
सध्याच्या काळात कुठंही प्रवास करणं ही मोठी जोखमीची गोष्ट होऊन बसली आहे. कारण काय? तर गेलं वर्षभर कोरोनाच्या महामारीमुळे सगळं ठप्प आहे. कोरोनाचा काळ हा सर्वांची कसोटी पाहणारा, आपले पूर्वीचे दृष्टिकोन बदलून टाकणारा काळ ठरलाय यात काही शंका नाही. या काळात काहींना ‘मंदीत संधी’ दिसली, तर काहींपुढे अडीअडचणींचा डोंगर उभा राहिला. We all are sailing in the same boat असंही जगभरात म्हटलं गेलं. गेले काही महिने जगभर कोरोनाबाबत विविध पैलूंवर चर्चा झाली. अनेक शास्त्रज्ञ, साहित्यिक, नेतेमंडळी, उद्योजक, पत्रकार, विचारवंत, खेळाडू, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी वेगवेगळी मतं व्यक्त केली. या साऱ्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन काहींनी दिला.
मग कोरोनासह जगायची लोकांची मानसिक तयारी हळूहळू होऊ लागली आणि त्यातही ‘क्वालिटी लाईफ’ किंवा ‘हेल्दी लाईफ’ जगायचं असंही काहींनी ठरवलं. सर्वांनाच तसं जगणं शक्य होईल असंही नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे प्रश्न आहेतच; परंतु बहुसंख्य लोकांना फिरायला अथवा प्रवास करायला आवडतं हेही तितकंच खरं. तो प्रवास व्यक्तिसापेक्ष असू शकतो. त्यामागं विविध कारणं असतील. तो गरजेनुसार असेल किंवा बजेटनुसार असेल. शहर, जिल्हा, राज्य, देश व परदेशात तिथली स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोरोनासंदर्भात निर्णय व नियम केले जातात, त्यात वेळोवेळी बदलही होताना दिसत आहेत. हे सारं जरी खरं असलं तरी सद्यस्थितीत प्रवास करणं हे तसं अवघडच झालंय आणि जे लोक यातूनही मार्ग काढून प्रवास करत आहेत त्यांचा इतरांना नक्कीच हेवा वाटतोय.
कोरोनानं खूप काही शिकवलं हे मत जवळपास सगळ्यांचंच आहे; पण यात आपलं स्वत:चं ‘हेल्दी लाईफ’ किंवा निरोगी आयुष्य असावं असं अनेकांना तीव्रतेनं जाणवू लागलं आहे. काहींनी त्यादृष्टीनं संकल्पही केले, तर काहींनी त्या दिशेनं प्रत्यक्षात पावलंही टाकली. खरं तर असं होणं हे चांगलंच आहे. मग माझ्या मनात विचार सुरू झाला की, जगात सर्वात निरोगी किंवा आरोग्यदायी देश कोणता असावा? थोडक्यात काय तर World’s Healthiest Country कोणती? मी शोध घ्यायला सुरुवात केली. काही सर्वेक्षणं त्यादृष्टीनं माझ्या पाहण्यात आली. ‘ब्लूमबर्ग व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Healthiest Country Index’ असं सर्वेक्षण २०१९ मध्ये केलं गेलं व स्पेन हा दक्षिण युरोपीय देश त्यात प्रथम क्रमांकाचा ठरला. जगभरातील १६९ देशांचं सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. तंबाखूचा वापर आणि लठ्ठपणा, जीवनशैली आणि स्वच्छता व स्वच्छ पाणी यांसारख्या पर्यावरणीय घटकांचा विचार करता जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभाग आणि जागतिक बँकेच्या संशोधकांच्या अभ्यासाअंती हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. या निष्कर्षांचं मूल्यांकन केल्यावर, निर्देशांकानुसार स्पेन हा ९२.७५ या श्रेणीसह ‘जगातला सर्वात आरोग्यदायी देश’ असल्याचं स्पष्ट झालं. जगभरात एका वर्षापेक्षा अधिक काळापासून असलेली कोरोनाची महामारी आणि येत्या सात एप्रिलला असणारा ‘जागतिक आरोग्यदिन’ यानिमित्तानं हे सारं मी तुमच्यासमोर मांडतोय.
जगातील सर्व देशांची सरकारं किंवा शासन/प्रशासन यांचे आरोग्यविषयक बाबींसंदर्भात कोरोनामुळे नक्कीच डोळे उघडले असतील. त्यावर अधिक शाश्वत स्वरूपाची धोरणं आखून ती कृतीत उतरवून सर्व नागरिकांना त्यांचा लाभ झाला पाहिजे अशीच बहुसंख्य लोकांची भावना आहे.
स्पेननंतर इटली हा आरोग्यदायी देशांच्या यादीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आशियातले आपले शेजारीदेश श्रीलंका ६६ व्या, बांगलादेश ९१ व्या आणि नेपाळ ११० व्या क्रमांकावर आहे. भारत मात्र १६९ देशांपैकी १२० व्या क्रमांकावर आहे. याच यादीत जगातील इतर काही देशांपैकी ब्रिटन १९ व्या, क्यूबा ३० व्या, अमेरिका ३५ व्या, तर चीन ५२ व्या क्रमांकावर आहे.
ज्या त्या देशातील नागरिकांच्या आरोग्यावर होणारा वार्षिक खर्च जर पाहिला तर एका व्यक्तीवर अमेरिकेमध्ये आठ लाख ७ हजार रुपये, ब्रिटनमध्ये दोन लाख ९३ हजार रुपये, तर ‘हेल्दिएस्ट कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेनमध्ये दोन लाख ५६ हजार रुपये खर्च केले जातात. तुलनेनं भारतात एका व्यक्तीवर वार्षिक खर्च अंदाजे १८ हजार २०० रुपये केला जातो. त्यापैकी बहुतेक लोक सरकारच्या मदतीनं कमी, तर स्वत:च्या स्रोतांतून अधिक खर्च करतात. जगाच्या तुलनेत आरोग्यविषयक बाबींमध्ये भारत किती मागं आहे हे पाहिलं की फार वाईट वाटतं. हे चित्र येत्या काही दशकांमध्ये बदलणं गरजेचं आहे.
दक्षिण युरोपीय देश असलेल्या स्पेनची लोकसंख्या चार कोटी ६९ लाख असून ‘स्पॅनिश’ ही तिथली मुख्य भाषा आहे. माद्रिद ही स्पेनची राजधानी आहे, तर बार्सिलोना ही सांस्कृतिक राजधानी. टेनेराइफ हे सात कॅनरी आयलंड्सपैकी सर्वात मोठं आयलंड आहे, तसंच माउंट टीड हे ज्वालामुखीशिखर असून, तो देशातील सर्वात उंच डोंगर आहे. पर्यटकांसाठी ही ठिकाणं हॉटस्पॉट आहेत. माद्रिद इथं जगप्रसिद्ध प्राडो म्युझियम आणि थिस्सन-बोर्निमिझा नॅशनल म्युझियम आहे. भव्य पार्ट्यांसाठीही हे शहर ओळखलं जातं. सेविले व ग्रॅनाडा हीसुद्धा स्पेनमधील प्रेक्षणीय शहरं आहेत. मॅलोर्का येथील युनेस्को जागतिक वारसस्थळ असलेल्या सेरा डी त्रामुंटाना या ठिकाणी प्रवासी कारनं लाँग ड्राईव्हसाठी जातात.
स्पेनला गेल्यावर बिलबाओ इथल्या जगप्रसिद्ध गुग्नेहेमला भेट दिलीच पाहिजे. याशिवाय इबीझा, व्हॅलेन्सिया, सॅन सेबॅस्टियन, अॅलिकॅन्टे, रिओजा, कॉर्डोबा व इतर काही सुंदर ठिकाणंही आवर्जून पाहावीत अशीच. फुटबॉलसाठी स्पेन जगप्रसिद्ध आहे हे काही सांगायलाच नको. इथं अनेक सॉकर क्लब आहेत.
सतत काही ना काही घडना-घडामोडी घडत असलेली स्पेनची महानगरं, चित्तवेधक लँडस्केप्स आणि इतर सांस्कृतिक गोष्टींमुळे स्पेनला भेट देणं हे अनेक प्रवाशांच्या लेखी आनंददायी असतं. वीसहून अधिक महत्त्वाची आणि भेट देण्यायोग्य शहरं स्पेनमध्ये आहेत, त्यामुळे कोणत्या शहरापासून सुरुवात करायची हे ठरवणं कठीण होऊन बसतं.
सन २०४० पर्यंत जगातील सर्व देशांपैकी स्पेनच्या नागरिकांचं आयुर्मान सर्वाधिक होईल, असा अंदाज असून तिथलं सरासरी आयुर्मान ८५.८ वर्षं असेल. रुचकर खाद्यपदार्थ, उबदार हवामान, श्राव्य-मधुर संगीत, आकर्षक इतिहास...ही स्पेनची वैशिष्ट्यं आहेत आणि यांत आता आणखी एका वैशिष्ट्याचा समावेश झाला आहे व ते म्हणजे अर्थातच ‘जगातील सर्वात आरोग्यदायी देश’
हे सगळं लक्षात घेता, कोरोनाच्या या महामारीनंतर जेव्हा केव्हा प्रवास तुम्ही प्रवास कराल तेव्हा जगातील सर्वात आरोग्यदायी देश असलेल्या स्पेनची ट्रिप नक्की आखा. सध्याचं वर्ष आरोग्यदायी जावो अशा जागतिक आरोग्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा...!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.