शाश्‍वत पर्वतीय पर्यटन !

आज मी हे भलतंच का सांगतोय? की भूगोलाचा तास घेतोय? असं तुम्हाला वाटत असेल. तसं काही नाहीये… आपला मुख्य विषय पर्यटनाचा असून आज जगातील ‘पर्वत पर्यटन’ याबद्दल थोडंसं सांगणार आहे.
Mountain
MountainSakal

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे हे आपण सारे जाणतोच. परंतु मित्रांनो, जगातील सर्व पर्वतरांगा मिळून किती टक्के भाग व्यापलेला आहे हे आपणास ठाऊक आहे का? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तब्बल २२ टक्के भाग पर्वत किंवा पर्वतरांगा व्यापतात. पर्वत हे केवळ पाहण्यासारखे दृश्य नाही तर वनस्पती, प्राणी आणि सुमारे एक अब्ज मानवांसाठी याच डोंगर दऱ्या निवासस्थान ही प्रदान करतात. थोडक्यात काय तर, पर्वत हे जगातील १५ टक्के लोकसंख्येचे घर आहे आणि जगातील जैवविविधता हॉटस्पॉट्सपैकी निम्मे आहेत. एवढंच नाही तर जगभरातील पर्वतरांगा ताजे पाणी, अन्न आणि अगदी नूतनीकरणक्षम ऊर्जा यासारख्या महत्त्वपूर्ण संसाधनांचा पुरवठा करतात. ‘समुद्र की पर्वत’ अशी चर्चा किंवा तुलना बऱ्याच प्रवाशांमध्ये कायम होताना दिसते. कोणाला समुद्र आवडतो तर कोणाला पर्वत… दोन्हीची वैशिष्ट्ये आणि मजा वेगवेगळी आहे.

पण, आज मी हे भलतंच का सांगतोय? की भूगोलाचा तास घेतोय? असं तुम्हाला वाटत असेल. तसं काही नाहीये… आपला मुख्य विषय पर्यटनाचा असून आज जगातील ‘पर्वत पर्यटन’ याबद्दल थोडंसं सांगणार आहे. खरं तर कालच ११ डिसेंबर ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस’ साजरा झाला. आपल्या आयुष्यात पर्वतांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, पर्वतांच्या विकासातील संधी आणि अडथळे अधोरेखित करण्यासाठी आणि जगभरातील डोंगरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आणि वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणणारी ‘जबाबदार प्रवाशांची’ फळी तयार करण्यासाठी दरवर्षी ११ डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस’ साजरा केला जातो.

जागतिक पर्यटनापैकी सुमारे १५ ते २० टक्के प्रवाशांना पर्वतीय पर्यटन आकर्षित करते. आपण सर्वांनी ‘शाश्वत पर्वतीय पर्यटन’ म्हणजेच ‘Sustainable Mountain Tourism’च्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. दुर्दैवाने, हवामान बदल, जमिनीचा ऱ्हास, अतिशोषण आणि नैसर्गिक आपत्तींच्या प्रभावांमुळे पर्वतरांगा धोक्यात आहेत. या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतोय. आता मात्र आपण प्रवाशांनी जमेल तशी छोटी-छोटी पर्यावरणपूर्वक पावलं उचलली पाहिजेत. प्रसिद्ध निसर्गवादी, लेखक आणि पर्यावरण तत्वज्ञानी जॉन मुइर म्हणतात ‘‘तुम्ही डोंगरात नाही. पर्वत तुमच्यामध्ये आहेत.’’ बघा ना, जगातील सर्वांत सुंदर पर्वतांनी शतकानुशतके गिर्यारोहकांना मोहित केले आहे. जे प्रवासी डोंगरात वेळ घालवतात ते एका सकारात्मक शक्तीने किंवा ऊर्जेने जगताना दिसतात. सातही खंडात अफलातून पर्वतरांगा आहेत... चला तर काहींबद्दल जाणून घेऊया:

आशिया खंड

पाकिस्तान, भारत, चीन, नेपाळ आणि भूतानमध्ये १५०० मैल पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा खूपच सुंदर आणि मोहक आहेत. हे पर्वत केवळ गगनचुंबी इमारती नाहीत; ते स्वर्गासारखे आहेत. स्वर्ग ही कल्पना जरी असली तरी कधीतरी कल्पनेत जगायला काय हरकत आहे. जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्ट याच रांगांमध्ये आहे. तसेच मध्य पूर्व आशियातील इराणमधील दामावंद पर्वत (Mount Damavand) हा उंच तर आहेच शिवाय सक्रिय ज्वालामुखी असणारा पर्वत आहे. मलेशियातील किनबालू पर्वत (Mount Kinabalu) हे जागतिक वारसा यादीत समाविष्ट असून रोडोडेंड्रॉन, ऑर्किड (सुमारे १२०० प्रजाती), चेस्टनट झाडे, अंजीर, मॉसेस, फर्न आणि जगातील सर्वात मोठ्या Rjah Brooke च्या पिचर प्लांटसह सुमारे ६००० वेगवेगळ्या वनस्पतींचे घर आहे. त्याचबरोबर जपानमधील माउंट फुजी (Mount Fuji) व भूतानमधील गंगखर पुएन्सम (Gangkhar Puensum) हे ही पाहण्यासारखे आहेत.

ऑस्ट्रेलिया खंड

न्यू गिनी बेटावर वसलेले पंकक जया (Puncak Jaya) हे सर्वोच्च शिखर आहे. याला कार्स्टेन्झ पिरॅमिड असेही म्हणतात. ऑराकी (Aoraki) अन्यथा माउंट कुक (Mount Cook) म्हणून ओळखला जाणारा हा न्यूझीलंडमधील सर्वात उंच पर्वत आहे. येथे पर्यटनासाठी हेलिकॉप्टर टूर, स्कीइंग, ग्लेशियर ग्लायडिंग आणि पर्वतारोहण करता येतं. न्यू साउथ वेल्समध्ये, कोशियस्को नॅशनल पार्क येथे, माउंट कोशियस्को (Mount Kosciuszko) हा ऑस्ट्रेलियातील सर्वांत उंच पर्वत आहे. हा पर्वत १.६ दशलक्ष एकर राष्ट्रीय उद्यानाचा केंद्रबिंदू आहे ज्याला ‘युनेस्को बायोस्फीअर रिझर्व्ह’ म्हणून नियुक्त केले गेले आहे.

अंटार्क्टिका खंड

विन्सन मासिफ (Vinson Massif) हे पर्वतांपैकी सर्वात दुर्गम पर्वत आहे. तसाच माउंट टायरी (Mount Tyree) हा अंटार्क्टिकामधील दुसऱ्या क्रमांकाचा उंच पर्वत आहे. हे दोन्ही पर्वत काही मोजक्या लोकांनी सर केले आहेत. खरं तर अंटार्क्टिकाला जायचं म्हणजे खर्च अफाट आणि थंडी तुफान आहे म्हणून जास्त पर्यटक या ठिकाणी जात नाही.

आफ्रिका खंड

आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वतांच्या बाबतीत, आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात फक्त एकच नाव येतं ते म्हणजे किलीमांजारो पर्वत (Mount Kilimanjaro). अनुकूलतेसाठी पुरेसा वेळ देऊन, डोंगराच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो. तसेच इथिओपियातील सर्वात मोठा पर्वत रास दशेन (Ras Dashen) आणि केनियातील माउंट केनिया हे पर्वत सुप्रसिद्ध आहेत.

युरोप खंड

काकेशस पर्वत (Caucasus Mountains), जे आग्नेय युरोपपासून आशियापर्यंत पसरलेले आहेत; त्यातच युरोप खंडातील सर्व सहा उंच पर्वत आहेत. स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, मोनॅको आणि लिक्टेनस्टीन या देशांच्या वादात अडकणारे पर्वतरांगा म्हणजे द आल्प्स (The Alps). फ्रेंच बाजूला असणारा माउंट ब्लँक हा आल्प्समधील सर्वांत उंच पर्वत आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये सर्वांत उंच शिखर मोंटे रोसा आहे. तसेच माउंट अरारत हा तुर्कस्तानमधील बर्फाच्छादित आणि सुप्त ज्वालामुखी असणारा पर्वत प्रसिद्ध आहे.

उत्तर अमेरिका खंड

उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच पर्वत मूळतः डेनाली (Deneli) म्हणून ओळखला जात असे, नंतर त्यालाच माउंट मॅककिन्ले (Mount McKinley) म्हटलं जातं. आशियातील माउंट एव्हरेस्ट आणि दक्षिण अमेरिकेतील अकोन्कागुआ नंतर, डेनाली हे जगातील तिसरे सर्वांत प्रमुख आणि सर्वांत वेगळे (isolated) शिखर आहे. हवाईचे मौना के हे ज्वालामुखींनी भरलेल्या पॅसिफिकवर पसरलेले एक उत्तुंग शिखर आहे. ज्वालामुखी ताजुमुल्को, पिको डी ओरिझाबा आणि ग्रँड कॅनियन हेही प्रसिद्ध पर्वत आहेत.

दक्षिण अमेरिका खंड

हिमालयाच्या अवाढव्य पर्वतांच्या बाहेर, दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोनकागुआ (Mount Aconcagua) हे अर्जेंटिना, चिलीच्या सीमेजवळ स्थित असून जगातील सर्वोच्च शिखर आहे. व्हेनेझुएलामधील पिको बोलिव्हर आणि इक्वेडोरमधील सर्वांत उंच पर्वत चिंबोराझो प्रसिद्ध आहेत. नेवाडो ओजोस डेल सलाडो हा अर्जेंटिना-चिली सीमेवरील अँडीजमधील आणखी एक सक्रिय स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे. हा जगातील सर्वांत जास्त सक्रिय ज्वालामुखी आहे.

तर मित्रांनो, अनेक पर्वतांपैकी काही पर्वत तुमच्यासमोर ठेवले. कधीही कुठल्याही खंडात जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि बघण्याचा प्रयत्न करायचा. आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो, “Mountains are calling, and I must go.” परंतु हवामान बदलामुळे “Mountains are calling, and I must go to clean them,” असं म्हणायची वेळ आलीये. आपण हे समजून घेतले पाहिजे की या पर्वतांचे किती अनन्यसाधारण महत्व आहे. आपण ‘पर्वत पर्यटन’ करण्यासाठी जर तिथे गेलो तरी एक ‘जबाबदार प्रवासी’ म्हणून फिरलो पाहिजे.

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com