हार्डवर्कसोबत हवं स्मार्टवर्क

कॉर्पोरेटमध्ये २००६ पर्यंत मी बऱ्यापैकी सेट झालो होतो. माझे इंटरनल-एक्स्टर्नल नेटवर्किंग बरे असल्याने बऱ्याच नव्या लोकांच्या मेंटॉरिंगची जबाबदारीही माझ्यावर असायची.
Smartwork
Smartworksakal
Summary

कॉर्पोरेटमध्ये २००६ पर्यंत मी बऱ्यापैकी सेट झालो होतो. माझे इंटरनल-एक्स्टर्नल नेटवर्किंग बरे असल्याने बऱ्याच नव्या लोकांच्या मेंटॉरिंगची जबाबदारीही माझ्यावर असायची.

एखाद्या नवीन कार्यालयात काम करायला सुरुवात केल्यानंतर तिथली परिस्थिती सकारात्मकच असेल, हे सांगता येत नाही. अक्षरश: जीव तोडून काम करणारे काही असतात, त्यांना तुमच्याशी हितगुज करायलाही वेळ नसतो. काही काम सोडून इतर बरंच काही करत असतात. अशा कठीण परिस्थितीत तुमचा सॅण्डविच होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अशाच एका ऑफिसमध्ये आलेल्या न्यू कमर्सची कथा नकारात्मकतेवर मात करून यश मिळवता येते, हे सांगेल. कारण पैसे कमवायचे, वाढवायचे असतील तर हार्डवर्क हवेच; पण आता त्यासोबत स्मार्ट वर्कचीही तेवढीच गरज आहे.

कॉर्पोरेटमध्ये २००६ पर्यंत मी बऱ्यापैकी सेट झालो होतो. माझे इंटरनल-एक्स्टर्नल नेटवर्किंग बरे असल्याने बऱ्याच नव्या लोकांच्या मेंटॉरिंगची जबाबदारीही माझ्यावर असायची. अशातच एक तरुण मुलगा विजय (नाव बदललेय) आमच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या टीममधे रुजू झाला. ज्या दिवशी त्याने ऑफिस जॉईन केले, त्याच आठवड्यात माझे एक महत्त्वाचे ट्रेनिंग सुरू झाले. मला पुण्यात यशदाला जावे लागले. तिकडून परत आलो आणि पुन्हा लगेच काही महत्त्वाच्या मिटिंगसाठी दिल्लीला गेलो. त्यामुळे विजयसोबत म्हणावा असा संवादच होऊ शकला नाही. फक्त पहिल्या दिवशी इंडक्शनच्या वेळेस जी भेट झाली तेवढीच. त्यानंतर साधारण महिनाभरानंतर एक दिवस तो मला कॅन्टीनमध्ये एकटाच जेवताना दिसला. मी त्याच्यासोबतच जेवण घ्यावे आणि गप्पा माराव्या म्हणून सहज जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला महिनाभराच्या कामाचा फिडबॅक विचारला आणि त्याला त्याचे काम कसे वाटतेय, काही अडचणी आहेत का, असे ठराविक प्रश्न विचारले तेव्हा तो फार तणावात जाणवला.

तो म्हणाला, ‘‘मला डिपार्टमेंट बदलून हवेय. या कामात मला अजिबात आनंद मिळत नाही. जॉबरोलही चेंज करून हवाय आणि हे होत नसेल तर माझी मुंबईतून ट्रान्सफर करावी,’’ अशी विनंती तो आमच्या जनरल मॅनेजरकडे त्या दिवशीच करणार होता. हे सगळं त्याने एका दमात सांगून टाकलं.

मी शॉक झालो. याची तर किराना मालची यादी तयार असावी किंवा बकेटलिस्ट रेडी असावी तशीच तयारी होती. मग मी त्याच्याकडून अजून डिटेल्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तोही प्रामाणिकपणे सर्व सांगत गेला. शेवटी हळूहळू का होईना; पण नक्की काय प्रकार झाला ते माझ्या लक्षात आलं.

तो आमच्या ज्या सहकाऱ्यासोबत महिनाभर काम करत होता, तो दिवसभर अत्यंत निगेटिव्ह कमेंट करत बसायचा. कंपनीबद्दल, मॅनेजरबद्दल सतत नाखूष असायचा. त्याला त्याचे साहेब काही बोलले की, ‘‘आपण एवढे प्रामाणिकपणे काम करतो तरी कंपनीला कशी आपली कदर नाही आणि इकडे जॅाब सेक्युरिटी कशी वाईट आहे, पॅालिसी योग्य नाहीत... राजकारण कसे काय चांगल्या लोकांना संपवून टाकते...’’ वगैरे, वगैरे बाबींनी याचे डोके भंडावून सोडायचा. विजयने ज्या मॅनेजरच्या जागेवर जॉईन केले होते, तो कसा इथून निघून गेला, त्याविषयीच्या खोट्या सुरस कथाही याला ऐकवल्या होत्या. त्यामुळे एकंदरीतच विजयचा पराजय झाला होता. या नकारात्मक वातावरणाचा इतका प्रभाव पडला, की त्याने आपली इथे ओळख निर्माण करण्याच्या शक्यता आणि चांगल्या संधींकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले.

मी त्याचे सर्व बोलणे ऐकल्यावर शांतपणे त्याला विचारले, ‘तुला या नोकरीची खरंच गरज आहे का?’’

तो म्हणाला, ‘‘हो हो! अगदीच.’’

मी पुढे विचारलं, ‘‘तुझा आताचा बॉस तुझ्या मागच्या बॉसपेक्षा चांगला, हुशार आहे का?’’

त्यावरही विजय ‘‘होय’’ म्हणाला.

विजय पुढे म्हणाला, की ‘‘मागचा पूर्ण महिना मी रोज जवळजवळ १२ ते १४ तास काम करतोय; पण तरीही प्रचंड तणाव आहे. कामात मजाच येत नाही. काय करावं काही सुचतच नाही. नवं काही करायला जावं तर भीती वाटते किंवा त्याचे दुष्परिणाम काय होतील याचीच चिंता जास्त वाटते.’

खरं तर मुद्दा तो किती वेळ काम करतो किंवा काय करतो हा नव्हताच. तो सतत नकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत राहत होता, त्यामुळे त्याचा विचका झाला होता.

जो आमचाच सहकारी त्याला हे इनपुट्स देत होता, तो स्वत: अत्यंत टुकार आणि फक्त पाट्या टाकण्याच्या कामाचा होता. तो तिकडे फक्त काही वरच्या लोकांची चापलुसी करून नोकरी टिकवून होता. अशी नवीन लोकं आली की त्यांचा ‘बकरा’ बनवायचा हा त्याचा आवडीचा छंद होता. विजय बिचारा खेडेगावातून आलेला. एका लहान कंपनीतून थेट कॉर्पोरेटची त्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे तो अलगद त्याच्या जाळ्यात अडकलेला.

मग मी अत्यंत शांतपणे विजयसोबत चर्चा केली. त्याला या सर्व राजकारणाबद्दल स्पष्ट सांगितले. माणसामाणसांत विष पेरणारे इतिहासातही होते, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही असतील, मग ते क्षेत्र कोणतेही असो. आता आपण त्यांच्यासोबत वाहत जायचे की आपण आपला वेगळा रस्ता तयार करायचा, हे आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते.

पुढे कॉर्पोरेटशी संबंधित ज्या बाबी सांगितल्या, त्यातील काही ठळक मुद्दे असे-

१. इतर लोकं काय म्हणतात, याकडे अजिबात लक्ष न देता तुमच्या स्वत:च्या नावीन्यपूर्ण कल्पना बिनधास्त राबवा.

२. तुम्हाला जे काम करायचेय त्यासाठीच्या स्कील डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल, यावर फोकस करा.

३. आपल्या आयुष्यात आपण कोणाच्या सान्निध्यात राहतो, कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो याचा खूप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती असेल तर प्रगती आणि सुख निश्चित मिळेल.

४. वेळेचे जास्तीत जास्त चांगले नियोजन करून प्रॉडक्टिव्ह आणि रिझल्ट ओरिएण्टेड कामावर लक्ष द्यायचे.

५. जगात कुठेही गेलात तरी अशी नकारात्मक लोकं भेटणारच आहेत, ते काय म्हणतात यावर विश्वास ठेवला तर आयुष्यात कधीच प्रगती होऊ शकणार नाही.

पुढील आठवडाभर मी आमच्या मोठ्या साहेबांना विनंती करून त्याला इतर लोकांसोबत ठेवले. मी स्वत: त्याचे डेली रिपोर्टस् चेक केले. पुढील अगदी काही दिवसांतच विजय अत्यंत समाधानाने हसतफिरत ऑफिसमध्ये रुळून गेला. पुढच्या काही महिन्यांतच त्याचे कंपनीकडून रिवॉर्ड व चांगल्या कामाबद्दल भरपूर कौतुकही झाले.

अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो तसे- Stay away from negative people, they have a problem for every solution. एकदा हे समजले, की आपण नक्की कोणासोबत असायला हवं, हे ठरतं आणि मग तशी ठोस कृतीही आपण करतो.

मंडळी, आपण चांगल्या शाळा-कॉलेजात शिकतो. पुढे कोणत्या तरी ठिकाणी नोकरी-धंदा सुरू करतो. कुटुंबात असा अनुभव असणारे कोणी असेल तर ठीक, नसेल तर मात्र फार मोठे संकट आ वासून उभे असते. नक्की काय, कसा प्रवास करायचा हा प्रश्न असतो. पुढे बरे पैसे यायला लागले की आपण वेगवेगळ्या नव्या जमान्याच्या वस्तू घेतो. हातात स्मार्ट वॅाच घालतो, स्मार्ट फोन वापरतो, पण माणसं म्हणून स्मार्ट बनतो का?

आपल्याला अशी बेरकी लोकं सहज फसवतात. आपल्या भावनांशी खेळून आपल्या करियरचा, आयुष्याचा खेळखंडोबा करतात.

खेडेगावातून आलेल्या आपल्या साध्या पोरापोरींना तर हे सहज डिप्रेस करतात. या अडथळ्यांना ओळखायला शिकायचं. साधी, मध्यमवर्गीय लोकं सहसा कोणावरही सहज विश्वास ठेवतात, करियर, आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित गोष्टींमध्ये स्मार्ट होणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार करणं अत्यंत गरजेचं बनलं आहे.

आपली माती सुपीक आहे, कॉर्पोरेट क्षेत्रही आपण सहज पादाक्रांत करू शकतो, त्यासाठी बुद्धीचा वापर अन् लवचिकता वाढायला हवी. नकारात्मकतेवर मात करून यश मिळवता यायला हवं. खऱ्या अर्थाने स्मार्ट बनता यायला हवं. पैसे कमवायचे, वाढवायचे असतील आणि प्रोफेशनल आयुष्यात यश मिळवायचे असेल तर हार्डवर्क हवेच; पण आता त्यासोबत स्मार्ट वर्कचीही तेवढीच गरज आहे. त्यातही चांगल्या, वाईट माणसांची पारख हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कळायला हवा.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com