esakal | समाजसेवेची नशा... | Social Work
sakal

बोलून बातमी शोधा

Social Work
समाजसेवेची नशा...

समाजसेवेची नशा...

sakal_logo
By
प्रफुल्ल वानखेडे

पैसे कमविण्याचा, सर्वाधिक बचत करण्याचा आणि ते पैसे योग्यरीत्या गुंतवणुकीचा सर्वोत्कृष्ट काळ हा ‘तारुण्य’ असतो. माझ्या आयुष्यात याच काळात समाजसेवा करण्याला उद्युक्त करणारी घटना घडली; त्यासाठी पुढाकारही घेतला. पोलिसांकडे गेलो. दिवसभर कामाला दांडी मारावी लागली; पण कुणाचे तरी भले करण्यासाठीची लढाई थांबवावी लागली... कदाचित तेव्हा तिथे थांबलो म्हणून आज इथे पोहचलो असेन..!

मुंबईत येऊन तीनचार वर्षं झाली होती. बऱ्यापैकी स्थिरावलो, सरावलो होतो. पैसेही गरजेपेक्षा बरे मिळत होते. आपण बॅचलर असताना वाईट व्यसनं नसतील, मित्र परिवार, साथसंगत चांगली असेल तर अगदी आनंदी आनंदच असतो.

आमच्या सुखाच्या व्याख्या म्हणजे मित्रांसोबत वीकेंडला नवा सिनेमा पाहणे. नवनवीन हॅाटेलांत जेवण करत खाद्यभ्रमंती करत फिरणे यापलीकडे काही नव्हत्या. असेच एका वीकेंडला सिनेमा पाहून स्टेशनवरून पायीच घरी चालत येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर फिरत असणारी लहान मुलं दिसली. उन्हाळ्याचे दिवस. त्यांच्या पायात चप्पल नाही. अंगावर धड कपडे नाहीत. डोळ्यात पाणी, भुकेने व्याकुळ. आमच्याकडे फार आशेने पाहत होती. आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यांतून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील होतो. आम्ही त्या पोरांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर त्यांना हवे तेवढे खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. त्यांनीही भरपेट खाल्ले. पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून, नाकातून चमकत होता.

पुढच्या रविवारीही पुन्हा तोच प्रकार. नंतर नंतर ती मुले आम्हाला ओळखायला लागली आणि आम्हालाही त्यांच्यात आपलेपणा वाटू लागला. अशाच एका शनिवारी संध्याकाळी आम्हा मित्रांच्यात त्या मुलांचा विषय निघाला. एक जण म्हणाला, किती दिवस आपण त्यांना फक्त वडापाव खायला घालायचा? आपण त्या मुलांसाठी काही तरी करायला हवे. काँक्रीट करायला हवे. तो ‘काँक्रीट’ शब्द आमच्या सर्वांच्याच डोक्यात फिट्ट झाला. खूप विचार केला आणि मग ठरले त्या मुलांना पोलिसांची मदत घेऊन आजूबाजूच्या निवारा केंद्रात सुपूर्द करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपण सर्वांनी मिळून करायचा.

झाले, ठरले! खूप दिवसांपासून काही तरी आपण समाजसेवा करायला हवी, समाजाचं देणं फेडायला हवं ही इच्छा होतीच. ती या स्वरूपात पूर्ण होत होती, याचा आनंद वेगळाच होता. दुसऱ्याच दिवशी आम्ही पाचसहा जण तिकडे गेलो. त्या मुलांना खाऊ घातले. शाळा शिकायची, स्वतंत्र होऊन कष्टाने पैसा कमवायचा, हे सर्व सोडून देऊन एक चांगलं आयुष्य जगायचं वगैरे वगैरे सर्व व्यवस्थित सांगून आणि त्यांना पूर्ण कल्पना देऊन त्यांना पुस्तकं, वह्या-पेन आणि नवे कपडेही दिले. आम्ही त्यांना लिहायची, वाचायची आवड लावून शाळेत टाकणार या अत्यंत चांगल्या विचाराने सुरुवात केली. फार दूरचा विचार न करताही सुरुवात मात्र उत्तम झाली, या विचाराने रात्री शांत झोपलो.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या शिफ्टसाठी काही मित्र लवकरच गेले. आम्ही निघण्याच्या गडबडीत बिल्डिंगच्या खाली उतरलो होतो. तेवढ्यात पाचसहा चरसी, गुंड टाईप लोक आमच्या सोसायटीच्या गेटवर आमची वाटच पाहत होते... ‘‘तूम लोगही हो ना जिसको समाजसेवा करने का नशा चढा है? हमारे बच्चों को कैसे लेके जाओगे, देखते हैं!’’

आम्हाला काही कळायच्या आत एकाने येऊन माझ्या मित्राची कॉलर पकडली आणि त्याला जोरात धक्का दिला. आम्ही लगेच पुढे होऊन त्याला सावरले आणि धडाधड हाणामारी करायला सुरू झालो. तेवढ्यात इतर लोकही आमच्या मदतीला धावले आणि त्यांनीही तिथे हात धुऊन घेतले. हे सर्व होत असताना एकाने पोलिसांना बोलावले आणि पुढे आमची वरात त्या चरसी गुंडांसह नजीकच्या पोलिस चौकीत दाखल झाली.

पोलिसांनी आमची तिथे खरंच चांगली मदत केली. तरुण पोरं, बऱ्यापैकी शिकलेली. कामधंदा करणारी. गावखेड्यांतून आलेली आणि त्यातही मराठी असतील तर पोलिस नेहमीच सहकार्य करतात, याचा आम्हाला चांगला अनुभव आला. आमच्या कोणाचीही हाणामारीच्या केसमध्ये नावं टाकली नाहीत तरी पण त्या गुंडांना लॉकअपमध्ये आणि आम्हाला ‘बाहेर’ दिवसभर थांबवून ठेवले.

सर्वांनाच दिवसभर कामाला दांडी मारावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा पोलिस ठाण्याला बोलावले. आता ते गुंड तिथे नव्हते; पण एक वेगळे खविस प्रकारातले ५०-५५ वयाचे हवालदारमामा आम्हाला भेटले. त्यांनी त्या गुंडांचा इतिहास, त्यांच्या इतर बऱ्याच गुन्हेगारी कारनाम्यांबद्दल आम्हाला भीती वाटेल असे मुद्दे पटवून सांगितले. पुढे ते लोक आम्हाला त्रास देणार नाहीत आणि त्या मुलांचे पोलिस आणि बेगर होमचे लोक काय करायचे ते करतील, तुम्ही तुमच्या कामाचे पहा. तुम्ही चांगली कामं करताय, घरची, तुमच्या भविष्याची काळजी असेल तर या भानगडीत पडू नका म्हणून खडसावले. आम्ही मात्र ‘हुशार’. ‘‘आमची तक्रार घ्या’’ यावर ठाम होतो... आणि सगळे मिळून वाद घालायला लागलो. नियम, कायदे, वगैरे वगैरे सर्व त्यांना सांगायला लागलो. तेवढ्यात त्या पोलिसाकडे अजून एक दुसरी हाणामारीचीच तक्रार आली आणि पोलिसांनी आम्हाला पुन्हा उद्या या म्हणून सांगितले.

तिसऱ्या दिवशी पुन्हा, ते मोठे साहेब आलेत म्हणून बिझी. आम्हाला पुन्हा दोन दिवसांनी या म्हणाले. या सर्व गोष्टींमुळे आमच्या सर्वांचीच कंपनीत दांडी लागली होती. असे चारपाच दिवस गेले. बॅास आणि इतर सहकारीही ओरडायला लागले होते. आमच्यापैकी काही जण सिग्नलवर जाऊन आले तर त्या सिग्नलवरची ती लहान मुलं बदलली होती आणि ते गुंडही गायब झाले होते. कधी नव्हे ते मला माझ्या कंपनीने ‘‘उद्या नाही आला तर यापुढे कामावर येऊ नको’’ असा निरोप पाठवला होता. मित्रांनाही जवळपास असेच मानसिक धक्के बसले होते. अतिशय निराशा आणि सरकारी व्यवस्थेबद्दल चिड निर्माण झाली होती. आपले या शहरात तसे ‘गॅाडफादर’ कोणीही नाही आणि आपण एक क्षुल्लक माणूस आहोत वगैरे वाटून रडायला यायचे, पण एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ दिसली होती, आपल्याकडे असलेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संपत्तीचा उपयोग फार जबाबदारीने करायला हवा.

एक तर आमच्यापैकी कोणीही गडगंज श्रीमंत नव्हते की एवढा वेळ आणि मानसिक ताण सहन करून या कामाला पुढे घेऊन जाऊ शकेल. कोणताही पूर्वअभ्यास न करता भावनेच्या भरात असे समाजकार्य आपण तडीस नेऊ शकत नाही याची जाणीव झाली. चारपाच दिवस अशी कामावर दांडी मारली (तेही पोलिस कम्प्लेंटसाठी) जी पोलिसच घ्यायला तयार नाहीत, तर आपले स्वत:चेच खायचे वांदे होऊ शकतात आणि आपण सध्या तरी या ‘समाजकार्य’ योग्यतेचे नाही, याची खाडकन जाणीव झाली. या व्यवस्थेशी लढायचे असेल तर कोणत्याही ठोस नियोजन, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय किंवा पूर्णवेळ तेच ध्येय ठेवून केल्याशिवाय हे फक्त दिवास्वप्नच राहते.

आमचे सर्वच प्रश्न आर्थिक नसले, तरी त्या सर्व प्रश्नांचा संबंध शेवटी आमच्या भौतिक परिस्थितीशीच होता. आम्हाला त्या वेळी दारुण अपयश, अपमान, आत्मक्लेश वाट्याला आला; पण शेवटी नोकरीवर गदा आली तर आमचेच आर्थिकच काय सामाजिक, कौंटुबिक आणि वैयक्तिक प्रश्न अजून गंभीर होणार होते. त्यामुळे आमची परिस्थितीही नक्कीच वाईट होणार आणि त्या वास्तवाकडे पाठ फिरवणे आमच्यापैकी कोणालाच परवडणारे नव्हते.

पुढे बरेच दिवस तो प्रसंग आठवला की मलाच माझी लाज वाटायची... त्या मुलांचे पुढे काय झाले असेल? कोणत्या नव्या सिग्नलवर ती मुले आता भीक मागत असतील? त्या दिवशी एखादा चाकूचा वार आमच्यापैकी कोणाला बसला असता तर? असे मनात येऊन भीतीही वाटायची. पुन्हा आपण त्यांच्यासोबत शेवटपर्यंत लढायला हवे होते वगैरे वगैरे.

आज मागे वळून पाहताना त्या खविस पोलिसमामांबद्दलही थोडाफार राग नक्की येतो; पण त्याच वेळी कळत नकळत त्यांच्यामुळे आम्हाला आमची खरी आर्थिक आणि सामाजिक ताकद, ज्ञान किती अपुरे आणि त्रोटक होते हेही कळाले होते. कदाचित तेव्हा तिथे थांबलो म्हणून आज इथे पोहचलो असेन... शेवटी ‘नशिबाचा खेळ.’

पैसे कमावण्याचा, सर्वाधिक बचत करण्याचा आणि ते पैसे योग्यरीत्या गुंतवणुकीचा ‘सर्वोत्कृष्ट काळ’ हा ‘तारुण्य’ असतो. (२१ ते ३० वय) शिक्षण पूर्ण करून आर्थिक कमाईला सुरुवात ते लग्न होईपर्यंत. आयुष्याला दिशा / कलाटणी देणारा काळ. सर्वप्रथम ‘Financial Freedom’चे नियोजन करावे; मग राजकारण, समाजसेवा किंवा मनोरंजन!

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

loading image
go to top