंख्या सिएरा लिओन या देशात होती.

जगातील प्रत्येक देशात निरनिराळ्या अडचणी असतात. आपण जेव्हा प्रवास करून तिथं प्रत्यक्ष जातो ना...तेव्हा सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, आर्थिक, सामाजिक इत्यादी क्षेत्रांतील तिथले प्रश्न कळतात. मी व्यक्तिश: अजून आफ्रिका खंडात गेलेलो नाही. मात्र, हजारो वर्षांपूर्वी ज्या आफ्रिका खंडात प्रथम मानवी उत्क्रांती झाली तिथं जायला कुणाला नाही आवडणार?

तर पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओनची लोकसंख्या ८० लाखांच्या आसपास आहे. फ्रीटाऊन (Freetown) ही त्याची राजधानी असून देशाची मुख्य भाषा इंग्लिश आहे. या देशाला ट्रान्सॲटलांटिक गुलामव्यापाराच्या (Transatlantic Slave Trade) इतिहासाच्या दृष्टिकोनातून ‘हजारो पश्चिम आफ्रिक्री अपहरणकर्त्यांचं निर्गमस्थान’ म्हणून विशेष महत्त्व आहे. परत आलेल्या गुलामांसाठी घर म्हणून फ्रीटाऊनची स्थापना सन १७८७ मध्ये केली गेली. सिएरा लिओनला ४०२ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे व त्याचाच एक भाग सन १८०८ मध्ये ब्रिटीश-वसाहत झाला आणि नंतर ब्रिटिशांनी तिथं राज्य केलं. ता. २७ एप्रिल १९६१ रोजी सिएरा लिओन स्वतंत्र राष्ट्र झालं; परंतु सन १९६७ मध्ये तिथल्या लष्करी सैन्यानं नागरी सरकार उलथवून टाकलं. पुढं अनेक लोकचळवळी तिथं उभ्या राहिल्या आणि पुन्हा ता. १९ एप्रिल १९७१ रोजी देशानं स्वत:ला प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं. मात्र, सरकार व सैन्यदलाच्या वादात देश कायम अंधारात राहिला.

सन १९९० ते २००२ पर्यंत सिएरा लिओनमध्ये बऱ्याचदा यादवी युद्धं झाली. त्यांची झलक किंवा तीव्रता एडवर्ड झ्वीकदिग्दर्शित, लिओनार्डो डी कॅप्रिओच्या ‘ब्लड डायमंड’ या सिनेमात दिसते. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी देशाची सूत्रं हातात घेऊन बदल घडवायला सुरुवात केली. पटकन सावरणारा किंवा उसळून वर येणारा देश म्हणून सिएरा लिओननं स्वत:ची वेगळीच ओळख निर्माण केली. अतिशय गरीब असणारा हा देश तिथं सापडणाऱ्या हिऱ्यांमुळे विकासाच्या दिशेनं निघाला. चार-पाच दशकं वारंवार होणाऱ्या यादवी युद्धांमध्ये हिऱ्यांचा व्यापार हा एक कळीचा मुद्दा होता हे नाकारता येणार नाही.

सन २००२ नंतर देशानं उंच भरारी घेतली, त्यामुळे जगातील पर्यटकांना तेथील मोठमोठे समुद्रकिनारे, वर्षावने, डोंगराळ भाग व वन्यजीव पाहण्याच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. सिएरा लिओनचे लोक फारच मैत्रीपूर्ण, निखळ आणि प्रामाणिक असल्यानं प्रवाशांना येणारा अनुभव अविस्मरणीय असे. सन २०१३ ते २०१६ मध्ये इबोलामुळे देशाची पुन्हा काहीशी पीछेहाट झाली. यानंतर मात्र शांततापूर्ण वातावरण, आरोग्यातील बदल व पर्यटन यांमुळे देशाचं भविष्य उज्ज्वल असेल असं मला वाटतं. एवढी वर्षं जो देश विविध अडचणींचा सामना करतोय त्या देशाला सुखाचे दिवस येतील अशी आशा आपण बाळगू या. Resilient People (कणखर नागरिक) म्हणून गेल्या दोन दशकांपासून तिथल्या नागरिकांची नव्यानं ओळख निर्माण झाली आहे.

सतत व्यग्र असणारं फ्रीटाऊन हे शहर बघण्यासारखे आहे. या शहरातील लोकांच्या लवचिकपणाचं जगभर कौतुक होतं. गुलामगिरीची पाळंमुळं कशी होती, गुलामगिरीचा नेमका इतिहास काय हे जाणून घ्यायचं असेल तर ‘बन्स आयलंड’ला (Bunce Island) भेट दिली पाहिजे. हत्ती, बिबटे व पाणघोडे हे ‘आउटंबा-किलिमी’ या राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. प्रवासी ज्या ठिकाणी क्वचितच जातात ते ‘टर्टल आयलंड’ही (Turtle Island) फार सुंदर आहे. थोडी विश्रांती घ्यायची असल्यास सुलिमा या छोट्याशा शहरातही पर्यटक जाऊ शकतात. तिथं लायबेरियातील निर्वासित लोक अधिक आहेत. निसर्गाच्या अधिक जवळ जायचं असल्यास ‘तिवाई आयलंड वन्यजीव अभयारण्य’ व ‘गोला’ वनआरक्षित क्षेत्र हेही पर्याय आहेत. लोमा पर्वतरांगांतील ‘माउंट बिंटुमनी’ हे एक हजार ९४५ मीटर असून ते देशातील सर्वात उंच शिखर आहे. नियमित ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा वेगळा अनुभव ठरू शकतो. कारण, आजूबाजूला अनेक प्राणी-पक्षी पाहायला मिळतात; परंतु काही वेळेला या देशात पर्यटकांची लूटही होऊ शकते. खरं तर, पश्चिम आफ्रिकेत हा धोका कायमच आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे, सन २०१८ ला सिएरा लिओनमध्ये ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ (Blockchain Technology) वापरून यशस्वीरीत्या निवडणुका घेण्यात आल्या. असा प्रयोग करणारा जगातील हा पहिला देश ठरला. या तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणुकीत पारदर्शकता आणता येईल असा आदर्श सिएरा लिओननं जगाला घालून दिला आहे.

थोडक्यात काय तर, प्रवास करताना ज्या त्या जागेचा इतिहास व सध्याची परिस्थिती जाणून घेणं! तर मित्रांनो, प्रवास करताना 3E हे सूत्र पाळलं पाहिजे, असं मी नेहमी म्हणतो. ते 3E सूत्र म्हणजे, Explore - Experience - Enrich. म्हणजेच काय तर, अधिक शोध (Explore) घेत किंवा शोधक नजरेनं फिरा; जेणेकरून तुम्हाला कायम दांडगा अनुभव (Experience) मिळेल आणि त्यातूनच तुम्ही तुमचं आयुष्य समृद्ध (Enrich) करू शकाल...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com